Book review in Marathi: निसर्गात रमायला कोणाला आवडत नाही? आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या कारणातून निमित्त साधून आपल्या भवतालच्या परिसराशी नाळ जोडतोच. फावल्या वेळात बागकाम करण्यापासून ते वन्यजीव छायाचित्रण करण्यापर्यंत किंवा पारंपारिक सण साजरा करण्यापासून ते गिर्यारोहण करण्यापर्यंत निसर्ग भ्रमंती करताना आपण विविध झाडे, वेली, वृक्ष, पाहतो सुवासिक फुलांचा गंध अनुभवतो, निसर्गाने चमत्काररीत्या घडवलेल्या मृदा पाषाणांना स्पर्श करतो. रसाळ फळे चाखतो, स्वच्छंदपणे सौंदर्याची उधळण केलेल्या हिरव्या राईच्या रंगोत्सवामध्ये विहारतो. पक्षांच्या सुमधुर गाणे ऐकतो. गवताळ प्रदेशात वाऱ्यावर झूलणाऱ्या गवतपात्यांची भिरभिरी, सळसळणारी पिंपळाची पाने, म्याऊ म्याऊ करणारा मोर झुडपांच्या आतून जरी गात असला तरीही मोराचं गाणं आपण चटकन ओळखू शकतो.
पुस्तक परिचय
आपण केवळ आपल्याला परिचित असणाऱ्या सजीवांचे आवाज टिपून त्यांची ओळख पटवतो का ? इतके सारे पक्षी अवतीभवती आहेत तरीही कावळा, चिमणी, पोपट आणि साळुंकी हेच गातात का ? ते गातात म्हणजे नेमकं काय करतात ? त्यांच्या गाण्याचे बोल कोणते ? त्यांचे भाष्य कोणासाठी आणि नेमकं कशासाठी ? अशा स्वाभाविक कुतूहलाची कोडी सोडवण्यासाठी पक्षी अभ्यासक शरद आपटे यांच नव पुस्तक पक्षीगान का ? केव्हा ? कोठे ? सायन्स ऑफ बर्ड साऊंड (Science Of Bird Sound) हे नुकतेच प्रकाशित झाले आहे.
लेखक परिचय
सांगली गावचे श्री. शरद आपटे हे महाराष्ट्रातील एक वरिष्ठ पक्षी निरीक्षक म्हणून परिचित आहेत. महाराष्ट्रातील पक्षी अभ्यासात त्यांचे योगदान निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. यांची दोन प्रमुख कारणे सांगता येतील. एक म्हणजे पक्षांच्या आवाजाचा अभ्यास आणि दुसरे म्हणजे पक्षांची ध्वनिमुद्रणे कॅसेट आणि सीडीच्या माध्यमातून प्रकाशित करणे. पक्षांच्या नानावीध आवाजन्च्या नादमधुर आवाज हा त्यांच्या आयुष्यभराच्या अभ्यासाचा विषय राहीला आहे.
त्यासोबत पक्षांचे छायाचित्रण, पक्षांचे वर्तन, विविध व्यवहार आणि पक्षांच्या ध्वनी शास्त्राविषयी कार्यशाळेच्या माध्यमातून, व्याख्यानातून आणि शिबिरातून जनमानसात माहिती पोहोचवणे हा नियमित कार्यक्रम राहिला आहे. आजतागायत सुमारे ४५० पक्षी प्रजातींचे आवाज रेकॉर्ड करण्यात त्यांना यश आले असून ५०००हून अधिक मुद्रिकेतर सामुग्री संग्रहित आहेत. भारताचे थोर पर्यावरण शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ, किरण पुरंदरे, डॉ. पापा पाटील आणि टी. एस. पेरूमल यांसारख्या तज्ञांचा त्यांना सहवास लाभला. २००२साली किरण पुरंदरे यांच्या संकल्पनेतून ऋतुरंग संस्थेच्या माध्यमातून “गा विहगांनो….” ही ऑडिओ कॅसेट तयार झाली.
२००८ साली “बर्डस ऑफ वेस्टन घाट खंड एक” आणि २०१४ साली “बर्ड्स ऑफ वेस्टन घाट खंड दोन” अशी पक्षांच्या चित्रांसह आवाजाची डीव्हीडी प्रकाशित करण्यात आली होती. त्याचे निसर्गप्रेमी श्रोत्यांकडून भरभरून स्वागत झाले. ३६वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन सांगली येथे भरले होते. श्री शरद आपटे यांच्या बर्ड साँग या संस्थेने व महाराष्ट्र पक्ष मित्र संघटनेने २३ आणि २४ डिसेंबर २०२३ रोजी बीएमसी सभागृह शांतिनिकेतन संस्था येथे पार पाडले. दरम्यान हे पुस्तक गोव्याचे जेष्ठ पर्यावरण अभ्यासक तथा संवर्धक श्री. राजेंद्र केरकर हस्ते पक्षी गान.. का ? केव्हा ? कोठे ? या पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन झाले.
पुस्तकाची विशेषता (New Book review in Marathi)
पक्ष्यांची ध्वनी निर्मिती (Bird Vocalization) हे समस्त पक्षी वर्गाच्या वर्तनाचे एक विस्मयकारक पैलू आहे. यामध्ये संवाद साधणे, स्व प्रदेशाचे संरक्षण करणे, जोडीदाराला आकर्षित करणे आणि सामाजिक सहसंबंध ठेवणे असे वैविध्यपूर्ण घटक या वागणुकीशी जोडले आहेत. या प्रत्येक घटनेमध्ये निर्माण केल्या जाणाऱ्या ध्वनींच्या विस्तृत श्रेणी अभ्यासता येतात. पक्षी श्वासनलिकेच्या पायथ्याशी स्थित असलेल्या सायरिंक्स नावाच्या विशिष्ट स्वरांगाचा वापर करून ध्वनीनिर्मिती करतात
. श्वाशकोशातून बाहेर येऊन चोंचेची हालचाल केलेली आपल्याला दिसते आणि आवाज कानावर पडतो. ही रचना पक्ष्यांना शीळ घालणे, किलबिलाट करणे आणि सामायिक गान म्हणणे, सुमधुर गाण्याने विरुद्ध लिंगी पक्ष्याला विणीसाठी रिझवणे आणि इतर प्रजातींच्या आवाजाची नक्कल करणे.
पक्षाची स्वर यंत्रणा हे सारे काम करण्यास उत्क्रांत झाले आहे. विविध प्रजाती त्यांच्या पर्यावरणीय कोनाडा आणि सामाजिक संरचनेनुसार विशिष्ट स्वर निर्माण करतात. बदक किंवा गुलाबी मैना सारखे पक्षी जटिल युगलगान किंवा समूहगीते गातात. याव्यतिरिक्त, पक्ष्यांच्या आवाजामुळे भक्षकांना चेतावणी दिली जाते. पक्षी समूहाच्या हालचालींचे समन्वय साधण्यासाठी धोक्याची माहिती विशिष्ट आवाजाने दिली जाते. स्वप्रजाती व परप्रजाती यांच्यातील संवाद, पर्यावरणीय बदल आणि उत्क्रांती प्रक्रिया समजून घेण्यासाठी संशोधक पक्ष्यांच्या आवाजाच्या नमुन्यांचा प्रदीर्घ काळासाठी अभ्यास करतात. एकंदरीत, पक्ष्यांचे स्वर हे पक्ष्यांच्या वर्तनाची आणि संवादाची रणनीतीची जटिलता प्रतिबिंबित करून जीवशास्त्राच्या समृद्ध आणि गतिशील स्वभावाचे प्रतिनिधित्व करते.
डॉ. माधव गाडगीळ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहितात. वीस प्रकरणात पक्षांच्या आवाजासह त्यांची निरीक्षणे वर्तणूक आणि त्यांना भेडसावलेले प्रश्न लेखकांनी चौकटीमध्ये वाचकापुढे ठेवलेली आहेत. शास्त्रीय संकल्पना सोप्या भाषेत मांडल्यामुळे पक्षी गाण हा विषय क्लिष्ट असला तरी वाचकाला ताण येत नाही म्हणून हे पुस्तक सर्व निसर्गप्रेमींना व शाळकरी विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना, छायाचित्रकारांना आणि खास करून जे पक्षांच्या ध्वनीमुद्रणात काम करू इच्छितो त्यांना एक संग्राहक पुस्तक आहे.
पक्षीगानचे आजचे महत्व
पक्ष्यांची गाणी हे नैसर्गिक जगतात निर्माण होणारे सर्वात सुंदर व जटिल ध्वनी आहेत. हे श्राव्य संकेत पक्ष्यांमधील संवादाचे सर्वात महत्वाचे माध्यम आहे. वन्य संजीवांच्या अभ्यासाचा एक लोकप्रिय क्षेत्र झाले आहे. हे क्षेत्र तांत्रिक दृष्ट्या कठीण असल्यामुळे यामधली प्रगती जिवशास्त्रातल्या इतर अभ्यासापेक्षा धीम्या गतीने कार्यरत आहे. पक्ष्यांचे नामकरण, वर्गीकरण, परिस्थीतिकीय अभ्यास, स्थलांतर व संवर्धन इतक्या क्षेत्रात भरीव कामगिरी झाली.
आंतरराष्ट्रीय स्थरावर तसेच भारतातही नवनवीन माहिती विज्ञानास मिळाली. भारतीय खंडप्राय प्रदेशात इंग्रजांनी पक्षी अभ्यास सुरू केला. डॉ. सलीम अली यांनी जगाच्या निसर्ग इतिहासात भारतीय पक्ष्याची विश्वसनीय आणि आद्ययावत माहितीने समृद्ध केल. त्यानंतर अनेक अभ्याकांची संशोधन लेख, आले, पक्षी परिचयाची पुस्तके आली, याद्या आल्या परंतु पक्षी आवाजाची मूलभूत माहिती आणि क्षेत्र भेटी दरम्यान नेमक काय कारव याकडे बऱ्याचदा कानाडोळा झालेल दिसते.
आपटे यांनी मात्र त्याच्याकडे गांभीर्याने पाहिल्याचे या पुस्तकातून समजते. या कृतीतून नवीन पक्षी निरीक्षकाना क्लृपत्या मिळाल्या आणि मार्गदर्शनही लाभते. पक्ष्यांच्या गाण्या साहित्यात गेल्या तीन दशकांपासून झपाट्याने वाढ झाली आहे. तथापि, नर – मादी स्वर, युगल स्वराची नक्कल आणि बदलत्या हवामानाचा परिणाम यांसारख्या काही संशोधन अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. पक्ष्यांच्या आवाजातील विविधता आणि कार्ये समजून प्राण्यांच्या ध्वनीउत्क्रांतीची कोडी सोडवण्यात आणि जैविक विविधता राखण्यात काय भूमिका बजावतात हे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो.
पक्षी गातात याचा शास्त्रीय अर्थ काय आहे ? पक्षाने स्वर यंत्राच्या साह्याने किंवा अन्य सहाय्याने वापरून केलेले आवाज म्हणजे पक्षांचा आवाज होय. पक्षी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि पुढच्या पिढीला जन्म देण्यासाठी गातात. या बाबतीत सविस्तर विवेचन सदर पुस्तकात केलेले आहे. पक्षी गायनाचे छटे, काळ, वेळ, ठिकाणे आणि आवाजाचा प्रकार या सर्व प्रकारच्या खुलासा उदाहरणासह दिले आहे. जसा एखाद्या गणिताच्या समीकरणाचा आलेख असतो तसं गाण्याच्या आवाजाचाही एक विशेष आलेख असतो त्याला ओसिलोग्रॅम किंवा सोनोग्राम Sonogram असं म्हणतात. त्याच्या आधारे आवाज समजून दिले आहे.
या स्पष्टीकरणाचा सर्वात विशेष गुण म्हणजे प्रत्येक प्रकारात उदाहरणा सोबत दिलेले मुद्रितांचे क्यु आर rकोड. पुस्तक वाचताना पक्ष्यांचे गान तात्काळ आपण मोबाइलवर क्यु आर कोड स्कॅन करून आवाज ऐकू शकतो. हीच विशेषता सर्व निसर्गप्रेमींना पुस्तक संग्रही ठेवण्यास प्रेरणा देईल. यात लेखक यशस्वी झालेले आहेत असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही.
तुमच्या आवडीचा पक्षी कोणता? त्याच्या आवाज (Bird Song) कसा आहे? हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. तसेच अशा नवनवीन पुस्तकांची माहिती (Book review in Marathi)मिळवण्यासाठी आमच्या लेखकमित्र या वेबसाईटला भेट देत रहा आणि आमच्या what’s app ग्रुप मध्येदेखील लगेच जॉईन व्हा.
राघवेंद्र वंजारी, सोलापूर.
पुस्तकाचे शीर्षक – पक्षीगान… का? केव्हा? कोठे? सायन्स ऑफ बर्ड साऊंड.
लेखक – शरद आपटे
प्रकाशक – बर्डसाँग, सांगली.
पृष्ठे – १५०
मूल्य – ₹ ४००
फार उत्तम परिक्षण. आभार