ॲमेझॉन किंडल (Amazon Kindle Book Information in Simple Marathi)
ॲमेझॉन किंडल हे पुस्तके वाचण्यासाठीचे छोटे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. आधुनिक युगात वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी ते महत्वाचे साधन असून जगभरातील पुस्तकप्रेमींची वाचनाची भूक शमविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. किंडलमुळे वाचन-व्यवहारात क्रांती घडून आली आहे. तसेच जागतिक साहित्याचे अमर्याद क्षेत्र बोटांच्या टिचकीवर उपलब्ध झाले आहे. तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्हीही किंडल वापरून पहायला हरकत नाही.
किंडलची वैशिष्ट्ये:
1. साहित्याचे समृद्ध दालन:
किंडलद्वारे विविध भाषांमधील ई-पुस्तकांचा विस्तृत संग्रह उपलब्ध होतो. त्यामुळे जगभरातील उत्तमोत्तम साहित्याचे एक समृद्ध दालन आपल्यासमोर खुले होते.
2. वाचन सुविधा :
किंडल आवृत्तीमधील पुस्तकाचे पान अगदी नेहमीच्या पुस्तकाच्या पानासारखेच दिसते. त्यामुळे वाचनाचा वेग सहज राहतो, मंदावत नाही. ह्यामध्ये फॉन्टचा आकार व स्क्रीनचा ब्राईटनेस वैयक्तिक प्राधान्यांनुसार बदलता येतो. तसेच ओळी अधोरेखित करता येतात. शिवाय किंडलमधील अंगभूत शब्दकोशाद्वारे वाचतेवेळी कठीण शब्दांचा अर्थही शोधता येतो. एकूणच, ह्याद्वारे वाचनाचा एक आगळावेगळा अनुभव तुम्हाला मिळतो.
3. ई-इंक डिस्प्ले:
किंडल उपकरणामध्ये इलेक्ट्रॉनिक शाई (ई-इंक) डिस्प्लेचा वापर केलेला असतो. तसेच त्याची स्क्रीन सहा इंच आकाराची व पुरेशी मोठी असते. त्यामुळे मोबाईलवर वाचताना जसा डोळ्यांवर ताण येतो, तसा किंडलवर वाचतेवेळी येत नाही.
किंडलचे प्रकार:
किंडल-बेसिक आणि किंडल-पेपरव्हाईट, असे किंडलचे दोन लोकप्रिय प्रकार आहेत. दोन्हींचे बॅटरी लाईफ चांगले असते, एकदा चार्जिंग केले की बॅटरी काही आठवड्यांपर्यंत पुरते. दोन्हींमध्ये विशेष फरक नाही. फक्त किंडल पेपरव्हाईटमध्ये मेमरी साईझ व स्क्रीन रेझोल्यूशन जास्त असते, तसेच ते वॉटर प्रूफ असते, ही काही अधिकची वैशिष्ट्ये आहेत.
छापील पुस्तकांच्या तुलनेत किंडलचे फायदे: Amazon Kindle Book Information in Simple Marathi
1. किंडलचा एक फायदा म्हणजे नेहमीच्या पुस्तकापेक्षा किंडल वजनाने फार हलके असते, ‘हॅंडी’ असते, हाताळण्यास सोयीचे असते. म्हणजे छापील पुस्तक वाचताना दोन्ही हात गुंतून पडतात, अवघडतात. एकाच स्थितीमध्ये बसून दीर्घकाळ वाचणे अडचणीचे ठरते. किंडलमध्ये ही गैरसोय टळते. किंडल बाजूला टेकवून बोटाने पाने स्लाईड करत, एका कुशीवर लोळत आरामात वाचता येते.
2. साहित्यिक पुस्तकांची दुकाने सर्वांना आणि सर्वदूर उपलब्ध असतातच असे नाही. शिवाय पुस्तकांच्या दुकानांमध्ये किंवा ग्रंथालयांमध्ये आपल्याला हवी ती पुस्तके हवी तेव्हा पटकन मिळतीलच असेही नाही. कधीकधी काही विशिष्ट छापील पुस्तके मिळविण्यासाठी खूप शोध घ्यावा लागतो. विशेषत: इतर भारतीय भाषांमधील किंवा, देशविदेशातील महत्वाच्या साहित्यिकांची इंग्रजी पुस्तके मिळवण्यासाठी खूप दगदग करावी लागते. किंडलवर तुम्हाला ती अगदी सहज, घरबसल्या उपलब्ध होतात.
3. तसेच, प्रवासामध्ये वाचण्यासाठी पुस्तके न्यायची असल्यास बॅगेतील खूप जागा व्यापली जाते. त्याऐवजी किंडलद्वारे शेकडो पुस्तके आपल्यासोबत नेता येतात. तसेच किंडल सतत सोबत बाळगता येते. फावल्या वेळात मोबाईलवर अनावश्यक वेळ वाया घालविण्याऐवजी किंडल उघडून वाचन सुरू ठेवता येते. त्यामुळे वेळ सत्कारणी लागतो.
4. किंडल आवृत्ती छापील पुस्तकांपेक्षा स्वस्त असते. तसेच किंडलवर बरीचशी विनामूल्य पुस्तकेही उपलब्ध असतात. आणि विशेष प्रसंगी पुस्तकांवर लक्षणीय सवलतीही असतात. जर तुम्ही चांगले वाचक असाल आणि दर आठवड्याला एक-दोन पुस्तकाचा फडशा पाडत असाल, तर तुम्हाला सतत नवनवीन पुस्तके खरेदी करणे खर्चिक होत जाते. अशावेळी किंडल वापरणे किफायतशीर ठरू शकते
5. ह्याशिवाय आणखी महत्वाचा फरक म्हणजे मर्यादित जागेचा. छापील पुस्तकांचा संग्रह ठेवण्यासाठी खूप जागा लागते. पुस्तक-संग्रहाची काळजी घेणे हे ही एक मोठे जिकिरीचे काम असते. त्याऐवजी, तुम्ही किंडलवर शेकडो पुस्तके डाउनलोड करून वैयक्तिक संग्रह करू शकता. आणि एकाच वेळी समांतररित्या, अनेक पुस्तके वाचत राहू शकता. किंवा वेगवेगळ्या मूडप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचू शकता.
किंडलच्या तुलनेत छापील पुस्तकांचे फायदे :
एकांतात, रात्रीच्या शांत वेळी एखादे पुस्तक ओंजळीत धरून पाने पलटण्याची भावना वाचनप्रेमींना विलक्षण सुखावणारी असते. तसेच नव्याकोऱ्या पुस्तकाच्या पानांचा मंद मंद वासही सुखद असतो. पुस्तकांचा स्पर्श हा अत्यंत जिवंत असा स्पर्श असतो. हा आनंद तुम्हाला किंडल बुक्समध्ये मिळत नाही. तसेच, जेव्हा तुम्ही पुस्तकांच्या दुकानांमध्ये किंवा ग्रंथालयांमध्ये जाता, तेव्हा तुम्ही पुस्तकांच्या अनोख्या दुनियेत वावरता. तिथली पुस्तके हातात घेऊन चाळता, निवडता, खरेदी करता तेव्हा पुस्तके तुमच्याशी वैयक्तिक जवळीक साधतात. त्यातून त्या विशिष्ट पुस्तकांशी एक आपलेपणाचे नाते तयार होते, रुजते. हाही आनंद कदाचित तुम्हाला किंडल-स्टोअरमध्ये मिळत नाही.
किंडल अनलिमिटेड:
किंडल अनलिमिटेड हा ॲमेझॉनचा सबस्क्रिप्शन-आधारित ई-बुक प्लॅटफॉर्म आहे. त्यावर ठराविक शुल्क भरून तुम्ही सदस्यत्व घेऊ शकता आणि असंख्य पुस्तके, मासिके मनसोक्त वाचू शकता. किंडलवर बरीचशी मोफत पुस्तकेही उपलब्ध असतात. किंडल अनलिमिटेडचे सबस्क्रिप्शन घेतल्यास तिथे पुस्तकांचा अक्षरशः खजिना सापडतो. आपल्या वाचनाच्या अभिरूचीनुसार अनेक लेखकांची पुस्तके डोळ्यांपुढे येतात. शोध घेत राहिल्यास आणखी सापडतच जातात. आणि ह्या प्रक्रियेला काही अंत नसतो, लिमिट नसते. कदाचित म्हणूनच त्यास अनलिमिटेड म्हटले असावे.
अर्थात, किंडल अनलिमिटेडच्या काही नकारात्मक बाबीही आहेत. जसे की ह्यामध्ये तुम्ही एका वेळी कमाल वीस पुस्तकेच सेव्ह करून ठेवू शकता. शिवाय, किंडल अनलिमिटेडकडून मिळणाऱ्या पुस्तकांवर तुमचा कायमस्वरूपी मालकीहक्क राहत नाही. कारण हे एखाद्या डिजिटल लायब्ररीसारखे आहे. तुम्ही तुमची सदस्यता रद्द केल्यानंतर, तुम्हाला त्यापुढे त्यातील पुस्तकांचा ॲक्सेस बंद होतो.
किंडल अनलिमिटेडवर कोणती पुस्तके उपलब्ध आहेत ?
किंडल अनलिमिटेडवर उपलब्ध असणारी काही वाचनीय पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.
किंडल अनलिमिटेडवर उपलब्ध असणारी काही मराठी पुस्तके:
कादंबरी, श्वास, धांडोळा, जंजाळ, स्वप्नवृत्त– विक्रम त्र्यंबक भागवत
नर्मदे हर हर – जगन्नाथ कुंटे
शेतकऱ्याचा आसूड- जोतिराव फुले
स्मृतिचित्रे- लक्ष्मीबाई टिळक
शीतयुद्ध सदानंद – श्याम मनोहर
रक्तमुद्रा – जी ए कुलकर्णी
किंडल अनलिमिटेडवर उपलब्ध असणारी काही अनुवादित पुस्तके :
अर्थाच्या शोधात – डॉ. व्हिक्टर फ्रॅंकल
शांताराम – ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स
झुंडीचे मानसशास्त्र – विश्वास पाटील
अवनी एक नवी- एकहार्ट टॉल
चीपर बाय डझन – फॅंक गिलब्रेथ,अर्नेस्टाईन गिलब्रेथ कॅरे
दोन शहरांची गोष्ट – चार्ल्स डिकन्स
आत्मरंगी – रस्किन बॉंड
पाच शहरे- अहमत हमीद तानपिनार
काळी मांजर – एडगर ॲलन पो
मानवजातीची कथा- हेन्री थॉमस
पिसुक– फ्रांझ काफ्का
डॉक्टर झिवागो – बोरिस पास्तरनाक
द कॉल ऑफ वाईल्ड – जॅक लंडन
पाश्चात्य तत्वज्ञानाची कहाणी – विल ड्युरांट
द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज – अरुंधती रॉय
कॅमिली – ॲलेक्झांडर द्युमास
मून ॲंड सिक्स पेन्स – सॉमरसेट मॉम
किंडल अनलिमिटेडवर उपलब्ध असणारी काही हिंदी पुस्तके :
कसप – मनोहर श्याम जोशी
धन यात्रा, खोया पानी- मुश्ताक अहमद युसुफी
नरकयात्रा, बारामासी, नेपथ्यलीला, पागलखाना- डॉ. ज्ञान चतुर्वेदी
हम इक उम्र से वाकिफ है- हरिशंकर परसाई
विकलांग श्रद्धा के दौर – हरिशंकर परसाई
ठिठुरता हुआ गणतंत्र – हरिशंकर परसाई
एक बटा दो- डॉ. सुजाता
ठीक तुम्हारे पीछे – मानव कौल
नाकोहस- पुरुषोत्तम अग्रवाल
रेहन पर रग्घू – काशीनाथ सिंह
वैधानिक गल्प – चन्दन पांडेय
शेखर: एक जीवनी – अज्ञेय
नदी के द्वीप – अज्ञेय
नये शेखर की जीवनी – अविनाश मिश्रा
वे दिन- निर्मल वर्मा
उदाहरणादाखल काही पुस्तकांची नावे वरती दिली आहेत. तसेच ह्याशिवाय इतरही असंख्य पुस्तके किंडलवर उपलब्ध आहेत. व्यक्तिपरत्वे वाचनाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असू शकतात. आपापल्या आवडीनिवडीनुसार तुम्ही किंडलवर पुस्तके शोधून वाचनाचा आनंद घेऊ शकता.(Amazon Kindle Book Information in Simple Marathi)
सारांशरूपात असे सांगता येईल की, ज्यांचे वाचन खूपच जास्त आहे, ज्यांचे पुस्तकांच्या खरेदीसाठी सतत पैसे खर्च होत राहतात, आणि साठत जाणाऱ्या पुस्तकांची काळजी घेणे शक्य होत नाही, त्यातून अपराधभाव येतो, अशा पुस्तकप्रेमींनी किंडल वापरून पाहायला हरकत नाही. ह्याद्वारे तुमच्या वाचनाच्या कक्षा नक्की रुंदावतील.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमच्या watsapp ग्रुपला जॉईन करा
लेखकाचे नाव- चेतन, पुणे