मुंबईतील पर्यटन स्थळे l Best Unique places to visit in Mumbai

WhatsApp Group Join Now

मुंबई म्हणजे महाराष्ट्राची राजधानी ! तिची एक शान आहे. मुंबई जसे सर्वात जलद शहर मानले जाते तसेच त्याला अमुल्य असा ऐतिहासिक वारसाही लाभला आहे. हे शहर पाहण्यासाठी खास जगभरातून पर्यटक येत असतात. तुम्ही फिरला आहात का मुंबई ? हा लेख वाचल्यावर सांगा तुम्हाला कोणते स्थळ सर्वात आवडले आहे?

स्वप्ननगरी मुंबई मध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. समुद्रकिनारे, मंदिरे, ब्रिटीश कालीन भव्य वास्तु अशी वैविध्यपूर्ण स्थळे या शहरात आपल्याला पाहता येतात. घड्याळाच्या काट्याबरोबर धावणाऱ्या या शहरातील काही स्थळांबद्दलची माहिती आज आपण पाहूया.

मुंबईतील पर्यटन स्थळे नावे आणि माहिती – Best Unique places to visit in Mumbai


१) गेट वे ऑफ इंडिया
भारताचे प्रवेशद्वार अशी ख्याती असलेल्या मुंबईतील वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. राजा जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या मुंबई भेटीच्या सन्मानार्थ, गेट वे ऑफ इंडियाची उभारणी जॉर्ज विलेट यांनी १९२४ मध्ये केली होती. इथून जवळच ताजमहाल हॉटेल हे मुंबईचे प्रसिद्ध हॉटेल आहे. फोटो काढण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया हे पर्यटकांच्या विशेष पसंतीचे ठिकाण आहे.

2) घारापुरी लेणी

घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी ही मुंबईपासून समुद्रात ७ किलोमीटर अंतरावर घारापुरी या लहान बेटावर आहेत. घारापुरी बेटावर जाण्यासाठी गेटवे ऑफ इंडियापासून मुंबईच्या खाडीतून तासाभराचा प्रवास करून बोटीने जावे लागते. या प्रवासात समुद्रावर विहार करणाऱ्या विविध प्रकारच्या पक्षांबरोबरच मुंबईचे लांबून दिसणारे रूपही पाहता येते. गगनचुंबी इमारतींचे दर्शन होते. तसेच बॅाम्बे हाय, न्हावाशेवा बंदर, मोठ्या व्यापारी नौका यांचेही दर्शन होते. भव्य आकाराच्या शिल्पांसाठी घारापुरीची लेणी प्रसिद्ध आहेत. इ.स.९ ते १३ वे शतक या कालखंडात पाषाणात ही लेणी निर्माण करण्यात आली. युनेस्कोने १९८७ साली या लेण्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला होता. पोर्तुगीजांनी या लेण्यांस घारापुरी ऐवजी एलिफंटा हे नाव दिले होते. त्रिमूर्ती, अर्धनारीश्वर ही इथली प्रमुख आकर्षणे आहेत. सुमारे ११ फूट उंच असणारे नटराज शिल्प देखील पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.

3) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
हे मुंबई शहरातील ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई सीएसएमटी) मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. याचे जुने नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) असे होते. इ.स. १८८७ मध्ये राणी व्हिक्टोरियाच्या राज्याभिषेकाप्रसंगी मुंबईच्या बोरीबंदर भागात हे स्थानक बांधण्यात आले. इथे एकूण १८ फलाट असून फलाट क्र. १ पासून ते फलाट क्र. ७ हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानके आहेत. लांब पल्ल्याच्या पॅसेंजर तसेच जलद गाड्यांसाठी फलाट क्र. ८ ते फलाट क्र. १८ हे मुख्य मार्गिकेवर आहेत.

४) नेहरू तारांगण
मुंबईतील वरळी परिसरात १९७७ साली नेहरू तारांगण उभारण्यात आले. या तारांगणात आकाशातील तारे आणि ग्रह जणू काही खाली येतात कि काय असे भासते. लहान मुलांमध्ये खगोलशास्त्र आणि विज्ञानाबद्दल उत्सुकता निर्माण करणारे असे हे नेहरू तारांगण/ प्लॅनेटोरियम आहे. अंतराळ संशोधनाचे विविध टप्पे इथे मांडलेले आहेत. अंतराळामधील वैविध्यपूर्ण घडामोडींचे दर्शन सहा प्रोजेक्टरच्या साहाय्याने आपल्याला पाहता येतात.
वेळ – सकाळी ११ ते ५, सोमवारी सुट्टी.


५) हाजी अली
इ. स. १४३१ साली मक्का यात्रेस जाताना आपले प्राण गमावणाऱ्या – सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांच्या स्मरणार्थ बांधलेला हा दर्गा आहे. पांढऱ्या संगमरवरी दगडांमध्ये बनलेली ही इमारत भारतीय आणि इस्लामिक स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
महालक्ष्मी रेसकोर्सच्या समोर समुद्रात बेटावर दर्गा आहे. एक पायवाटेवरून या दर्ग्यापर्यंत जात येते; परंतु ही पायवाट समुद्राला जेव्हा भरती येते तेव्हा ती आपल्याला दिसत नाही. दर्ग्यामध्ये फक्त ओहोटी असतानाच आपल्याला जाता येते. दगडी मार्गावर चालताना दोन्ही बाजूला समुद्र असल्याने तो अनुभव खूप सुंदर वाटतो. दर्ग्यातील कबरीभोवती चोहोबाजूंनी चांदीच्या चौकटीचे सुंदर नक्षीकाम केलेले खांब आहेत. या दर्ग्याला भेट द्यायला तुम्ही वेस्टर्न रेल्वेच्या महालक्ष्मी व मुंबई सेंट्रल स्थानकावरून, मध्य रेल्वेच्या भायखळा स्थानकावरून तसेच बसनेही प्रवास करू शकता.

६) महालक्ष्मी मंदिर
भुलाभाई देसाई मार्गावरील महालक्ष्मी मंदिर हे मुंबईतील प्रसिध्द मंदिर आहे. इ. स. १७८५ साली वरळी व मलबार हिल जोडण्याचे काम काही इंग्लिश इंजिनियर करत होते. पण त्या कामात अनेक अडचणी सतत येत होत्या. काय करावे हे सुचत नव्हते. पाठारे प्रभू हे त्या प्रोजेक्टचे मुख्य इंजिनियर होते. त्यांना वरळी जवळच्या समुद्रात लक्ष्मीची मूर्ती आहे, असे स्वप्न पडले. त्यांनी स्वप्नात दिसलेल्या जागी शोध घेतला असता लक्ष्मीची मूर्ती तिथे सापडली. त्यांनी मग तेथेच मंदिर बांधले. त्यामुळे त्यांचे ते प्रोजेक्ट पूर्ण झाले. इ. स. १८३१ ला धाक जी दादाजी नावाच्या एका हिंदू व्यापाऱ्याने या मंदिराची पुनर्निर्मिती केली. समुद्राचे सान्निध्य लाभल्याने हे मंदिर खूप सुंदर वाटते. मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला देवी महालक्ष्मी, देवी महाकाली आणि देवी महासरस्वती यांच्या मूर्त्या दिसतात. इथे जाण्यासाठी महालक्ष्मी स्टेशनवरुन शेअर टॅक्सी किंवा बसदेखील मिळू शकते.

७) सिध्दीविनायक गणपती
प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक मंदिर खूप प्रसिद्ध आहे. हा गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची श्रध्दा आहे. इ. स. १८०१ मध्ये हे मंदिर देउबाई पाटील आणि लक्ष्मण विठू पाटील यांनी बांधले होते. सिद्धिविनायक गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी वर्षभर देशभरातून लोक या मंदिराला भेट देतात. हे मुंबईतील सर्वात श्रीमंत मंदिर आहे कारण जगभरातील भाविकांकडून दरवर्षी देणगी स्वरूपात मोठी रक्कम जमा होते. उजव्या सोंडेची मूर्ती खूप सुंदर आहे. उजव्या सोंडेचा हा गणपती सिध्द पीठ आहे असे मानले जाते. म्हणून तो सिध्दीविनायक म्हणूनही ओळखला जातो. दररोज सकाळी ६ वाजता पूजा, अभिषेक झाल्यावर गणपतीच्या दर्शनाला सुरुवात होते.
सिध्दीविनायकाला दादर स्टेशनवरुन पायी जाता येते. तसेच शेअर टॅक्सी, बस देखील उपलब्ध आहेत.

८) तारापोरवाला मत्स्यालय
तारापोरवाला मत्स्यालय हे मुंबईतील एकमेव मत्स्यालय मरीन ड्राईव्हला आहे. हे मत्स्यालय शिक्षण आणि करमणुकीचे एक उत्तम साधन आहे. इ. स. १९२३ साली समुद्राने वेढलेल्या मुंबईला एक सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावे अशी संकल्पना सर्वप्रथम बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे कार्यवाहक श्री.मिलार्ड यांनी मांडली. त्याचबरोबर समुद्राच्या आतील अद्भूतरम्य जग लोकांना पाहायला मिळावे, या हेतूने मरीन ड्राईव्हला आठ लाख रु खर्चून १९५१ साली हे मत्स्यालय बांधण्यात आले. इथे प्रवेश केल्यानंतर समुद्रात, तलावात आढळणारे विविध प्रकारचे मासे आपल्या नजरेस पडतात. या मत्स्यालयात १०० हून अधिक मासे आहेत. लक्षद्वीप बेटामधून आणलेले सात प्रकारचे प्रवाळ व मासे हे इथले विशेष आकर्षण आहेत. टीव्हीवर पाहिलेले मासे प्रत्यक्षात पाहताना एक वेगळाच अनुभव मिळतो. माशांच्या टँकवर लिहिलेले नाव आणि त्याबद्दलची दोन ओळीतील माहिती आपल्या ज्ञानात भर टाकते. अशा या समुद्री सफर घडवणाऱ्या मत्स्यालयाला भेट देण्यासाठी तुम्ही वेस्टर्न रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकावरून चालत किवा टॅक्सीने जाऊ शकता.
वेळ:- मंगळवार ते शनिवार- सकाळी १० ते ७ पर्यंत
रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी- सकाळी १० ते ८ पर्यंत.

९) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम)
पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आणि आताचे श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय हे मुंबईतील सर्वात जुने आणि जवळपास ५० हजाराहून अधिक कलाकृतींचा संचय असलेले वस्तू संग्रहालय आहे. मुंबईचे ब्रिटीश वास्तुविशारद डब्लू.जी.विटेट यांनी याचा आराखडा तयार केला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे इ.स १९२२ मध्ये हे वस्तूसंग्रहालय सर्वांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. या संग्रहालयात भारत, चीन तसेच अन्य देशांच्या विविध कलाकृती पहावयास मिळतात. मराठा मुघल सरदारांच्या वापरातील शस्त्रास्त्रे, नौका, शिल्पे, विविध दालनात पाहता येतात. खूप काही पाहण्यासारखे असल्यामुळे इथली विविध दालने, वस्तू पाहताना एक दिवसही अपुरा पडेल की काय असे पर्यटकांना वाटू शकते. जगभरातील कलाकृती, इतर साहित्य व अन्य कलाकृतींची माहिती करून घेण्यासठी नक्की या वास्तुसंग्रहालयास भेट द्या.
वेळ – मंगळवार ते रविवार सकाळी १०.१५ पासून ते सायं ५.४५ वाजेपर्यंत पर्यटक इथे भेट देऊ शकतात.


१०) वीरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालय
लहान मुलांच्या आवडीचे ठिकाण म्हणजेच प्राणीसंग्रहालय. वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात हत्ती, सिंह, वाघ, वानर, मगरी, इत्यादी वन्यजीव आहेत. ४८ हेक्टर क्षेत्रावर हे प्राणी संग्रहालय विस्तारित आहे. याचे मुख्य आकर्षण म्हणजे पेंग्विन. सामान्यतः थंड प्रदेशात आढळणाऱ्या या पेंग्विनसाठी इथे कृत्रिम वातावरणनिर्मिती केली गेली आहे.
ठिकाण: भायखळा पूर्व, माझगाव, मुंबई
वेळ – सकाळी ९:३० ते संध्याकाळी ०५:३०, बुधवारी बंद


११) दादासाहेब फाळके चित्रनगरी / मुंबई फिल्म सिटी
मुंबई फिल्म सिटी हे मुंबईमध्ये भेट देण्यासाठी एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे ५२० एकर असून दादासाहेब फाळके चित्रनगरी ही मुंबई फिल्म सिटी म्हणूनही ओळखली जाते. इथे तुम्हाला थिएटर, बाग, तलाव, रेकॉर्डिंग स्टुडिओ, मंदिर अशी अनेक शुटिंगसाठी आवश्यक लोकेशन्स पहायला मिळतात.
बसमध्ये बसून मुंबई फिल्म सिटी मध्ये तुम्हाला फेरफटका मारता येईल, चित्रिकरणाचे सेट पाहता येतील. आपण जर चित्रपटांचे चाहते असाल तर या चित्रपट नगरीला भेट द्यायला विसरू नका.
ठिकाण – आरे कॉलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई
वेळ – दररोज, सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०५:०० वाजेपर्यंत

कशी वाटली ही पर्यटन स्थळे? अशाच अनेक माहितीपूर्ण लेखांसाठी lekhakmitra.com या वेबसाईटला भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.

धन्यवाद !!! (Best Unique places to visit in Mumbai)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top