आध्यात्मिक ऊर्जा कशी वाढवावी ? 

WhatsApp Group Join Now

आध्यात्मिक ऊर्जा कशी वाढवावी ? 

अध्यात्म म्हणजे काय ? –

       अध्यात्म या शब्दाचा अत्यंत साधा अर्थ म्हणजे स्वतःला जाणून घेणे किंवा स्वतःच्या अंतरंगात डोकावणे . पूर्वीच्या काळापासून अनेक अवजड शब्दांचा आधार घेऊन त्याला किचकट केल्यामुळे अध्यात्म म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची बाब आहे, असा समज होता. त्यामुळे अध्यात्माच्या वाटेवर चालण्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा लागतो किंवा ते वृद्ध काळात केले जाते, अशा चुकीच्या कल्पना लोकांत होत्या. परंतु  २१ व्या शतकात झालेल्या इंटरनेटच्या क्रांतीने ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. त्यातून अध्यात्मासंबंधी असणारे गैरसमज दूर होण्यास मदत झाली. हल्लीचे तीव्र स्पर्धेचे जग आणि त्यातून येणारे नैराश्य यामुळे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात अध्यात्माकडे आकर्षिला गेला. आता अनेक भौतिक संस्था तसेच सोशल मीडिया चॅनेल्स हे अध्यात्मिक विकास केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आलेले दिसून येतात.

भारत आणि अध्यात्म – 

         भारतीय तत्त्वज्ञानात अध्यात्मावर अत्यंत सखोल चिंतन झाल्याचे आढळून येते. त्यात आस्तिक व नास्तिक दोन्ही बाजूंनी अध्यात्माचा विचार केलेला दिसतो. वेद आणि उपनिषदे आस्तिक तत्त्वज्ञानाचा  पाया मानले जातात. त्यावर द्वैत-अद्वैत सिद्धांत मांडले गेले. तर बौद्ध आणि जैन तत्त्वज्ञानास नास्तिक तत्त्वज्ञान मानले जाते. कारण त्यात ईश्वराचे अस्तित्व नाकारले गेले आहे. परंतु सर्व तत्त्वज्ञानाचे सार हे माणसाला या मायारुपी संसारातून बाहेर काढणे व मोक्ष प्राप्त करणे हाच आहे. बौद्ध धर्मात मोक्षालाच निर्वाण म्हटले जाते तर जैन धर्मात त्याला कैवल्य संबोधले जाते. अशा विविध प्रकारच्या चिंतनातून भारताला प्रगल्भ अध्यात्मिक वारसा लाभला आहे. 

अध्यात्मिक ऊर्जा – 

             प्रत्येक जीवामध्ये जगण्यासाठी प्राणशक्ती असते. तीच त्या जीवाला सजीव बनवते. परंतु मनुष्यात प्राणशक्तीसोबतच आंतरिक ऊर्जा असते. तिलाच अध्यात्मिक ऊर्जा म्हटले जाते. अध्यात्मात या ऊर्जेला केंद्रस्थानी मानून तिच्याद्वारे आत्मिक विकास साधला जातो.

            गौतम बुद्धांनी सांगितल्या प्रमाणे जीवनाचे चार आर्य सत्य आहेत. 

१) जीवनात दुःख आहे.

२) दुःखाला कारण आहे.

३) दुःखापासून मुक्ती मिळणे शक्य आहे.

४) दुःख दूर करण्यासाठी उपाय आहेत.

याच दुःखाच्या दुष्टचक्रात सापडलेला व्यक्ती अध्यात्मात त्याचे समाधान शोधतो. जेव्हा तो स्वतःच्या अध्यात्मिक ऊर्जेचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला लक्षात येते की सर्व दुःखाचे निवारण हे मानवाच्या अंतरंगात आहे. मनुष्य जेव्हा आतून बदलतो तेव्हाच तो बाहेरून बदलू शकतो. 

अध्यात्मिक ऊर्जा वाढवण्याचे मार्ग – 

         अंतर्मनातील ऊर्जेकडे पोहोचण्याचे अनेकविध मार्ग भारतीय अध्यात्मिक परंपरेत सांगितले आहेत.

१) ध्यानसाधना भारतात अत्यंत प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. त्यामार्गाने आपल्या श्वासावर लक्ष केंद्रीत करून अध्यात्मिक ऊर्जा प्रबळ करण्याचा प्रयत्न केला जातो. 

२) त्याचप्रमाणे पतंजली ऋषींनी योग अभ्यास करून ही ऊर्जा वाढवता येते असे सांगितले आहे. विविध आसनांच्या माध्यमातून शरीर व मनावर नियंत्रण कसे मिळवावे, हे त्यांनी त्यांच्या तत्त्वज्ञानात मांडले.

३) भगवद्गीतेत निष्काम कर्मयोगाचा सिद्धांत मांडला आहे. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता ध्यानमग्न होऊन आपले कर्म करत राहणे हा त्याचा सार आहे. 

४)गौतम बुद्धांनी अध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी अष्टांग मार्ग सांगितले. त्यामध्ये योग्य दृष्टी , योग्य संकल्प , योग्य वाणी,  योग्य कर्म , योग्य उपजीविकेचे साधन, योग्य व्यायाम, योग्य स्मृती आणि योग्य समाधी इत्यादींचा समावेश होतो. 

५) जैन तत्त्वज्ञानात पाच महत्त्वपूर्ण तत्व मानली गेली आहेत. ते म्हणजे सत्य, अहिंसा, अस्तेय ( चोरी न करणे ), अपरिग्रह ( मालमत्ता संग्रहित न करणे ), ब्रह्मचर्य,  इत्यादी. यांच्या माध्यमातून मनुष्य आपल्या जीवनाला सर्व मोहांपासून दूर ठेवू शकतो. 

६) मध्ययुगात सुरू झालेल्या भक्ती चळवळीत अनेक संतांनी भक्तीमार्गाद्वारे अध्यात्माकडे जाण्याचा मार्ग जनसामान्यांसाठी खुला केला. त्यात संत ज्ञानेश्वर , संत मुक्ताबाई , संत तुकाराम , संत नामदेव , संत कबीर , संत रोहिदास, इत्यादी अनेकांची नावे आहेत. सर्व जगाचा निर्माता परमेश्वर आहे आणि त्याच्या भक्तीत स्वतःला झोकून देऊन या भवरुपी संसारातून आपण मुक्त होऊ शकतो, असा विचार त्यातून मांडला गेला.                    

             या विविध मार्गांनी अध्यात्मिक ऊर्जा वाढविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. कुठलाही मार्ग अंगिकारला तरी सर्वांचे उद्दिष्ट हे मानवाला त्याच्या दुःखापासून दूर करणे व त्याच्या आत्म्याची उन्नती करून त्याला मोक्ष मिळवून देणे हेच आहे. 

            आधुनिक काळात जिद्दू कृष्णमूर्ती आणि ओशो यांनी अध्यात्मिक विचार सोप्या पद्धतीने समजावून अनेक तरुण युवक युवतींना  प्रेरित केले. हल्ली नवनवीन संस्था अध्यात्माचे ज्ञान सर्वत्र पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत. त्यात सद्गुरू (श्री. जग्गी वासुदेव ) यांचे ईशा फाउंडेशन , श्री श्री रविशंकर यांचे आर्ट ऑफ लिव्हिंग, आचार्य प्रशांत यांचे अद्वैत फाउंडेशन , सिस्टर शिवानी यांची ब्रह्माकुमारी संस्था इत्यादींचे नाव अग्रस्थानी आहे. यूट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून अध्यात्मिक शिक्षण मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे यापूर्वी  केवळ काही उच्चकुलीन लोकांपर्यंत मर्यादित राहिलेली ही ज्ञानरूपी कुटी आता सर्वांना खुली झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top