गणू रडायला काय झाले? अरे बोल काहीतरी, तुझ्या घरी जाऊन आलो तिथे समजले की तू तुझ्या आई बाबांबरोबर माळावरच्या घरी गेला आहेस राहिला म्हणून आम्ही सगळेजण इकडे आलो.गणू म्हणजे गणपत चे मित्रमंडळी त्याला विचारत होते.
गणू रडत रडतच म्हणाला,”आबा गेल्यावर आजीने, आई-बाबा व मला घरातून हाकलून दिले. आज पहिल्यांदा समजले की बाबांची ती सावत्र आई आहे. आता इथून पुढे आम्हाला या पडीक माळरानावरच्या जागेतच राहायचे आहे. आई तर एक सारखीच रडत आहे, आता कसे होणार आमचे म्हणून?
गणू म्हणजे गणपत एक चुणचुणीत हुशार मुलगा. पाटवले गावातल्या शाळेमध्ये इयत्ता सातवी शिकणारा. गणपत चे आजोबा ‘शिरपतराव ढोलेपाटील’ गावामध्ये मोठी असामी होती. एक महिन्यापूर्वी ते स्वर्गवासी झाले व गणपतच्या आई-वडिलांना गणपतच्या सावत्र आजीने घराबाहेर काढले.
गणपतचे वडील स्वभावाने अतिशय भित्रे व गरीब त्यांच्यासाठी सावत्र आई असली तरी ते तिला खूपच मानायचे. शिरपतराव जिवंत असेपर्यंत त्यांच्या दुसऱ्या बायकोने म्हणजेच गणपतच्या सावत्र आजीने गणपतच्या वडिलांना चांगले वागवत असल्याचे नाटक सर्वांसमोर केले होते.
शिरपतराव गेल्यावर लगेचच तिने घराची, जमीन जुमल्याची वाटणी करून पडीक माळरानातली जमीन व तिथेच झोपडी वजा घर गणपतच्या वडिलांना देऊन, त्या कुटुंबाला घरातून हाकलून दिले होते. घरातली भांडणे चव्हाट्यावर नको म्हणत गणपत चे आई वडील मुकाट्याने जे मिळाले आहे त्या गोष्टीत आनंद मानून त्या माळरान जमिनीवर राहिला आले होते. पुढे काय व कसे करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता.
गणू चा तीन-चार दिवस विचार करण्यातच वेळ गेला, त्याला एकदम आजोबांचे म्हणजे शिरपतरावांचे वाक्य आठवले,”गणपतराव ही ‘काळी’ जमीन नसून त्याच्यात ‘सोनं आहे सोनं’, आपल्या बापदादांनी ते खणुन-खणुंन काढलाय बर का” गणूच्या मनात हे वाक्य सतत घोळत होते. सोन्याचा शोध घेणे हे आपल्या एकट्या दुकट्याचे तर नक्कीच काम नाही, मग अशी काहीतरी युक्ती करावी की ज्यामुळे आपल्याला हे सोने मिळेल असे त्यानी मनोमन ठरवले .
गणूच्या मित्रांनी त्याला धीर दिला. काहीतरी युक्ती करूयात असे सर्व बालचमुंनी ठरवले.
चार-पाच दिवसांनी गणूचे मित्र परत त्याला भेटायला आले. सगळ्यांनी एकत्र बसून काहीतरी खलबते केली.
दुसऱ्या दिवसापासून गावातली सतरा अठरा वर्षाची उनाड मुले गणूला भेटायला आली.
गणूच्या आई-वडिलांना काय चालू आहे याचा पत्ताच नव्हता. गणूची हुशारी सगळ्यांना माहीत असल्यामुळे आई-वडिलांनी पण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला.
आई काकुळतीला येऊन गणू ला विचारू लागली की, अरे गणू ,तुझ्या मनात तरी काय चाललं आहे जरा सांगतोस का आम्हाला? तुला खूप शिकून मोठे व्हायचे आहे. तू बघतोयस ना आपली परिस्थिती कशी झाली आहे ते, या उनाड मुलांच्या नादी लागू नकोस. त्यांनी शिक्षण सोडून दिवसभर गावात गुंडगिरी करत फिरत असतात ती ,त्यांच्या संगतीत राहू नकोस रे बाबा. गणू ने आई बाबांना विश्वासात घेतले व सांगितले की,आजोबा त्याच्याशी बोलताना बऱ्याच वेळा म्हणाले होते की, ही ‘काळी’ नुसती जमीन नसून त्याच्यामध्ये ‘सोने आहे सोने’ त्याचा शोध घेण्यासाठी त्याने एक युक्ती केली आहे.गणू चे बाबा त्याला समजावून सांगत म्हणाले की,अरे गणू! बाबांचे म्हणजे तुझ्या आजोबांचे जमिनीवर खूप प्रेम असल्यामुळे ते असे म्हणत होते, या माळरानात खडका शिवाय काहीही नाहीये बाळा, त्यामुळे तू अशा कुठल्याही गोष्टीच्या नादी लागू नकोस व सोनं सापडले नाही तर गावातली मुले तुला धरून मारतील.
गणू ने सांगितले की, आपल्या जमिनीत सोनं मिळाले तर त्याचा अर्धा भाग हा आपला असणार आहे व अर्धा भाग जी मुलं काम करतील त्यांनी पापसात वाटून घेणार आहेत असे ठरले आहे.त्यामुळे त्यांनी जर कष्ट केले तरच त्यांना सोने मिळणार आहे नाहीतर आपण त्यांना काही देणे लागणार नाही. अर्थात या सगळ्यात आपले कुठलेही नुकसान होणार नाही याची गणू ने खबरदारी घेतली होती.
दुसऱ्या दिवसापासून तीन-चार मुलांचा समूह गणूच्या जमिनीत सोने शोधायला येऊ लागला. हळूहळू ही बातमी सर्व गावात पसरली त्यामुळे ज्याला जमेल तो येऊन थोडा थोडा भाग खणत होता.
असे करता करता पूर्ण जमीन खणून झाली.
जमिनीत काही सापडत नाही म्हणल्यावर गावातल्या लोकांचा उत्साह कमी होत होत त्यांनी काम बंद केले.
गणूचे मन खट्टू झाले. मग आजोबांनी आपल्याला खोटे तर सांगितले नाही ना? राहून राहून त्याच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले. पण एक मन म्हणत होते की आजोबा जे काय सांगत होते त्याच्यात काहीतरी अर्थ दडला आहे आणि तो मला शोधायचा आहे.. थोडक्यात आजोबांचे म्हणणे ‘डीकोड’ करायचे होते तर…..
आता मात्र गणू ने त्याच्या मित्रांची मदत घेतली. प्रत्येकाने आपापले डोके चालवून आजोबांच्या म्हणण्याचा अर्थ काढायचा प्रयत्न केला.
हाताश व निराश परिस्थितीत गणू व त्याचे मित्र मंडळी टेकडीवरच्या महादेवाच्या मंदिरात बसले असताना एक वयस्कर गृहस्थ तिथे आले ते शिरपतरावांचे चांगले मित्र होते.
गणू व त्याच्या आई-वडिलांवर आलेल्या परिस्थितीचा त्यांना पूर्ण अंदाज होता.
शिरपतरावांकडनं गणूच्या हुशारीचे किस्से पण त्यांनी ऐकले होते. सोनं सापडेल म्हणून गणू ने गावकऱ्यांची घेतलेली मदत केलेली युक्ती त्यांना खूपच आवडली होती.
गणू ला हताश व निराश झालेले पाहून त्यांनी जमिनीतल्या सोन्याविषयी त्याला माहिती सांगितली.
आजोबांचे सोने सापडले म्हणून गणू खूपच खुश झाला. आता त्याचे डोके पटापट चालू लागले. आजोबांच्या मित्राबरोबर बोलून त्यांनी एक योजना आखली.
गणू ने त्याच्या शाळेतल्या मित्रांच्या घरून ओला कचरा दररोज जमवायचे ठरवले.
शेतातच त्याने सात खड्डे तयार केले. शाळेतल्या शास्त्र विषय शिकवणाऱ्या बाईंकडून गांडूळ खत कसे करायचे याची माहिती करून घेतली. जमिनीचा पोत चांगला करण्यासाठी म्हणून जमिनीमध्ये चुना, राख, कडुलिंबाची पाने या सर्वाचा थर देऊन कोको पीट मिसळून जमीन तयार केली.
एका ठिकाणी त्यांना जमिनीत खाली एक जिवंत पाण्याचा झरा सापडला. पाणी सापडले म्हणून सर्वांनी मिळून खोदकाम केले व एक छोटीशी विहीर बांधली.
हे सर्व गावकरी दूरून पाहत होते. सोने सापडले नाही म्हणून आता गणूच्या डोक्यावर परिणाम झाला असे सर्व म्हणू लागले.
आता हळूहळू गणूच्या आई-वडिलांना मार्ग दिसू लागला. तालुक्याच्या गावाला जाऊन उत्कृष्ट प्रतीचे बी-बियाणे आणले.आता त्या तिघांनी मिळून भाजीपाल्याची पेरणी केली.
जमिनीत पाणी सापडल्यामुळे शेताला मुबलक प्रमाणात पाणी मिळू लागले.
आता गणू चे आईबाबा जोडीने शेतामध्ये राबू लागले.
दिवसभर गणू शाळेत जात होता संध्याकाळी घरी आल्यावर शेतामध्ये कामही करत होता.
भूगोलाच्या सरांशी बोलल्यावर त्याच्या लक्षात आले की पावसाचे पाणी अडवून शेततळे करता येईल, त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचाही प्रश्न सुटेल. गणू प्रयोगशील असल्यामुळे व शाळेतले सर्व शिक्षक गणूच्या हुशारीवर खुश असल्यामुळे ज्याला जशी जमेल तशी ते मदत व मार्गदर्शन गणूला करत होते.
हळूहळू गणूच्या शेतामध्ये भाजीपाला उगवू लागला. ठरल्याप्रमाणे गणू ने अर्धा हिस्सा स्वतःसाठी ठेवला व अर्धा हिस्सा ज्यांनी ज्यांनी खोदकाम करताना मदत केली होती त्यांच्या घरी जाऊन सुपूर्त केला.
गणूचा प्रामाणिकपणा, कष्ट करायची त्याची तयारी व हुशारी या तीन गुणांमुळे आजोबांच्या मित्राने काळ्या जमिनीतून सोने कसे काढायचे याचा कानमंत्र गणूला दिला होता.
सर्व गावकरी एकदम खुश झाले. उनाड मुलांना पण कष्टाचे महत्त्व समजले.
जमिनीत पुरलेले सोने म्हणजे काय असते ते आज सर्वांना समजले.
आता गणूला वेध लागले होते ते बारावी झाल्यावर एग्रीकल्चर मध्ये डिग्री घेऊन आपल्याच गावात राहून शेती करायची व पूर्ण गावाचा विकास करायचा.
गणूची व त्याच्या आई-वडिलांची परिस्थिती हळूहळू बदलू लागली.
कितीही विपरीत परिस्थिती आली तरी त्याच्यातून मार्ग हा हमखास निघतो फक्त शांत डोक्याने विचार करायची आवश्यकता असते.
यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक कष्ट, आजूबाजूच्या परिस्थितीचे अवलोकन करून व त्यांचाच आधार घेऊन आपण पुढे गेलो तर यश हे नक्कीच आपल्या पदरात पडते.
आपल्या क्षमता ओळखून त्या दृष्टीने प्रयत्न केले तर आपण नक्की यशस्वी होतो.
हा यशाचा त्रिवार मंत्र गणू ने स्वतः अनुभवला.
गणू ला शाळेत शिकलेली हिंदी कविता आठवली आणि आज त्याला त्याचा खऱ्या अर्थाने अर्थ समजला होता…
लहरों से डरकर नौका पार नही होती,
कोशिश करने वालों की कभी हार नही होती|
नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है,
चढ़ती दिवारों पर, बार बार फिसलती है,
मन का विश्वास रगों में साहस भरता है,
चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखराता है|
आखिर उसकी मेहनत बेकार नही होती,
कोशिश करने वालों की कभी हार नही होती|
वृषाली पुराणिक.पुणे
आपल्या क्षमता ओळखून त्या दृष्टीने प्रयत्न केले तर आपण नक्की यशस्वी होतो. हा यशाचा त्रिवार मंत्र गणू ने स्वतः अनुभवला.ही बोधकथा तुम्हाला कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
छान 👌👌