“रायगड..” जिथे इतिहास श्वास घेतो !!

WhatsApp Group Join Now

  “प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीशिवछत्रपती महाराज की जय !” या घोषणेने अवघा भारतवर्ष दुमदुमला. त्याच आवाजाची गाज ऐकायला, त्या ‘दुर्गदुर्गेश्वराचा’ ट्रेक पूर्ण करण्यासाठी आता आपणही जायचंच. ठरलं तर मग.

     तोच शिवकाळ पुन्हा एकदा अनुभवता यावा ह्या विचाराने आम्ही शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या पंढरीला म्हणजेच रायगडावर जाण्यास सज्ज झालो. आणि आम्ही मराठा साम्राज्याच्या संस्थापकाच्या राजधानीकडे निघालो.

     किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचताच, सभोवतालचा नजारा जरा डोळ्यात साठवतोय तेवढ्यात वरती नजर पडली. जणू आखाड्यात तालमीच्या पैलवानाने त्याच्या पिळदार मिशीवर रुबाब दाखवावा तसा सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडणारा रायगड कसा विराजमान आहे हे त्याच्या थाटावरुन उमगले. गडाच्या पहिल्या पायरीवर माथा टेकवून गडचढाईला सुरवात केली. आता तुम्ही म्हणाल, बाकी गडांच्यावेळी फक्त नमस्कार मग ही मानाची शाल फक्त रायगडालाच का? अगदी बरोबर आहे तुमचं. अहो, ह्या पायरीवरून कित्येक बारीला राजांचं जाणंयेणं झालं असेल. राजांच्या पायधुळीचा थोडासा जरी अंश माझ्या माथी लागला तरी पवित्र अशा रायगडाच्या कुशीत जन्म घेतल्यासारखं माझ्या आयुष्याचं सार्थक होईल – “त्याचसाठी केला होता अट्टाहास!” म्हणूनच त्या पायर्‍यांवर नतमस्तक होऊन “पादस्पर्शे क्षमस्वः” म्हणत क्षणभराचीही विश्रांती न घेता नेहमीप्रमाणे हातात काठी घेऊन सुरवात केली.

     रायगडाच्या १४०० पायर्‍यांच्या वाटेवरून चढताना होणाऱ्या अतीव आनंदाने शरीर पिसासारखं हलकं हलकं वाटत होतं. वाटेत कुठे मोठ्या दगडी पायर्‍या, नागमोडी वाटा आणि आजूबाजूला दिसणार्‍या दऱ्या, तर कुठे रायगडाच्या रखवालदाराप्रमाणे भासणारे अजस्त्र असे काळे कुळकुळीत पाषाण आहेत.

     चोहोबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला हा किल्ला सह्याद्रीच्या किल्ल्यातील रांगांचा एक दुवा आहे. निसर्गतः डोंगररांगांनी वेढलेला असल्यामुळे शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा यासाठी पुणे सोडून पश्चिम डोंगरातील रायगड हा किल्ला महाराजांनी राजधानी म्हणून निवडला. तेथे आम्ही महाराजांच्या अस्तित्वाची अनुभूती घेत होतो.

     परंतु, थोडं चढतो न चढतो तोच ढगाळ वातावरण तयार झालं. बरं झालं, ऊन नाही तोपर्यंत पटकन चढाई करुन घ्यावी ह्या विचाराने वेग वाढवला. एवढ्यात २ – ३ पावसाचे थेंब ठिबकले. पाऊस आणि अचानक? क्या बात है… मस्तच की ! अवकाळी पावसातील पहिली गडचढाई. मनाला विसावा देत एक एक पायरी चढत असतानाच जोरात सोसाट्याचा वारा सुटला.

     लाकडी खांब आणि काठ्या रोवून जी काही लहान रिकामी दुकाने होती त्यांच्या आडोशाला आम्ही आता उभे ठाकलो होतो. बाप रे बाप !! आकाशात जोरदार विजा चमकायला लागल्या आणि सुरु झाले ते तांडव !! प्रत्येकजण आडोशाला शांत उभा होता. तेवढ्यात अगदी समोरच तेजस्वी लखलखाट झाला. सारेजण बारीक नजर करुन बघत होते. सह्याद्रीच्या दर्‍या खोर्‍यातुन जणू जमीनीला मोहस्पर्श करुन वीज नाहीशी होत होती. नेहमी घरात असताना खिडकीतून आकाशाकडे आपल्याला वीज दिसते. परंतु इथलं दृश्य निराळंच… म्हणजे, गच्चीत क्रिकेट खेळताना वरुन जर बाॅल खाली पडला तर तो कुठे पडला हे पहाताना वाटणारं कुतूहल इथे विजेच्या बाबतीत वाटत होतं.

     साधारण अर्ध्या तासानंतर वातावरण निवळलं. आणि आता तर खरं निसर्गसौंदर्य अनुभवायला मिळणार होतं. माती ओलेचिंब झाली होती. पाय घसरत होते.

     मजलदरमजल करीत पायर्‍या चढत महादरवाजा गाठला. काय ती तटबंदी, दरवाजावरील कोरीव काम, आखणी.. नेत्रदीपक जणू ! हळूहळू पोहोचलो की. रायगडाचा जणू काही अभिषेक झाला होता. राजसभेत पोहोचताच महाराजांना पाहून मन सुखावले आणि मनाला जणू भुरळच पडली. सुरेख इंद्रधनुष्याची कमान… किती अल्हाददायक वातावरण. राजांना मानाचा मुजरा करुन संपूर्ण रायगडाची सफर केली.

     गड बघताना पहिली आगेकूच टकमक टोकाच्या दिशेने केली. ज्या कड्यावरून, देशाशी बेईमानी करणाऱ्या गद्दारांना खाली लोटून दिले जात असे त्या टकमक टोकावरून दिसणारं रायगडाचं रौद्रभिषण रुप अवीट आहे. टकमक टोकावरून पाचाडची खिंड, वर येणारा रस्ता, काळ नदीचे पात्र, तेथील छोट्या – छोट्या वस्त्या, डोंगराचे लाटांसारखे पडलेले कप्पे फारच आकर्षक आहेत. इथूनच मागे होळीचा माळ आहे, त्याच्यापुढे शिर्काई देवीची छोटी मुर्ती आहे, जगदीश्वराचं मंदीर मोठं आणि काळ्या पाषाणांनी सुबक घडवलं आहे, मंदिराच्या पूर्व दरवाज्यापासून थोड्या अंतरावर अष्टकोनी चौथरा आहे. तीच त्या ‘युगकर्त्याची’ समाधी आहे.

     पृथ्वीवर रायगडाच्या मेघडंबरीत सिंहासनारुढ महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी जणू स्वर्गच असल्याचा भास होतो. एकेकाळी ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर श्रीशिवछत्रपती सिंहासनारुढ झाले होते.

     रायगड किल्ला ज्यांनी आराखडा करुन महाराजांना बांधुन दिला त्या कारागिराचे, म्हणजेच ‘हिरोजी इंदुलकर’ यांचे नाव एका दगडावर कोरलेले आहे. त्यांनी महाराजांना सांगितले होते की, ‘महाराज, मी गडाची बांधणी अशी केली आहे की, वर येईल तो फक्त वारा आणि खाली जाईल ते फक्त पाणी !!’ त्यामुळेच अशा अभेद्य गडाची महाराजांनी राजधानीसाठी निवड केली होती.

     आम्ही रायगडावर गेल्यापासूनच अगदी शिवमय झालो होतो. असा युगकर्ता राजा युगायुगातून एकदाच जन्माला येतो. तो आपल्या भारतभुमीत जन्माला आला याचा अभिमान वाटत होता. आता अंधार पडला… पुन्हा एकदा सभोवार नजर टाकून आणि गडावरील दृश्य मनात साठवून गडउतार झालो. पायथ्याशी असलेल्या गावात मस्त सगळ्यांसोबत जेवण करुन त्या अजरामर वास्तुचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.

     महाराज आज देहरुपाने जरी नसले तरी त्यांच्या विचारांच्या ठिणग्या किती जाज्वल्य आहेत. खरंच महाराजांचा हा ठेवा जतन करण्यासाठी आयुष्यात एकदा तरी रायगडावर जायलाच हवं.

लेखिका –

(ठाणे)

मो. नं. ९६०४५७७५३३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top