कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्याचा संगम
डॉ ऋषिकेश बोधे
Generative AI मुळे कला क्षेत्रात एक भितीचे वातावरण आहे , पण मला नाही वाटत की कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कलाकारांची जागा घेऊ शकते. जितका ए.आय अधिक बुद्धिमान होत जाईल, तितकी ओरिजनल कलाकारांची मागणी वाढत जाणार आहे. कारण कला जितकी दुर्मिळ असेल, तितकी ती अधिक मौल्यवान बनत जाते. एआयच्या ह्या फास्ट युगात ज्या कलाकाराकडे सखोलपणे काम करण्याची सवय आहे, विविध कौशल्ये आहेत तेच कलाकार राज्य करतील. जरी एआय नव निर्मिती सोप्या पद्धतीने निर्माण करण्यासाठी सक्षम झाला असेल, एका क्लिकवर पिक्चरच्या स्क्रिप्ट तयार करता आल्या, एका प्रॉम्प्टवर सुंदर आणि कलात्मक चित्रं तयार करता आले, जिवंत आणि खरे भासतील असे व्हिडिओ तयार करत असले तरी त्याचा सर्जनशीलतेला कोणताही धोका नाही. पण जर तुमची कला सहज कॉपी करण्याइतकी उथळ असेल, त्यात काही सखोलता नसेल, तर अशा कलाकारांना त्यांची जागा सोडावी लागेल.
पण गमतीची गोष्ट अशी की एआयच्या डोक्यावर बसण्यासाठी एआयचाच वापर करता येतो. फक्त त्याचा वापर करून ते शिकायला हवं. एआय फक्त कला क्षेत्राशी निगडीत नसून ती लेखन, संगीत निर्मिती, व्हॉईस आर्टिस्ट, अकाउंटिंग, शेअर मार्केट प्रेडिक्शन, कोडिंग, रिसर्च आणि अगदी वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा घुसला आहे. स्पष्टच सांगायचं झालं तर भविष्यात जनरल फिजिशियनची , करिअर कौन्सिलर , स्कॉलॉजिस्ट इत्यादीची सुद्धा गरज संपणार आहे. प्राथमिक उपचार, साध्या सर्दी-खोकल्यासाठी किंवा किरकोळ आजारासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज संपणार आहे कारण ChatGPT सर्वच प्रश्नांची उत्तरं देतं. त्याला विचारलं की , काय त्रास होतोय ? किती दिवसांपासून होतोय ? आणि कोणत्या गोळ्या घ्यायच्या ?, कोणत्या तपासण्या करायच्या ? तर ते बेधडक, बिनचूक, साध्या आणि समजेल अशा भाषेत सांगतो. अर्थात ह्यात अजून बरीच सुधारणा आणि जागृती होणे बाकी असले तरी आपल्या समाजाची दिशा मात्र तीच आहे.
भविष्यात लोकं डॉक्टरकडे तेव्हाच जातील जेव्हा एखादा आजार गंभीर आहे असं त्यांना वाटेल.आधी रुग्ण गुगल करायचे पण तेव्हा नक्की कशावर विश्वास ठेवायचा , काय वाचायचं हे समजत नसायचं पण आता तसं नाही. गुगल च्या ऐवजी ते आता ChatGPT वर विचारतील. आणि ChatGPT सटासट सांगून मोकळा होईल.
आपण हे थांबवू शकत नाही कारण आपण स्वतःच ह्याला पोसलं आहे , आणि अजूनही पोसतच आहोत. ज्ञानाचा अधिकार सर्वांना आहे. आणि माहितीच्या युगानंतर आता इंटरनेट आणि एआयच्या युगात माहिती फक्त उपलब्धच नाही, तर ती आपल्याला हव्या त्या भाषेत, हव्या त्या पातळीवर समजेल अशा स्वरूपात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे इथूनपुढे डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेटपेक्षा तुमच्यातले प्रॅक्टिकल कौशल्यच तुम्हाला तारू शकतात. आणि हे होण्यासाठी अधिक काळ जाणार नाही.
आता प्रत्येक क्षेत्रात “man with a tool” पेक्षा “man who knows how to use the tool” अधिक महत्वाचा होईल. AI हे साधन आहे, पण मनुष्यच त्या साधनाला दिशा देतो.
पुढील दशक हे “AI vs Human” चं नसून “AI + Human” चं दशक असेल — जिथे एआय तुमचा प्रतिस्पर्धी नसून, तुमचा सहकारी बनेल. कलाकार, शिक्षक, संशोधक, डॉक्टर किंवा शास्त्रज्ञ — जो एआयला फक्त एक shortcut म्हणून नव्हे तर एक amplifier म्हणून वापरेल, तोच टिकेल.
म्हणून भविष्यात सर्जनशीलतेचं मूल्य वाढणार आहे, पण त्या सर्जनशीलतेत खोली, विचार आणि वैयक्तिक मूल्य असायला हवं. उथळ कलाकार नाहीसे होतील, पण खरे कलाकार — जे स्वतःच्या अनुभवातून, वेदनेतून, आणि प्रामाणिकतेतून सर्जन करतात — ते अमर होतील.
थोडक्यात, एआय मानवाची जागा घेणार नाही; तो त्या माणसाची जागा घेईल जो स्वतःला अपग्रेड करायला तयार नाही.
भविष्य हे कला + कौशल्य + कृत्रिम बुद्धिमत्ता = अमरत्व या समीकरणावर उभं आहे.
जो हे समजून घेईल, तोच पुढच्या युगाचा कलाकार, निर्माता ठरेल.
लेखक – डॉ ऋषिकेश बोधे
