करा ब्रह्म मुहूर्ताचे पालन आयुष्याचे होईल नंदनवन 

WhatsApp Group Join Now

करा ब्रह्म मुहूर्ताचे पालन आयुष्याचे होईल नंदनवन 

।।मुहूर्ते बुध्येत् धर्माथर चानु चिंतयेत। कायक्लेशांश्च तन्मूलान्वेदत वार्थमेव च। ।

    भारतीय संस्कृतीत आपण मुहूर्तांना फार महत्त्व देतो. आपण जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात रहात असलो तरी कोणतेही काम करण्याची सुरुवात असो किंवा एखादी वस्तू खरेदी करायची असल्यास अगदी घरात शुभकार्य करायचे असेल तरीही आपण सर्वप्रथम मुहूर्त बघूनच मग त्या कामाला सुरुवात करतो हे अगदी लहानपणापासून आजी, आई, काकू या घरातल्या ज्येष्ठ व्यक्ती पूर्वीपासूनच या प्रथा पाळत आलेल्या आहेत, अगदी आजही आपण कितीही म्हणलो की आम्ही खूप शिकलेलो आहोत, आम्ही खूप प्रगती केलेली आहे. तरीसुद्धा अगदी आजही या आणि अशा गोष्टी चे पालन आपणही करतो, हे आपण सगळ्यांनी आपल्या घरात पाहिले असेल.

 मुहुर्त :

  पूर्वीपासून अशी धारणा  आहे की योग्य मुहूर्तावर जर आपण एखादं काम केलं तर ते काम यशस्वीरित्या पूर्ण होतच. आणि हे मुहूर्त काही विशिष्ट दिवशीच असतात असे नाही तर, अगदी दररोज दिवसभरात 24 तासांमध्ये एकूण 30 मुहूर्त असतात. त्यापैकी प्रत्येक मुहूर्त हा 48 मिनिटांचा असतो आणि एखादी वेळ चांगली आहे का हे आपण पंचांगावरून पाहत असतो. अगदी याचा एक छोटास उदाहरण पाहिलं तर एकाच दिवशी जन्म झालेल्या दोन बाळांची जन्मपत्रिका ही वेगवेगळी पाहायला मिळते ती या मुहूर्तांमुळेच कारण जन्म जरी एकाच दिवशी झालेला असेल, तरीसुद्धा त्यांचा कालावधी वेग वेगळा असतो. अगदी आजही बाळाचा जन्म झाल्याबरोबर घरातील प्रमुख स्त्री ही पहिल्यांदा बाळाच्या जन्म झालेला वेळ हे या बाळासाठी कशाप्रकारे योग्य आहे हे पंचांगात पाहायला जाण्यासाठी तिची धावपळ उडालेली असते. आता या दिवसभरातील तीस मुहूर्तांपैकी रात्रीच्या चार प्रहरांमध्ये सगळ्यात शेवटचा प्रहर म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वीचा प्रहर यालाच आपण ब्रह्म मुहूर्त म्हणतो. आणि हाच सर्वात महत्त्वाचा मुहूर्त मानला जात. 

मुहूर्ताचे महत्त्व व अर्थ

पण नेमकं याचं अनन्य साधारण महत्त्व आपल्या आयुष्यात काय आहे? याची माहिती आपण थोडक्यात पाहूया. आपण पाहू की ब्रह्म मुहूर्त म्हणजे नेमकं काय?  आता ब्रह्म म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश या तीन शिवशक्तींचा एकत्रित वास म्हणजे आपण ब्रह्म म्हणून समजतो, या सृष्टीचा निर्माता कोण?  हा जर आपल्याला सहज कोणी प्रश्न केला तर आपल्या डोळ्यासमोर एक साधारण गोष्ट येते की ब्रह्मदेव यांनीच आपली पृथ्वी निर्माण केलेली आहे. या सृष्टीचा निर्माता कोण असेल तर तो ब्रह्मदेव आहे. ही गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत म्हणजे ब्रम्ह म्हणजे कोणी अनन्यसाधारण शक्ती  नाही हे आपल्याला माहितीच आहे. मग “ब्रह्म मुहूर्त म्हणजे माणसाची आंतरिक शक्ती जागृत करणारं व माणसाला सकारात्मक राहन्यासाठी उत्स्फूर्त वेळ म्हणजे ब्रह्म मुहूर्त होय”. आता याची वेळ नेमकी काय आहे? तर सकाळी सूर्योदयापूर्वी 96 मिनिटे अगोदर चा जो कालावधी आहे, त्याला सर्वसाधारणपणे ब्रह्म मुहूर्त असं समजलं जातं. पण जर आपण सूर्योदयाचा रोजचा कालावधी बघितला तर तो प्रत्येक स्थानावर वेगवेगळ्या आहे, त्यामुळे साधारणतः पहाटे 4 वाजून 24 मिनिटे ते 5 वाजून 12 मिनिटांची ही वेळ ब्रह्म मुहूर्त म्हणून समजली जाते.

 माणसांच्या आयुष्यातील महत्त्व:

 आपण ब्रह्म मुहूर्त म्हणजे काय, आणि त्याचा नेमकी वेळ कोणती, याची माहिती घेतली पण याबरोबरच या वेळेचे फायदे ही आपण विचारात घेऊ. आपण आपल्या आजूबाजूला बरेचसे लोक पाहतो की जे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप यशस्वी झालेले असतात, एक व्यक्ती म्हणून समाजात त्यांचं वेगळं स्थान असतं. एक आदर्श व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो, तसं पाहायला गेलं तर त्यांच्याकडेही आपल्या एवढेच 24 तास असतात पण ते काहीतरी असं काही खास करतात की त्यामुळे ते स्वतःच्या व्यवसायात किंवा त्यांच्या स्वतःच्या कामांमध्ये एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचतात. तर याचं गुपित म्हणजे त्यांच्या दिवसाची सुरुवातच ते करतात ते या ब्रह्म मुहूर्ता पासून. यावेळेत उठल्यामुळे, महत्त्वाची कामे सकाळी शांत पूर्ण वातावरणात अगदी कमी वेळेत आणि पूर्णपणे लक्ष केंद्रित करून करता येते. विशेष म्हणजे दिवसभरात 60,000 पेक्षाही जास्त विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात याची माहिती आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून मिळालेलीच आहे. पण पहाटेच्या या वेळेस अगदी कमी प्रमाणात किंवा कोणतेही बाकीचे विचार डोक्यात येत नाही असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळेच आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकणं आणखी सोपं जातं. असे म्हटले जातं की या वेळेत पृथ्वीवरती दैवी शक्तीचा वास असतो आणि ज्या काही चांगल्या घटना घडतात किंवा वातावरणाला सकारात्मक रूप प्राप्त होतं ते याच कालावधीत. जर आपण निसर्गाचं अगदी बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की, जी फुलं आणि फळ उमलण्याचा जो काळ आहे तो ही या ब्रह्म मुहूर्ताचा कालावधीतच. फुलं उमलतात आणि त्यांच्या सुगंधाने वातावरणामध्ये एक अल्हाददायक सकारात्मक प्रभाव पसरत असतो, त्यामुळे ईश्वरीय शक्तीचा वास या वातावरणात जाणवतो. नवीन काहीतरी करण्याचं व योग्य निर्णय घेण्याचं सामर्थ्य या अल्हाददायक वातावरणातून सहज प्राप्त होतं. शांत डोक्याने विचार करणं व एखाद्या संकटातून अगदी सहज योग्य मार्ग काढून बाहेर पडणे हेही शक्य होतं. 

वैज्ञानिक दृष्टिकोन :

जर वैज्ञानिक दृष्ट्या पाहायला गेलं तर सकाळच्या वातावरणा मध्ये वाहनांची रेलचेल, माणसांची ये-जा अगदी कमी प्रमाणात असल्यामुळे वातावरण शांत तर असंतच, त्याबरोबर प्रदूषणही कमी होतं. त्या कारणाने अगदी मोकळा श्वास घेण्यासाठी शुद्ध ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळतं. झाडांना जी नवीन पालवी फुटलेली असते जी नुकतीच, उमललेली फुलं असतात त्यांचा सुगंधाने मन प्रसन्न होतं अगदी सकारात्मक विचार डोक्यामध्ये येतात, नवीन उमेद आणि नवीन ऊर्जेने आपण आपल्या कामाला लागण्याचे बळ मिळते. त्यामुळेच कितीही मोठ्यातलं मोठं काम कठीण काम असू देत ते सहजरीत्या अगदी उत्साहने पार पाडतो. 

आता ही वेळ योग्य कोणासाठी आहे? तर या वेळेमध्ये जे विद्यार्थी दशेत आहेत, एखाद्या परीक्षेची तयारी करत आहेत किंवा नवीन उद्योग चालू करायचा आहे, त्याच्यासाठी नवनवीन कल्पना सुचवायच्या आहेत, एखाद्या क्षेत्रामध्ये आपलं पाऊल घट्ट रुजवण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी ही वेळ अगदी योग्य आहे. आज बहुतेक नागरिक सकाळी फिरायला जातात त्यामुळे आरोग्य संतुलित राहण्यासाठी ही मदत होतेच, तसेच चेहऱ्यावर एक वेगळंच तेजही निर्माण होतं. 

आता याचे एवढे फायदे असतील तर स्वाभाविकच आहे, आपण सगळ्यांनी या मुहूर्ताचा आपल्या आयुष्यात योग्य फायदा करून घेणं गरजेचं आहे,पण हे केव्हा शक्य होईल? जर आपण सकाळी पहाटे या वेळेला उठलो तर, ह्या गोष्टी आपल्यालाही सहज शक्य होतील, यासाठीच पूर्वी आजी आजोबा म्हणायचे ‘लवकर निजे तो लवकर उठे’. आणि खरच ही गोष्ट जाणवते की, पूर्वीचे मोठी माणसं जे सांगत होते ते खरंच आहे, कारण आज जर आपण पाहायला गेलो तर आपल्यापेक्षा आपले आजी आजोबा आजही कितीतरी कणखर आणि तब्येतीने अगदी ताजे तवाने, उत्साही आहेत त्यांच उत्साहाचं गुपितही पहाटे लवकर उठण्यामध्येच आहे. खरंच कळत नकळत या वेळेचा किती महत्त्वाचं स्थान आहे आपल्या आयुष्यात.

   हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी वेदांमध्ये या सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेतच. चला तर मग इथून पुढे आपणही सगळेजण या ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेचं पालन करूया.

तुम्हाला जर माझा लेख आवडला असेल तर जरूर कळवा धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top