पंढरपूरची आषाढी वारी: महाराष्ट्राची प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा

WhatsApp Group Join Now

पंढरपूरची आषाढी वारी: महाराष्ट्राची प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा

ज्येष्ठ महिना निम्मा उलटून गेला की अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते पंढरपूरच्या आषाढी वारीचे. ज्येष्ठ कृष्ण सप्तमी/ अष्टमी पासून ‘ज्ञानबा-तुकाराम’ च्या गजरात विठू माऊलीच्या दर्शनाच्या ओढीने वारकऱ्यांची पाऊले देहू/आळंदीपासून पालखीसोबत पंढरीच्या दिशेने पडू लागतात. या भक्तिरसाच्या रंगात आणि टाळ-चिपळ्यांच्या नादात अवघा महाराष्ट्र रंगून जातो. आषाढी एकादशीला त्या सावळ्या, सुंदर विठ्ठलाचे मुख पाहण्यासाठी दरवर्षी लाखो वारकरी कित्येक किलोमीटर पायी चालत पंढरपूरला जातात.

आपल्या दर्शनासाठी जमलेला हा हरीभक्तांचा मेळा पाहून विठुमाऊली सुध्दा आनंदित होते आणि आषाढसरींच्या रूपात त्यांच्यावर आपल्या कृपेचा वर्षाव करते. पंढरपूरची ही वारी आणि त्यानंतर येणारी आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा महोत्सव असतो. या अनुपम्य आणि अलौकिक सोहळ्याचे वर्णन करणे शब्दातीत असते, तो अनुभवावाच लागतो. म्हणूनच ‘एक तरी वारी अनुभवावी’ असे म्हणावेसे  वाटते. 

पंढरपूरचा विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत! पंढरपूरच्या आषाढी वारीची परंपराही महाराष्ट्रात शेकडो वर्षे चालत आली आहे आणि यापुढेही चालत राहील. पण वारी म्हणजे काय? तिचे महत्त्व काय आहे? तिचा इतिहास काय आहे? याबद्दल मात्र फार कमी जणांना माहिती असते. या लेखात महाराष्ट्राच्या या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पंढरपूरच्या वारीचा इतिहास:

‘विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी पंढरपूरला समूहाने वर्षातून एकदा तरी जाणे म्हणजे वारी’ असे सामान्यत: म्हणता येईल. नित्यनियमाने वर्षातून किमान एकदा तरी वारी करणाऱ्या लोकांना ‘वारकरी’ आणि त्यांच्या समूहाला ‘दिंडी’ म्हणतात. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्याच्या शुद्ध एकादशीच्या दिवशी वर्षातून दोनदा असते. महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक गावातून वारकरी दिंड्या देहू/आळंदीला येतात आणि तेथून पुढे पंढरपूरला जातात. पायी चालत असताना विठ्ठलाची भक्तिगीते म्हटली जातात, टाळ आणि चिपळ्यांच्या नादात विठ्ठल नामाचा गजर केला जातो. वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षांची मोठी संतपरंपरा लाभली आहे. या संतांनी विठ्ठलाचे रूप आणि गुण वर्णन करण्यासाठी रचलेले अभंग आणि ओव्या वारीत म्हटल्या जातात. पारंपरिक नृत्ये, फुगड्या, भजन आणि कीर्तने होतात. वारीला ‘सामुदायिक रीतीने केलेली विठ्ठलाची उपासना’ असेही म्हणता येईल. 

वारीला अतिशय दीर्घ अशी परंपरा लाभली आहे. वारीची परंपरा महाराष्ट्रात तेराव्या शतकापासून आहे याचे उल्लेख सापडतात. संत ज्ञानेश्वरांचे वडिल विठ्ठलपंत हे वारीला जात असत. म्हणजे वारीला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. काही जणांच्या मते, जेव्हा पांडुरंग पुंडलिकाला भेटण्यासाठी पंढरपूरात आले, तेव्हापासून वारीची पद्धत सुरु झाली. काही जणांच्या मते वारी आदी शंकराचार्यांच्या काळापासून सुरु आहे. काहीही असो, वारीची परंपरा अतिशय प्राचीन आहे हे निश्चित! एखादी परंपरा एवढी वर्षे जपणे हे सोपे नाही. या कालखंडात महाराष्ट्रावर अनेक संकटे आली, परकीय आक्रमणे आणि अत्याचार यामुळे महाराष्ट्र होरपळून निघाला, अनेक नैसर्गिक आपत्तीही आल्या, पण ही वारीची परंपरा अखंडित राहिली. 

खरे तर चैत्र, आषाढ,कार्तिक आणि माघ अशी चार वेळा पंढरपूरात यात्रा भरते आणि या चारपैकी कोणत्याही एका यात्रेच्या वेळी वारकरी पंढरपूरला जातात. ‘पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या तीन इच्छा प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात असतात. या सर्व यात्रांमध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीची यात्रा सर्वात मोठी असते. पूर्वी वाहतुकीची साधने उपलब्ध नव्हती. जनसामान्य पायीच एका गावाहून दुसऱ्या गावाला जात, तसेच पंढरपूरलाही ते पायीच जात. आज वाहतूकीची अनेक साधने उपलब्ध असली तरी ही पायी जाण्याची परंपरा मात्र कायम आहे. 

आषाढी एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात. भगवान विष्णूंची निद्रा या दिवसापासून सुरु होते ती पुढील चार महिने म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत असते.

वारकरी संप्रदाय: 

या संप्रदायाला भागवत संप्रदाय असेही म्हटले जाते. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरी तुकायचा’ असे या संप्रदायाबद्दल म्हटले जाते. संत ज्ञानेश्वरांनी या संप्रदायाचा पाया रचला. अनेक संतांनी भागवत धर्माची ध्वजा हाती घेतली. तुकोबारायांनी त्याला पूर्णत्व दिले. हा असा संप्रदाय आहे ज्यात लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, उच्च-नीच जातीभेद नाही. वारी चालणारा प्रत्येक जण फक्त आणि फक्त वारकरी असतो. वारकरी संप्रदायातील सर्वजण एकमेकांना ‘माऊली’ म्हणून संबोधतात. एकमेकांना वाकून नमस्कार करण्याचीही पद्धत या संप्रदायात आहे. असे केल्याने आपल्यामधील अहंकार नाहीसा होण्यास मदत होते अशी त्यांची धारणा असते. परस्परांच्या हृदयात स्थित असलेल्या आत्मारामाला केलेला तो नमस्कार असतो. 

भगवान विष्णूंचा अवतार असलेले विठ्ठल हे यांचे आराध्य दैवत असते. हा भक्ती संप्रदाय आहे. संत तुकारामांच्या अभंगात वर्णन केल्याप्रमाणे ‘घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे’  या उक्तीला अनुसरून अखंड नामस्मरण करणे हे त्यांचे वैशिष्ट्य असते. नामस्मरणासाठी ते तुळशीची माळ वापरतात आणि ती गळ्यातही धारण करतात. म्हणूनच त्यांना ‘माळकरी’ असेही म्हणतात. गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळाला गोपीचंदनाचा टिळा ही वारकऱ्यांची बाह्य लक्षणे. सात्विक अन्न खावे, शुद्ध आचरण ठेवावे, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करावे, भजन-कीर्तन करावे, नित्य नियमाने वारी करावी, एकादशी व्रत करावे, हरिपाठ म्हणावा, ज्ञानेश्वरी, अभंगगाथा यासारख्या ग्रंथांचे पारायण करावे आणि विठ्ठलाचे चिंतन करत आपले जीवन समाधानाने व्यतीत करावे ही त्यांची जीवन मूल्ये असतात. ‘पुंडलिक वरदा हारी (हरी) विठ्ठल’, ‘श्री ज्ञानदेव-तुकाराम’, ‘पंढरीनाथ महाराज की जय’ चा गजर प्रत्येक कार्याला सुरुवात करण्यापूर्वी केला जातो. 

पंढरपूरच्या आषाढी वारीचे आजचे स्वरूप: 

सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख असलेले हैबतबाबा यांच्या प्रेरणेने आळंदीहून संत ज्ञानेश्वरांच्या पादुका पालखीत ठेऊन पालखी काढण्यास सुरुवात झाली. त्यापूर्वी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची एकत्र पालखी निघे. संत तुकोबाराय दर शुद्ध एकादशीस वारीसोबत पंढरपूरला जात. त्याच्या पश्चात त्यांचा कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी १६८५ पासून वारीसोबत देहूवरुन संत तुकोबांच्या आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वरांच्या पादुका आणि पालखी पंढरपूरला नेण्याची पद्धत सुरु केली. या पादुका गळ्यात घालून नेत. या पालखी सोहळ्यास अनेक राजे, श्रीमंत पेशवे आर्थिक सहाय्य करीत. सन १८३२ पर्यंत अशी एकत्र पालखी पंढरपूरात येई. नंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी स्वतंत्र मार्गावरून आळंदीपासून जाऊ लागली. आता संत निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, संत एकनाथ, संत सावता माळी, समर्थ रामदास स्वामी, संत गजानन महाराज अश्या निरनिराळ्या संतांच्या पालख्या वारीत सहभागी होतात. एवढेच नव्हे तर अनेक मंदिर, देवस्थाने, धार्मिक संस्थाने यांच्या पालख्याही आपापली दिंडी घेऊन वारीत सहभागी होतात. देहू आणि आळंदीच्या पालख्यांचा रथ ओढण्यासाठी खिल्लारी बैलजोडी वापरतात. देहू/आळंदी ते पंढरपूर हा पालखी मार्ग सुमारे २५० किमीचा आणि अठरा/ एकोणीस दिवसांचा आहे. वारीहून परत येताना हाच प्रवास निम्म्या कालावधीत पूर्ण होतो. या संपूर्ण मार्गावर या बैलांची विशेषत्वाने काळजी घेतली जाते. इतर पालख्यांचा कालावधी अंतराप्रमाणे वेगवेगळा आहे. 

संपूर्ण भारतभरातून अनेक दिंड्या वारीत सहभागी होतात. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो, तसेच प्रत्येक दिंडीला क्रमांक दिलेला असतो. ठरवून दिलेल्या क्रमांकानेच अत्यंत शिस्तबद्ध रीतीने दिंड्या मार्गक्रमण करतात. वारीत अनेक स्त्रिया डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सामील होतात, तसेच हातात भागवत धर्माची पताका(झेंडा) असलेले वारकरी आणि वीणा घेतलेले ‘विणेकरी’ सुद्धा असतात. आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी सर्व दिंड्या वाखरी गावात संतनगर येथे भेटतात आणि संध्याकाळी पंढरपूरला जातात. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ‘राम कृष्ण हरी’ च्या जयघोषात ते चंद्रभागेत स्नान करुन प्रदक्षिणा पूर्ण करतात. आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विठ्ठलाची सपत्नीक पूजा करतात. दुपारी विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींची खास रथातून मिरवणूक काढतात, जी प्रदक्षिणा मार्गातून नेली जाते. गोपालकाला करुन आषाढी पौर्णिमेला या उत्सवाची सांगता होते.

वारीची काही वैशिष्ट्ये:

१) रिंगण: वारी दरम्यानचे हे सर्वात मोठे आणि वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण आहे. वारीत काही ठरवलेल्या ठिकाणी मोठ्या मैदानात गोल किंवा उभे रिंगण घातले जाते. हे अतिशय कौशल्याचे काम चोपदार करतात. गोल रिंगणात मध्यभागी पालखी असते. त्याभोवती वर्तुळाकार दिंड्या असतात. त्यानंतर मधे मोकळे रिंगण ठेवून परत दिंड्यांचे वर्तुळ असते. टाळ आणि पखवाजाच्या तालावर विठूनामाचा गजर करत वारकरी एका लयीत पदन्यास करत नाचतात. मधल्या मोकळ्या रिंगणातून दोन अश्व दौडतात. यापैकी एका अश्वावर पताका घेऊन स्वार आरूढ असतो, तर दुसरा मोकळा असतो. या अश्वावर संत महाराज आरूढ असतात अशी श्रद्धा आहे. म्हणूनच या अश्वाला ‘माऊलींचा अश्व’ असे म्हणतात.हे अश्व पालखीला तीन प्रदक्षिणा घालतात. त्यावेळी ‘माऊली,माऊली’ चा गजर सर्वत्र दुमदुमतो. रिंगणामध्ये काही मार्ग मोकळे ठेवलेले असतात. त्यावरून डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या स्त्रिया, पताका घेतलेले वारकरी आणि विणेकरी धावतात. उभ्या रिंगणामध्ये दिंड्या पालखीच्या दोन्ही बाजूंनी समोरासमोर उभ्या राहतात. संत तुकाराम महाराजांच्या आणि संत सोपानकाकांच्या रिंगणात धनगर आपली मेंढरे घेऊन रिंगण घालतात आणि पालखीला प्रदक्षिणा घालतात. 

२) धावा: देहूच्या पालखीसोबतचे वारकरी वेळापूर ते पंढरपूर हा शेवटचा टप्पा धावत पार करतात. या प्रथेमागे संत तुकाराम महाराजांची एक कथा आहे. असे म्हणतात की वारीसोबत चालत असताना तुकोबारायांना वेळापूरच्या टेकडीवरुन  पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले. त्याबरोबर ते विठ्ठल दर्शनाच्या ओढीने तिथवर धावत गेले. याची आठवण म्हणून हा टप्पा धावत पार पाडण्याची प्रथा पडली. 

३) फडावरील कीर्तन-प्रवचने: वारीमध्ये अनेक फड असतात, जेथे नियमितपणे कीर्तने-प्रवचने होतात. प्रत्येक फडात त्याचे नियंत्रण करणारा एक वारीप्रमुख व त्याची शिष्यमंडळी असतात. वारकरी संप्रदायात तुळशीची माळ गळ्यात घालून शिष्यत्व पत्करले जाते.म्हणून ‘शिष्यत्व पत्करणे’ याला ‘माळ घालणे’ असेही म्हटले जाते. वारकऱ्याने ज्यांची माळ गळ्यात घातली आहे त्यांच्या फडावर जाऊन तो नियमितपणे तिथे होणारी कीर्तने व प्रवचने ऐकतो. ही प्रवचने/ कीर्तने वारीप्रमुखांकडून किंवा त्यांच्या शिष्यांच्याकडून केली जातात.  

४) परतवारी: पंढरपूर ते देहू अथवा आळंदी पर्यंतच्या परतीच्या प्रवासास परतवारी म्हणतात. परतवारीचा कालावधी ८-९ दिवसांचा असतो. काही वारकरी ही परतवारी सुद्धा करतात. 

वारीचे नियोजन आणि व्यवस्थापन:

खरे तर पंढरपूरच्या वारीचे चोख नियोजन आणि व्यवस्थापन हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. दरवर्षी लाखो वारकरी शिस्तीत, गोंधळ न घालता पंढरपूरला जातात. प्रत्येक पालखीचे व्यवस्थापन त्या त्या पालखीच्या प्रमुखांकडून केले जाते. उदाहरणार्थ, संत तुकाराम, संत एकनाथ यांच्या पालख्यांची व्यवस्था त्यांच्या वंशजांकडून केली जाते, तर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीची व्यवस्था आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानाकडून पाहिली जाते. प्रत्येक दिंडीचे व्यवस्थापन त्या दिंडीचा प्रमुख करतो. दिंडीत वारकरी पाच पाचच्या रांगेत, शिस्तीत, पताकेसमोरून आणि दिंडी न ओलांडता चालतात. त्यांच्या भोजनाच्या, विश्रांतीच्या वेळा ठरलेल्या असतात. दिंडीमधील सदस्यांना विविध जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असतात. प्रत्येक दिंडीमध्ये भोजन व्यवस्था बघणारा एक गट असतो. दिंडी रात्रीच्या मुक्कामाला पोहोचण्याच्या आधीच हा गट पुढे जाऊन दिंडीसाठी भोजनाची व्यवस्था करतो. वारीत होणाऱ्या भजनाचे नेतृत्व गळ्यात वीणा घेतलेले विणेकरी करतात. वारी संदर्भातील विविध कामांसाठी आणि कारणांसाठी शासनाशी चर्चा करावी लागते. त्यासाठी सुद्धा विविध पदे निर्माण केली गेली आहेत. अनेक सामाजिक संस्था सुद्धा या कार्यात हातभार लावत असतात.

वारी आपल्याला काय देते?

  • वारीमध्ये १८ ते २० दिवस वारकरी संसारातील सर्व सुखसोयी आणि संपत्ती विसरून सामील होतो. सर्वांबरोबर उठतो, बसतो, जेवतो आणि झोपतो. यामुळे निश्चितच सामाजिक सलोखा, बंधुभाव वाढण्यास मदत होते. 
  • सर्वांशी समत्वाने वागताना आपला स्वतःबद्दलचा अहंकार आणि दुसऱ्यांबद्दलचा द्वेष नाहीसा होतो. 
  • विठ्ठलाच्या नामात, भजन-कीर्तनात मनुष्य स्वतःला विसरून जातो. त्यामुळे त्याचे अंतःकरण शुद्ध होऊन अध्यात्मिक उन्नती होते. 
  • वारीच्या काळात पंढरपूरात अलोट गर्दी होते. अनेकदा भल्या मोठ्या रांगेत दर्शनासाठी कित्येक तास ताटकळावे लागते. मग अनेक वारकरी फक्त मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन परत निघतात. उन-पावसात अनेक सायास करुन, शेकडो किलोमीटर अंतर चालून आल्यावरसुद्धा ‘माऊलीचे दर्शन होत नाही’ म्हणून जराही खट्टू न होता, शांतपणे, फक्त कळसाचे दर्शन घेऊन परतीच्या वारीला लागणारा वारकरी जीवनातील कोणताही ‘नकार’ पचवण्याची ताकद राखतो यात शंका नाही. 

अशी ही वारी पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी आणि अभ्यासण्यासाठी भारतभरातून आणि परदेशातही अनेक भाविक आणि पर्यटक तिच्यात सहभागी होत असतात. 

तुम्हाला पंढरपूरच्या आषाढी वारीबद्दल  ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपही जॉईन करा.

      धन्यवाद !

5 thoughts on “पंढरपूरची आषाढी वारी: महाराष्ट्राची प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा”

  1. Chandralekha Dhairyasheel Jagdale

    खूप छान माहिती मांडली आहे. वाचाताना मनापासून आनंद झाला, वारीतील बारकावे लक्षात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top