केदार एक हुशार आणि गुणी शिक्षक होता. प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात यावे ही त्याची मनापासूनची इच्छा होती आणि म्हणूनच वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळताच तो आनंदाने त्या उपक्रमांमध्ये सहभागी होत असे. पुढे येऊन जबाबदारीही स्वीकारत असे. अशीच एक नवीन संधी केदारला मिळाली होती. डोंगरी आणि दुर्गम भागातील मुलांना शिकवण्याची संधी. ज्या संस्थेच्या शाळेत तो शिक्षक म्हणून काम करत होता त्याच संस्थेने हाती घेतलेला उपक्रम होता.
आज शाळेचा पहिला दिवस होता आणि त्या दुर्गम भागातील पालकांसह त्यांची मुलेही हजर होती. सर्व पालकांना शाळेची व्यवस्थित माहिती देण्यात आली आणि सोबतच मुलांना शिकवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.शाळा सुरू झाली आणि मुले उत्साहाने शाळेत येऊ लागली. केदार आणि बाकीचे शिक्षकही उत्साहाने शिकवत होते. मुलांना अभ्यासाची गोडी लागली होती आणि शाळा जोमाने सुरू होती.
आजही नेहमी प्रमाणे केदार शिकवण्यात मग्न होता की त्याला खिडकीतून बाहेर आंब्याच्या झाडा पाठीमागे कोणीतरी असल्याची चाहूल लागली. प्रथम तर त्याने दुर्लक्ष केले आणि समोर पाहून शिकवू लागला. थोड्या वेळाने परत त्याची नजर त्या आंब्याच्या झाडाकडे गेली तर आता मात्र तिथे कोणीही नव्हते.केदारने मनातले विचार झटकून टाकले पण दुसऱ्या दिवशीही केदारला त्या आंब्याच्या झाडा पाठीमागे कोणीतरी असल्याची चाहूल लागली आणि आता त्याची पक्की खात्री पटली की तिथे नक्कीच कोणीतरी आहे. त्याने दुर्लक्ष केले आणि हळूच वर्गातून बाहेर पडला.
“ओ बाई , कोण तुम्ही? आणि इथे काय करताय?? ” केदार आता त्या झाडाजवळ पोहोचला होता तेही त्या व्यक्तीच्या नकळत. त्याने दरडावून त्या व्यक्तीला विचारले पण ती व्यक्ती घाबरून खाली मान घालून उभी होती. केदारने परत ओरडून विचारले,
“कोण तुम्ही? चोरी करायला आला आहात? नक्कीच चोर आहात तुम्ही. सिक्युरिटी… सिक्युरिटी.. ” केदारने जोरजोरात सुरक्षा रक्षकांना हाक मारली आणि ती व्यक्ती घाबरून जोरात पळत सुटली. सुरक्षा रक्षक येईपर्यंत ती व्यक्ती पळून गेली होती. केदारने ही गोष्ट इतर शिक्षकांच्या कानावर घातली आणि झाल्या प्रकाराने शाळेच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.नंतर मात्र बरेच दिवस शाळेच्या आवारात कोणीही संशयित आढळले नाही पण एक गोष्ट मात्र केदारच्या नजरेतून सुटली नाही. पाचवीच्या वर्गात शिकणारी आणि अभ्यासात हुशार असणारी रेणू शांत शांत राहू लागली. तिचे अभ्यासातून लक्ष उडाले. गणिताची उत्तरे चुकू लागली आणि विज्ञानाचे प्रयोग फसू लागले. हुशार रेणू अचानक अशी का वागू लागली याचे कोडे केदारला पडले होते. रेणू आपल्याच विश्वात मग्न राहू लागली.
आज शाळेत मुलांच्या पालकांना बोलावले होते. मुलांची प्रगती पाहण्यासाठी सगळे पालक आवर्जून हजर होते. रखमा देखील डोक्यावर पदर घेऊन सगळ्यात पाठीमागे एका कोपऱ्यात बसून ऐकत होती. समोर सर्वात अनुभवी आणि जेष्ठ असलेले शिक्षक भाषण करत होते. पालकांना काही गोष्टी समजावून सांगत होते. अचानक केदारचे लक्ष त्या कोपऱ्यात बसलेल्या रखमा वर गेले आणि केदार संशयाने पाहू लागला. तोच त्याला आठवले की ही तर तिच व्यक्ती आहे जी काही दिवसांपूर्वी आंब्याच्या झाडा पाठीमागे लपून बसली होती.
केदार झटकन् जागेवरून उठला आणि ताडताड पावले टाकत त्या व्यक्ती समोर म्हणजेच रखमा समोर जाऊन उभा राहिला. आता मात्र रखमा भेदरून गेली .केदारने सुरक्षा रक्षकांना बोलावले आणि हीच ती व्यक्ती आहे जी लपून शाळेत येत होती आणि त्या दिवशी पकडणार तोच पळून गेली असे सांगितले.सुरक्षा रक्षकांनी रखमाला पकडले. सुरक्षा रक्षक रखमाला तिथून घेऊन जाऊ लागले तोच रेणू जोरजोरात धावत आली आणि रखमाला बिलगली.
“आई.. आई..” रेणू मोठमोठ्याने रडत होती आणि केदार सह सर्वच जण आश्चर्याने पाहत होते . केदारला समजेना की जर ही रेणूची आई आहे तर अशा पद्धतीने शाळेत लपून यायचे काय कारण ? केदारने सुरक्षा रक्षकांना थांबवले. रखमाला समोर बोलावले आणि कारण विचारताच रखमा भावुक झाली.
“मला बी शिकायचं हाय.मला बी वाटतं शाळंत जावं लिव्हावं, वाचावं . लई वाटत हुतं पर आमच्या आय बानं कवा शाळा दावलीच न्हाय आमास्नी . काय करणार शाळंत जाऊन त्यापरीस घरातलं काम शिक .कशाला पायजे शाळा? तवा त्येंचं ऐकलं . पर आता माझी रेणू शाळत जाय लागली आणि शाळंच कवतिक कराय लागली तसं परत वाटाय लागलं आपुण बी शिकावं पर आपल्याला शिकिवणार कोण?म्या रेणूला इचारल आन् रेणूनी मला सांगितलं की आमचं केदार सर चांगल शिकिवत्यात. आमच्या वर्गाच्या खिडकी जवळ एक आंब्याचं झाड हाय..तू तिथं इवून थांबत जा. केदार सर ज्ये काय शिकवतील त्ये सगळं तुला ऐकायला ईल.. आन् म्हणून म्या.. ” . रखमाला अश्रू अनावर झाले. ती हुंदके देउन रडू लागली. केदारला वाईट वाटले आणि स्वतःच्या गैरसमजाबद्दल पश्चात्ताप वाटू लागला.
“मला माफी द्या. माझं चुकलं पर शिक्षा माझ्या लेकराला नको व्हायला. रेणूची यात काय बी चूक न्हाय.मला शिक्षा द्या “.रखमा कळवळून रडत होती आणि आपल्या मुळे रेणूला शिक्षा मिळते की काय अशी भिती तिला वाटू लागली.
“ताई, मला माफ करा . माझा गैरसमज झाला. तुम्ही शिकण्यासाठी येत होता आणि मी तुम्हांला चोर समजून बसलो. चूक तर माझी आहे पण मला माझी चूक सुधारायची आहे.. हो.. ताई आजपासून मी तुम्हांला शिकवणार आणि केवळ तुम्हांलाच नाही तर तुमच्या सारख्या शिकण्याची इच्छा असणाऱ्या सगळ्यांना मी शिकवणार तेही कोणतीही फी न आकारता “. केदारने आश्वासन दिले आणि रखमाच्या चेहऱ्यावर हसू फुलले सोबतच डोळे आनंदाश्रूंनी तुडुंब भरले. रखमा केदार समोर हात जोडून उभी राहिली. तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव होते.
” हे कसं शक्य आहे केदार ?या मुलांना शिकवण्यासाठी आपली इथे नेमणूक झाली आहे. मान्य आहे मला की एक शिक्षक म्हणून शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येकाला मदत करणे आपले कर्तव्य आहे पण या मुलांची शाळा सोडून तू या सगळ्यांना कसे शिकवणार ” ? जेष्ठ शिक्षक शिंदे सरांनी शंका मांडली आणि केदारच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलले.
“रात्रशाळा.. हो …रात्री आठ ते दहा या वेळेत भरेल आपली शाळा. मी तुमचा शिक्षक आणि तुम्ही माझे विद्यार्थी. या मुलांची दिवसभर शाळा असते आणि तुम्हांला तुमची दिवसभराची कामे. म्हणूनच सगळी कामे उरकल्या नंतर भरेल आपली रात्रशाळा “. केदार उत्साहाने म्हणाला.
शाळेचे सगळे पालक आता केदार भोवती एकच गलका करत होते ,” आमी पण येणार शाळत. आमास्नी पण शिकवा ” . त्या सगळ्यांचा उत्साह पाहून केदारला अजूनच प्रोत्साहन मिळत होते.
पुढील काही दिवसातच रात्रशाळा सुरू झाली आणि शाळेच्या विद्यार्थ्यांचे पालक आता रात्रशाळेचे विद्यार्थी बनले. हळूहळू रात्रशाळा प्रगती करू लागली. डोंगरी आणि दुर्गम भागात राहून शिकणाऱ्या मुलांसोबत त्यांचे पालकही शिकू लागले. काहीच दिवसांतच रखमाला स्वत:ची सही करता येऊ लागली आणि तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्वच पालक आता आनंदी होते कारण त्यांचे लिहिता आणि वाचता येण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते.
समाप्त..
कथा कशी वाटली अभिप्राय देऊन जरुर कळवा. अशा नवनवीन कथांसाठी चॅनेलला फाॅलो करा आणि वेबसाइटला भेट द्या. धन्यवाद. Motivational Marathi story for reading
लेखिका – सौ. मनिषा उदयसिंह पाटील, पुणे .
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
Very Nice 👌
धन्यवाद