Ashok Saraf : ‘सौदामिनी आधी कुंकू लाव.! किंवा ‘मिस्टर माने इथेच राहतात का? मधले माने किंवा ‘विख्यि व्याख्या व्युखू करणारे नवकोट नारायण उद्योगभूषण यदुनाथ जवळकर किंवा हा माझा बायको पार्वती म्हणणारे धनंजय माने ही सगळी पात्रं आणि डायलॉग लक्षात आहेत ना?तुमचा यातला आवडता डायलॉग कोणता? ही सगळी पात्रं ज्यांनी अजरामर केली ते मराठी चित्रपटसृष्टीमधील महानायक अशोक सराफ म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक मामा.
अशोक सराफ म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीला पडलेलं सोनेरी स्वप्न असं म्हणलं तर वावग ठरणार नाही.यातच आता कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा करून त्यांचे अभिनंदन केले आहे.’माझ्या आजपर्यंतची धडपड सार्थकी लागल्या सारखं वाटतयं.! असं म्हणत त्यांनी या पुरस्काराबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
याआधी 2016 मध्ये फिल्मफेअर मराठी लाईफटाईम अचीवमेंट पुरस्काराने अशोक सराफ यांना सन्मानित केलं गेलं होतं. जाणून घेऊया अशोक सराफ यांची कारकीर्द-
हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या मूळ बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 मुंबईत झाला.दक्षिण मुंबईत चिखलवाडीत त्यांच बालपण गेलं.
अशोक सराफ यांचे मामा गोपीनाथ सावकार यांची कलामंदिर नावाची नाटक कंपनी होती. त्यामुळे घरातच सगळं कलेच वातावरण अशोक मामांना जवळून अनुभवता आलं.तरीही सुरवातीच्या काळात अशोक सराफ यांचे मामा आणि वडील दोघांचीही इच्छा नव्हती की त्यांनी याक्षेत्रात यावं कारण तो काळ अभिनय सृष्टीसाठी पूरक नव्हता, त्यातून म्हणावंस उत्पन्न मिळत नव्हतं त्यामुळे अशोक सराफ यांनी वडिलांच्या इच्छेखातर 10 वर्ष स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी केली.
अशोक सराफ यांच्या वडिलांचा इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय होता.ते आनंदी होते आपला मुलगा मार्गी लागला म्हणून पण अशोक सराफ यांचं मन मात्र नाटकांकडे धाव घेत होत. बँकेत काम करत असताना सुद्धा ते नाटकात काम करायचे.अभिनयाचं बाळकडू हे अशोक सराफ यांना नाटकातूनच मिळालं.सुरवातीला छोटया नाटकातून काम करत त्यांनी नोकरीला असताना वि.स. खांडेकर यांच्या ययाती कादंबरीवर आधारित नाटकात ‘विदूषकाची भूमिका केली,आणि तिथूनच त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. 1975 साली दादा कोंडके सोबत त्यांनी पांडू हवालदार केला आणि तो चित्रपट त्यांना खरी ओळख देऊन गेला.
अशोक सराफ यांनी बँकेतील नोकरी का सोडली?-
नाटकात काम करत असताना आर्टिस्ट कोट्यातून 1967 साली बँकेत नोकरीला लागले.बँकेत असताना नाटक त्यांच्या तालमी,शूटिंग आणि काम यात त्यांची फार धावपळ होत असे.अशात अनेकदा त्यांना कामावर जाता येत नसे अशात त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना खूप सांभाळून घेतलं अशोक सराफ यांची कामं त्यांनी केली पण एकदा त्यांनी बराच काळ सुट्टी घेतली आणि आजारी असल्याचं मेडिकल सर्टिफिकेट बँकेत दिलं तेव्हा काही वरिष्ठ अधिकारी त्यांच्या घरी त्यांना बघायला आली तेव्हा ते कोल्हापूरला असल्याच त्यांच्या बहिणीने त्यांना सांगितले.त्यावेळी अशोक सराफ यांना वाटलं की कधीतरी हे सत्य समोर येणारच आहे आणि आपल्यामुळे आपले बँकेतील सहकारी अडचणीत येतील याकरणाने त्यांनी ती नोकरी सोडली.
पहिला चित्रपट-
आपल्या सर्वांना माहिती आहे की अशोक सराफ यांनी त्यांची अभिनयाची सुरुवात नाटकांपासून केली.अशातच नाटक सुरू असताना गजानन जहागीरदार यांनी मामांना ‘दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटात भूमिका दिली आणि त्यावेळी सात दिवसांच्या शूटिंगचे त्यांना सातशे रुपये मिळाले होते.त्यानंतर तब्बल चार वर्षानंतर दादा कोंडके यांना कुणीतरी त्यांचं नाव सुचवलं आणि त्यातूनच पांडू हवालदार उभारला.हा चित्रपट त्यांच्या अभिनय कारकिर्दीला पुढे नेण्यास कारणीभूत ठरला.
अशोक सराफ यांचा अभिनय प्रवास-
नाटकातून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे अनेक हिंदी मराठी चित्रपट, नाटक यात समाविष्ट झाला. त्यांनी केवळ विनोदी नव्हे तर गंभीर भूमिका देखील केल्या आणि त्याही तितक्याच अजरामर झाल्या.
दादा कोंडके सोबतचा पांडू हवालदार, कळत नकळत,भस्म यात त्यांनी अभिनयाचे वेगवेगळे पैलू दाखवले तर वजीरमध्ये त्यांनी राजकारणी साकारला.चौकट राजामधला गुणा तर आजही लोकांना भावतो.रंजना यांच्या सोबतचा बिनकमाचा नवरा,एक डाव भुताचा हे चित्रपट आजही लोकांच्या मनात आहेत.पुढे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे समीकरण इतकं गाजलं की आजही त्यांची जोडी यादगार आहे.
ऐंशीच्या काळात लक्ष्मीकांत बेर्डे,महेश कोठारे, सचिन पिळगावकर यांनी धुमाकूळ घातला होता.याच काळात त्यांची ओळख त्यांची पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांच्याशी झाली आणि पुढे त्याच रुपांतर प्रेमात आणि लग्नात झालं.त्यांना एक मुलगा आहे अनिकेत सराफ.तो अभिनय क्षेत्रात न येता तो एक शेफ आहे.याकाळात नवरी मिळे नवऱ्याला, आयत्या घरात घरोबा, आत्मविश्वास, अशी ही बनवाबनवी, धुमधडका,पहिली शेर दुसरी सव्वाशेर,आमच्या सारखे आम्हीच,गंमत जंमत,नवरा माझा नवसाचा,चंगु मंगु,बाळाचे बाप ब्रम्हचारी,साडेमाडे तीन आणि आताच काही वर्षापूर्वी आलेला शेंटीमेंटल अशा अनेक चित्रपटात त्यांनी आपला ठसा उमटवला.
अशोक सराफ ते सगळ्यांचे अशोकमामा कसे झाले?
अशोक सराफ यांना संपूर्ण चित्रपट सृष्टी ते सामान्य माणसं सगळेचजण अशोक मामा म्हणून ओळखतात,हाक मारतात.ते सगळ्यांचेच ‘मामा कसे झाले याची गोष्ट त्यांनी अनेकदा त्यांच्या मुलाखतीमधून सांगितली आहे.70च्या काळात एका चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूर मध्ये चालू होते. त्यावेळी तिथला कॅमेरामॅन होता ‘प्रकाश शिंदे. तो एकदा त्याच्या मुलीला शूटिंगला घेऊन आला असताना त्याने त्याच्या मुलीला ओळख करून दिली,ती हे अशोक मामा.तिथून पुढे त्या सेटवर सगळेजण त्यांना अशोक मामा म्हणू लागले आणि पुढे ते सगळ्यांचेच अशोकमामा झाले.
अशोक सराफ मराठी ते हिंदी प्रवास-
आपल्या हावभाव,डायलॉग आणि अभिनय कौशल्याने अशोक मामांनी मराठी कला क्षेत्राला भुरळ पाडली होतीच तीच पुढे हिंदीतही पडली. नव्वदीच्या काळात सुरू झालेली ‘हम पांच या मालिकेमधील आनंद माथूर आठवतोय,पाच मुली आणि दोन बायका यामध्ये पिचलेला पुरुष आणि त्याची उडणारी धांदल आणि त्यातून निर्माण होणारा निखळ विनोद मामांनी लिलिया साकारला होता, या मालिकेच्या आठवणी सामान्य माणसाच्या मनात आजही तितक्याच जिवंत आहेत.
यासोबतच मामांनी ‘डोन्ट वरी होजायेगा,छोटी बडी बाते सारख्या हिंदी मालिकेत काम केलं.खरंतर हिंदी चित्रपट सृष्टीला या अवलिया कलाकाराला पुरेपूर न्याय देता आला नाही असंच वाटतं, मराठीत सुपरस्टार असलेल्या अशोक मामांना हिंदी चित्रपटात मात्र कायम दुय्यय किंवा सहकलाकाराच्या भूमिका वाट्याला आल्या,त्यातही विनोदी.त्यांनी त्याही भूमिका तितक्याच अजरामर केल्या यात शंका नाही.सिंघम मधील हेड कॉन्सटेबल,करणं अर्जुन मधील मुंशी, जोरु का गुलाम मधील गोविंदाचा मामा येस बॉस मधील शाहरुख खानचा मित्र या त्यांच्या भूमिका आजही लक्षात राहतात.यासोबतच प्यार किया तो डरना क्या,खूबसुरत,बेटी नंबर वन,कुछ तुम कहो कुछ हम कहें,गुप्त यासारख्या हिंदी चित्रपटात काम केलं.
अशोक मामा हे मराठी,हिंदी चित्रपट मालिकेत खूप सक्रीय असले तरीही त्यांनी नाटकाशी त्यांची जोडलेली नाळ कधीच तुटू दिली नाही.आता गाजत असलेलं त्यांचं व्हॅक्यूम क्लिनर नाटक प्रेक्षकांना भुरळ पाडत आहे. यासोबतच याआधी मामांनी केलेली हमीदाबाईची कोठी,अनधिकृत,मनोमिलन,हे राम कार्डिओग्रॅम,मनोमिलन,डार्लिंग डार्लिंग,सारखं छातीत दुखतंय ही नाटकं लक्षात राहतात.यातल्या काही नाटकांचे प्रयोग परदेशातही झाले.आजवर अशोक मामांनी विनोदी, गंभीर, नायक खलनायक अशा अनेक भूमिका निभावल्या.
त्यांचं अचूक टायमिंग,कमालीची विनोद बुद्धी,हावभाव हे सगळं आजही आपल्याला त्यांच्या भूमिकेत अडकवून ठेवतो.अभिनय त्यातही विनोदी अभिनय हा अतिशय गंभीरपणे करायची गोष्ट आहे असं जेव्हा मामा म्हणतात तेव्हा हे आजच्या कलाकारांनी समजून घेणं महत्त्वाचे आहे.
त्यांना जाहीर झालेला महाराष्ट्र भुषण पुरस्कार खरंतर आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि मामांचा कोणता चित्रपट,डायलॉग तुमच्या लक्षात आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
तुम्हाला हा लेख कसा वाटला,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका.अशीच नवनवीन माहिती आणि लेख आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
लेखक – निलम घाडगे (पुणे)
Nice
धन्यवाद.!😊
अरे वा खूपच छान .बरीच माहीती मिळाली.
धन्यवाद.!😊
खूप छान लेख👌👌
धन्यवाद.!😊
अशोक सराफ यांचे खूप छान वर्णन केले आहे. .माहितीपूर्ण लेख.
धन्यवाद.!😊
KHUPCH SUREKH AANI MUDDESUD
धन्यवाद.!😊
Nice Information 👍
धन्यवाद.!😊