Preparation Tips for 10th Standard Exam in Marathi: महाराष्ट्रातील जवळ जवळ १७,००,००० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक तणावात आहेत. ह्या तणावातून बाहेर पडण्यासाठी पालक व विद्यार्थी यांना काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करावे लागेल.
माहिती परीक्षेविषयी :-
महाराष्ट्र राज्य प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १० वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जेणेकरून सर्व शाळा व विद्यालये आपापल्या विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करून घेतील. यंदा ही परीक्षा १ मार्च पासून सुरू होत आहे. परीक्षेचा कालावधी १ मार्च ते २२ मार्च २०२४ पर्यंत आहे. परीक्षेचे वेळापत्रक www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.

तयारी मनाची:-
विद्यार्थी इयत्ता पहिलीपासूनच दरवर्षी परीक्षा देत असतो. त्याला माहित असते की तो पास झाल्यावर वरच्या वर्गात जाणार आहे. पण शालेय जीवनाचे अंतिम वर्ष दहावी यांनतर त्याच्यासाठी बाहेरील जगाचे दरवाजे उघडणार आहेत. याचवेळी विदयार्थी आणि पालक यांनी निवडायचा असतो तो योग्य मार्ग. म्हणूनच दहावीच्या परीक्षेला खूप महत्त्व आले आहे. बोर्ड परिक्षेआधी असलेला एक महीना खूपच तणावाचा आणि महत्वाचा असतो. कित्येक विद्यार्थी बऱ्यापैकी अभ्यास होऊन ही विलक्षण तणावात असतात. तर काही विद्यार्थी यांची अजून अभ्यासाची तयारी बाकी असते. तेही या तणावात असतात. हा जो ताण आहे तो या वेळी पालकांना फार काळजीपूर्वक हाताळता आला पाहिजे. पालकांनी सतत अभ्यास कर अशी मुलापाठी भुणभुण लावू नये. कारण पालकही ह्या स्पर्धेच्या युगात माझा पाल्य टिकून राहिला पाहिजे यासाठी तणावात असतात. या वेळी पालकांनी काय करावे आणि काय करू नये याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन करत आहेत.
पालकांसाठी नम्र सूचना:-
शाळा व विद्यालय यांनी १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रिलियम घेतल्या आहे. काही घेत आहेत. जेणेकरून विद्यार्थी व पालक यांना अभ्यास कितपत झाला आहे? लिखाण करताना कोणत्या अडचणी येत आहेत? याची कल्पना येत आहे. आता केवळ एक महिना राहिल्यामुळे पालकांनी मुलांना कसे समजावून घ्यावे. ह्याबद्दल काही टिप्स येथे देत आहोत.
• सर्व पालकांना आपल्या पाल्याची कितपत तयारी झाली आहे याची कल्पना आली आहे. त्यामुळे हाती असलेला एक महिना नियोजनपूर्वक अभ्यास करण्यास मदत करावी.
• प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याची क्षमता ओळखता आली पाहिजे व त्यानुसारच मुलांकडून अपेक्षा ठेवाव्यात.
• आपल्या पाल्यावर न चिडता, न रागवता अभ्यासाची रोज चौकशी करावी.
• पालकांनी पाल्याला विश्वास द्यावा की तू प्रयत्न करून यश मिळवू शकतो.
• सतत नकारात्मक बोलणे टाळा. जेवढे शांत राहता येईल तेवढे राहावे.
• आपल्या पाल्याची तुलना दुसऱ्या कोणाशीही करू नका.
• जेवताना, टी व्ही बघताना त्यांना अभ्यासाबद्दल टोकू नका. फक्त वेळेचं भान द्या.
• मुलांशी इतर विषयांवर देखील छोटी चर्चा करू शकता. जेणेकरून भाषा विषयातील लेखन कौशल्य करताना फायदा होईल.
• वेळ कमी आहे. तुझा अजून अभ्यास पूर्ण झाला नाही असे दिवसभर निगेटिव्ह बोलू नये.
• मुलांना सांगत रहा, माझी काय मदत हवी असेल तर बिनधास्त सांग. ज्यामुळे त्यांच्या मनावरचे अभ्यासाचे ओझे, अपेक्षांचे ओझे हलके होईल. तुमची मुले तुमच्याशी बोलताना संकोचणार नाहीत.
• प्रत्येक आई, आपल्या मुलांसाठी ह्या काळात एक महत्त्वाचा आधार असते. आईने मूल अभ्यास करताना त्याच्याजवळ बसावे. त्याच्या आवडीचे पदार्थ करावेत.
• सतत आपल्या पाल्याला सांगावे की तू उत्तम करत आहेस. तू यशस्वी होत आहेस. तुझे ध्येय तु नक्कीच गाठू शकतोस. यामुळे मुलांना ही अभ्यास जोमाने करावासा वाटतो.
आपल्या मुलांना या जगात समजून घेणारे फक्त आपण पालकच असतो म्हणून कोणताही ताण न घेता व देता ही परीक्षा बिनघोर पार पडेल अशी आशा बाळगूया.
विद्यार्थी मित्रहो तुमच्यासाठी :-
प्रिय विद्यार्थी मित्र, तुम्ही मुलगा असो वा मुलगी तुमच्यासाठी दोन शब्द सांगत आहे. जगात तुम्हाला तुमचे आई वडील जेवढे प्रेम करतात तेवढं कोणीच करू शकत नाही. हे तुमच्या मनावर ठासून घ्या. तुमच्या अडचणी, चुका त्यांच्या इतके कोणी समजून घेऊ शकत नाही. तुम्हाला सतत अभ्यास कर, अभ्यास कर म्हणत असतील तर ती कटकट नाही त्यांची काळजी आहे. सगळेच पालक शिक्षित नसतात. त्यांना तुमच्या अभ्यासक्रमातील झालेले बदल कळत नसतील, पण जगाच्या व्यवहाराबद्दल चांगले ज्ञान आहे. म्हणून ह्या स्पर्धेच्या युगात तुम्ही टिकून राहावे व पुढचे आयुष्य चांगले जगता यावे यासाठीची त्यांची धडपड आहे. म्हणून या एका महिन्यात तुमचे १००% योगदान देणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला ही आत्मिक समाधान लाभेल.
हे झालं पालक व विद्यार्थी यांची भावनिक गुंतवणूक याबद्दल आता विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा हे पाहूया.
अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्ये :-
पहिल्यापेक्षा आता अभ्यासक्रम खूपच सुटसुटीत व चालू काळानुसार आहे. पुर्वी मुले पाठांतर करून परीक्षा पास होत असत पण त्याचे बरेच दुष्परिणाम मुलांना पुढच्या काळात अनुभवावे लागले आहेत. पण आता या अभ्यासक्रमात नवीन आव्हाने आहेत. मुलांनी पाठांतरापेक्षा विषय भरपूर वेळा वाचवा. विषय समजून घ्यावा जेणेकरून त्यांच्या ज्ञानात भर पडेल.
स्वतःचा स्वीकार:-
प्रत्येक विद्यार्थ्याला आपण कितपत तयारी केली आहे हे माहीत असते. त्यामुळे त्यांनी आता आपण अजून किती अभ्यास करू शकतो? व नियोजनपूर्वक कसे सगळे विषय हाताळू शकतो? याचा नक्कीच विचार करावा.
वेळेचे नियोजन:-
• सर्वप्रथम सर्व विषयांचा किती अभ्यास झाला आहे याची एक थोडक्यात यादी करा. जसे की भाषा विषयासाठी स्थुलवाचन, लेखन कौशल्य, कवितेचे प्रश्न उत्तरे, गणित विषयाचे कठीण प्रश्न, इतिहास व भूगोल यांचे प्रश्न, नकाशा वाचन, विज्ञानातील आकृत्या, सहसंबंध इंग्रजी विषयातील स्पेलिंगस आणि इतर.
• एका दिवसाला ४ ते ५ विषयांचा अभ्यास झाला पाहिजे.
• रोजचे टारगेट ठरवा. जसजसे तुम्ही रोजचे टारगेट पूर्ण कराल तशी अभ्यास करण्याची जिद्द वाढत जाईल.
• ठरवलेले करताना लिखाणाचा सराव करा.
• स्टॉपवॉच चा वापर लेखन कौशल्य लिहताना करा. तुम्हाला किती वेळ लागतो याचा अंदाज येईल.
• मागील काही वर्षांचे बोर्ड पेपर्स लिहायची प्रॅक्टिस करा.
• स्वतःवर विश्वास ठेवून अभ्यास करा.
• सर्वात महत्वाचे म्हणजे आपले आरोग्य, विश्रांती याला देखील महत्व द्या.
• योग्य आहार, पुरेशी झोप घ्यावी.
• अभ्यास करताना मध्ये मध्ये ५ ते १० मिनिटांचा ब्रेक घ्यावा.
• योगा, ध्यान यामुळे मन शांत होऊन आपले चित्त एकाग्र होते.
वरील दिलेल्या सूचना प्रत्येक विद्यार्थ्यासाठी लागू पडतात. फक्त गरज आहे ती प्रामाणिकपणे अभ्यास करून यश मिळवणे. प्रत्येक विद्यार्थ्याने हे समजून घ्या की १० वी ची परीक्षा ही आपल्या जीवनातील अंतिम परीक्षा नाही. त्यामुळे घाबरून न जाता प्रयत्न करणे एवढेच हातात असते. म्हणून “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही मिळे” यानुसार छोटे छोटे प्रयत्न ही मोठे यश मिळवण्यासाठी कारण ठरू शकतात.
तर पालकहो व विद्यार्थी सज्ज व्हा ह्या परिक्षेसाठी. All the best.
वाचक मित्रहो कसा वाटला लेख? आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रपरिवार, व जे दहावी ची परिक्षा देणार आहेत अश्या पालकांना व विद्यार्थी यांना शेअर करायला विसरू नका. अश्याच माहितीपर लेख वाचण्यासाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
लेखिका – सौ. वैदेही उदयकुमार बाबरदेसाई.
खूपच सुंदर माहिती , पालक व वि्यार्थी दोघांसाठी
Thank you sir
Very good Information for every Parents and their Children. Keep it up