हैदराबाद सफर – पर्यटन स्थळे
“मोत्यांचे शहर” अशी ओळख असणारे हैदराबाद शहर भारतातील तेलंगणा या राज्याची राजधानी आहे. हे भारतातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. “हैदराबादी बिर्याणी” हा येथील प्रसिद्ध पदार्थ आहे. बासमती तांदूळ, चिकन किंवा मटण , दही, कांदा, मसाल्याचे पदार्थ इ. गोष्टी वापरून तयार केलेला हा पदार्थ खूपच चविष्ट असतो. येथील इराणी चहा, उस्मानिया बिस्किट्स, डबल का मीठा, खुबानी का मीठा, खुबानी आईस्क्रीम इ. गोड पदार्थ प्रसिद्ध आहेत. चित्रपट निर्मितीचे हे अग्रगण्य केंद्र आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत कंपन्यांची कार्यालये येथील hi-tech सिटी या भागात आहेत. ज्युबिली हिल्स या भागात येथील प्रतिष्ठित व्यक्तींचे वास्तव्य आहे.
हैदराबादमधील भेट देण्याजोगी पर्यटन स्थळे:
१. हुसेन सागर तलाव
२. लुंबिनी पार्क
३. NTR गार्डन
४. बिर्ला मंदिर
५. बिर्ला सायन्स म्युझियम
६. शिल्परामन
७. सालारजंग म्युझियम
८. चारमिनार
९. गोलकोंडा किल्ला
१०. Statue of Equality
११. Hi-tech सिटी
१२. केबल ब्रिज
१३. रामोजी फिल्म सिटी
१. हुसेन सागर तलाव – या तलावामध्ये बोटिंगची सोय आहे. खूप लोकांना एकदम नेणारी मोठी बोट किंवा दोन लोकांना नेणारी छोटी स्पीड बोट अशा दोन प्रकारच्या बोटी येथे आहेत. त्यासाठी वेगवेगळे पैसे आकारले जातात. तलावाच्या मध्ये भगवान गौतम बुद्धांचा भव्य पुतळा आहे. हा उभा पुतळा आहे. बोटिंग करताना या पुतळ्यापर्यंत बोटीने नेले जाते. पुतळ्याच्या आजूबाजूला सुंदर बाग केलेली आहे. तेथे उतरून फिरण्यासाठी थोडा वेळ दिला जातो. नंतर पुन्हा बोटीने काठावर सोडले जाते. सूर्यास्तानंतर बोटिंग करताना जवळच असलेले नव्याने बांधलेले तेलंगणा सचिवालय इलेक्ट्रिक दिव्यांच्या रोषणाईने झगमगताना दिसते. हेच सचिवालय बिर्ला मंदिरकडे जाताना रस्त्यावरून जवळून पण बाहेरूनच पाहता येते.
२. लुंबिनी पार्क – हुसेन सागर तलावाजवळच लुंबिनी पार्क आहे. संध्याकाळी फिरण्यासाठी आलेले बरेच लोक येथे दिसतात. पार्कच्या बाहेरच्या बाजूला एक खूप मोठा गोलाकार त्रिमितीय आरसा लावलेला आहे. त्यात रात्रीच्या वेळेचे रस्त्यांवरील दिवे, मोटारींचे दिवे या सर्वांचे प्रतिबिंब दिसते. हा आरसाही सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरतो.
३. NTR गार्डन – लुंबिनी पार्कपासून काही अंतरावर NTR गार्डन आहे. येथे आत जाण्यासाठी पैसे देऊन तिकीट घ्यावे लागते. NTR हे नाव आंध्रप्रदेशचे प्रसिद्ध अभिनेते व माजी मुख्यमंत्री श्री. एन.टी. रामराव यांच्या नावावरून दिले आहे.
४. बिर्ला मंदिर – वरील तीनही जवळजवळ असणारी ठिकाणे पाहून आपल्याला रिक्षाने बिर्ला मंदिर येथे जाता येते. हे मंदिर प्रसिद्ध बिर्ला उद्योगसमूहाने बांधून घेतले आहे. हे व्यंकटेश्वराचे संगमरवरी मंदिर आहे. मंदिरात जाण्यापूर्वी पादत्राणांबरोबरच मोबाईलही बाहेर जमा करावा लागतो. मंदिराबाहेर हैदराबादचे मोत्यांचे दागिने आणि इतर गोष्टींची दुकाने आहेत.
५. बिर्ला सायन्स म्युझियम – बिर्ला मंदिराच्या जवळच बिर्ला सायन्स म्युझियम आहे. हैदराबाद येथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रिक्षाने जाताने रिक्षावाले हैदराबादच्या मोत्यांच्या दागिन्यांच्या दुकानाला भेट देण्याचा आग्रह पर्यटकांना करतात.
६. शिल्परामन – हे हैदराबाद येथील craft village आहे. आत जाण्यासाठी पैसे आकारले जातात. आत अनेक छोटी छोटी दुकाने आहेत. तेथे हैदराबादचे मोत्यांचे दागिने, हैदराबाद सिल्क साड्या, ड्रेसेस, बांगड्या , शोभेच्या वस्तू, आणि इतर अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. कृत्रिम घरे आणि वेगवेगळी कामे करणारी माणसे (पुतळे) असलेले छोटे खेडेगावही आत वसवले आहे. खूप ठिकाणी सुंदर सजावट केलेली दिसते.
७. सालारजंग म्युझियम – येथे ३८ दालने आहेत. प्रत्येक दालनात इजिप्त, पर्शिया इ. वेगवेगळ्या देशांतील वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा संग्रह पाहायला मिळतो. उर्दू हस्तलिखिते , कोरीव काम केलेले प्राचीन काळातील फर्निचर , बाहुल्या , जुन्या नाण्यांचा संग्रह इ. गोष्टींचा यात समावेश आहे. हे संग्रहालय शुक्रवारी बंद असते.
८. चारमिनार – जुन्या हैदराबादमधील ही एक प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहे. येथे गोलाकार जिन्याने वर जाता येते.
९. गोलकोंडा किल्ला – हा किल्ला सुद्धा जुन्या हैदराबादमध्ये आहे. हा १३ व्या शतकातील किल्ला आहे. हौशी पर्यटक पूर्ण किल्ला चढून वर जातात. वर जगदंबा मातेचे मंदिर आहे. या किल्ल्यावरून हैदराबादच्या बऱ्याचशा भागाचे दर्शन होते. येथे दाखविला जाणारा ‘लाईट शो’ हे येथील आकर्षण आहे.
१०. समता स्फूर्ती केंद्र (Statue of Equality) – येथील श्रीरामानुज स्वामी यांची भव्य सुवर्णमूर्ती लक्ष वेधून घेते. खूप दूर अंतरावरूनच ही भव्य मूर्ती दृष्टीपथात येते. येथे आत प्रवेश करण्यापूर्वी पादत्राणे आणि मोबाईल काउंटरवर जमा करावे लागतात. आत १०८ देवांची छोटी छोटी मंदिरे आहेत. मंदिरांचे कोरीव काम सुंदर आहे. वाहनांच्या पार्किंगची चांगली व्यवस्था आहे.
११. Hi-tech सिटी – Microsoft, Google, Amazon, Deloitte, Capgemini इ. मोठ्या-मोठ्या कंपन्याची कार्यालये असलेला हा भाग आहे.
१२. केबल ब्रिज – रस्त्याच्या दोन बाजूला फक्त दोन स्तंभ आणि केबल्स यांच्या आधाराने हा पूल तयार केला आहे. रात्री इलेक्ट्रिक दिव्यांच्या रोषणाईने हा पूल झगमगून जातो. Hi-tech सिटी कडे जाताना या पुलावरून जाता येते.
१३. रामोजी फिल्म सिटी – पूर्ण एक दिवस घालवता येईल असा हा भाग आहे. या ठिकाणी हैदराबादमधील हॉटेल्स मधून कार किंवा बसने जाता येते. सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत आत फिरता येते. आत वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रीकरणासाठी वेगवेगळी ठिकाणे आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बसेसची व्यवस्था आहे. बाहेरील दृश्ये विनासायास दिसतील अशीच या बसेसची रचना आहे. प्रत्येक बसमध्ये एक गाईड असतो. तो आजूबाजूच्या दृश्यांची इंग्रजी मिश्रित हिंदीमध्ये माहिती देतो. आपण माहिती ऐकताना बस हळूहळू पुढे जात असते. यात ‘no god temple (चेन्नई एक्स्प्रेस), सिंघमचे पोलीसठाणे, कारागृह, कोर्ट, खेडेगाव, रेल्वे स्टेशन, मोठे कारंजे, जोधा-अकबर सेट इ. चित्रीकरणासाठी उभ्या केलेल्या गोष्टी दिसतात. पर्यटकांना रामोजी फिल्म सिटी मध्ये राहता यावे म्हणून हॉटेल्सची सोय आहे.
पुढील बस आपल्याला रामायण-महाभारत सेटवर नेते. तेथून पुढे बाहुबली सेटवर जाता येते. येथील भव्यता डोळे दिपविणारी आहे. माहिष्मती नगरीचा सुंदर सेट येथे उभारला आहे. भल्लालदेवचा पुतळा, रथ, तोफ, शंकराची पिंडी, घंटा अशा अनेक भव्य गोष्टी येथे पाहायला मिळतात.
पुढील ठिकाणी ‘बर्मा ब्रिज’ सारख्या साहसी खेळांचा आनंद आपण लुटू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांच्या आणि जातींच्या पक्षांचे आणि झाडांचे दर्शन आपल्याला सुखावते.
परदेशातील चित्रीकरण दाखविण्यासाठी येथे साक्षात ‘लंडन सिटी’ उभारली आहे. सुंदर घरे, स्वच्छ रस्ते, घराभोवती छोटे बगीचे पाहून खरचं परदेशात असल्यासारखे वाटते. विमानातील चित्रीकरणासाठी विमानाची भव्य प्रतिकृती आहे. विमानतळ, त्यावरील आसनव्यवस्था हे सुद्धा आहे.
पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून ठिकठिकाणी उपहारगृहे, प्रसाधनगृहे इ. ची सोय आहे. काही ठिकाणी हैदराबादच्या प्रसिद्ध मोत्यांचे दागिने, हैदराबाद सिल्क साड्या, फ्रीज magnets यासारख्या वस्तूंची दुकाने आहेत. शेवटच्या टप्प्यात काही ‘शो’ज चे आयोजन केले आहे. प्रत्येक शो साठी स्वतंत्र audio visual रूम्स ची सोय आहे. यातील ‘cinema making experience’ हा शो विशेष लक्षवेधी आहे.
कशी वाटली ही सफर? Best 13 tourist places to must visit in Hyderabad in Marathi अशाच अनेक माहितीपूर्ण लेखांसाठी lekhakmitra.com या वेबसाईटला भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.
धन्यवाद !!!
लेखिका – सौ. पल्लवी वैद्य,डोंबिवली
हैदराबाद सफर झकास👌👌
घरी बसूनच छान हैदराबादची सफर घडली
“❤️Life is about learning, growing, and sharing. This is what I love most about Hyderabad.”❤️
हैद्राबाद ची सफर मस्त आहे👌👌👌
हैद्राबाद सफर मस्त आहे👌👌