महाराष्ट्रा मध्ये साजरा केला जाणाऱ्या बैलपोळा या सणाविषयी माहिती
भारतात चातुर्मासाचे विशेष महत्त्व आहे. चातुर्मासामध्ये अनेक सण व्रत वैकल्य केले जातात. हे चार महिने संपूर्णपणे परमेश्वराच्या आराधने करता दिले जातात. या चार महिन्यांमध्ये अनेक सण वार साजरे केले जातात. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असा हा चातुर्मासाचा काळ असतो.
भारतीय संस्कृतीने निसर्गाला खूप महत्त्व दिले आहे. निसर्गाचे आपल्याला खूप वरदान आहे. आपले जीवन संपूर्णतः निसर्गावरच अवलंबून असते. त्यामध्ये पशु,पक्षी प्राणी झाड फळ फुल हे सगळेचं येतात. म्हणूनच त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण वारांचे आयोजन केले आहे. या दिवशी त्यांची पूजा करून त्यांना श्रद्धायुक्त नमन केले जाते. असाच एक सण म्हणजे बैलपोळा जो महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो.
महाराष्ट्रा मध्ये साजरा केला जाणाऱ्या बैलपोळा या सणाची माहिती information of bailpola festival celebrated in maharashtra in marathi या लेखामध्ये आपण बैलपोळा या सणाची माहिती बघूया.
चातुर्मास या कालखंडातील श्रावण महिना खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यांमध्ये बरेच सण आणि व्रतवैकल्य केले जातात.श्रावण महिन्यामध्ये नारळी पौर्णिमा, कृष्णजन्म, नागपंचमी असे महत्त्वाचे सण साजरे केले जातात. मग शेवटच्या दिवशी म्हणजेच पिठोरी अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो. भारत हा कृषिप्रधान देश आहे त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो.
बैलपोळा कुठे साजरा केला जातो?
बैलपोळा हा महाराष्ट्रात साजरा केला जातो. जास्त करून विदर्भामध्ये अतिशय थाटामाटात साजरा केला जातो. विदर्भाच्या सीमेवर असलेले दोन राज्य मध्य प्रदेश आणि तेलंगण या राज्यात पण साजरा केला जातो. बैलांना सर्जा म्हटले जाते, तर सर्जा राजांचा हा अतिशय मोठा सण आहे.
बैल पोळा कसा साजरा केला जातो?
भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे वर्षभर बैलांकडून भरपूर काम करून घेतले जाते. त्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून एक दिवस त्यांना आराम देऊन, गोडाधोडाचे जेवण दिले जाते. या दिवशी बैलांना संपूर्ण विश्रांती दिली जाते.
पोळ्याच्या आदल्या दिवशी त्यांना आमंत्रण दिले जाते. पोळ्याच्या दिवशी बैलांना नदीवर किंवा ओढ्यावर आणून स्वच्छ आंघोळ घातली जाते. वर्षभर बैल मानेवर नांगर ठेवून शेत नांगरत असतात. त्या ठिकाणी हळद आणि तूप लावून शेकतात. त्याला खांद शेकणे अथवा खंड शेकणे असे म्हणतात. त्यांच्या संपूर्ण शरीरावर गेरुने नक्षी काढतात म्हणजेच त्यांना सजवतात. त्यांच्या अंगावर रंगबिरंगी झूल टाकून त्यांना नटवले जाते. झूल म्हणजे एक चांगल्या प्रकारचे कापड असते. शिंगांवर बेगड लावली जाते तर डोक्याला बाशिंग लावले जाते. गळ्यामध्ये कवड्याच्या माळा घातल्या जातात. तसेच घुंगरांच्या माळा पण घातल्या जातात. नवी वेसण घातली जाते. बैलांच्या पायामध्ये चांदीचे तोडे अथवा करदोडे घातल्या जातात. त्यांच्यासाठी नवा कासरा म्हणजेच त्यांना आवरायची दोरी घेतली जाते. बैलांना सांभाळणाऱ्या घरघड्यास नवीन कपडे दिले जातात. शेतकऱ्यांच्या घरी सुवासिनी दारात रांगोळी काढून बैलांचे स्वागत करतात. दुपारच्या वेळी खळ्यामध्ये जाऊन शेतकरी बैल जोडीला स्वतः घरी येण्यास आमंत्रित करतो आणि वाजत गाजत घरी घेऊन येतो. तसेच बैलांसाठी पुरणपोळी, वडे, कढी चा नैवेद्य केला जातो व त्यांना प्रेमाने खाऊ घातल्या जातो. ज्यांच्या घरी स्वतःचे बैल नाही असे शेतकरी बैलाची मातीची प्रतिमा तयार करतात व त्याचे पूजन करतात.
शेतकऱ्यांचा उत्साह—प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या बैलांची निगा राखतो. तसेच त्यांच्यासाठी शक्य होईल तेवढे कौतुक करतो. आपला बैल दुसऱ्या बैलापेक्षा सुंदर दिसावा म्हणून प्रयत्न करतो. या दिवशी खेड्यातल्या घराघरांमध्ये दाराला आंब्याचे तोरण लावतात. गावामध्ये बैलपोळ्याच्या मिरवणुकी निघतात, त्यामध्ये आपल्या बैलांना घेऊन भाग घेतात. या दिवशी गावाच्या सीमेवर एक मोठे आंब्याचे तोरण लावतात.तिथे सगळे शेतकरी आपले बैल घेऊन जमा होतात. सगळे बैल गावातून सीमेवर वाजंत्री ढोल ताशे यांच्या मिरवणुकीत आणले जातात. शेतकऱ्यांमध्ये खूप उत्साह असतो. यामध्ये पोळ्यावर असलेली गाणी म्हटली जातात. त्याला गावाकडे झडत्या असे म्हणतात. यानंतर गावातला पाटील किंवा जमीनदार तोरण फोडतो. म्हणजेच पोळा फुटला असे म्हणतात. महाराष्ट्रातील काही गावांमध्ये बैलांची शर्यत आयोजली जाते जो बैल पहिल्यांदा पोळा फोडेल त्याला ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व सन्मान केला जातो.यानंतर शेतकरी आपल्या बैलाला मारुतीच्या देवळात नेतात व तिथून घरी जातात. घरी गेल्यावर त्या बैलांना मानाने ओवाळले जाते. बैल घेऊन जाणाऱ्यास बोजारा म्हणजेच पैसे दिले जातात. शेतकरी कुटुंबांमध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे म्हणूनच त्यांच्याकडे हा सण अत्यंत धुमधडाक्याने साजरा केला जातो. शेतकऱ्याला आपल्या बैल जोडी करता खूप आदर आणि प्रेम असते. कारण त्याचे ते सर्वस्व असते.
बैलपोळा हा सण अतिशय पारंपारिक पद्धतीने व जिव्हाळ्याने साजरा केला जातो कारण खेड्यापाड्यांमध्ये बैल हे शेतकऱ्यांचे दैवतच आहे.
बैलपोळ्याची पौराणिक कथा—भगवान विष्णू जेव्हा कृष्णाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले होते तेव्हा कृष्णाचा मामा कंस त्याचा वध करण्याच्या मागे लागले होते त्याकरता पोलासुर नावाच्या राक्षसाला कृष्णाचा वध करण्यासाठी पाठवले परंतु श्रीकृष्णाने या पोलासुराचा वध केला. त्या दिवशी श्रावण अमावस्या होती. तेव्हापासून बैलपोळा करण्याची पद्धत रूढ झाली आहे.
कर्नाटकी बेंदूर—-महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर म्हणजेच कोल्हापूर शहराच्या जवळ कर्नाटकी बेंदूर हा बैलांचा सण साजरा केला जातो. हा सण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो. महाराष्ट्रात जसा पोळ्याचा सण साजरा केला जातो तसेच या दिवशी बैलांना कामातून सुट्टी देऊन त्यांना नटवून सजवून सीमेच्या जवळ नेऊन बैलपोळा साजरा केला जातो.
तान्हा पोळा—या पोळ्याचे आयोजन विदर्भ या प्रांतामध्ये केले जाते. हा दिवस मुख्य पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लहान मुले खेळण्यातल्या लाकडी बैल जोड्या सजवतात व त्यांना घेऊन शेजार पाजारच्या घरात जातात. शेजारीपाजारी त्या बैलांची पूजा करतात आणि लहान मुलांना खाऊ देतात. यालाच तान्हा पोळा असे म्हटले जाते.
प्रत्येक शेतकरी दरवर्षी या दिवसाची वाट बघत असतो. कारण बैल हा त्याचा खरा मित्र असतो. जो त्याला वर्षभर मदत करत असतो.
भारतीय संस्कृतीचा हा वसा आजही खेड्यापाड्यात आणि काही शहरांमध्ये पाळला जातो याचा आपल्याला अभिमान हवा.
महाराष्ट्रा मध्ये साजरा केला जाणाऱ्या बैलपोळा या सणाची माहिती information of bailpola festival celebrated in maharashtra in marathi हा लेख आपल्याला कसा वाटला हे जरूर कळवण्यासाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला नक्की भेट द्या लेख वाचा आणि प्रतिक्रिया द्या तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा. व आमचे व्हाट्सअप चॅनेल सुद्धा जॉईन करा.
धन्यवाद!
लेखिका- वैशाली देव (पुणे)