लहानपणी दुरदर्शन बघताना सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमादरम्याने जाहिराती येत असत. त्यातील अनेक जाहिराती आजही आपल्याला अगदी स्पष्ट आठवतात. तब्बल 30 ते 40 वर्षे आधीच्या जाहिराती देखील आज आपल्याला आठवतात याचे कारण म्हणजे प्रत्येक ब्रँडला धरुन केलेले जिंगल्स आणि व्हिज्युअल्स.
वॉशिंग पावडर निरमा, निम की सफेदी जो निरमा से आयी, रंगीन कपडा भी खील खील जाए, सबकी पसंद निरमा – सर्वांच्या ओठांवर बसलेले गाणे
Happydent ची जाहिरात ज्यामध्ये एका महालात सगळे Happydent खाऊन उलटे टांगले जातात आणि चमकणाऱ्या दातांचा प्रकाश रात्रीच्या वेळी महालाला प्रकाशीत करीत असतो. तेरा दिल रोशन, तेरा मन रोशन तो जहाँ रोशन हे गाणे बॅग्राऊंडला सुरु असते. अत्यंत कल्पक जाहिरात.
फेविकॉलच्या जाहिरातीतील हत्ती सर्वांनाच आठवत असेल, तसेच फेविकॉलने तुटलेली बशी जोडण्याची जाहिरात देखील लक्षात असेलच इतकेच काय एका काठीला चार ठिकाणी फेविस्टिक लावून मासे पकडणाऱ्या माणसाची जाहिरात मला नाही वाटत कोणी विसरला असेल. तितक्याच कल्पक पण जरा हटके असणाऱ्या या जाहिराती आपल्या कायम लक्षात राहणाऱ्या आहेत. या जाहिराती लागल्या की, नेहमीच आम्ही भावंडं एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघून हसू लागायचो. हे हसणं इतक्यासाठीच असायचं की आमच्या बाल मनाला देखील माहित असायचं की समोर दाखवलं जातंय ते शक्य नाही पण तरीही जाहिरातीतील कल्पकता ज्याला आपण क्रिएटिव्हीटी म्हणतो ती भन्नाट असायची आणि म्हणूनच अनेक वर्षे उलटून देखील या जाहिराती लक्षात आहेत. Marathi copy writing jobs

जाहिरात कल्पकतेचे मूळ – ग्राहकांचे मानसशास्त्र
जाहिरात समजून घ्यायची असेल आणि शिकायची असेल तर आपल्याला ग्राहकांचे मानसशास्त्र समजून घेणे तितकेच महत्वाचे असते. अगदी ऐंशी नव्वदीच्या काळातील जाहिराती असो किंवा आजच्या आपल्या सोशल मिडियाच्या विश्वातील जाहिराती असो प्रत्येक जाहिरातीची मुळ संकल्पना ही ग्राहकांच्या मानसशास्त्राच्या अवतीभवती फिरताना दिसून येईल. ‘डर के आगे जीत है!’ म्हणणाऱ्या Mountain Dew ची जाहिरात आजच्या तरुणाईला समोर ठेवून तयार करण्यात आलेली आहे. त्याही पलिकडे जाऊन वृद्धांच्या हृदय विकारांना टार्गेट करीत अनेक खाद्यतेलाच्या जाहिराती आपण पाहिल्या असतील. महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत शँम्पू, हेअर ऑईल आणि सॅनीटी पॅड्सच्या जाहिराती आपण रोज पाहतो. या केवळ जाहिराती नसतात तर आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध साधण्यासाठीचा एक खूप मोठा प्रभावीत करणारा विचार प्रपंच देखील त्यामध्ये ठासून भरलेला असतो. जाहिरात विश्वाची ही छोटीशी तोंडओळख करुन देण्याचे कारण म्हणजे कॉपी रायटिंग हा जाहिरात कलेचाच एक अविभाज्य भाग आहे. Marathi copy writing skill
जाहिरातीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे कॉपी रायटिंग
कॉपी रायटिंग हा जाहिरात विश्वातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. एखाद्या ब्रँडबद्दल कमी शब्दांत आणि मोजकेपणाणे ग्राहकांच्या मनाला भिडणाऱ्या शब्दांची बांधणी करुन एखाद्या ब्रँडची जाहिरात करणे म्हणजेच कॉपी रायटिंग होय. बरं ते इतकं सोपंही नाही आणि म्हणावं तर कठीणही नाही. कारण इथे ग्राहकांना आकर्षित करणारी शब्दांची बांधणी असावी लागते.
कॉपी रायटरकडे कोणते कौशल्य असावे लागते?
कॉपी रायटिंग क्षेत्रात काम करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे लेखकाचा शब्दसंचय खूप असावा लागतो आणि शब्दसंचय वाचनाने वाढतो. वैचारिक आणि योग्य मत मांडणाऱ्या व्यक्तींना ऐकावे लागते. विविध क्षेत्रातील माहितीचा जीतका संचय करता येईल तितका करावा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आपल्याकडे कॉपी रायटिंगसाठी आलेल्या प्रत्येक ब्रँडच्या ग्राहकवर्गाचे मानसशास्त्र आपल्याला माहित असले पाहिजे. एखाद्या ब्रँडची वस्तू लोकांनी का घ्यावी हे सांगताना ग्राहकांच्या दैनंदिन जीवनातील गोष्टींना, सवयींना केंद्रस्थानी ठेवणे गरजेचे असते. कॉपी रायटरला हे समजले पाहिजे. हे कौशल्य अंगी निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांची मते ऐकणे, प्रत्येक ब्रँडचा ग्राहक वर्ग कोणत आहे, त्या ग्राहकवर्गाच्या काय गरजा आहेत, याचा अभ्यास करणे गरजेचे ठरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदलता ट्रेंड आणि टेक्नॉलॉजीला धरुन आपले लेखन करत राहणे या सर्वच गोष्टी एका कॉपी रायटरने लक्षात ठेवणे अपेक्षित असते.
कॉपीरायटर काय करतात?
कॉपी रायटर एखाद्या ब्रँड विषयी मोजक्या शब्दात परंतु नेमकेपणाने लिहितात. ब्रँडिंग विश्वात कॉपी रायटरला अत्यंत महत्त्व आहे. एखाद्या प्रॉडक्टची वैशिष्ट्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम कॉपी रायटर करीत असतो. हे करत असताना दर्शकांचा किंवा प्रत्यक्ष ग्राहकांचा स्विचिंग स्पॅम म्हणजेच थांबून प्रॉडक्टबद्दल माहिती मिळवण्याचा कालावधी देखील कॉपी रायटरला लक्षात घ्यावा लागतो. तुम्ही उत्तम लेखक असाल, 500 ते 1000 शब्दांमध्ये विविध विषयांवर लेख लिहित असाल परंतु एखाद्या कंपनीच्या प्रॉडक्टबद्दल नेमकेपणाने केवळ 5 ते 7 शब्दात कॉपी लिहिताना तुमची तारांबळ उडू शकते. पण पक्का अभ्यास असेल आणि आत्मविश्वास असेल तर नक्कीच तुम्ही हे काम उत्तमरित्या करु शकाल.
कॉपी रायटरचे प्रकार
कॉपी रायटींग हे क्षेत्रात कल्पक आणि भन्नाट आयडिया घेऊन येणाऱ्या व्यक्ती काम करु शकतात. कॉपी रायटिंगचे बरेच प्रकार आहेत त्यापैकी काही प्रकार मी पुढे देत आहे, त्यातील एक प्रकार निवडून तुम्ही त्यामध्ये स्वतःचे करिअर करु शकता. Types of copy writing
सोशल मिडिया ब्रँडिंग कॉपी रायटर
जिंगल कॉपी रायटर
लँडस्केप डाटा कॉपी रायटर
ब्रँडिंग रिल्स कॉपी रायटर
टॅगलाईन्स, स्लोगन्स कॉपी रायटर
वेबसाईट कॉपी रायटर
उत्तम कॉपीरायटर बनण्यासाठी आपली लेखनशैली अद्ययावत करा
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे ही गोष्ट कॉपी रायटरने नेहमी लक्षात ठेवावी आणि सतत बदलणाऱ्या जाहिरात विश्वासोबत आपली लेखन पद्धती देखील अपडेट करीत रहावी. आजूबाजीच्या बदलांना आत्मसात करणाची क्षमता आपल्या लेखनात निर्माण करावी. नवनवीन ट्रेंड समजून घेत ब्रँडिंगच्या नवनवीन स्ट्रेटेजीचा देखील अभ्यास सुरु करा. कोणत्या ब्रँडने कशी स्ट्रॅटेजी केली आणि त्याचा ग्राहकवर्ग वाढला या सर्व गोष्टींचा बारिक निरिक्षणातून अभ्यास सुरु ठेवा.
कॉपीरायटरचे काम कसे मिळवावे?
सध्या कॉपी रायटिंग क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्यांची वानवा आहे त्यामुळे तुमच्यात जर ती कला असेल तर नक्कीच तुम्ही विविध कंपन्यांच्या ब्रँडसाठी लिहू शकता. सोशल मिडिया किंवा डिजिटल मिडिया पाहणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या क्लाईंटसाठी लिहिणारे कॉपी रायटर हवे असतात. आणि 2019 नंतर तर मराठी कॉपी रायटिंग क्षेत्रात अनेक संधी निर्माण झालेल्या दिसून येत आहेत. तुम्ही मराठी कॉरी रायटर असाल आणि तुम्हाला विविध कंपन्यांच्या ब्रँड पॉडक्टसाठी लिहायचे असेल तर तुमचा पोर्टफोलिओ तयार करा. एखादे लँडिंग पेज देखील तुम्ही तयार करु शकता. लिंक्डिंक, फेसबूक आणि इन्स्टा सारख्या प्लॅटफॉर्मवर कायम कॉपी रायटरसाठी जाहिराती येत असतात. त्यांना तुमचा पोर्टफोलिओ पाठवा. ब्रँडिंग विषयी तुमचे मत लिहित रहा. शक्य असल्यास ट्रेंडिंग ब्रँड्स बद्दल लिहा. प्रत्येक कंपनीच्या ब्रँडचे वैशिष्ट्य समजून लिहिण्याचा प्रयत्न करा, तुमचे लिखाण तुमच्या पोर्टफोलिओमध्ये येऊदे. कंपन्या नेहमीच चांगल्या कॉपी रायटरच्या शोधात असतात, त्यांना उत्तम काम करणारे रायटर हवे असतात.
तुमचा पोर्टफोलिओ तयार करा
स्वतःच्या कामाविषयीचा पोर्टफोलिओ तयार करा. तुमचे लेखन आणि शब्दसंचय तुमच्या पोर्टफोलिओमधून दिसला पाहिजे. तुमचा पोर्टफोलिओच तुमच्या कामाची ग्वाही देत असल्याने अत्यंत विचार करुन स्वतःचा पोर्टफोलिओ बनवा. आधी केलेल्या कामांचा समावेश त्यामध्ये करा. एखाद्या महत्त्वाच्या ब्रँडसाठी लिहिलेले असेल तर त्यांतील काही अनोख्या कॉपीज पोर्टफोलिओमध्ये पेस्ट करा.
कॉपीरायटर दर महिना किती कमावतात?
कॉपी ही ग्राहकवर्गापर्यंत प्रॉडक्टचे वैशिष्ट पोहोचवणारे माध्यम आहे. त्यामुळे प्रॉडक्टची विक्री होत असते. या सगळ्याचा विचार करता कॉपीरायटर दर महिना 30 हजारांपासून ते लाखाच्या घरात कमावतात. मोठ मोठ्या ब्रँडसाठी लिहिताना बऱ्यात गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, ग्राहकवर्गाचे मानसशास्त्र, ग्राहकांची विचार करण्याची पद्धत लक्षात घेऊन आपल्या कॉपी लिहाव्या लागतात ही एक कला आहे. आणि तुम्ही एका वेळी विविध ब्रँडसाठी लिहित असाल तर कला अधिक बहरत जाते आणि त्यातून मिळणारी कमाई देखील वाढत जाते.
जाहिरात विश्वातील एक महत्वाचा भाग असलेल्या कॉपी रायटर विषयावरील हा लेख कसा वाटला कमेंट करुन नक्की कळवा. अशाच नवनवीन करिअरची संधी मिळवून देणाऱ्या लेखांसाठी लेखकमित्र वेबसाईटला नेहमी भेट द्या.
लेखिका-विशालाक्षी प्रशांत चव्हाण – मुंबई
खूप छान पद्धतीने तुम्ही explain केलंय हा विषय.
धन्यवाद
अप्रतिम लेख आहे खूप खूप महत्त्वाची माहिती आम्हाला मिळाली..
पुढे येणाऱ्या नवीन लेखासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
धन्यवाद
Nice and objective information
या संधार्बत माहिती देण्यासाठी खुप खुप धन्याद…
आपण असाच आपला अनुभव आणी ज्ञान वाटप करा ज्याने आम्हा सर्वांना याचा लाभ मिळेल व आमचा ज्ञान सुद्धा वाढेल ….
खूप छान महत्त्व पुर्ण माहिती देणारा लेख आहे
धन्यवाद