3. ब्रह्मचारिणी
” या देवी सर्वभूतेषु माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता। नमस्तयै नमस्तयै नमस्तयै नमो नमः।। “
नवरात्री हा सण देवीच्या नऊ शक्तीच्या पूजनाचा सण आहे. देवी शक्तीचे हे प्रत्येक रूप एक नवी ऊर्जा देते. नवरात्री सणाला लवकरच सुरुवात होणार आहे. या नऊ दिवसात सर्वजण देवीच्या भक्तीमय वातावरणात रमुण जातील. आणि देवीच्या कृपेने जीवन सफल करतील.
आज मी तुम्हाला देवी ब्रह्मचारिणी बद्दल माहिती सांगणार आहे.
ब्रमह्मचारिणी देवीची पूजा-अर्चना नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते. ‘ब्रम्ह’ याचा अर्थ ‘तपस्या’ होतो आणि ‘चरणी’ याचा अर्थ ‘आचरण करणारी’. म्हणजेच ब्रह्मचारिणी याचा अर्थ ‘तपाचे आचरण करणारी’ असा होतो. देवीने उजव्या हातात जपमाला डाव्या हातात कमंण्डलु आणि डोक्यावर स्वर्ण मुकूट धारण केले आहे.
देवीचा श्लोक
” दधाना कर पदम्याभ्या क्षमाला – कमंण्डलु। देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा ।। “
याचा अर्थ जिने हातात माळ आणि कमंण्डलु धारण केलेले आहे जिच्यापेक्षा कोणीच उत्तम नाही अशी ‘हे ! देवी माझ्यावर तुझा कृपा प्रसाद राहू दे’
असा होतो.
या दिवशी साधक कुंडलिनी शक्तीला जागृत करण्यासाठी तिची पूजा करतात. आपल जीवन सफल होण्यासाठी आणि जीवनात अचानक उद्भवलेल्या संकटांना यशस्वीरित्या पार करण्यासाठी साधक देवीची पूजा करतात. कारण ब्रह्मचारिणी देवी हि तिच्या कठीण तप करण्याच्या गुणामुळे असीम धैर्याचे प्रतीक आहे. तिची पूजा केल्याने आपल्यालाही या धैर्याची प्राप्ती होते.
दुर्गेचे हे दुसरे रूप भक्तांना अनंत फळ देणारे आहे. माणसात या देवीच्या उपासनेमुळे तप, त्याग, वैराग्य, सदाचार, संयम यांची वृद्धी होते. जीवनाच्या कठीण संकटांमध्ये त्या व्यक्तीचे मन कर्तव्य पथापासून विचलित होत नाही. त्यामुळे त्याला सर्वत्र सिद्धी मिळते आणि त्याला विजय प्राप्त होते.
आता आपण देवीची कथा ऐकू या.
ब्रह्मचारिणी देवीने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला. त्यावेळी नारदमुनीने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती.
या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात. १००० वर्षापर्यंत तिने फळ खाऊन तपश्चर्या केली. उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला. या तपश्चर्येनंतर ३००० वर्षांपर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले.
यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला ‘अपर्णा’ हे एक नाव पडले. अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले. तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला. सर्व देवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले.
शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले. की ‘हे देवी ! आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही. तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील. आता तू तपस्या सोडून घरी जा. लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील.’ असा वर त्यांनी दिला.
आता आपण ब्रह्मचारिणी देवीला कोणते फुल आणि प्रसाद अर्पण करावा ते पाहू या.
देवी ब्रह्मचारिणीला पिवळ्या रंगाचे फळ आणि फुल आवडते. कमळाचे आणि जास्वंदाचे फुलही देवीला आवडते. म्हणून तेही देवीला वाहिल्या जाते. तूप, दही, दूध, सुकामेवा, साखर, सहद आणि तुळशीचे पत्ते यापासून देवीसाठी पंचामृत बनवले जाते आणि ते देवीला प्रसाद म्हणून अर्पण केले जाते. देवीला गोड पदार्थ, दुधापासून बनलेले पदार्थ किंवा साखर यांचाच भोग चढविला जातो.
नवरात्री च्या दुसऱ्या दिवशी दुर्गेच्या या रूपाला सर्वांनी मनोभावे पूजावे ज्यामुळे तुमचेही मन एकचित्त होण्यास मदत होईल. आणि जीवनातील संकटातही तुम्ही तुमच्या कर्तव्य पथावर टिकून राहू शकाल आणि योग्य त्या यशाला प्राप्त कराल.
तेव्हा तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की आम्हाला कळवा. उद्याच्या भागात चन्द्रघंटा देवी विषयी माहिती मिळणार आहे,वाचायला विसरू नका. अशाच माहितीसाठी आमच्या सोबत राहा.
धन्यवाद !
लेखिका – प्रतिक्षा गाडे (प्रतु)
Very nice
ब्रह्मचारिणी देवी बद्दल खूप छान माहिती मिळाली
लेख माहितीपूर्ण आहे. मांडणी छान. व्यक्तीश: मला प्रत्येक शब्द शुद्ध असावा असं वाटतं… काही शब्दाची रूपे जरा खटकतात..उदा. वाहिल्या. दुसरं सहद शब्द मराठी नाही.
Khup Chan 👍