अक्षयतृतीया म्हणजे काय? 

WhatsApp Group Join Now

          अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्ता पैकी एक आहे. हिंदू कॅलेंडरच्या मुख्य तारखांपैकी यंदा हा सण यावर्षी वैशाख शुक्ल तृतीया तिथीला 10 मे रोजी शुक्रवारी पहाटे 4:17 वाजता सुरू होईल आणि शनिवार 11 मे रोजी मध्यरात्री 02.50 पर्यंत राहणार आहे. यावर्षी हा एक सुंदर योगायोग असेल. या शुभ योगात कोणतेही शुभ कार्यला सुरुवात केल्याने तिप्पट फळ मिळते. यावर्षी अक्षय तृतीया शुक्रवारी येणार असून, या दिवशी हिंदू भाविक लोक देवी लक्ष्मीची पूजा करू शकतील. हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र असा दिवस आहे. अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. याला ‘अखाती तीज’ असेही म्हणतात.

        या शुभमुहुर्ताच्या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हंटले जाते. या दिवशी दान करण्याला खूप महत्व आहे. शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तुंचे दान करतो, त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच जास्त प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात, म्हणुन अक्षयतृतीला विशेष महत्व आहे. वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणुन प्रसिध्द आहे. या दिवशी पाण्याचे दान करण्याला सुद्धा महत्व आहे.

  अक्षयतृतीया म्हणजे काय? 

             अक्षय म्हणजे “जे कधीही न संपणार ” आणि म्हणूनच असे म्हटले जाते, की अक्षय्य तृतीया ही अशी तिथी आहे. या दिवशी केलेले जप, दान, ज्ञान हे अक्षय फळप्राप्ती देणारे असते. म्हणून याला अक्षय तृतीया असे म्हणतात. ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फळ देते. म्हणूनच असे म्हटले जाते की, या दिवशी एखादी व्यक्तीला कामात यश मिळाल्या नंतरही त्याची मोठ्या प्रमाणात भरभराट होते. या दिवशी तुम्ही नवीन कपडे, सोन,गाडी, घर अश्या मौल्यवान गोष्टी खरेदी केलेली चांगल मानतात. तसेच या दिवशी जो जप,उपास करतो, त्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते आणि सुख- शांती,समृद्धीने संपन्न होतो. तसेच वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणुन प्रसिध्द आहे असे मानले जाते.

अक्षयतृतीया साजरी का केली जाते आणि दानाचे महत्व-

       अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे. सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात. जैन धर्मातिल लोकांसाठीसुद्धा अक्षय तृतीयेचा दिवस महत्त्वपूर्ण मानला जातो. या तिथीला नर नरायण, परशुराम, हयग्रीव याचा जन्म झाला आहे. म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात. तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाला सुरुवात झाली आहे. 

1) हिंदू श्रद्धा-  हा दिवस पृथ्वीचे रक्षण करणारे भगवान विष्णू यांना समर्पित आहे. अक्षय तृतीयेमागे हिंदूंची आणखी एक दृढ श्रद्धा आहे. ती म्हणजे काहीजण याचा संबंध भगवान विष्णूच्या जन्माशी आणि लीलाशी जोडतात. सर्व समजुती श्रद्धेशी संबंधित आहे. वैशाख महिना हा भगवान विष्णूंसाठी आवडता आहे असे मानले गेले आहे. म्हणून या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी यांची पूजा केली जाते.

         तसेच या दिवशी श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले की, या तिथीस केलेले दान व हवन याचं क्षय होत नाही. म्हणून या तिथीला मुनींनी ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अविनाशी होते. तसेच जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो सर्व पापांतून मुक्त होतो, असे म्हंटले आहे.

2) परशुरामाचा जन्माचेमहत्व  –  विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते. तसेच हिंदू धर्माप्रमाणे विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी विष्णू सहाव्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले, म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, त्रेता आणि द्वापर युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर अमर राहिले. परशुराम हे सप्तर्षींपैकी (सात ऋषीं पैकी एक ऋषी) जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते. हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले, तेव्हापासून अक्षय्य तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करायला लागले.

3) श्रीकृष्ण आणि सुदामाची मैत्री – श्रीकृष्णांचा पृथ्वीवर जन्म झाला, त्यानुसार अनेक पौराणिक कथा पुराणात सांगण्यात आलेल्या आहेत की, एका  अक्षय तृतीयेच्या दिवशी गरीब मित्र सुदामा बालपणीचा मित्र कृष्णाला भेटायला आला होता, तेव्हा कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त चार तांदळाचे दाणे होते, तेच सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले. तेव्हा श्रीकृष्णाने आपला मित्र सुदामाची सगळी आर्थिक परिस्थिती अंतर्ज्ञानाने ओळखून, सुदामाचे दारिद्र्य दूर करून त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी संपूर्ण केले. मित्र श्रीकृष्णाच्या कृपाशिर्वादाने सुदामा श्रीमंत झाला. तेव्हापासून अक्षय्य तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले आहे.

4) अन्नपूर्णेच्या पूजेचे महत्व– अक्षय तृतीया हा दिवस माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे म्हणून मानला जातो. तसेच देवी अन्नपूर्णाही देवी पार्वती चे रुप म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्याने आयुष्यभर घरात सुख,शांती,समृद्धी नांदते. तसेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि अन्नदान केल्याने तिची कृपादृष्टी आपल्यावर राहते. तसेच अन्नपूर्णेच्या पूजेने धन, धान्याला कधीही कमी पडत नाही. 

5)  वेद महर्षी व्यास आणि अक्षयपत्रच महत्व – या दिवशी भगवान गणेशाने  वेद महर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती. महाभारताला पाचवा वेदाची संज्ञा दिली गेली आहे. या महाभारतात भगवद्गीतेचाही समावेश केला गेला आहे. म्हणूनच या दिवशी गीतेच्या 18 व्या अध्यायाचे पाठणाचे महत्व दिले गेले आहे. 

        तसेच या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला ‘अक्षयपत्र’ प्राप्त झाले होते. तो दिवस अक्षय तृतीयाच होता. अक्षयपात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्नाला भरपूर पुरवठा होता, अन्न कधीच संपत नव्हते. त्यामुळे या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब,भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे. तसेच या दिवसापासून शेतकरी रब्बी पिकानंतर रिकामे पडलेले शेत नांगरण्यास सुरुवात करायला लागले. त्यामुळे या दिवशी केलेले दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते, म्हणून या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही. आणि वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य वाढते.

6) साडीच दान- अक्षय तृतीयेची आणखी एक कथा महाभारतात समावेश आहे. ती म्हणजे या दिवशी दुशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता. या वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली.

7)  कुबेराची पूजा – दक्षिण भारतातील मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीने कुबेराच्या तपाने प्रसन्न होऊन त्यांना धनाचे देवता बनवले होते. कारण या दिवशी कुबेर यांनी शिवपुरम या ठिकाणी शिवाची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते. कुबेराच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागण्यास सांघितले, तेव्हा कुबेरांनी लक्ष्मीजींकडून आपली  संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले. त्यानंतर शंकरजींनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्यास सांगितले.  तेव्हापासून आजपर्यंत अक्षय्य तृतीयेला लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मी ही भगवान विष्णूची पत्नी आहे, म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्याआधी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी लक्ष्मी यंत्रमाची पूजा केली जाते, ज्यामध्ये विष्णू, लक्ष्मी सोबत कुबेराचेही चित्र असते. म्हणूनच या दिवशी लक्ष्मी यंत्र आणि भगवान कुबेराची देखील पूजा केली जाते.      

8) गंगेत स्नान करण्याचे महत्व  –  अक्षय तृतीयेच्या दिवशी आकाशगंगेत निवास करणारी पवित्र गंगा नदी राजा भगीरथ यांच्या तपस्यामुळे भगवान शंकरांनी पृथ्वीवर पाठवली होती. तसेच पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्यामुळे या दिवसाचे पावित्र्य वाढले. त्यामुळे या दिवसाचा हिंदूंच्या पवित्र सणात समावेश होतो. तसेच पवित्र जलात स्नान, श्रीविष्णूची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण  करण्यालाही महत्व दिले आहे. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे,नाही तर निदान तिलपण करावे. त्यामुळे पितृदोष नाहीसे होतात. तसेच या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे ही नष्ट होतात.

9) आंब्याचे महत्व – या सणाच्या दिवशी सर्व प्रथम स्थान हे अंबा या फळांचे आहे. या सणाचा वेळी आंब्याच्या दानाला खूप महत्त्व असून, पूजेसाठी मोठया प्रमाणात खरेदी करतात. तसेच कुटुंबातील मृत सदस्यांना नैवद्य देऊन पित्र, सुवासिनींला आमरस, पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी होते. तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय्य तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते.

10) माठाचे महत्व – वैशाख महिन्यात अत्यंत उष्णता असते. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ घेऊन,  त्यात वाळा ठेवतात. त्यामुळे पाण्याला सुगंध येतो आणि पाणीही चवदार व थंड राहण्यास मदत होते. तसेच मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी फायदेशीर राहते.

अक्षय तृतीयेला काय दान करावे आणि फायदे काय होतात तेपाहूया.

       वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया सण साजरा करण्यात येतो. हिंदू धर्मामध्ये या सणाला मोठे महत्त्व दिले जाते. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे या दिवशी कोणतेही मंगल कार्य, विवाह, खरेदी, गुंतवणूक पहिल्यासारखा मुहूर्त पाहिला जात नाही. 

       तसेच हिंदू धर्मात तप, व्रत, दान आणि तीर्थ याला विशेष महत्त्व आहे. जी व्यक्ती नियमान प्रमाणे व्रत ठेवून, तप, दान-पुण्य करते. त्या व्यक्तीस अक्षय पुण्य फळ मिळते. वैशाख महिन्यात या धार्मिक कार्यांना मोठे महत्त्व आहे. तर या महिन्यात अक्षय तृतीयेच्या  दिवशी केले जाणारे दान हे नेहमी अक्षय राहते अशी धार्मिक मान्यता आहे. 

कोणते दान करावे?

 1) आंब्याचे दान- या सणाला आंब्याचे महत्त्व असून पूजेसाठी मोठी खरेदी होते. तसेच कुटुंबातील दिवंगत सदस्यांना, पितरांना, देवाला नैवद्य दाखऊन, सुवासिनींलाही आमरस, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी होते.

2) सार्वजनिक ठिकाणी केलेले दान – मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी साध्या पाण्याची व  थंड पाण्याची  सोय करावी. भंडारा करून गोड-धोडाचे जेवण ठेवावे याने अनंत पुण्य मिळते.

3) पिवळे वस्तूचे दान – अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रभू विष्णूंना पिवळी मिठाई, पिवळी फुल वाहावे, तसेच पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे 9 दिवे लावून पूजा करावी. त्याने घरात सुखशांती नांदते आणि धनलाभ होतो.

4) गरजू लोकांना दान – उन्हाळ्यापासून रक्षण होण्यासाठी गरजू लोकांना छत्री, मटका, आणि पंखा दान करावा.

5) विष्णुसहस्त्रनाम पाठाचे महत्व – अक्षय तृतीयाच्या दिवशी प्रभू विष्णूनारायनाची आणि लक्ष्मीची पूजा करावी. तसेच रोज श्री विष्णुसहस्त्रनाम पाठ आणि श्री सूक्त पाठ केल्याने जीवनात धन, यश, पद आणि किर्ती प्राप्त होते.

6) रामरक्षाचे महत्व –ज्यांना आरोग्याच्या समस्या असतील, त्यांनी या दिवशी रोज रामरक्षा स्तोत्र पाठ अवश्य केले पाहिजे. तसेच नवीन वस्त्र धारण करून मंदिरात अन्न आणि फळ दान केले पाहिजे. तसेच त्याने आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.

7)  शालेय वस्तूचे दान – या दिवशी आपल्या मित्रांना, विद्वान लोकांना धार्मिक पुस्तक दान केल्याने देव गुरु बृहस्पती प्रसन्न होतात. तसेच गरीब गरजू शालेय विद्यर्थ्यांना पुस्तके, शालेय गणवेश, पेन, पेन्सिल अश्या वस्तू दान करावे. 

8)  सुपारीचे दान – हिंदू धर्मात पूजा करताना सुपारीचा वापरला महत्व दिले आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुपारी दान केल्याने सुख आणि सौभाग्य लाभते. तसेच तुम्हाला आर्थिक लाभा बरोबर आयुष्यातील त्रासही दूर होतात.

9) कुमकुम दान – अक्षय तृतीयेला कुमकुम दान करणे खूप शुभ मानले जाते. स्त्रियांसाठी हा दिवस  खूप महत्त्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या चैत्रगौरीच्या निमित्ताने सुहासिनी हळदी-कुंकू करतात, मोगऱ्याची फुले, गजरा, आंब्याची डाळ आणि पन्हे देतात.          त्यादिवशी हळदीकुंकू समारंभांचा (गौरी उत्सवाचा) अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो. तसेच चैत्र गौरी  विसर्जन करतात. त्यामुळे स्त्रियाच सौभाग्य वाढत आणि वैवाहिक आयुष्यातील समस्या दूर होतात.

10) उदककुंभाचे दान- या दिवशी देव आणि पितर यांच्या नावाने ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे. त्याचे कारण असे की, पितरांच्या चरणी उदककुंभ दानाने पितर माणसाच्या जन्म संबंधित ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात. तसेच देवाचा                           आशीर्वादामुळे आपल्या प्रारब्धातील  पाप नष्ट होण्यास मदत होते.

11) अन्न दान –  हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला तांदूळ, डाळ आणि पीठ इत्यादी दान केल्याने अत्यंत शुभ फळ मिळते. यासोबतच माता अन्नपूर्णाची ही कृपा सदैव राहते.

12)जल दान – अक्षय तृतीयेच्या दिवशी जल दान करणे देखील खूप शुभ असत. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी किंवा लोकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याने फार मोठे पुण्य मानले आहे. असे केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते.

13) जवस दान – अक्षय तृतीयेला जवस दान केल्याने सर्व पापांतून मुक्ती मिळते. तसेच पापाचा क्षय होतो. शास्त्रात असे म्हंटले आहे की, जवस हे सोन्याच्या बरोबरीचे मानले जाते. त्यामुळे जव दान केल्याने घरात सुख-समृद्धी येते.

14) मनाचे दान – या दिवसात मनोभावे कुलदेवतेची सेवा करून जप केला पाहिजे, तिला प्रार्थना करून तिची ओठी भरली पाहिजे. तिच्या सेवेत मन अर्पण केलं पाहिजे

         अश्याप्रकरे अक्षय तृतीयेच्या पुण्य प्रभावामुळे राजाला एकेकाळी वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली होती. तरीही ते कधीही लोभाला बळी पडले नाही. तसेच सत्कर्माच्या मार्गापासून दूर न जाता पुण्यकर्म करा. त्यामुळे अक्षय तृतीयेला पुण्याचा साठा वाढत राहील. 

          ज्याप्रमाणे भगवंताने धर्मदासांवर कृपा केली, त्याचप्रमाणे जो कोणी या अक्षय्य तृतीयेच्या कथेचे महत्त्व जाणून घेईल. तसेच नियमानुसार पूजा व दान करील, त्याला अक्षय्य पुण्य आणि कीर्ती प्राप्त होईल. तसेच तुम्हाला येणाऱ्या  या नवीन वर्षी अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा !

                                    ही अक्षय तृतीय तुमच्या कुटुंबाला

                              नवचैतन्य, सुख शांती व प्रेम देऊन जावो

                                           हीच आमची कामना

                                अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!

4 thoughts on “अक्षयतृतीया म्हणजे काय? ”

  1. Tanulata Palkhe

    Parashuram is not from Saptarshi, he is from “Sapt Chiranjivi” – only 7 human beings are blessed to be immortal. “Ashwathama” is one of them. “The Parashuram” is another one.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top