नवे वर्ष सुरू होते तशा नव्या कल्पना, संकल्प सुरू होतात. हे नवे वर्ष सुरू होऊन १५ दिवस झाले; तरी इच्छा असूनही हवी तशी ह्यावर काम करायला सुरुवात अजून झाली नाही, हो ना? हे करू, ते करू म्हणून अनेक जण कामालाही लागतात. पण नव्याच्या नवलाईप्रमाणे काही जण हळू हळू ती कामं पुढे पुढे ढकलू लागतात; मग कालांतराने तोच संकल्प पुढच्या वर्षी नव्याने केला जातो. आणि हे असं होण्यामागचे सर्वसामान्य कारण हे ऐकायला मिळते की – “वेळच मिळत नाही किंवा वेळच पुरत नाही” पण हे फक्त कारण झालं. आजच्या स्पर्धात्मक युगात वेळेला प्राधान्य दिलं पाहिजे. वेळ का आणि कसा मिळत नाही, ह्यावर नीट विचार केला तर सगळ्यांनाच समान असलेले हेच २४ तास व्यवस्थित सत्कारणी लावता येतील. सर्वात आधी हे लक्षात घेतले पाहिजे की “वेळ हा कधीच मिळत नसतो, तो काढावाच लागतो. (Best Tips for effective time management in Marathi)
वेळ ही प्रत्येकाच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जो वेळेचा पुरेपूर आणि योग्य रीतीने वापर करतो तो नेहमीच हव्या त्या गोष्टी, हव्या त्या “वेळेत” साध्य करण्याची शक्ती त्याच्याजवळ बाळगतो. क्षेत्र कुठलेही असो, तुम्ही कुठल्याही पदावर काम करत असाल, कुठल्याही वयोगटातील असाल, गृहिणी असाल, नोकरदार असाल किंवा स्वतःचा व्यवसाय करत असाल. प्रत्येकानेच आपापल्या परीने आपलं स्वतःचं नियोजन करण्याचं कौशल्य वाढवलं तर कुठलंही काम वेळेअभावी पूर्ण झालं नाही हे कारणच उरणार नाही.
आज आपण असे काही मुद्दे लक्षात घेणार आहोत ज्याने आपले ह्या वर्षी घेतलेले संकल्प तर पूर्ण होतीलच शिवाय आपली इतर प्रलंबित आणि ठरलेली कामंही योग्य रीतीने मार्गी लागतील.
वेळ आणि वेळेचे नियोजन –
वेळ आणि वेळेच्या नियोजनाची सांगड घालण्यात आपण यशस्वी झालो तर कुठलेही काम पूर्ण कार्यक्षमतेने करू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने कुठल्याही गोष्टीची किंवा कामाची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी “वेळेचं नियोजन” हेच सर्वात मोठं आणि यशस्वी कौशल्य आहे ही बाब स्वीकारली पाहिजे.
- वेळेचा आदर करा. – कोणत्याही कामात यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःच्या आणि इतरांच्याही वेळेचा आदर करणे अत्यंत इष्ट आहे. कुणाला वेळ दिली असेल तर ती पाळणं, एखादं काम वेळेत पूर्ण करून देणं ही जबाबदारी समजा. तरच वेळेचा सदुपयोग होईल आणि कुणाचाही वेळ व्यर्थ जाणार नाही.
- ध्येय ठरवा.- आपलं ध्येय काय आहे ते ठरवा आणि त्यानुसारच वेळेचं नियोजन करा. रोज त्या ध्येयासाठी गरजेनुसार आणि नियोजनानुसार न चुकता वेळ द्या.
- समजून घ्या.- कुठलेही काम करताना पूर्ण समजून घेतलं तर बराचसा वेळ वाचवता येतो. समजा एखाद्याने कुठली जबाबदारी दिली असेल तर ती त्याचं वेळी पूर्णपणे समजून घ्या. म्हणजे समजलं नाही म्हणून होणारी दिरंगाई टाळता येते आणि कामही वेळेत पूर्ण होते आणि कामातली उत्पादकता वाढवता येते.
- दैनंदिन नियोजन वही / डायरी बनवा. – आजच्या धावत्या जगात अनेक गोष्टी एकावेळी करणे ही काळाची गरज बनली आहे. नवे मार्ग, प्रगत तंत्रज्ञान सोबत असले तरी कित्येकदा अपुरा पडणारा वेळ हा बऱ्याच विलंबित कामासाठी कारणीभूत ठरतो. तेव्हा स्वतःचे पद्धतशीर असे नियोजन खूप उपयोगी पडते. त्यासाठी एक दैनंदिन नियोजन वही किंवा डायरी बनवा. त्यामध्ये प्रत्येक महिन्यातल्या, आठवड्यातल्या, दिवसभरातल्या कामांची वेगवेगळी नोंद करा. महत्त्वाच्या कामांसोबत साध्यातले साधे कामही लिहायला विसरू नका. उदा. एखादे पुस्तक वाचन पूर्ण करायचे आहे, एखाद्याला महत्त्वाचा फोन करायचा आहे, एखादे चित्र पूर्ण करायचे आहे, कुणाशी भेट घ्यायची आहे, कुणाला महत्त्वाची माहिती द्यायची आहे, कपडे इस्त्री करून ठेवायचे आहे, कुठे फिरायला जायचे असेल तर काय काय तयारी करायची, इत्यादी. कुठलीही कामं आपण त्यामध्ये लिहून ठेवू शकतो. जेणेकरून आपण कुठलेच काम विसरणार तर नाहीच शिवाय सगळीच कामे वेळेनुसार प्रयत्नपूर्वक पूर्ण करू शकतो.
- कालमर्यादा ठरवा, वेळापत्रक बनवा. – नियोजन वहीत फक्त काम लिहू नका तर वेगवेगळ्या कामानुसार म्हणजेच वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक कामं अशी वेगवेगळी यादी बनवा. प्रत्येक कामासाठी मुदत ठरवा. कुठल्या वेळी कुठले काम करायचे आणि त्या कामाला किती वेळ द्यायचा ह्याचं व्यवस्थित वेळापत्रक तयार करा. प्रत्येक कामाची अंतिम तारीख आणि वेळ स्वतःच निश्चित करा.
- प्राधान्यक्रम ठरवा. – अनेकदा एका वेळी अनेक काम हाती घेतलेली असतात. तेव्हा गोंधळून न जाता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवा. त्याप्रमाणेच ती काम पूर्ण करायला घ्या. दुसरे कामही महत्त्वाचे म्हणून हातातले काम बाजूला ठेवून ते करायला घेतले तर दोन्ही कामे योग्य रीतीने पूर्ण करता येणार नाही. अशावेळी कामाचा ताण येऊन कामात आणखी विलंब होण्याची शक्यता जास्ती असते. तेव्हा एक काम झाल्याशिवाय दुसरे करायला घेऊ नका.
- नवे तंत्रज्ञान शिका. – वेगवेगळयापर्यायांचा विचार करा, मोठ्या कामाचं छोट्या छोट्या भागात विभाजन करा. त्याचाही प्राधान्यक्रम लिहून काढून त्यानुसार अमलात आणा. म्हणजे कामाचा ताणही येत नाही आणि योग्यरीतीने काम वेळेत पूर्ण करता येऊ शकते.
- सातत्य ठेवा. – कामातली शिस्त आणि नियोजन ह्यात सातत्य असू द्या. दर महिन्याला न चुकता वेळापत्रक बनवणं आणि त्यानुसार गोष्टी साध्य करणं ह्याची नियमित सवय लावून घ्या.
- चालढकल करणं टाळा. – कित्येकदा कंटाळा आला म्हणून किंवा नंतर करू म्हणून अनेक काम पुढे पुढे ढकलली जातात आणि अप्रत्यक्षपणे आपण जरुरीपेक्षा जास्ती वेळ त्या कामांसाठी घालवतो. चालढकल करण्याची लागलेली सवय मोडून आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा.
- मोबाईल/ टीव्ही बंद ठेवा. – आजच्या काळात आपण सर्वच मोबाइल, टिव्ही यांचा अती वापरकरू लागलो आहोत. सतत मोबाईल हातात घेण्याची, सारखे सामाजिक माध्यमांवर जाण्याची, सतत टिव्ही वर काही ना काही पाहत बसण्याची सवयच लागली आहे. त्यामध्ये आपल्या कामाचा वेग आणि वेळ दोन्ही खर्च होतो हे आपल्या लक्षातही येत नाही. तेव्हा कामाच्या मध्ये वेळ काढणाऱ्या ह्या गोष्टी बाजूला ठेवणे केव्हाही चांगलं. समाज माध्यमांचा वापर कामाच्या वेळी करणं टाळा. किमान अती महत्त्वाच्या कामात असताना तरी, मोबाईल बंद ठेवा. शक्य असल्यास अमुक वेळेत कोणी फोन करू नका, मेल किंवा संदेश पाठवून ठेवा अशा सूचना आधीच देऊ शकता; म्हणजे आपण विचलित न होता पूर्ण लक्ष आपल्या कामावर देऊ शकतो.
- विश्रांती घ्या. – प्रत्येक काम झाल्यावर थोडीशी तरी विश्रांती घ्या. प्रत्येकाची विश्रांती घ्यायची पद्धत वेगळी असू शकते, ती आपल्या आवडीप्रमाणे ठरवा. आपल्या नियोजनाच्या यादीत विश्रांतीची वेळही ध्यानात ठेवून त्या कामाची कालमर्यादा ठरवा. थोड्याशा विश्रांतीनेही पुढील काम करण्यास ऊर्जा मिळते.
- कामाची जागा नीटनेटकी आणि सोयीस्कर ठेवा. – कार्यालयात असो वा घरात आपली काम करण्याची जागा नेहमीच सोयीस्कर असू द्या. कुठलाही पसारा राहणार नाही ह्याची खबरदारी घ्या. छोट्या मोठ्या गोष्टींची अडचण येणार नाही.
- व्ययक्तिक आणि व्यावसायिक गोष्टी एकाच वेळी करू नका. – वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टी एकत्र आणू नका. भावनिक आणि आर्थिक गोष्टींचा गुंता होऊ देऊ नका. इथेही प्राधान्य लक्षात घेऊनच त्या त्या गोष्टीला वेळ द्या.
- हसा. – चार्ली चॅप्लिन ,सांगून गेले की ज्या दिवशी तुम्ही हसला नाहीत तो दिवस वाया गेला. तेव्हा रोज हसा. म्हणजेच काय तर कुठलंही काम असो कितीही कष्टाचं किंवा वेळ खाऊ काम असलं तरी हसत हसत ते काम मनापासून करा म्हणजे तो दिवस, ती वेळ कधीच वाया जाणार नाही. पर्यायाने थोडा विरंगुळा ही मिळतो आणि शांत डोक्याने पुढे काय करायचं हे ही सुचते.
- कृतज्ञ रहा. – कोणी आपल्यासाठी वेळ काढून आपल्या कामात मदत केली असेल किंवा कुठल्या गोष्टीची तंत्रज्ञानाची मदत झाली असेल तर त्या प्रती कृतज्ञ रहा. जमल्यास त्या व्यक्तीप्रती आभार व्यक्त करा. कारण काम कुठलंही असो वेळेचं स्थान हे कायम पहिले असते.
वेळेचं नियोजन करताना जर ह्या सगळ्या कौशल्यांची कास धरली तर; तुम्हाला यश तर नक्की मिळेलच, सोबत ज्या समाधानाची, संपत्तीची वाट बघत असतो ते नक्कीच आपल्याला वेळेत मिळेल. तेव्हा उचला वही आणि लागा कामाला. आज पासूनच नियोजनाला सुरुवात करा. वर्षाच्या पहिल्या दिवशी केलेले संकल्प पूर्ण नियोजनाने, ध्येयाने आणि ठरवलेल्या वेळेतच नक्की पूर्ण करा. सोबत पूर्ण झालेल्या सर्व कामांची यादीही करत रहा. वर्षाच्या शेवटी ती आवर्जून “वेळ काढून” वाचा. जो आनंद मिळेल तो शब्दातीत असेल. कारण तुम्ही “वेळेचा आदर केला असेल” आणि “वेळेला वेळ दिला असेल”. हीच जगातील सर्वात मोठी गोष्ट आहे.
आजचा लेख कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या. तुम्हाला कुठल्या विषयांवर लेख वाचायला आवडतील तेही सांगा. (Best Tips for effective time management in Marathi)ही माहिती आपल्या कुटुंबासोबत मित्र-परिवारालाही नक्की पाठवा. अशाच विविध विषयांवरील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नेहमी भेट द्या.
वेळ काढून वाचल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रियांची वाट बघत आहोत.
धन्यवाद.
लेखिकेचे नाव – नंदिनी हाटकर, मुंबई.
Best information
Thank you Anish ji🙏🏻🙂
खूप छान लिहिलंय
Thank you Akanksha🙏🏻🙂
Nice guidelines….!!
Thank You Gouri🙏🏻🙂
छानच लिहिले आहे 👌.
Thank You Vaishali🙏🏻🙂
वेळ काढून वाचवा असा लेख…. खुप सुंदर
Thank you so much Amit ji🙏🏻🙂
अत्यंत मुद्देसूद मांडणी केली आहे
Thank you so much Priti ji🙏🏻🙂
खूपच छान!!
धन्यवाद नेहा 🙂🙏🏻
खुप छान माहिती
धन्यवाद सुप्रिया🙂🙏🏻