महाराष्ट्रातील चैत्रगौरीचा उत्सव
महाराष्ट्रात चैत्र शुद्ध तृतीयेपासून वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत, असा महिनाभर चैत्रगौरीचा सोहळा साजरा केला जातो. चैत्र शुद्ध तृतीयेला चैत्रगौरीची स्थापना केली जाते. या सोहोळ्यात देवघरातील अन्नपुर्णेला चैत्रगौरीच्या रूपात पूजले जाते. ही पूजा म्हणजे शिवपत्नी पार्वतीची ‘गौरी’रुपात केलेली पूजा होय. या महिन्यात ही गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना केली जाते. या महिन्यात वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टी नवचैतन्याने फुललेली असते. अनेकरंगी फुले, फळे यांनी झाडे, वेली बहरलेल्या असतात. ही माहेरवाशीण मग आपल्या सख्यांबरोबर मनसोक्त खेळते, नटते, सजते, वनात जाऊन वसंत ऋतूचा आनंद लुटण्यासाठी झोपाळ्यावर झुलते. अनेक भारतीय सणांमध्ये स्त्रीशक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. हा सणही त्यातीलच एक आहे. पण या सणाचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे अन्नपूर्णेचा उत्सव आहे. आणि घरोघरीच्या अन्नपूर्णा म्हणजे गृहिणी तो श्रद्धेने साजरा करतात.
महाराष्ट्रातील चैत्रगौरीच्या उत्सवाचे स्वरुप:
‘चैत्र’ हा मराठी वर्षाचा पहिलाच महिना. या महिन्याच्या शुद्ध तृतीयेपासून महाराष्ट्रात घरोघरी चैत्रगौरीचा सोहळा पारंपारिक स्वरुपात साजरा करण्यास सुरुवात होते. या दिवसाला ‘गौरीची तीज’ असेही म्हणतात. बहुतांश घरांमध्ये पारंपरिक पितळेचा अथवा लाकडी पाळणा घासून पुसून स्वच्छ करतात. त्या पाळण्यात गौरीला आसन म्हणून वस्त्र अंथरून त्यावर देवघरातील अन्नपुर्णेच्या मूर्तीची गौरीरुपात स्थापना करतात. काही घरांमध्ये झोपाळ्यावर बसलेल्या कुळातील पारंपरिक चैत्रगौरीची स्थापना व पूजा केली जाते. झोपाळ्यावर किंवा पाळण्यात या गौरीची स्थापना केली जाते म्हणून या गौरीला डोलगौरी असेही म्हणतात. त्या वेळी गौरीची पंचोपचारे पूजा करुन तिला भरजरी वस्त्रे नेसवली जातात. अलंकार घातले जातात. गौरीला साखरेच्या गाठीची माळ सुद्धा घालण्याची पद्धत आहे. चैत्र महिना म्हणजे मोगरा, चाफा, जाई, जुई, चमेली इत्यादी फुलांना बहर येण्याचा महिना. म्हणून गौरीला ही सुंगधी फुले अर्पण केली जातात. तिच्यापुढे पारंपारिक, सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. पूर्वीच्या काळी सासरी गेलेल्या लेकीबाळी या महिन्यात माहेरपणाला येत.
महिनाभरात कोणत्याही एका दिवशी सवाष्ण जेवू घालतात. या दिवशी चैत्रगौरीपुढे पाना-फुलांची शोभिवंत आरास मांडतात. विविध झाडांच्या डहाळ्या, हिरवी पाने, फुले इत्यादींचा वापर करून गौरीभोवती सुंदर चैत्रबन तयार केले जाते. उन्हाळ्याला सुरुवात झालेली असते. बाजारात कैऱ्या येण्यास सुरुवात झालेली असते. अशा वेळी गौरीला कैरीचे पन्हे, कैरी घालून केलेली डाळ, भिजवलेले चणे(हरभरे) यांचा नैवेद्य दाखवतात. ‘ऋतुकालोद्भव’ फळे, म्हणजे कलिंगड, टरबूज, द्राक्षे इत्यादींचा नैवेद्य गौरीला अर्पण केला जातो. गौरीपुढे वाळा घातलेले थंड पाणी भरून चांदीचे तांब्या-भांडे भरून ठेवतात. माहेरी आलेल्या गौरीचे लाड पुरवण्यासाठी घरात लाडू, चकली, करंजी, शेव असे विविध पारंपरिक पदार्थ करतात. गौरीपुढे करण्यात आलेल्या आराशीमध्ये हे खाद्यपदार्थ सुद्धा आवर्जून ठेवले जातात. या दिवशी संध्याकाळी आजूबाजूच्या स्त्रियांना, कुमारिकांना हळदीकुंकवासाठी बोलावतात. त्यांना अत्तर लावून गुलाबपाणी शिंपडतात. आलेल्या स्त्रियांना, मुलींना हळद-कुंकू, खिरापत, कैरीची डाळ, केशरयुक्त पन्हे देऊन त्यांची भिजवलेल्या हरभऱ्यांनी ओटी भरली जाते. त्यांना सुगंधित फुले दिली जातात.
या महिन्यात घरासमोरील अंगणात मांगल्याचे प्रतीक असलेली वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी काढली जाते. तिला चैत्रांगण म्हणतात. चैत्रांगणामध्ये चैत्रगौरीचा पाळणा, गणपती, समई, यांची चित्रे काढली जातात. तसेच शंख, चक्र, गदा, पद्म, सूर्य, चंद्र, गोपद्म, त्रिशूल, स्वस्तिक, नाग,कासव,गरुड, राधाकृष्ण, पाळण्यातील गौरी, तुळशी वृंदावन, आंबा, वड यासारखे वृक्ष इत्यादी विविध शुभचिन्हांचा या रांगोळीत समावेश असतो.
महाराष्ट्रातील विविध ठिकाणचा चैत्रगौरी उत्सव:
कोल्हापुरातील अंबाबाईच्या मंदिरात चैत्रगौरीचा सोहळा मोठ्या उत्साहात व थाटात साजरा केला जातो. मंदिरातील गरुड मंडपात अंबाबाईची उत्सवमूर्ती फुलांनी सजवलेल्या झुल्यावर बसवतात. तिला कैरीची डाळ, पन्हे, कलिंगड, टरबूज इत्यादींचा नैवेद्य अर्पण केला जातो.
कोकणांत चित्रगौरीचे स्वागत करण्यासाठी सुंदर उपमा असलेले ‘गौरीचे माहेर’ हे पारंपरिक गीत म्हटले जाते. सृष्टीदेवता असलेल्या अन्नपूर्णेचे वर्णन करण्यासाठी अत्यंत सुंदर उपमा या गीतात वापरल्या गेल्या आहेत. तसेच तिथे घरी आलेल्या स्त्रिया व कुमारिका यांचे पाय धुवून त्यांच्या हातावर चंदनाचा लेप लावून त्यावरून शिंपल्याचा शिरांचा वरचा भाग फिरवण्याची प्रथा आहे.
महिनाभर माहेरपण उपभोगून अक्षयतृतीयेला म्हणजे वैशाख शुद्ध तृतीयेला गौर पुन्हा सासरी जाण्यास निघते. या दिवशी भगवान शंकर तिला नेण्यासाठी येतात अशी समजूत आहे. त्या दिवशी गौरीची पूजा करुन तिला खीर-कानोला, दहीभात, आंब्याचा रस असा नैवेद्य दाखवला जातो.
भारतात इतरत्र हा उत्सव कसा साजरा केला जातो?
भारतातील इतर काही राज्यांमध्ये सुद्धा हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करतात.
कर्नाटक: कर्नाटक राज महाराष्ट्राप्रमाणेच चैत्रगौरीचे पूजन केले जाते. स्त्रियांची भिजवलेल्या हरभऱ्यांनी ओटी भरली जाते.
राजस्थान: राजस्थानात होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून चैत्र महिना सुरू होतो. या महिन्यात स्त्रिया ‘गणगौरीचे’ व्रत मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने करतात. येथे ‘गण’ म्हणजे ‘शिव’ आणि ‘गौरी’म्हणजे ‘पार्वती’ यांचे एकत्रित पूजन केले जाते.
आंध्रप्रदेश, तेलंगणा : आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यात सौभाग्यगौरी किंवा वसंतगौरी म्हणून या गौरीचे पूजन करतात.
देशाच्या अनेक भागात दुर्गमतेचा चैत्र नवरात्रीचा उत्सवही साजरा केला जातो. हा उत्सव गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत असा नऊ दिवसांचा असतो. या नऊ दिवसात देवीच्या विविध नऊ रुपांची पूजा केली जाते.
चैत्रगौरी उत्सवामागील वैचारिक दृष्टिकोन:
भारतातील सर्व सण समारंभ सृष्टीशी, निसर्गाशी संबंधित आहेत. स्त्रीच्या मातृरूपाचे पूजन अनेक सणांत केले जाते. बदलत्या ऋतुमानाला अनुसरून आपल्या आहार-विहारात बदल केला पाहिजे या विचारांचे प्रतिबिंब भारतातील सर्वच सणांमध्ये पडलेले दिसून येते. चैत्रगौरीचा सणही त्याला अपवाद नाही. हा सण साजरा करण्याच्या पद्धतीचा या दृष्टिकोनातून विचार केला तर या सणामागील वैचारिक दृष्टिकोन स्पष्ट होतो. उन्हाळ्याची चाहूल लागत असताना कैरीची डाळ, पन्हे, कलिंगड, टरबूज, द्राक्षे यांचा नैवेद्यातील समावेश याचे प्रतीक आहे. मोगऱ्याचा सुगंध, वाळ्याचे थंड पाणी उन्हाळ्यातील रुक्ष वातावरण सुगंधित आणि आल्हाददायक करतो. चंदनाचा लेप हाताला लावण्यामागे ‘येणाऱ्या उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्याचे’ कारण असावे. चैत्र महिना म्हणजे वसंत ऋतूचा महिना. ‘ऋतूनां कुसुमाकरः’ असे ज्या ऋतूचे भगवद्गीतेत वर्णन केले आहे तो हा ऋतू! या ऋतूत झाडे, वेली फुला-फळांनी बहरतात. झाडांना नवीन कोवळी पालवी फुटते.(तिला चैत्रपालवी असेही म्हणतात.) या महिन्याभरात जणू काही सर्व सृष्टीच कौमार्यावस्थेतून तारुण्यात प्रवेश करत असते. त्यामुळे चैत्रगौरीचा सण हा सृष्टीचे हे स्थित्यंतर साजरे करण्याचा उत्सव आहे.
पूर्वीच्या काळी स्त्रिया घरी असत. हळदी कुंकवाच्या निमित्ताने त्यांना नटूनथटून घराबाहेर पडत येत असे. अशा समारंभांमुळे त्यांना घरकामातून थोडा विरंगुळा मिळत असे. रांगोळ्या काढणे, सजावट करणे या निमित्ताने त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळत असे. सासरी गेलेल्या लेकी या सणाला माहेरी येत. मग त्यांचेही कोडकौतुक गौरींबरोबर होत असे.
घरातील वातावरण मंगलमय करण्यात सणांचा मोठा हातभार असतोच. सण साजरे करण्याच्या निमित्ताने समाजातील विविध घटक एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे सामाजिक एकोपा वाढतो. माणसाची ताणतणावातून मुक्तता होते. आधुनिक भाषेत बोलायचे तर असे सण ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’साठी फार उपयुक्त आहेत, स्त्रियांचे तसेच घरातील सर्वांसाठी ‘स्ट्रेस बर्स्टर्स’ आहेत!!
तुम्हाला महाराष्ट्रातील चैत्रगौरीच्या उत्सवासंबंधीची ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा.
धन्यवाद !
क्षितीजा कापरे
माहितीने परिपूर्ण असा लेख
माहिती छान च आहे
खूप छान…. आईच्या चैत्र गौरी ची आठवण आली… आणि सांबारे मामींची..
संगमनेरला कितीतरी घरात साज-या होणा-या चैत्र गौरीची…किती हौसेने करत असत. सुखद आठवणी आहेत…
छान माहिती