कृत्रिम बुद्धिमत्ता – फायदे आणि तोटे
सध्या सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नाव आपल्या कानावर सतत पडत आहे. मग त्या वर्तमानपत्रातल्या बातम्या असो की टीव्हीवरचे स्पेशल रिपोर्टस्! सोशल मीडिया वरची चर्चासत्रे असो की मित्रांबरोबर केलेल्या गप्पा! कृत्रिम बुद्धिमत्ता, तिचे फायदे, तोटे, त्याचा मानवावर होणारा परिणाम हा सध्या जगात सर्वत्र सतत चर्चिला जाणारा विषय आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे. प्रत्येकालाच मनातून हे नक्की कळले आहे की या कृत्रिम बुद्धिमत्तेचा माणसाचा जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. काहींच्या मते तो अगदी चांगला असेल तर काहींच्या मते अत्यंत वाईट!! पण काहीतरी परिणाम होणार याबद्दल मात्र कोणाचेच दुमत नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे तोटे समजून घेण्यापूर्वी प्रथम आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय हे पाहूयात.
या लेखात खालील गोष्टी अंतर्भूत आहेत.
१) कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय?
२) कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे आणि तोटे.
१) फायदे
२) तोटे
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय?
कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक शास्त्राची एक शाखा आहे. यामध्ये असे संगणक आणि संगणक प्रणाली तयार करण्याचा अंतर्भाव होतो ज्याने मानवी विचारांची प्रतिकृती निर्माण होईल. काही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणाली तर त्यांच्या पूर्वानुभवावरून त्यांच्या डेटा मध्ये बदल घडवतात आणि मानवी मदतीशिवाय त्यांची कामगिरी उंचावतात. थोडक्यात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे कम्प्युटर प्रोग्रॅम्सची नवीन गोष्टी शिकण्याची आणि विचार करण्याची क्षमता.
सध्या आस्थापने असो की व्यक्ती, सध्या सर्वच जण अनेकविध प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना दिसतात.
कोणतीही नवीन तंत्रज्ञान आले की त्याचे फायदे आणि तोटे यावर चर्चा नेहमी सुरू असते. आणि ते सहाजिकही आहे. कारण जशा नाण्याला दोन बाजू असतात, तसेच प्रत्येक तंत्रज्ञानाचेही फायदे आणि तोटे असतातच. वेगवेगळ्या स्तरांवर तावातावाने झडणाऱ्या प्रचंड चर्चा बाजूला ठेवून आपण शांतपणे, निखळपणे दोन्ही बाजूंचा विचार करूया. कारण आपल्याला तंत्रज्ञानापासून दूर तर पळता येणार नाही. तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. घड्याळाचे काटे कधीही उलटे फिरवता येत नाहीत असे म्हणतात. त्यामुळे गरज आहे ती तंत्रज्ञान समजून घेण्याची आणि त्याशिवाय तिच्यावर प्रतिक्रिया न देण्याची.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे-
सध्या बहुतेक सर्व कंपन्या आपला अंतर्गत कारभार सुरळीत चालण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेत आहेत. असेही म्हटले जाते की कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीनलर्निंग या दोन गोष्टी ज्या कंपन्या शिकून घेणार नाही त्या टिकून राहणार नाहीत.
१) कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यामुळे मानवी चुका टाळल्या जातात तसेच मानवाला असलेला धोकाही टाळता येतो. खरे तर चुका करणे हा मानवी स्वभाव आहे चुकांतूनच माणूस शिकतो असे तत्त्वज्ञानही काहीजण सांगतात. परंतु जेव्हा या चुकांमुळे व्यक्तीला किंवा आस्थापनांना मोठा तोटा होतो किंवा फटका बसतो, त्यावेळी मात्र अशा मानवी चुका परवडत नाहीत. वस्तूंचे उत्पादन करताना एखादी क्रिया वारंवार करताना मानवी मेंदू थकतो आणि त्यामुळेही चुका होऊ शकतात. तसेच कधी कधी डेटाचे विश्लेषण करताना गफलत होऊ शकते. अशावेळी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने अचूकतेच्या जवळ पोहोचणे शक्य होते. पूर्वानुभवावर आधारित सुधारणा करणारा प्रोग्रॅम वापरल्यास अधिक अचूक परिणाम मिळू शकतील
उदाहरणार्थ – हवामानाच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास अधिक अचूक अंदाज वर्तवता येतील.
२) कधी कधी काही कामे करणे मानवासाठी अवघड आणि धोकादायक असते. अशी कामे करताना माणसाला इजा किंवा अपाय होऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अशी कामे आपण करू शकतो. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीत अशा कृत्रिम बुद्धिमत्ताधारी रोबोंचा वापर करता येणे शक्य आहे.
उदाहरणार्थ -अतितीव्र उत्सर्जन (radiation) असलेल्या ठिकाणी आपण मानवा ऐवजी रोबोचा वापर करू शकतो. समुद्रात किंवा खाणींमध्ये खोलवर जाणारा रोबो कृत्रिम बुद्धिमत्ता वर आधारित बनवू शकतो.
३) २४/७ उपलब्धता
मानवी श्रमाला मर्यादा आहे एक माणूस दिवसातून फार तर आठ तास काम करू शकतो. परंतु त्यानंतर तो थकतो. परंतु यंत्रांचे तसे नाही. ती अहोरात्र काम करू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेले चॅटबोट्स हे दिवसाचे 24 तास आठवड्याचे सातही दिवस ग्राहकांना सेवा पुरवू शकतात. त्यामुळे कारखान्याची उत्पादनक्षमता वाढते.
उदाहरणार्थ -शैक्षणिक संस्था किंवा सेवा केंद्रे येथे अशाप्रकारच्या चॅटबोट्सचा उपयोग करून लोकांच्या शंकांचे निरसन करणे, त्यांच्या अडचणींचे निराकरण करणे शक्य होईल.
४) पूर्वग्रह विरहित निर्णय-
बऱ्याचदा निर्णय घेताना माणसांच्या पूर्वग्रहांचा त्या निर्णयावर परिणाम होतो. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून घेतलेल्या निर्णयांचे तसे नसते. कारण ते निर्णय काटेकोरपणे तयार केलेल्या अलगोरिदम वरून घेतले जातात. त्यामुळे पूर्वग्रहांचा निर्णयांवर परीणाम होत नाही.
५) वारंवार केली जाणारी कामे
जेव्हा एखादे काम वारंवार केले जाते तेव्हा ते काम माणसाला कंटाळवाणे वाटू शकते. अशी कंटाळवाणी कामे जर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने केली गेली तर माणूस अधिक सृजनात्मक कामे करू शकतो.
उदाहरणार्थ -कॉम्प्युटर मध्ये डेटा भरणे, डेटाचे पृथक्करण करणे, अहवाल तयार करणे इत्यादी.
६) खर्चात कपात
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने कामे केल्यास खर्चात कपात होते. यंत्रे 24 तास काम करू शकतात. कामगारांच्या साहाय्याने करून घेतलेल्या कामांपेक्षा यंत्रांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने केलेली कामे निश्चितच कितीतरी पटींनी सरस ठरतात.
७) माहिती संपादन आणि पृथक्करण
डेटा प्रक्रिया करताना इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर डेटा तयार होतो की तो मानवी बुद्धीच्या आकलनाच्या आणि पृथक्करणाच्या पलीकडे जातो. असा मोठा आणि गुंतागुंतीचा डेटा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने हाताळता येतो व त्याचे पृथक्करणही करता येते.
८) डिजिटल मदत
अनेक उच्च दर्जाच्या संस्थांमध्ये वापरकर्त्यांबरोबर सुसंवाद साधण्यासाठी, त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी मानवी संसाधने न वापरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने अनेक वेबसाईटवर वापरकर्त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातात.
उदाहरणार्थ -अनेक संस्थांमध्ये ग्राहक सहाय्यक कक्ष हा अशा प्रकारचे चॅटबोट्स किंवा व्हॉइसबोट्स वापरून बनवला जाऊ शकतो.
९) जलदगती निर्णय क्षमता
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून संस्थांमधील निर्णय जलद गतीने घेणे शक्य होते. मनुष्य निर्णय घेताना अनेक भावनिक आणि प्रात्यक्षिक गोष्टींचे विश्लेषण करतो. त्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागू शकतो. परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता धारक प्रणाली दिलेल्या डेटाचे पृथक्करण करून निर्णय जलद गतीने देऊ शकते.
उदाहरणार्थ -चेस खेळताना संगणकाला हरवणे हे त्याच्यापाठी असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जवळपास अशक्य असते. आयबीएमच्या डीप ब्ल्यू या संगणकाने १९९० मध्ये तत्कालीन सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्ह याला पराभूत केले होते.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे तोटे
कृत्रिम बुद्धिमत्तेचे वरील फायदे पाहता असे वाटते की अगदी निर्बुद्ध मनुष्यच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास नकार देईल. पण प्रत्यक्षात तसे नाही कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनेक तोटेही आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यापूर्वी त्याचे तोटेही बारकाईने लक्षात घेतले पाहिजे.
१) सर्वात पहिला आणि सर्वात मोठा तोटा म्हणजे याचा विकास आणि अंमलबजावणी ही फार खर्चिक बाब आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तुम्ही नक्की काय करणार आहात यावर खर्चाचा आकडा ठरतो. अर्थात एकदा कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून त्याची अंमलबजावणी सुरू झाली की हा खर्चाचा आकडा हळूहळू कमी होतो. एकदा काम सुरळीत सुरू झाले की मग इतर खर्च कमी करण्यास मदत होते.
२) भावना आणि सृजनशीलतेचा अभाव
मानव त्याच्या भावना आणि सृजनशीलता वापरून निर्णय घेऊ शकतो. परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेचे तसे नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून आपण चांगल्या संकल्पना मिळवू शकतो पण या मूळ (ओरिजिनल) नसतात.
यावरून असेही म्हटले जाते की जोपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून मूळ आणि सर्जनशील संकल्पना निर्माण होत नाहीत तोपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता कधीही मानवाला मात देऊ शकणार नाही. म्हणजे एखाद्या कंपनीला जर एखाद्या अडचणीवर काही सृर्जनशील, नाविन्यपूर्ण उत्तर हवे असेल तर मानवी मेंदूला पर्याय नाही!! तसेच काही संवेदनशील निर्णय घेताना मनुष्य त्याच्या भावनांचाही उपयोग करतो. कृत्रिम बुद्धिमत्तेकडे ती क्षमताच नाही त्यामुळे दिलेले पॅरामीटर्स वापरून सुयोग्य निर्णय घेणे हेच फक्त कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेचे काही प्रोग्रॅम मानवी भावना वाचणे समजून घेणे यासाठीही लिहिले जातात परंतु असे प्रोग्राम सुद्धा सृजनशील निर्णय घेऊ शकत नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अतिशय उत्तम प्रोग्राम मध्ये सुद्धा दया, कनवाळूपणा या भावना घालता येत नाही. या भावना फक्त आणि फक्त माणसाकडेच असतात.
३) यंत्रांचा ऱ्हास
प्रत्येक यंत्राला काही आयुर्मर्यादा असते. काही वर्षानंतर यंत्राचे भाग खराब होण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे यंत्राची प्रत खालावते. जर कृत्रिम बुद्धिमत्ता अशा यंत्रामध्ये असेल तर यंत्र खराब झाल्यास त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा ही काही उपयोग होत नाही.
४) अनुभवाने सुधारणा होत नाही
मनुष्याच्या बाबतीत असे म्हणतात की ‘अनुभवाने माणसाला शहाणपण येते.’ ‘अनुभव हा माणसाचा मोठा गुरु आहे.’ पण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत मात्र हे अजिबात खरे नाही. अनुभवाने सुधारत जाणारी कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करणे हे अशक्य नाही पण फार अवघड आणि खर्चिक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काही प्रणाली अशाप्रकारे ‘अनुभवाने सुधारत जाणाऱ्या पद्धतीने’ विकसित केल्या गेल्या आहेत. परंतु त्या फार थोड्या आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेत अनुभवावर आधारित सुधारणा करायची असेल तर मानवी हस्तक्षेप गरजेचा असतो.
५) बेरोजगारी
कृत्रिम बुद्धिमत्तेचा हा तोटा सर्वात जास्त चर्चिला गेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जसजसा मोठ्या प्रमाणावर सुरू होईल तसतशी नोकऱ्यांची संख्या घटत जाण्याची शक्यता आहे. वारंवार केली जाणारी कामे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने उत्कृष्टपणे करता येतात त्यामुळे कामगार भरतीवर नक्कीच परिणाम होईल. याबाबतीत काही जण दुसरी एक शक्यता वर्तवतात ती अशी की पूर्वापार चालत आलेल्या नोकऱ्या कमी झाल्या तरी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नवीन प्रकारच्या नोकऱ्या तेवढ्याच संख्येने निर्माण होतील. फक्त हे नवीन तंत्रज्ञान सर्वांनी आत्मसात केले पाहिजे.
६) नैतिक प्रश्न
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे तसेच सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे काही नैतिक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वात मोठा प्रश्न आहे ग्राहकांच्या डेटाच्या गोपनीयतेचा! ग्राहकांच्या गोपनीय डेटाची सुरक्षितता कशी अबाधित ठेवता येईल हा मोठा प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढीमुळे निर्माण झाला आहे. बेरोजगारी मुळे निर्माण होणारे प्रश्न तसेच कायदेशीर जबाबदाऱ्या हे काही इतर नैतिक प्रश्नही आहेतच.
७) माणसे आळशी होतील
सर्व उपकरणे आपोआप काम करू लागली तर माणसांचे त्यांच्यावरील अवलंबित्व वाढेल आणि माणसे आळशी होतील. विशेषतः भावी पिढ्यांवर याचा मोठा दुष्परिणाम होऊ शकतो.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सर्व फायद्या तोट्याचा विचार करता असे म्हणावे लागेल की उद्योगांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तोटे लक्षात घेतले पाहिजेत. परंतु त्याचवेळी त्याच बरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करणेही सुरू केले पाहिजे. कारण जर तोटे माहिती असतील तर त्या दृष्टीने काळजी घेऊन त्यावर मात करत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या फायद्यांचा उपयोग करून घेता येईल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अधिक सक्षमपणे, अधिक कार्यक्षमतेने आणि नैतिकतेला धरून करता येईल.
कसा वाटला हा लेख तुम्हाला?
तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे…….
लेखिका — क्षितिजा कापरे
खूपच माहितीपूर्ण लेख . धन्यवाद.
खूप धन्यवाद
अगदी माहितीपूर्ण लेख.
धन्यवाद !
खूप धन्यवाद