अतिशय सुंदर, नाजूक, आनंदाने जगणारी, खूप बडबडी, कोणत्याही परिस्थितीमध्ये सकारात्मक विचार करणारी , मुलांसोबत मैत्रीपूर्ण वातावरण ठेवून त्यांच्या मनाचा अचूक वेध घेणारी ही आहे अस्मिता. खरंच तिला पाहून मन कसं प्रसन्न होतं असे.
अस्मिता आणि अरुण दोघं नवरा बायको, एक मुलगा, एक मुलगी असे छान छोटंसं कुटुंब. अस्मिता शाळेत शिक्षिका होती. अरूण पण छान नोकरी करत होता.त्या दिवशी अस्मिता आणि अरूणच्या लग्नाचा वाढदिवस होता. अरुण वर्षातून दोनदाचं अस्मिता सोबत देवीच्या दर्शनासाठी जात असे .एक तर लग्नाचा वाढदिवस आणि अस्मिताचा वाढदिवस. त्याही दिवशी दोघं देवीला जावून आले होते. अस्मिताने देवीला मनोभावे अभिषेक करून छान साडी नेसवली होती कारण त्यांच्या लग्नाला वीस वर्षे पूर्ण झाली होती. दोघही खूप खुष होते.
घरी आल्यानंतर नाश्ता करून अरूण ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघाला; पण त्याचे काही महत्त्वाचे कागदपत्र घरी विसरला म्हणून तो परत घरी आला. तेव्हा अस्मिता फोनवर बोलत होती. तिने अरूण परत आला आहे हे पाहिलेच नव्हते. ती फार आनंदात फोनवर बोलत असलेली पाहून अरुण तिथेच थांबला. ती फोनवर असं अरे कारे बोलत असल्यामुळे अरुण थोडा चिडला. तिचे बोलणे होईपर्यंत अरूण तिथेच थांबला. जसा फोन कट करून अस्मिता मागे वळली समोर अरुणला पाहून दचकली. अरुणने एक क्षण ही न लावता तिला विचारले,” फोन कुणाचा होता ?” पण अस्मिता घाबरली होती म्हणून काही न बोलता फक्त मैत्रिणीचा होता एवढंच सांगितलं; पण अरूणच्या मनाला ते पटलं नव्हतं कारण आजपर्यंत अस्मिता अशारितीने घाबरलेल्या अवस्थेत कधीच बोलली नव्हती.
ती खोटं बोलत आहे हे त्याच्या लक्षात आले होते. त्याने लगेच सांगितले ” लाव फोन मला बघायचं आहे कोणती मैत्रिण होती म्हणून.” अस्मिताने फोन लावला तेव्हा समोरचा मुलाचा आवाज ऐकून अरूण भयानक चिडला. सगळा दिवस असाच कटकटीमध्ये गेला. सायंकाळी अस्मिता अरूण समोर गयावया करू लागली .” मला माफ करा मी घाबरून गेले म्हणून खोटं बोलले पण आता खरंच सांगतो आहे. माझं ऐकून तरी घ्या; पण अरुण काहीच ऐकून घेत नव्हता. केवळ मुलांसाठी त्याने लग्नाच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ आणलेला केक कापला; पण त्याचा राग काही कमी होत नव्हता.
न राहवून शेवटी अरुण अस्मिताला घेऊन तिच्या माहेरी गेला. तिथे तिचे आईवडील, भाऊभावजय राहत होते. गेल्यावर थोडं बोलणं झालं जेवण आटोपून अरूण आणि अस्मिता यांचा भाऊ बाहेर गेले. अरूणने भावाला कल्पना दिली की , तो का आला आहे. रात्री सगळे गप्पा मारत असताना अरुणने विषय काढला. अस्मिता थोडी भांबावून गेली हा विषय घरी झाला असताना इथे पुन्हा का काढला. सगळ्यांसमोर अरुणने प्रश्नांचा भडीमार सुरू केला. आपले आईवडील आणि भाऊ भावजय पण अस्मिताला संशयित नजरेने पाहत होते हे पाहून तिला खूप वाईट वाटले. सगळ्यांच्या नजरा तिला टोचू लागल्या. जणू आज ती एक आरोपी आहे आणि सगळ्यांना उत्तरं हवी आहे.
अस्मिताने सांगायला सुरुवात केली. मला आलेला फोन हा राहुलचा होता. त्याची आणि माझी भेट ऑनलाईन व्यवसाय मधून फेसबुक वर झाली. व्यवसाय आणि प्रोडक्ट्स घेण्यासाठी आम्ही बोलत होतो; पण बोलता बोलता ओळख झाली आणि त्यात तो माझ्या माहेरचा आहे हे समजल्यावर म्हणजे तो आपल्या कॉलनीत राहतो हे समजलं म्हणून मी देखील बोलू लागले. बोलण्यात आणि प्रोडक्टमुळे आमचं रोजच थोडंफार बोलणं होतं असे; पण एक दिवस त्याने मला सांगितले की, मी त्याला आवडू लागले. जसं मला समजले की, तो माझ्या वर प्रेम करू लागला आहे तेव्हा मी त्याला समजून सांगत होते की हे काही प्रेम वगैरे नसतं हे आकर्षण असतं. तू माझ्यापेक्षा फार लहान आहेस .उगीच कुठे ही गुंतू नको. तू तुझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. त्यांना त्रास होईल असे वागू नकोस; पण त्याच कालावधीत त्याला एक चांगली नोकरी मिळाली. मग तो मला म्हणू लागला की तुम्ही माझ्यासाठी लकी आहात. तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून माझे चांगले झाले. माझी व्यसनं पण कमी होत गेली. मला लक्षात आले की,आपण त्याच्याशी बोललो तर हा जास्तच गुंतत जाईल म्हणून मी हळूहळू बोलणं कमी करू लागले. बऱ्याच महिन्यांपूर्वी मला त्याचा एकदा फोन आला होता तेव्हा मी त्याला नीट समजावून सांगितले आणि म्हणाले होते की मला फोन नको करूस; पण त्याने मला आता पुन्हा त्याने नवीन बिझनेस चालू केला आहे हे सांगण्यासाठी फोन केला. मी त्याचं सगळं ऐकून घेतलं आणि त्याचं अभिनंदन केले; पण नेमकं त्यावेळेस अरुण आला आणि मी घाबरून गेले आणि खोटंच बोलून गेले.
अरुणला मी हेच सांगत होते की तुम्हाला पाहून मी घाबरले आणि खोटं बोलले कारण खरं सांगितलं असतं तर विश्वास ठेवला नसता. अरूण नेहमीचं संशय घेतो. त्यांच्यासमोर फोनवर किंवा समोरही कोणासोबतही मी बोलले की ते संशयी नजरेने पाहत असतात. खरं बोलले तरी समजून ऐकून घेत नाही.
अरुणच्या या संशयी वृत्तीमुळे मी फार घाबरून राहते; पण राहुलच्या बाबतीत एक समाधान होते की तो परका असुनही समजून घेत होता. मला त्याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता; पण माझ्या विचारांनी आणि समजून सांगण्याने त्याच्यामध्ये खूप बदल झाला. मी त्याला म्हणाले होते की मी कौन्सिलींग करते त्यामुळे तू मला मॅडम म्हणत जा. तो पण मी म्हणेन तसाच वागत होता. तो एक परका असून ऐकत होता त्यामुळे माझ्या मनात एक त्याच्याबद्दल स्थान निर्माण झालं होतं पण हो ते प्रेम नक्कीच नव्हतं.
ज्या नवऱ्यासोबत वीस वर्ष संसार केला त्याला माझ्यावर विश्वास नाही हे पाहून मी तुटून गेले; पण मी चुकीचं काहीही केलं नाही. आजच्या घडीला ना नवरा ना आईवडील कोणी मला समजून घ्यायला तयार नाहीत; पण आजपासून मी फक्त माझ्या मुलांसाठी जगणार आहे हा विचार मनामध्ये मी पक्का केला आहे.
अरुणने त्या राहुलला फोन केला आणि धमकी दिली तेव्हा मी या गोष्टीला विरोध केला की, कशातच काही नसतांना दुसऱ्याच्या मुलाला आपण का धमकी द्यायची ?” अस्मिता कळकळीने आपले मत सर्वांसमोर मांडत होती. तरीही अरुणने स्वतःचा हेका सोडला नाही. तो त्या गोष्टीवरून अस्मिताला डिवचतंच राहिला. शेवटी अस्मिताने राहुलला फोन करून बोलावून घेतले आणि त्याच्या कानावर सत्यपरिस्थिती घातली. तेव्हा तो अस्मिताच्या आईवडिलांना, नवऱ्याला भेटायला घरी आला. त्याने क्षमा मागितली; पण एक वाक्य बोलून गेला माझ्यामुळे मॅडमना त्रास देवू नका. अशी समंजस मुलगी, बहीण, बायको मिळणं नशिबात लागत. मी पुन्हा कधीचं यांना फोन करणार नाही की कधी भेटायचा प्रयत्न करणार नाही; पण यांना मानाने जगू द्या.
अस्मिताच्या नवऱ्याला राहुलचं हे बोलणे फारचं खटकले. कोणीही ऐरागैरा येऊन आपल्या बायकोविषयी चांगले विधान मांडतो हे त्याला रुचले नाही. आधीपासूनच संशय घेणारा अरूण आता अधिकचं संशय घेवू लागला; पण अस्मिता मात्र प्रामाणिकपणे तिचा संसार करत होती. आईबाबांना समाजात नातेवाईकांमध्ये खाली मान घालायला नको म्हणून ती कसाबसा संसार रेटत होती. ह्या सगळ्या प्रकरणात तिचे फार हाल होत होते; पण केवळ मुलांसाठी ती जगत होती कारण जिथे सगळ्यांनी तिला चुकीचं समजलं होतं तिथे फक्त तिची मुलं तिला साथ देत होती.
एके दिवशी मात्र अस्मिताच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. ऑफिसमधून अरुण रात्री उशिरा आला तो दारू पिऊनचं. त्याने मुलांसमोर अस्मिताला घाणेरड्या शिव्यागाळ्या द्यायला सुरुवात केली. वास्तविक अस्मिता आपला संसार टिकवण्यासाठी सारं काही सोसत होती; पण आता तिच्या सहनशक्तीचा अंत झाला. ती पवित्र असूनसुद्धा नवरा तिच्यावर गलिच्छ आरोप करत होता हे मात्र तिला सहन झाले नाही. रागाच्या भरात तिने अरूणच्या एक कानशिलात लगावली आणि लागलीच मुलांना घेऊन घराबाहेर पडली.
घराबाहेर पडल्यावर अस्मिता तिच्या माहेरी जाणार नव्हती कारण माहेरच्यांनी देखील तिला समजावून घेतले नव्हते. तिला कोणाचेही उपकार सुद्धा घ्यायचे नव्हते. ती तिच्या एका मैत्रिणीच्या घरी गेली. तिच्या मैत्रिणीकडे सारे काही कथन केले. केवळ एक रात्र तिच्याकडे राहू द्यायची तिला विनंती केली.
दुसऱ्या दिवशी सकाळीचं अस्मिताने भाड्याचे एक छोटेसे घर पाहिले. मुलांना घेऊन ती तिथे राहू लागली.
अस्मिताच्या नवऱ्याला अस्मिता घर सोडून निघून गेल्यावर त्याची चूक त्याला कळली. तो तिच्याकडे तिची माफी मागावयास आला असता अस्मिताने त्याला माफ केले नाही उलट त्याला घराबाहेर जाण्यास सांगून तिने त्याच्या तोंडावर दार लावून घेतले आणि पुन्हा जर त्रास द्यायला आला तर पोलिसात तक्रार नोंदवेन अशी धमकी त्याला दिली.
अस्मिताने खऱ्या अर्थाने तिचा स्वाभिमान जपला होता. आता एकचं तिचे ध्येय होते ते म्हणजे अरूणची सावली देखील मुलांवर पडू द्यायची नव्हती आणि तिच्या मुलांना एक माणूस म्हणून जगायला शिकवायचे होते.
लेखिका – कविता कुलकर्णी (पांडे )
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
Good… Right decision of Asmita…
छान👌👌
खूप छान निर्णय अस्मिताचा
छान कथा👌👌👌
छान..
अस्मितेचे आपली अस्मिता जपली👌
छान..
अस्मितेचे आपली अस्मिता जपली म्हणायची👌