कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आपले आयुष्य पणाला लावणारे थोर समाज सुधारक बाबा आमटे यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन. त्यांनी स्वीकारलेले खडतर जीवन व त्यांचा प्रेरणादायी प्रवास याबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
बाबा आमटे हे एक समाजसेवक होते.कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी त्यांनी चंद्रपूर महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचे आश्रम सुरू केले.ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटले. वन्य जीवन संरक्षण व नर्मदा बचाव आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळीमध्ये ही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले गेले आहे.
• बाबा आमटे यांचा परिचय:
मुरलीधर देवीदास आमटे म्हणजेच बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 साली महाराष्ट्रात वर्धा जिल्हा हिंगणघाट येथे ब्राह्मण कुटुंबात झाला. देविदास आमटे हे त्यांचे वडिल तर त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आमटे होते. त्यांचे वडील देविदास आमटे हे स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश प्रशासनातील जिल्हा प्रशासन व महसूल संकलन विभागाचे सरकारी अधिकारी असून वर्धा जिल्ह्यातील एक श्रीमंत जमीन मालक होते.त्यांचे आई वडील त्यांना प्रेमाने बाबा म्हणून हाक मारत. आणि हेच नाव पुढे त्यांना संबोधले जाऊ लागले.
•बालपण व शिक्षण (baba amte information in marathi):
मूळच्या जमीनदार घराण्यात जन्म झाल्याने त्यांचे बालपण सुखात गेले.लहान वयातच वडिलांनी त्यांना एक बंदूक भेट दिली होती. त्या बंदुकीने ते छोटी-मोठी शिकार करीत.त्यांचे प्राथमिक शिक्षण चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे झाले व महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथे झाले.त्यांनी नागपूर विद्यापीठातून बीए व एलएलबी हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. बाबांना स्वतः डॉक्टर व्हायचे होते परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. काही काळ वकिली केल्यानंतर त्यांनी इ.स.1949-50 मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या शिफारसी मुळे त्यांनी फक्त डॉक्टरांना करता येणारा कुष्ठरोग निदानावरील आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला.
•बाबा आमटे यांचा विवाह:
बाबा आमटे यांचा विवाह 18 डिसेंबर 1946 रोजी इंदू घुले यांच्याशी झाला. इंदू घुले विवाहानंतर साधनाताई आमटे म्हणून परिचित झाल्या. बाबांच्या या समाज कार्यामध्ये साधनाताईंनी स्वतःला झोकून दिले. बाबांच्या जीवनात साधनाताईंनी जी आयुष्यभर साथ दिली याची अद्भुत रम्य कहाणी त्यांचे “समिधा” या त्यांच्या आत्मचरित्रात वाचावयास मिळते.
•बाबा आमटे यांचा समाजकार्य:
1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात ते महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या सहवासात आले आणि त्यांच्या विचारांचा बाबांच्या मनावर फार प्रभाव पडला. या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. महात्मा गांधीजींच्या चरख्याचा स्वीकार करून खादी कपडे घालायचे ठरविले. इ.स.1943 मध्ये वंदे मातरम ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना 21 दिवसांचा तुरुंगवास झाला होता.baba amte information in marathi
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गानी आंदोलने केली.पंजाब दहशतवादांनी वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यातील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्याने अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता.राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी इ.स.1985 मध्ये “भारत जोडो”अभियान योजले होते.यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
•आनंदवन:
त्याकाळी कुष्ठरोगाची साथ पसरली होती.अनेक लोक या रोगामुळे बाधित झाले होते. समाजात त्यांना फारच हीन भावनेचा सामना करावा लागत होता. कुटुंबातून बेदखल केले जात होते. एके दिवशी बाबांना रस्त्याच्या बाजूला एक कुष्ठरोगी पडलेला दिसला. त्याच्या जखमांमध्ये जंतू होते व त्याचा दुर्गंधही येत होता. बाबा ते बघताच घाबरले.या प्रसंगाने त्यांच्या जीवनाला वेगळे वळण दिले आणि त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन कुष्ठरोगानी ग्रस्त असलेल्या लोकांचे पुनर्वसन आणि सशक्तिकरण करण्यासाठी समर्पित केले.बाबांनी कुष्ठ रोगाबद्दल अभ्यासायला सुरुवात केली. आणि अशा निराधार लोकांची सेवा करण्याचे ठरविले.
बाबा आमटेंनी महाराष्ट्र राज्यात चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा गावाजवळ 1948 साली महारोग्यांच्या सेवेसाठी केवळ दोन झोपड्यांमधून आनंदवन हा प्रकल्प सुरू केला. महारोगी सेवा समिती वरोरा मार्फत या प्रकल्पाची सर्व व्यवस्था बघितली जाते. कुष्ठरोग्यांची शुश्रुषा करणेच नव्हे तर त्यांना आत्मनिर्भर,स्वावलंबी बनवण्यासाठी बाबांनी अथक परिश्रम घेतले.आज येथे रुग्णालयांबरोबरच शाळा ,महाविद्यालय ,अनाथालय ,अंध व मूकबधिर मुलांची शाळा, हस्तकला, शिवणकला, हातमाग, यंत्रमाग असे विविध उपक्रम राबविले जातात.
आज आश्रमात सर्व जाती-धर्माचे व सर्व थरातील लोक आहेत. शेती बरोबरच कुक्कुटपालन, दुग्धशाळा, गोशाळा, शेळी मेंढी पालन इत्यादी उद्योग सुरू करून दिले. प्रचंड पाऊस, घनदाट जंगल, दळणवळणाची साधने नसणे, पावसात मार्ग अडवून टाकणारे नदी नाले, जंगली प्राण्यांचा सुळसुळाट, अन्न वस्त्र निवाऱ्याची कमतरता, शासनाचा असहकार ,आदिवासींचे अज्ञान, अंधश्रद्धा अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही प्रचंड जिद्दीने बाबांनी आपली कामे पूर्णत्वास नेली आणि आनंदवन श्रमवन म्हणून विकसित झाले. डॉ. विकास आमटे व त्यांची पत्नी बाबांच्या तत्वांचे पालन करून आनंदवनाची धुरा सांभाळत आहेत.
•लोकबिरादरी प्रकल्प -हेमलकसा:
हा प्रकल्प महाराष्ट्र राज्यात गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात हेमलकसा येथे वसला आहे. दंडकारण्य जंगलात दुर्गम असलेल्या ह्या भागात माडिया गोंड या आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे. बंडखोर कारवायांमुळे व शोषित समाज जीवनामुळे इथले आदिवासी हलाखीचे जीवन जगत. या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन या भागात ना नफा या तत्त्वावर चालणारा लोकबिरादरी हा प्रकल्प आदिवासींच्या शैक्षणिक,आर्थिक आणि आरोग्यविषयक विकासासाठी बाबा आमटेंनी 23 डिसेंबर 1973 रोजी या प्रकल्पाचे कार्य सुरू केले. या प्रकल्पा अंतर्गत शाळा,रुग्णालय व पशू अनाथालय चालविले जाते.
डॉ.प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी डॉ.मंदाकिनी आमटे यांनी या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी या परिसरातील लोकांना ग्रामविकास योजना,आरोग्य ,शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. डॉ.प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी यांना कम्युनिटी लीडरशिप साठी 2008 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
•नर्मदा बचाओ आंदोलन:
नर्मदा नदीवर भारतातील गुजरात राज्यात बांधण्यात आलेल्या सरदार सरोवर धरणाविरुद्ध विस्थापित शेतकरी आदिवासी पर्यावरणवादी व मानवी हक्क कार्यकर्त्यांनी उभारलेले व मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले होते. बाबा आमटे यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी आनंदवन सोडून नर्मदा काठी येऊन आपला मुक्काम ठोकला होता.अशाप्रकारे त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.या आंदोलनाच्या प्रमुख सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि बाबा आमटे यांना राईट लाईव्हलीहू ड अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले होते.
•बाबा आमटे यांचा साहित्य:
बाबा आमटे हे जसे सामाजिक कार्यकर्ते होते तसेच ते एक संवेदनशील कवी व लेखक होते.
बाबा आमटे यांनी लिहिलेली पुस्तके
•’ज्वाला आणि फुले’ – कवितासंग्रह
•’उज्वल उद्यासाठी’ (काव्य)
•’माती जागवील त्याला मत’
बाबा आमटे यांच्या संबंधी लिहिली गेलेली पुस्तके
•आनंदवन प्रयोगवन- लेखक डॉ. विकास आमटे
•मला (न) कळलेले बाबा आमटे-लेखक विलास मनोहर
•बाबा आमटे (चरित्र मूळ लेखिका तारा धर्माधिकारी हिंदी अनुवाद डॉक्टर हेमा जावडेकर)
•बाबा आमटे (चरित्र लेखक भ. ग. बापट)
•बाबा आमटे यांची गीते : आकलन आणि आस्वाद (बाळू दुगडुमवार)
•बाबा आमटे यांच्या जीवनावर वसंत कानेटकर यांनी”वादळ माणसाळतय” नावाचे नाटक लिहिले आहे.
•बाबा आमटे-व्यक्तित्व ,कवित्व आणि कर्तुत्व (लेखक: बाळू दुगडुमवार)
•बाबा आमटे यांचा पुरस्कार:
समाजातील कुष्ठरोगी व उपेक्षित घटक यांच्यासाठी बाबा आमटे यांनी केलेल्या कार्याबद्दल आजपर्यंत त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
•1985 मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे पारितोषिक मिळाले.
•1986 मध्ये पद्मविभूषण हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
•1988 चा मानवी हक्क पुरस्कार बाबांना देण्यात आला.
•बाबा आमटे पहिल्या जे .डी. बिर्ला पुरस्काराचे मानकरी ठरले.
•नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या समवेत 1991 च्या राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड पुरस्कार प्राप्त झाला.
•1999 मध्ये बाबांना केंद्र सरकारच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित केले गेले.
•आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार चे बाबा मानकरी ठरले.
•2002-03 मध्ये महाराष्ट्र – भूषण या राज्यस्तरीय सर्वोच्च पुरस्कारानेही बाबांना सन्मानित करण्यात आले.
बाबांना इतके सन्मान पुरस्कार मिळाले आहेत की त्याची नोंद ठेवणे कठीण आहे.हे सर्व सन्मान पुरस्कार तोकडे पडतील इतके बाबांचे कार्य व त्याग महान आहे.
• बाबा आमटे यांचा मृत्यू:
बाबा आमटे यांचा 9 फेब्रुवारी 2008 रोजी आनंदवन येथे वृद्धापकाळशी निगडित आजारानी निधन झाले. अंत्यसंस्कार करण्यापेक्षा दफन करणे निवडून त्यांनी पर्यावरणवादी आणि समाज सुधारक म्हणून उपदेश केलेल्या तत्त्वांचे पालन केले गेले. अशा तऱ्हेने संपूर्ण भारताने आणि आनंदवनाने एक थोर समाजसेवक गमावले.बाबांच्या मागे त्यांचे हे सामाजिक कार्य व वारसा त्यांचे दोन चिरंजीव व त्यांच्या पत्नी तसेच त्यांचे नातू जपत आहेत. बाबा आमटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोटी कोटी नमन!
बाबा आमटेंविषयीची “baba amte information in Marathi” ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा तसेच तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा, माहिती व बातमी लेखन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला नक्की भेट द्या तसेच आमचा व्हाट्सअप ग्रुप ही जॉईन करा.
धन्यवाद!
लेखिका — आकांक्षा निरळकर, मुंबई
फारच छान सुंदर
Nice info 👌👌👌
Nice