भारतातील बारा ज्योतिर्लिंगे: देवाधिदेव महादेवांची बारा जागृत स्थाने
श्रावण महिन्यात देवांचे देव असलेल्या श्री शंभू महादेवांच्या उपासनेचे फार मोठे महत्त्व आहे. महादेवांची पूजा ही मूर्ती रुपात न करता, लिंग रूपात केली जाते. संपूर्ण भारतात अशी बारा ठिकाणे महादेवांची जागृत ठिकाणे म्हणून ओळखली जातात. या ठिकाणांना बारा ज्योतिर्लिंगे किंवा द्वादश ज्योतिर्लिंगे म्हणतात. ज्योती म्हणजे ‘प्रकाश’ अथवा ‘तेज’ आणि लिंग म्हणजे ‘चिन्ह’ किंवा ‘प्रतिक’. ज्योतिर्लिंग म्हणजे ‘भगवान शिवाचे तेजस्वी प्रतिक’. असंख्य शिवभक्त या चैतन्य आणि अनंत ऊर्जेचे प्रतिक असलेल्या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. ही सर्व शिवस्थाने नदी किंवा सागरकिनारी, पर्वत शिखरांवर अथवा पायथ्याशी आणि अत्यंत निसर्गरम्य स्थानी विराजमान आहेत. आजच्या या लेखात आपण भारतातील बारा ज्योतिर्लिंगांबद्दल जाणून घेणार आहोत.
बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थापनेमागील कथा:
या ज्योतिर्लिंगांच्या स्थापनेमागील कथा शिव महापुराणात वर्णन केली आहे. एकदा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यात वाद झाला. दोघेही ‘आपणच सर्वोच्च शक्ती’ असल्याचा दावा करत होते. त्यांची परीक्षा घेण्यासाठी, शिवाने तिन्ही लोकांना (पृथ्वी, आकाश आणि पातळ) प्रकाशाच्या एका विशाल, अनादी-अनंत स्तंभाने छेदले. भगवान शिवांनी विष्णू आणि ब्रह्मदेवांना स्तंभाचे टोक शोधण्यास सांगितले व असेही सांगितले की, की जो ते शोधून काढेल तो सर्वोच्च मानला जाईल.
त्यानुसार प्रकाशाचा शेवट शोधण्यासाठी भगवान विष्णू खालच्या दिशेने व ब्रम्हदेव वरच्या दिशेने गेले. काही वेळाने ब्रह्मदेवांनी परत येऊन प्रकाशाचे टोक शोधल्याचे खोटेच सांगितले. भगवान विष्णूंनी आपला पराभव मान्य केला. शिवशंकर दुसऱ्या प्रकाशस्तंभाच्या रुपात प्रकट झाले. त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला की त्याला कुठल्याही समारंभात स्थान मिळणार नाही तर विष्णूंची अनंत काल पूजा केली जाईल.
त्यानंतर भगवान शंकर बारा विविध ठिकाणी ऊर्जारुपात प्रगट झाले. त्या ठिकाणची ज्योतिर्लिंगे ही या अनादी-अनंत प्रकाशस्तंभांचे प्रतिनिधित्व करतात.
बारा ज्योतिर्लिंगांची नावे आणि त्यांची भारतातील स्थाने:
ज्योतिर्लिंगाचे नाव | स्थान |
श्री सोमनाथ | वेरावळ, गुजराथ |
श्री मल्लिकार्जुन | श्रीशैल्य, आंध्रप्रदेश |
श्री महांकाळेश्वर | उज्जैन, मध्यप्रदेश |
श्री ॐकारेश्वर | ॐकारेश्वर, मध्यप्रदेश |
श्री वैजनाथ | परळी, महाराष्ट्र |
श्री भीमाशंकर | भीमाशंकर, महाराष्ट्र |
श्री रामेश्वर | रामेश्वर, तामिळनाडू |
श्री नागेश्वर | औंढा नागनाथ, महाराष्ट्र |
श्री विश्वेश्वर | वाराणसी, उत्तरप्रदेश |
श्री त्र्यंबकेश्वर | त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र |
श्री केदारनाथ | केदारनाथ, उत्तराखंड |
श्री घृष्णेश्वर | वेरुळ, महाराष्ट्र |
१) श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग ( गुजरात- वेरावळ )
बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे पहिले ज्योतिर्लिंग गुजरात मधील सौराष्ट्र क्षेत्रात वेरावळ जवळ प्रभास पट्टन येथे आहे. जेव्हा चंद्राला(सोमदेवाला) दक्ष प्रजापतीने ‘क्षयरोग होईल’ असा शाप दिला होता, तेव्हा याच ठिकाणी त्याने शिवलिंगाची स्थापना करुन तप केले व या शापापासून मुक्ती मिळवली, अशी कथा शिवपुराणात सांगितली आहे. सोमदेवने येथे शंकरांचे मंदिर बांधले. म्हणून त्याला ‘सोमनाथ’ असे नाव पडले.
इतिहासकारांच्या मते, मुस्लिम आक्रमकांनी सोमनाथ मंदिराला १७ वेळा नष्ट केले आणि प्रत्येकवेळी या मंदिराची पुनर्रचना करण्यात आली. मंदिर निर्मितीच्या इतिहासाच्या बाबतीत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.
उत्तर भारतीय चालुक्य वास्तूकला शैलीमध्ये बांधलेल्या सध्याच्या भव्य मंदिराची उभारणी सरदार वल्लभ पटेल यांच्याकडून १९५१ मधे करण्यात आली आहे. मंदिराच्या दक्षिणेला समुद्रकिनारी असलेल्या स्तंभावर एक बाण असून त्यावर असे लिहिले गेले आहे की ‘हे मंदिर आणि दक्षिण ध्रुव यामध्ये जमिनीचा एकही तुकडा नाही. असा हा अबाधित ज्योतिर्मार्ग आहे.’ या स्तंभाला ‘बाणस्तंभ’ म्हणतात.
२) श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग (आंध्रप्रदेश-श्रीशैल्य)
कृष्णा नदीच्या तीरावर नल्लमलाई डोंगर रांगात श्रीशैल पर्वतावर हे ज्योतिर्लिंग आहे. याला दक्षिणेचे कैलास असेही म्हणतात. या मंदिराबाबत पौराणिक कथा अशी आहे:
श्री गणेश आणि कार्तिकेय विवाहयोग्य झाल्याने भगवान शिवाने त्यांना बोलावून सांगितले की तुमच्यापैकी जो या जगाला प्रदक्षिणा घालून प्रथम परत येईल त्याचा विवाह प्रथम होईल. हे ऐकताच कर्तिकेय स्वामी मोरावर बसून उडून गेले. श्री गणेशांनी मात्र उंदरावर बसून शिव-पार्वतीची प्रदक्षिणा घातली आणि ‘ते दोघे म्हणजेच आपले जग आहे’ असे सांगितले.
शिव-पार्वतींनी आनंदित होऊन श्रीगणेशाचे लग्न लावून दिले. हे कळताच कार्तिक स्वामी संतप्त झाले व क्रौंच पर्वतावर निघून गेले. हाच श्रीशैल पर्वत होय. त्यांची समजूत काढण्यासाठी शिव-पार्वती तेथे वेष पालटून गेले. हे कळताच कार्तिकेयाने तेथे एक शिवलिंग स्थापन केले ज्यात शिवपर्वती ज्योती रूपात विराजमान झाले.
श्रीशैलमचा इतिहास दुसऱ्या शतकात सातवाहन काळापर्यंत सापडतो. त्यानंतर चौदाव्या शतकातील प्रोलय्या वेमा रेड्डी या राजाने कृष्णा नदी (पाताळगंगा) ते श्रीशैलम असा मार्ग बांधला. नंतर विजयनगर साम्राज्यात मुख्य मंदिराचे, तसेच दक्षिण टोकाकडील गोपुरांचे दगडी बांधकाम करण्यात आले. पुढे पंधराव्या शतकात राजा कृष्णदेवराय यांनी राजगोपुर व इतर भागांचे निर्माण केले. इ. स. १६६७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिराच्या उत्तरेकडील गोपुरचे बांधकाम केले.
३) श्री महांकाळेश्वर ज्योतिर्लिंग (मध्यप्रदेश-उज्जैन)
क्षिप्रा नदीकाठी वसलेल्या सुंदर उज्जैन शहरात महांकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एकमेव मंदिर दक्षिणाभिमुख आहे. दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते. म्हणून येथे भगवान शंकरांना महांकाल म्हटले जाते. हजारो वर्षे जुने असलेल्या या मंदिराचा विस्तार राजा विक्रमादित्यने त्याच्या कारकिर्दीत केला होता असे म्हणतात. महांकालेश्वर मंदिराचे एकंदरीत तीन भाग आहेत. त्यापैकी खालच्या भागात महांकालेश्वर, मधल्या भागात ओंकारेश्वर आणि वरच्या भागात श्री नागचंद्रेश्वर मंदिर आहे. दर सोमवारी या मंदिरात भस्म आरती होते. यातील श्रीनागचंद्रेश्वर शिवलिंगाचे दर्शन फक्त नागपंचमीच्या दिवशीच घेता येते. महांकालला उज्जैनचा राजा असे म्हटले जाते. दरवर्षी श्रावण महिन्यात महांकाल पालखी संपूर्ण उज्जैन शहरातून काढली जाते.
४) श्री ॐकारेश्वर ज्योतिर्लिंग (मध्यप्रदेश- ॐकारेश्वर )
शिवपुराण, स्कंद पुराण, वायुपूराण या ग्रंथांमध्ये या ज्योतिर्लिंगाचा उल्लेख आहे. मध्यप्रदेशातील खांडवा जिल्ह्यात नर्मदा आणि कावेरीच्या संगमावरील मंधाता अथवा शिवपुरी नावाच्या बेटावर डोंगरावर हे मंदिर वसलेले आहे. येथे ॐकारेश्वर आणि अमरेश्वर अशी दोन मंदिरे आहेत. या डोंगराचा आकार ॐ सारखा आहे. राजा मंधाताने या पर्वतावर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करुन घेतले व त्यांच्याकडे तेथेच निवास करण्याचे वरदान मागितले, अशी कथा येथे सांगितली जाते. शिवशंकर येथे रात्रीचा मुक्काम करतात अशी धारणा आहे.
५) श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग (महाराष्ट्र- परळी)
समुद्र मंथनाच्या वेळी धन्वंतरी आणि अमृत ही दोन रत्ने बाहेर पडली. राक्षसांपासून वाचवण्यासाठी श्री विष्णूंनी धन्वंतरीसह अमृत शिवलिंगात लपवले. राक्षसांनी त्या शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच त्यातून ज्वाला बाहेर पडू लागल्या, पण देवांनी स्पर्श करताच त्यातून अमृताचा प्रवाह बाहेर येऊ लागला. परळी वैद्यनाथ हे तेच शिवलिंग आहे असे मानले जाते. अमृतयुक्त असल्यानेच या ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ (अपभ्रंश- वैजनाथ, अर्थ- आरोग्याचा देव) असे म्हणतात.
हे मंदिर सुमारे २००० वर्षे जुने आहे असे म्हणतात. देवगिरीच्या यादवांचा प्रधान हेमाद्री याने सध्याचे हे भव्य आणि चिरेबंदी मंदिर बांधले आहे असे म्हणतात. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
६) श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग (महाराष्ट्र -भीमाशंकर)
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील हे ठिकाण म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. भगवान शंकरांनी अर्धनारी नटेश्वर रुपात त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर येथे विश्रांती घेतली.
या प्राचीन मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे असून ते सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूर्वीचे आहे. भगवान शंकराचा सुंदर चांदीचा मुखवटा शिवलिंगावर बसविलेला असून त्यावर शिव, ब्रम्हा, विष्णू, सूर्य, चंद्र या पाच देवांचे चेहरे कोरलेले आहेत. मुखवट्याला “पंचमुख” म्हणतात. शिवलिंगामध्ये एक उभा छेद आहे असून एकीकडे शिव एका बाजूस शक्ती असे दोन भाग आहेत. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम असून मंदिरावर दशावताराच्या सुंदर, रेखीव मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडपाबाहेर चिमाजी अप्पांनी भेट दिलेली सुमारे पाच मण वजनाची लोखंडी घंटा आहे.
भीमा नदीचे उगमस्थान असलेले, निबीड डाकीनी वनाने वेढलेले, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे ठिकाण शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे.
७) श्री रामेश्वर ज्योतिर्लिंग (तमिळनाडू- रामेश्वर)
भारतातील सर्वात दक्षिणेकडील तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटावर हे मंदिर आहे. रामाने लंकेवर स्वारी करण्यासाठी येथे समुद्रावर ‘रामसेतू’ बांधला . परत येताना रामाने रावणहत्येचे परिमार्जन म्हणून शंकरांची आराधना करण्याचे ठरवले. त्यासाठी शिवलिंग आणण्यासाठी श्रीरामांनी हनुमानाला कैलास पर्वतावर पाठवले. पण शिवलिंग स्थापनेची वेळ जवळ आली तरी हनुमान आले नाहीत, म्हणून सीतेने वाळूचे शिवलिंग तयार केले व त्याची स्थापना या मंदिरात केली. त्यानंतर हनुमंताने आणलेल्या शिवलिंगाचीही स्थापना तेथे करण्यात आली. सध्या मंदिराच्या गाभाऱ्यात रामाने स्थापन केलेले ‘रामलिंग’ व हनुमानाने आणलेले ‘विश्वलिंग’ अशी दोन शिवलिंगे आहेत. हे दगडी मंदिर दक्षिण भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराचे दगड श्रीलंकेमधून बोटींवर आणले गेले होते असे म्हणतात. रामेश्वरममध्ये श्रीरामांनी आपल्या बाणांनी तयार केलेल्या २२ विहिरी आहेत, ज्यांना ‘तीर्थ’ असे म्हणतात. शंकरांच्या अभिषेकसाठी मागवलेले अनेक ठिकाणचे तीर्थ या विहिरींत ठेवले गेले होते अशी मान्यता आहे.
८) श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग (औंढा नागनाथ- महाराष्ट्र)
हे स्थान महाराष्ट्रात हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ येथे आहे.
प्राचीन काळी दारुकवनात ‘दारुक’ नावाची राक्षसीण आपला पती ‘दारुक’ याच्यासह राहत होती. हे वन तिने तपश्चर्येने पार्वतीमातेकडून वरदानाच्या स्वरुपात प्राप्त करुन घेतले होते. उन्मत्त झालेल्या दारुक आणि दारुका यांनी अनेक ब्राह्मणांना बंदी बनवले. त्यांना वाचवण्यासाठी भगवान शंकर नागेश्वर रूपात तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी दारुक आणि दारुका यांचा नाश केला.
पांडव वनवासात असताना येथे आले आणि त्यांनी येथे नागेश्वरचे भव्य दगडी मंदिर बांधले. त्यानंतर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव घराण्याने तेथे सात मजली दगडी हेमाडपंथी मंदिर बांधले. सोळाव्या शतकात औरंगजेबाने ते नष्ट केले. त्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करुन कळस पुन्हा बांधला.
संत नामदेव मंदिराच्या मागील बाजूस कीर्तन करत असताना हे मंदिर संपूर्ण फिरले अशी आख्यायिका आहे. म्हणून या मंदिरात नंदी मागील बाजूस आहे.
मंदिराच्या आवारात भगवान शंकरांची १०८ मंदिरे आणि ६८ तीर्थे आहेत.
९) श्री विश्वेश्वर ज्योतिर्लिंग (उत्तरप्रदेश- वाराणसी)
गंगा नदीच्या काठावर वसलेल्या वाराणसी (काशी) या पवित्र शहरात हे ज्योतिर्लिंग आहे. स्वयंभू असलेल्या या मंदिराचे बांधकाम नंतर अकराव्या शतकात सम्राट विक्रमादित्याने केले. मुस्लिम आक्रमकांनी हे मंदिर अनेकदा नष्ट केले, पण ते पुनःपुन्हा बांधण्यात आले. कुतुबुद्दीन ऐबक याने हे मंदिर पाडल्यानंतर अकबराच्या दरबारातील राजा तोरडमल याने ते परत बांधले. औरंगजेबाने ते पडल्यानंतर अनेक वर्षांनी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. राज रणजितसिंह याने त्याच्या शिखरावर सोन्याचा मुलामा चढवला होता. म्हणून या मंदिराला सुवर्ण मंदिर असेही म्हणतात. महाराष्ट्रातील प्रख्यात संत एकनाथ यांनी सोळाव्या शतकात येथे ‘श्री एकनाथी भागवत’ हा महान ग्रंथ लिहिला. नुकताच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून त्याला भव्य दिव्य स्वरूप प्राप्त करुन देण्यात आले आहे.
१०) श्री त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र- त्र्यंबकेश्वर)
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील हे मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असून, येथून गोदावरी नदी उगम पावते. दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने हे शिवालय बांधले. पुढे अठराव्या शतका श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी हेमाडपंती स्थापत्यशैलीत हे मंदिर नव्याने बांधले. काळ्या पाषाणातील सुंदर स्थापत्य आणि कोरीव काम हे या मंदिराचे वैशिष्ट्य. मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी असून कळसावर पाच सुवर्णकलश आहेत. त्यावर पंचधातूंची ध्वजा विराजमान आहे. मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याचा मुख्य दरवाजा पूर्व बाजूस आहे.
येथील पर्वतावर ब्रह्मदेवांनी तप करून श्री महादेवांना प्रसन्न करुन घेतले. हा पर्वत ब्रह्मगिरी पर्वत म्हणून विख्यात झाला. गौतम ऋषींनी गोहत्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी या पर्वतावर कठोर तपश्चर्या केली व महादेवांना प्रसन्न करुन घेतले. त्यांच्या विनंतीवरून महादेव येथे ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रगट झाले.
या शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपारी असून त्यात ‘ब्रह्म-विष्णू-महेश’ विराजमान आहेत. शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सतत सुरु असतो. अशा स्वरूपाचे हे शिवलिंग जगातील एकमेव शिवलिंग आहे.
या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची वर्षभर गर्दी असते. श्रावणी सोमवारी ती विशेषत्वाने जास्त असते.
११) श्री केदारनाथ (उत्तराखंड- केदारनाथ)
देवभूमी उत्तराखंड राज्यात रुद्रप्रयाग येथे (पौराणिक गढवाल प्रदेश) हिमालयाच्या कुशीत मंदाकिनी नदीकाठी केदारनाथ मंदिर वसलेले आहे. बैलाच्या पाठीसारखे दिसणारे हे शिवलिंग अतिशय प्राचीन आहे. महाभारत युद्धानंतर बंधुहत्येच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून पांडव महादेवांना शरण गेले. महादेवांनी त्यांना हिमालयात बैलाच्या रूपात दर्शन दिले. भीमाने त्या बैलाला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे पाच तुकडे झाले आणि पाच ठिकाणी विखुरले. ही ठिकाणे ‘पंचकेदार’ म्हणून प्रसिद्ध आहेत.
त्यापैकी बैलाच्या पाठीचा भाग केदारनाथ येथे पडला. मूळचे मंदिर पांडवांनी बांधलेले होते. आठव्या शतकात आदी शंकराचार्यांनी त्याची पुनर्बांधणी केली. त्या प्रदेशात कुठेही न आढळून येणारे ‘कत्यूरी’ शैलीचे दगड ‘आश्लार’ पद्धतीने एकावर एक रचून कोणत्याही प्रकारच्या सिमेंट शिवाय या मंदिराचे बांधकाम झाले आहे. ह्या दगडामुळे ४०० वर्षे बर्फाखाली राहूनही ह्या मंदिरावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. हे मंदिर उत्तर-दक्षिण स्वरूपात आहे. बऱ्याचदा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा करावा लागूनही हे मंदिर दिमाखात उभे आहे. २०१३ साली येथे ढगफुटी होऊन महापूर आला. परंतु तरीसुद्धा ह्या मंदिराचा मुख्य भाग तसाच राहिला. पुराच्या दरम्यान एक मोठी शिळा पुराच्या पाण्यातून वाहून आली आणि मंदिराच्या मागील बाजूस येऊन थांबली. त्या शिळेमुळे मंदिराचे रक्षण झाले. ही शिला आजही तिथे असून त्या शिलेला ‘भीमशिला‘ असे नाव देण्यात आले आहे.
हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा ह्या काळातच दर्शनासाठी खुले असते. हिवाळ्यामध्ये येथील देवांच्या मुर्ती उखीमठ ह्या स्थानावर आणून पुजल्या जातात.
१२) श्री घृष्णेश्वर (महाराष्ट्र- वेरुळ)
शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथात उल्लेख असलेले हे प्राचीन मंदिर महाराष्ट्रात वेरुळ येथे येलगंगा नदीकाठी आहे. छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. सध्याचे मंदिर अठराव्या शतकात मल्हारराव होळकरांची पत्नी गौतमीबाई यांनी बांधले असून त्याचा नंतर अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केला. लाल दगडात बांधलेले हे विस्तीर्ण मंदिर म्हणजे पारंपारिक दक्षिण भारतीय वास्तुकलेचा आणि देखण्या कोरीव कामाचा अजोड नमुना आहे.
या मंदिरामागची पौराणीक कथा अशी आहे: येथे सुधर्मा नावाचा ब्राह्मण आपली पत्नी सुदेहा हिच्यासह राहत होता. संतती नसल्याने त्याने सुधाची बहीण घुष्मा हिच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा झाला. पण सवतीमत्सराने सुदेहाने त्या मुलास मारुन एका तळ्यात फेकले. घुष्माला अतोनात दुःख झाले. ती शिवभक्त होती. ती रोज १०१ पार्थिव शिवलिंग बनवून त्यांचे त्या तळ्यात विसर्जन करत असे. दुःखी अवस्थेतही तिने तो नेम पार पाडला. ते पाहून शंकर तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिचा पुत्र जिवंत केला. घुष्माने त्यांच्याकडे तेथेच राहण्याचे वरदान मागितले. म्हणून या ज्योतिर्लिंगाला घुष्मेश्वर किंवा घृष्णेश्वर म्हणतात.
अनेक शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या बारा ज्योतिर्लिंगांची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp गृपही जॉईन करा.
धन्यवाद !
क्षितिजा कापरे,
१२ ज्योतिर्लिंग माहीती छानच आहे