What is Intelligence and Types of Intelligence in Marathi l बुद्धिमत्ता म्हणजे काय व त्याचे प्रकार किती आहेत?

WhatsApp Group Join Now

बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर अनेक शास्त्रज्ञांनी किंवा तत्त्वचिंतकांनी बुद्धिमत्तेची वेगवेगळी व्याख्या केलेली आहे. वुडवर्थ ने म्हटले आहे की “विचार कौशल्यांचा प्रकट उपयोग म्हणजे बुद्धिमत्ता”. विलियम स्टर्न ने म्हटले आहे की “बाह्य परिस्थितीशी जुळवून घेताना स्वतःचे योग्य समायोजन करण्याचे सामर्थ्य म्हणजे बुद्धिमत्ता”. बुद्धिमत्ता हा एक अतिशय गहन विषय आहे.प्राचीन काळापासून बुद्धिमत्ता म्हणजे काय? यावर वेगवेगळ्या देशातील लोक अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात आहेत .

प्रत्येकाचे मत वेगवेगळे आहे. पण जो माणूस बुद्धिमान आहे तो आपले जीवन योग्य तऱ्हेने परिस्थितीशी समायोजन करून बरेचदा अमूर्त पातळीवर सुद्धा विचार करून त्याला एक दिशा देतो व यश साधतो तोच खरा बुद्धिमान.निसर्गाने मनुष्याला जन्मतःच बुद्धिमत्ता दिली आहे. पृथ्वीवरील इतर प्राण्यांपेक्षा तो नक्कीच मानसिक दृष्ट्या सक्षम आहे.त्याचा मेंदू इतर प्राण्यांपेक्षा अधिक विकसित आहे. मनुष्याचा मेंदू अनेक प्रकारच्या भावना नियंत्रित करतो. उच्च कोटीचा विचार करतो. स्मरणशक्ती, स्पर्श श्वासोच्छ्वास, लैंगिक भावना, आजूबाजूच्या परिस्थितीवर विचार करणे भूक, दृष्टी, इच्छा इत्यादी अनेक गोष्टी नियंत्रित करतो. या सगळ्या गोष्टींवर विचार करून त्याला कसा प्रतिसाद द्यायचा आहे हे तो मेंदू ठरवतो. जितका मेंदू प्रगल्भ होत जाईल, तितकाच प्रगल्भ विचार ती व्यक्ती करत असते.

   दोन मुलांची जर आपण तुलना केली तर त्यांची बुद्धिमत्ता वेगवेगळ्या विषयात असू शकते. एखादा मुलगा संगीतात हुशार असू शकतो तर दुसरा चित्रकलेत. म्हणूनच लहानपणापासून मुलांचा मेंदू कसा विकसित करण्यात येईल यावर भर देण्यात येतो. त्याच्या वेगवेगळ्या क्षमता ओळखून त्या दृष्टीने त्याला तयार करण्यात येते.

  जी व्यक्ती बुद्धिमान असते तीच बलवान ठरते. कारण बुद्धीच्या जोरावर माणसाला यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करता येतात. निसर्गाने मनुष्याला दिलेले हे वरदानच आहे. बुद्धिमान व्यक्तींमध्ये निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा उच्च कोटीची असते.

    आता मेंदूची बुद्धिमत्ता म्हटली तर ती एकच नाही. अशा अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता माणसांमध्ये समाविष्ट असतात. तो जशा वातावरणात राहतो, त्याची अनुवंशिकता , तो कुठले विषय शिकतो आहे,तशी बुद्धिमत्ता तयार होत जाते.

  बुद्धिमत्तेचे प्रकार कोणते ? –

१) भाषिक बुद्धिमत्ता-ही बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्ती अतिशय चांगल्या प्रकारचे लेखन करतात. कवी,नाटककार, लेखक अशा व्यक्तींमध्ये ही बुद्धिमत्ता अफाट असते. हा गुण बहुतेक अनुवंशिक आलेला असतो.आजी, आजोबा ,आईआणि वडील यापैकी कोणीतरी चांगलं लिखाण करतं. किंवा अतिशय चांगल्या प्रकारची भाषा त्यांना वापरता येते. या प्रकारची बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती अतिशय वाचन वेड्या असतात. त्यांना शब्दांचे अचूक ज्ञान असते. कुठले शब्द कुठे वापरायचे, वाक्यरचना कशी करायची, यात ते खूप हुशार असतात.त्यातच त्यांनी आपलं पुढील शिक्षण घेतले, तर ते अतिशय चांगल्या प्रकारे नाव कमावू शकतात. लहानपणापासूनच अशा मुलांना भरपूर पुस्तके वाचण्यास देऊन त्यांना लेखन करण्यास प्रोत्साहित केले गेले पाहिजे.

२) नैसर्गिक बुद्धिमत्ता-या प्रकारची बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्ती निसर्गाशी खूप लवकर जवळीक साधतात. झाडं, फळं, फुलं, माती, पाणी इत्यादी गोष्टींचे त्यांना खूप आकर्षण असते. खूप सहज प्रकारे या व्यक्ती निसर्गातील वस्तू ओळखतात. जसे, प्राणी झाडे इत्यादी. ही बुद्धिमत्ता असणारे मुलं सहजपणे पर्यावरणवादी, पक्षी निरीक्षण करणारे, शेतकरी भूगर्भ शास्त्रज्ञ, बाग काम करणारे, प्राणी संशोधन करणारे असे घडू शकतात. अशा मुलांना सहलीं करता तसेच जंगलांमध्ये झाडे, पशु,पक्षी ओळखण्यासाठी घेऊन जायला हवे.

३) तार्किक बुद्धिमत्ता– ही बुद्धिमत्ता असणारे लोकं गणित या विषयात अत्यंत हुशार असतात. तर्क लावणे, तसेच गणित सोडवताना वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करणे, संख्येबाबत त्यांचे ज्ञान अफाट असते. तसेच या व्यक्तींना कम्प्युटरचे पण खूप ज्ञान असते .त्यामध्ये त्यांना मुख्यतः प्रश्न सोडवणे ही संकल्पना खूप आवडते .कुठल्याही प्रश्नाचे उत्तर ते तर्क लावून बरोबर सोडवतात. या प्रकारची बुद्धिमत्ता असणारे लोकं मुख्यतः कॉम्प्युटरशी निगडित विषयांमध्ये ज्ञानी असतात. तसेच गणित, शास्त्र या ,वेगवेगळ्या विषयांमध्ये नवीन संकल्पना तयार करणे व ती सोडवणे यामध्ये पुढे शिकतात व हुशार असतात. अशा मुलांना एखाद्या गणिताला सोडविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब कसा करता येईल यासाठी सराव दिला पाहिजे.

४) दृश्य बुद्धिमत्ता– या बुद्धिमत्तेच्या व्यक्ती साधारणतः त्यांच्या आजूबाजूच्या वस्तू, त्यांचा आकार, वेगवेगळे चित्र, कल्पना यामध्ये खूप रमतात. त्यातून ते काहीतरी वेगळ्या प्रकाराचे अनुमान काढण्यास सदैव उत्सुक असतात. त्या आकारांबद्दल, चित्रांबद्दल त्यांना कुतूहल असते. असे विद्यार्थी साधारणपणे इंजिनियर, आर्किटेक्ट चित्रकार व कलेमध्ये निपुण असतात. या मुलांना कोडी सोडवणे, रंग भरणे वेगवेगळ्या प्रकारचे आकार एकमेकांना संगत ठेवणे अशा गोष्टींचा सराव दिला पाहिजे.

५) शारीरिक बुद्धिमत्ता-अशी मुले साधारणतः आपल्या शरीराचा उपयोग अतिशय चांगल्या प्रकाराने करू शकतात .त्यांना कुठल्या वेळी आपल्या शरीराची हालचाल कशी करायची याचे योग्य ज्ञान असते. शारीरिक दृष्ट्या ते सक्षम असतात. त्यांचे स्वतःचे स्नायू बळकट करण्याकडे त्यांचा भर असतो. अशी मुले साधारणतः खेळाडू, नृत्य करणारे, फिटनेस कोच या प्रकारामध्ये आपले पुढील शिक्षण किंवा आपले करिअर घडवू शकतात. या मुलांना लहानपणापासूनच कसरती करणे, नृत्याच्या शाळेत पाठवणे, तसेच वेगवेगळे योगासनांचे प्रकार शिकवणे यासाठी पालकांनी लक्ष दिले पाहिजे.

६) व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता-अशा प्रकारची बुद्धिमत्ता असणाऱ्या लोकांना स्वतःबद्दल, स्वतःच्या शरीराबद्दल किंवा मनाबद्दल अतिशय जाणीव असते. त्यांना काय हवे आहे किंवा पुढे काय करायचे आहे, याबाबतीत ते खूप स्पष्ट असतात .त्यामुळे पुढे जाऊन त्यांना काय शिकायचे आहे, किंवा कोणाशी संबंध ठेवायचे आहे किंवा ते कोणाबरोबर सहजपणे राहू शकतात, याबाबतीत आधीच ठरवून ठेवतात. स्वतःच्या भावना व विचार प्रक्रिया यांच्याबद्दल त्यांना योग्य जाणीव असते व वेळोवेळी ते जीवनात या विचार प्रक्रियेचा उपयोग करतात. आयुष्याचा मार्ग आखतांना ही विचार प्रक्रिया त्यांना खूप कामी येते. अशा मुलांना त्यांचे प्रश्न शांतपणे त्यांचा वेळ देऊन सोडवण्यास मदत केली गेली पाहिजे.

७)आंतर वैयक्तिक बुद्धिमत्ता-अशा प्रकारचे लोक इतर लोकांना खूप छान प्रकारे समजू शकतात. समोरच्या माणसाचे गुण किंवा तो काय विचार करतो आहे, त्याच्या भावना इत्यादी समजून घेण्यात ते हुशार असतात. असे लोक समाजसेवक, नेता इत्यादी बनू शकतात. ज्यांना लोकांमध्ये काम करण्याची आवड आहे अशा लोकांना ही बुद्धिमत्ता अधिक प्रमाणात असते. ही माणसे अतिशय उत्तम लोक संग्रह करतात. तसेच आपली नाती चांगल्या प्रकारे टिकवतात. त्यांना खूप चांगले टीमवर्क करता येते. या मुलांना ज्या ठिकाणी सभा आहेत किंवा चर्चासत्र, भाषण अशा ठिकाणी घेऊन जायला हवे.

८) सांगितीक बुद्धिमत्ता-अशा मुलांना निसर्गानीच बुद्धिमत्ता बहाल केलेली असते. ही बुद्धिमत्ता अनुवंशिक सुद्धा असते .ही मुलं स्वर, सूर आणि आलाप याबद्दल अतिशय जागरूक असतात. त्यांना संगीताची खूप जाण असते व त्यातील लय त्यांना समजते. अशी मुलं गायक, संगीतकार यासारखे करिअर घडवतात. त्यांना निसर्गात, पशुपक्षी यांचे आवाज यांमध्ये सुद्धा संगीत सापडते. या मुलांना अतिशय चांगल्या प्रकाराने वाद्य वाजवण्याची जाण असते. या मुलांना संगीत शिकणे वाद्य वाजवणे गाण्याचे कार्यक्रम या ठिकाणी घेऊन जायला हवे

९) अस्तित्वनिष्ठ बुद्धिमत्ता-ही बुद्धिमत्ता ज्यांची खूप प्रमाणात असते, अशा व्यक्तींना मी कोण? याचा शोध घेण्याची खूप आवड असते. तसेच निसर्ग किंवा स्वतःबद्दल त्यांना माहिती शोधून काढायची असते. मानवी अस्तित्वाबद्दल खोलात जाऊन माहिती काढायची असते निसर्गाचा उगम किंवा स्वतःचा उगम कसा झाला ?याबद्दल त्यांना खूप कुतुहल असते. अशा व्यक्ती साधारणतः आध्यात्मिक असतात. या मुलांना ध्यान करणे, योगासन करणे ,अध्यात्मिक पुस्तक वाचणे यासाठी मदत केली गेली पाहिजे.

    प्रत्येक जन्मलेल्या मुलांमध्ये अशा प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. पण ज्या वातावरणात तो राहतो किंवा शिक्षण घेतो, त्याप्रमाणे त्या बुद्धिमत्तेचा विकास होतो.

     शाळेमध्ये साधारणतः भाषिक तार्किक आणि शारीरिक बुद्धिमत्तांचा विकास केला जातो. बाकीच्या बुद्धिमत्तांचा विकास करण्याची जबाबदारी पालकांची असते

   वरील बुद्धिमत्तेचा विकास जर घडवायचा असेल तर लहानपणापासून प्रत्येक बुद्धिमत्ते करता जर काही सकारात्मक वचनं रोज म्हटली किंवा सकारात्मक वाक्य त्या मुलांच्या आजूबाजूला लिहून ठेवली किंवा त्यांच्या मनावर बिंबवली तर त्यांच्या बुद्धीचा विकास नक्कीच होतो.

 वरील प्रकारच्या बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी अनेक शोध घेतल्या जातात. बुद्धिमत्ता मापनासाठी फ्रेंच मानसशास्त्रज्ञ बिने यांनी १९०५ साली पहिली बुद्धिमत्ता चाचणी तयार केली. वेगवेगळ्या वयोगटा करता वेगवेगळ्या बुद्धिमत्ता चाचणी तयार केल्या गेल्या आहेत. त्याच्या मृत्यूनंतर मेरिल या मानसशास्त्रज्ञानी त्या चाचणीच्या सुधारित आवृत्ती तयार केल्या.अनेक शिक्षण शास्त्रज्ञ यावर शोध निबंध लिहित असतात. त्या अनुसार अनेक बुद्धिमत्ता चाचणी तयार केल्या जातात. मुलांची बुद्धिमत्ता तपासली जाते. अशा प्रकारे देशातील पुढील पिढी अधिक प्रगल्भ बनवण्यास याची मदत होते.

बुद्धिमान व्यक्तींनी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर उत्तम समाज बांधणी आणि देशबांधणी साठी करावा ही अपेक्षा आहे. याची जबाबदारी शाळा, समाज आणि कुटुंब यांच्याकडे असते.

तुम्हाला हि माहिती कशी वाटली ? जरूर कमेंट करा आणि अश्याच माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.

15 thoughts on “What is Intelligence and Types of Intelligence in Marathi l बुद्धिमत्ता म्हणजे काय व त्याचे प्रकार किती आहेत?”

  1. अतिशय सुंदर. आणि प्रगल्भ लेख
    नेटका पण वाटलाआणि सर्व व्यापी पण वाटला !
    🌹

  2. मेधा deshpande

    उपयुक्त माहिती. तरी ज्ञानप्रभोदिनी चा IQtest चा तक्ता द्यावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top