‘ऑगस्ट’ महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

WhatsApp Group Join Now

ऑगस्ट’ महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

‘ऑगस्ट ’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या नेतृत्वगुण असलेल्या, विचारी, प्रभावी संवादकौशल्य जपणाऱ्या असल्याचे मानले जाते. चालू ‘ऑगस्ट’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.

डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया : २७-०८-१९०८) – क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट महान फलंदाज म्हणून ‘ब्रॅडमन’ यांचे नाव घेतले जाते. फलंदाजीतील आपल्या अचाट कामगिरीने ते नावाप्रमाणे फलंदाजांचे ‘डॉन’ बनले. त्यांनी अवघ्या ५२ कसोटीत ८० डावांत ९९.९४ च्या सरासरीने २९ शतकांच्या सहाय्याने ६,९९६ धावा केल्या. शेवटच्या डावात फक्त ४ धावा केल्या असत्या तरी त्यांनी ७,००० धावा आणि १०० ची सरासरी पार केली असती. पण असे म्हणतात की शेवटच्या डावात फलंदाजीला आल्यावर प्रेक्षकांनी दिलेल्या अभूतपूर्व मानवंदनेने व लाडक्या खेळाच्या वियोगाने त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यामुळे त्यांना गोलंदाजाचा चेंडू दिसला नाही आणि ते शून्यावर त्रिफळाचीत झाले.

एरवी त्यांना बाद कसे करावे हेच गोलंदाजांना कळत नसे आणि एका मालिकेत त्यांना बाद करण्यासाठी इंग्लंडने शरीरवेधी (बॉडीलाईन) गोलंदाजीच्या अखिलाडू रणनीतीचा वापर केला. पण ‘सर’ डॉन त्यालादेखील पुरून उरले. डॉन कप्तान म्हणून देखील अतिशय यशस्वी ठरले आणि त्यांचा संघ अजिंक्य मानला जाई. तांत्रिकदृष्ट्या त्यांचे काही विक्रम पुढे मोडले गेले पण त्यांची सर कोणाला आली नाही. त्यांचे अबाधित असलेले काही विक्रम याप्रमाणे – १] फलंदाजीची कारकीर्दीतील सर्वोच्च सरासरी = ९९.९४ २] सर्वात जलद ६,००० धावा = (६८ डाव) ३] सलग ६ कसोटींमध्ये शतके ४] कप्तानाने एका मालिकेत केलेल्या सर्वोच्च धावा = ८१०.                      

दिलीप सरदेसाई (०८-०८-१९४०) – कर्माने मुंबईकर असले तरी जन्म ‘मडगाव’चा असल्याने भारतासाठी खेळणारे ‘सरदेसाई’ हे पहिले “गोवेकर” क्रिकेटपटू होते. सलामी बरोबरच मधल्या फळीत खेळणाऱ्या सरदेसाईंनी ३० कसोटीत ५ शतकांसह २,००१ धावा केल्या. १९७१ मध्ये भारताच्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमधील पहिल्या मालिका विजयांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. १९६१ ते १९७३ दरम्यान ते मुंबईसाठी रणजी करंडक खेळले, ज्यात १० वेळा संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि कधीही हरला नाही.     

संदीप पाटील (१८-०८-१९५६) – स्थानिक क्रिकेटमध्ये उंच आणि लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘संदीप’ यांनी, ८० च्या दशकात भारतासाठी खेळताना देखील आक्रमक फलंदाजीचा नजराणा पेश केला. पण त्यांच्या आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असल्याने त्यांची कारकीर्द फार लांबू शकली नाही. ऑस्ट्रेलियात लिली, हॉग, पास्को सारख्या गोलंदाजांसमोर केलेल्या १७४ धावा आणि वेगवान गोलंदाज विलीसला एकाच षटकात मारलेले ६ चौकार रसिकांच्या कायम स्मरणात राहतील. ८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे ते प्रमुख सदस्य होते. त्यांनी २९ कसोटीत १,५८८ तर ४५ वन-डे मध्ये १,००५ धावा केल्या. २००३ च्या विश्वचषकात केनियाचे प्रशिक्षक असताना आपल्या दुबळ्या संघाला उपांत्य फेरीत नेण्याची किमया त्यांनी करून दाखवली.         

प्रवीण आमरे (१४-०८-१९६८) – मूळ मुंबईकर असणाऱ्या ‘प्रवीण’ला मुंबई संघातील गुणवान व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या गर्दीमुळे संधी मिळवण्यासाठी ‘रेल्वे’ संघाकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळावे लागले. तेथे अनेक वर्षे खोऱ्याने धावा जमवल्यावर त्याची भारतीय संघात वर्णी लागली. पहिल्याच वन-डे मध्ये अर्धशतक आणि पहिल्याच कसोटीत शतक ठोकण्याचा पराक्रम प्रवीणने केला. अतिशय मेहनती खेळाडू असणाऱ्या प्रविणला दुर्दैवाने भारतीय संघातील इतर अनेक नामवंत फलंदाजांच्या उपस्थितीमुळे फार संधी मिळू शकली नाही. त्याने ११ कसोटी आणि ३७ वन-डे मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले.      

जवागल श्रीनाथ (३१-०८-१९६९) – भारताकडून खेळलेला सर्वात वेगवान गोलंदाज असे सुरुवातीच्या श्रीनाथबद्दल म्हणता येईल. भारतीय गोलंदाजाच्या निव्वळ वेगामुळे परदेशी फलंदाजांची भंबेरी उडतेय असे दुर्मिळ चित्र श्रीनाथमुळे पहायला मिळाले. कर्नाटकचा हुशार इंजिनियर श्रीनाथ आक्रमक गोलंदाज असला तरी त्याच्या स्वभावात कधी आक्रमकता नसे. त्याने ६७ कसोटीत २३६ बळी मिळवले ज्यात एक वेळा सामन्यात १० बळी आणि दहा वेळा सामन्यात ५ बळी मिळवले. तसेच ४ विश्वचषकांसह २२९ वन-डे खेळताना ३१५ बळी घेतले.    

फ्रँक वॉरेल (वेस्ट इंडिज : ०१-०८-१९२४) – ‘सर फ्रँक’ हे जणू वेस्ट इंडियन क्रिकेटचे राजदूत होते. उजव्या हाताचे फलंदाज आणि डावखुरे मंदगती गोलंदाज असणाऱ्या फ्रँकनी ५१ कसोटीत ५० च्या सरासरीने ३,८६० धावा केल्या आणि ६९ बळी घेतले. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कर्णधार म्हणून वेस्ट इंडिजमधील विविध बेटांमधील खेळाडूंची एकजिनसी मोट बांधली आणि संघाला यशाचा मार्ग दाखवला. ते विंडीजचे पहिले कृष्णवर्णीय कप्तान होते. खुशमिजाज वृत्तीचे वॉरेल अतिशय सहृदयी देखील होते. १९६२ मध्ये नरी कॉन्ट्रॅक्टर जेव्हा जायबंदी झाले तेव्हा रक्तदान करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. ल्युकेमियाने उमद्या फ्रँकचे ४२ व्या वर्षी अकाली निधन झाले. त्यानंतर वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला ‘फ्रँक वॉरेल करंडक’ असे संबोधले जाते. भारताशी त्यांचे विशेष स्नेहबंध होते आणि ‘अराउंड द वर्ल्ड’ या बॉलिवूड चित्रपटात त्यांनी ‘विशेष पाहुणा’ म्हणून कामही केले.              

क्लाईव्ह लॉईड (वेस्ट इंडिज : ३१-०८-१९४४) – अतिशय उंच, पोक असणारा, चष्मिस ‘लॉईड’ चेंडूवर हातोड्याप्रमाणे घाव घाली. मधल्या फळीतील डावखुऱ्या फलंदाज लॉईडने १९ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ११० कसोटींमध्ये ४७ च्या सरासरीने ७,५१५ धावा ठोकल्या. तसेच ८७ वन-डेत १,९७७ धावा केल्या. पण त्याचे खरे यश म्हणजे त्याच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने सुवर्णकाळ बघितला. त्याने ७४ कसोटीत नेतृत्व केले त्यातील ३६ मध्ये विजय मिळवला, तर ८४ वन-डेपैकी ६४ मध्ये जय संपादन केला. एकाहून एक सरस फलंदाज आणि अति-वेगवान गोलंदाजांची तोफ यांच्या सहाय्याने विंडीजने १९७५-८५ या दशकात क्रिकेट जगतावर राज्य केले. सलग ११ कसोटी जिंकण्याचा व २६ कसोटी अपराजित राहण्याचा पराक्रम त्याच्या संघाने केला. त्याच्याच नेतृत्वाखाली विंडीजने १९७५ व १९७९ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला तर १९८३ च्या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले.           

ग्रेग चॅपेल (ऑस्ट्रेलिया : ०७-०८-१९४८) – १९७० ते १९८५ या काळात गावसकर व रिचर्डस यांच्या बरोबरीने महान फलंदाज म्हणून ‘ग्रेग’ गणला जाई. आकर्षक व आक्रमक फलंदाज ग्रेगने ८७ कसोटीत ५४ च्या सरासरीने ७,११० केल्या. तसेच ७४ वन-डेमध्ये २,३३१ धावा काढल्या. यशस्वी कप्तान असणारा ग्रेग उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील होता, ज्याने कसोटीत १२२ झेल टिपले. आपल्या पहिल्या आणि अखेरच्याही कसोटीत त्याने शतक झळकावले. मात्र तो भारताचा प्रशिक्षक असताना गांगुली व इतर ज्येष्ठ खेळाडूंबरोबर झालेल्या कडवट मतभेदांमुळे तो भारतात प्रचंड वादग्रस्त व अप्रिय ठरला.

रमिझ राजा (पाकिस्तान : १४-०८-१९६२) – अतिशय गुणवान फलंदाज म्हणून ८० च्या दशकाच्या सुरुवातीला उदयाला आलेला रमिझ हवी तशी अपेक्षापूर्ती करू शकला नाही. त्याने ५७ कसोटीत २,८३३ तर १९८ वन-डेमध्ये ५,८४१ धावा केल्या. १९९२ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो भाग होता. काही काळ देशाचे नेतृत्व करण्याची संधी त्याला मिळाली. पाकिस्तानच्या मोजक्या उच्चशिक्षित क्रिकेटपटूंमध्ये त्याची गणना होते. पाकच्या क्रिकेट बोर्डावर प्रभावीपणे काम केल्यानंतर आता समालोचक म्हणून तो ठसा उमटवत आहे.  

शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडिज : १६-०८-१९७४) – भारतीय वंशाचा ‘चंद्रपॉल’ हा मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज खडूस आणि सातत्यपूर्ण होता. एकवीस वर्षांच्या कारकीर्दीमध्ये त्याने तब्बल १६४ कसोटींमध्ये ५१.३७ च्या सरासरीने ११८६७ धावा काढल्या ज्यामध्ये ३० शतके आणि ६६ अर्धशतके आहेत. २६८ एकदिवसीय सामन्यांत त्याने ८,७७८ धावा केल्या. शिवाय २२ टी-२० सामनेही त्याच्या नावावर आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या डावात विश्वविक्रमी ४१८ धावांचा यशस्वी पाठलाग करताना त्याचे १०४ धावांचे मोलाचे योगदान होते. २००३ साली चंद्रपॉलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या ६९ चेंडूत शतक झळकावले. लाराच्या निवृत्तीनंतर दुबळ्या विंडीजच्या फलंदाजीला त्याने स्थैर्य दिले व अनेकदा संघाला आपल्या चिवट, लढाऊ फलंदाजीने सावरले.                 

मोहम्मद युसुफ (पाकिस्तान : २७-०८-१९७४) – पाकिस्तानच्या मोजक्या अल्पसंख्यांक ख्रिस्ती समुदायातील क्रिकेटपटूंपैकी एक म्हणजे ‘यूसुफ योहाना’ किंवा ‘मो. यूसुफ’. मधल्या फळीतील अतिशय शैलिदार फलंदाज यूसुफने २००० च्या दशकात संघासाठी अमूल्य योगदान दिले. त्याने ९० कसोटीत ५२ च्या सरासरीने ७,५३० धावा केल्या तर तब्बल २८८ वन-डे मध्ये ४२ च्या सरासरीने ९,७२० धावा काढल्या. एका कॅलेंडर वर्षामध्ये (२००६) सर्वाधिक १७८८ कसोटी धावा करण्याचा यूसुफचा जागतिक विक्रम अजूनही अबाधित आहे.         

शोइब अख्तर (पाकिस्तान : १३-०८-१९७५) – गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूची गती मोजण्याचे तंत्र आल्यानंतर ‘अख्तर’ हा सर्वात वेगवान गोलंदाज नोंदवला गेला आहे. अख्तरच्या लांबलचक रन-अपसह अति-वेगवान गोलंदाजीमुळे फलंदाजांच्या मनात धडकी भरत असे. मात्र त्याची गोलंदाजीची शैली संशयास्पद होती आणि अनेकदा तो चेंडू ‘फेकतो’ असे म्हटले जाई. ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ नावाने प्रसिद्ध अख्तरने ४६ कसोटीत १७८ तर १६३ वन-डेमध्ये २४७ बळी मिळवले.         

लसीथ मलिंगा (श्रीलंका : २८-०८-१९८३) – रंगवलेल्या आणि स्प्रिंगसारख्या कुरळ्या केसांनी हा वेगवान श्रीलंकन गोलंदाज प्रथमदर्शनी लक्ष वेधून घेई. फिरकी गोलंदाजांची परंपरा असणाऱ्या श्रीलंकेत त्याने अनेक वर्षे वेगवान गोलंदाजीची धुरा वाहिली. त्याची गोलंदाजीची विचित्र अॅक्शन फलंदाजांना बुचकळ्यात टाकी आणि सोबतच गोलंदाजीतील पारंपारिक कौशल्य, अचूकता, विविधता, अफलातून यॉर्कर चेंडू, धीमा चेंडू यांमुळे तो खतरनाक गोलंदाज बनला. गोलंदाजीतील या गुणवैशिष्टयांमुळे त्याने खोऱ्याने बळी मिळवले आणि विशेषत: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये देशाला अनेक विजय मिळवून दिले. एकंदरीत त्याने ३० कसोटीत १०१, २२६ वन-डेत ३३८ तर ८४ टी-२० मध्ये १०७ बळी मिळवले.         

केन विल्यमसन** (न्यूझीलंड : ०८-०८-१९९०) – सध्याच्या घडीचा जगातील चार सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेला ‘केन’, आत्ताचा सर्वात सज्जन, शांत, संयमी खेळाडू म्हणूनही ओळखला जातो. २०१० साली भारताविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक करत त्याने कारकिर्दीला धडाक्यात सुरुवात केली. मध्ये अनेक वर्षे देशाचे तिन्ही प्रकारात यशस्वी नेतृत्व केल्यानंतर आता तो निव्वळ फलंदाजीवर लक्ष केंद्रित करू लागला आहे. मधल्या फळीतील फलंदाज असणाऱ्या केनने आत्तापर्यन्त १०० कसोटीत ५५ च्या सरासरीने ८,७४३ धावा केल्या आहेत. शिवाय १६५ एकदिवसीय सामन्यांत ४८ च्या सरासरीने ६,८१० धावा तर ९३ टी-२० सामन्यांमध्ये २,५७५ धावा केल्या आहेत.  

à ईतर काही प्रमुख खेळाडू ::

[अ] परदेशी खेळाडू —   

बिल वूडफूल (ऑस्ट्रेलिया : २२-०८-१८९७) – दुसऱ्या महायुद्धापूर्वीचा एक महान सलामीचा फलंदाज. ३५ कसोटीत २३०० धावा.

लिंडसे हॅसेट (ऑस्ट्रेलिया : २८-०८-१९१३) – दुसऱ्या महायुद्धामुळे उमेदीची वर्षे वाया गेलेला मधल्या फळीतील महान फलंदाज. ४३ कसोटीत ३०७३ धावा.

गॉडफ्रे इव्हान्स (इंग्लंड : १८-०८-१९२०) – क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकांपैकी एक. यष्टीचीत करण्याच्या कलेमध्ये विशेष प्राविण्य. ९१ कसोटींमध्ये यष्टीमागे २१९ बळी आणि २४३९ धावा. 

ट्रेव्हर गोडार्ड (दक्षिण आफ्रिका : ०१-०८-१९३१) – डावखुरा फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज. ४१ कसोटीत २५१६ धावा आणि १२३ बळी.

एडि बार्लो (दक्षिण आफ्रिका : १२-०८-१९४०) – चष्मिस अष्टपैलू खेळाडू. सलामीचा फलंदाज, वेगवान गोलंदाज आणि उत्कृष्ट स्लिप क्षेत्ररक्षक. ३० कसोटीत २५१६ धावा, ४० बळी आणि ३५ झेल.  

जेफ थॉमसन (ऑस्ट्रेलिया : १६-०८-१९५०) – वेगवान गोलंदाज. ‘लिली’च्या जोडीने १९७५-८५ या दशकात प्रलयंकारी वेगाने फलंदाजांमध्ये दहशत निर्माण केली. ५१ कसोटीत २०० बळी, तर ५० वन-डेत ५५ बळी. 

जॉन एम्बुरी (इंग्लंड : २०-०८-१९५२) – ऑफ स्पिनर आणि उपयुक्त फलंदाज६४ कसोटी (१४७ बळी, १७१३ धावा), ६१ वन-डे (७६ बळी, ५०१ धावा).  

इक्बाल कासिम (पाकिस्तान : ०६-०८-१९५३) – डावखुरा फिरकी गोलंदाज. ५० कसोटीत १७१ बळी.

जॅक रसेल (इंग्लंड : १५-०८-१९६३) – यष्टीरक्षक, डावखुरा फलंदाज. ५४ कसोटी (यष्टीमागे १६५ बळी, १८९७ धावा), ४० वन-डे (यष्टीमागे ४७ बळी, ४२३ धावा).

अॅन्गस फ्रेझर (इंग्लंड : ०८-०८-१९६५) – अचूकतेसाठी प्रसिद्ध मध्यमगती गोलंदाज. ४६ कसोटीत १७७ बळी, ४२ वन-डेत ४७ बळी.   

ग्रॅहॅम थोर्प (इंग्लंड : ०१-०८-१९६९) – मधल्या फळीतील शैलिदार डावखुरा फलंदाज. १९९३ च्या अॅशेस मालिकेत पदार्पणाच्या कसोटीत शतक. एकूण १०० कसोटीत ६७४४ धावा तर ८२ वन-डेमध्ये २३८० धावा. ०४ ऑगस्ट २०२४ ला अकाली निधन.    

मार्क बुचर (इंग्लंड : २३-०८-१९७२) – सलामीचा व मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज. ७१ कसोटी (४२८८ धावा).

सायमन कॅटीच (ऑस्ट्रेलिया : २१-०८-१९७५) – मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज. ५६ कसोटी (४१८८ धावा), ४५ वन-डे (१३२४ धावा).

हॅमिल्टन मासाकाड्झा (झिंबाब्वे : ०९-०८-१९८३) – मधल्या फळीतील फलंदाज. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी कसोटी पदार्पणात शतक. ३८ कसोटी (२२२३ धावा), २०९ वन-डे (५६५८ धावा) , ६६ टी-२० (१६६२ धावा). 

अॅलेक्स केरी** (ऑस्ट्रेलिया : २७-०८-१९९१) – यष्टीरक्षक, डावखुरा फलंदाज. ३२ कसोटी, ७२ वन-डे, ३८ टी-२०.                          

[ब] भारतीय खेळाडू —  

मोहम्मद निस्सार (०१-०८-१९१०) – भारताकडून इंग्लंडविरुद्ध १९३२ सालच्या पहिल्याच कसोटीत खेळलेले वेगवान गोलंदाज. पहिल्याच डावात त्यांनी ५ गडी बाद केले. एकूण ६ कसोटीत २५ बळी घेतले.  

हिरालाल गायकवाड (२९-०८-१९२३) :- नागपूर येथे जन्मलेले ‘हिरालाल’ डावखुरे मंदगती व मध्यमगती गोलंदाज होते. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ३७५ बळी घेतलेल्या हिरालालना १९५२ साली पाकिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीत एकही बळी मिळाला नाही.  

नरेन ताम्हाणे (०४-०८-१९३१) – भारताच्या आजवरच्या सर्वोत्तम यष्टीरक्षकांमध्ये मुंबईकर ‘ताम्हाणे’ यांची गणती होते. त्यांनी २१ कसोटीमध्ये यष्टीमागे ५१ बळी टिपले. निवड समिती सदस्य आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी बराच काळ काम केले.

बाळू गुप्ते (३०-०८-१९३४) :- आपले प्रसिद्ध ज्येष्ठ बंधू ‘सुभाष गुप्ते’ यांच्याप्रमाणे मुंबईकर ‘बाळकृष्ण गुप्ते’ हे देखील लेग स्पिनर होते. ४१७ प्रथमश्रेणी बळी घेतलेल्या बाळूंना ३ कसोटीत अवघे ३ बळी घेता आले.   

व्यंकटेश प्रसाद (४-८-१९६९) :- कर्नाटकचा अतिशय उंच असणारा मध्यमगती गोलंदाज ‘व्यंकटेश’ बळी मिळवण्यासाठी वेगापेक्षा चेंडू स्विंग व कट करण्यावर भर देई. कानडी जोडीदार श्रीनाथबरोबर स्थानिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची चांगली जोडी जमे. त्याने ३३ कसोटीत ९६ तर १६१ एकदिवसीय सामन्यांत १९६ बळी मिळवले.        

 ** खेळाडू म्हणून अजून कारकीर्द चालू )

फलंदाज नाबाद )

( ++ सारी आकडेवारी ३१-०७-२०२४ पर्यंतची )

मित्रहो, ‘ऑगस्ट ’ मध्ये जन्मलेल्या या प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडले असेल. आपल्या काही प्रतिक्रिया, सूचना असतील तर जरूर कळवा तसेच हा लेख आपल्या क्रिकेटप्रेमी मित्रपरिवारासोबत सामायिक करायला विसरू नका. असेच नवनवीन माहितीपूर्ण, मनोरंजक लेख, बातम्या, कथा आम्ही आपल्यापर्यंत आणत असतो. त्यासाठी आमच्या ‘लेखकमित्र’ या संकेतस्थळाला भेट देत रहा आणि आमच्या ‘व्हॉटसअॅप’ व ‘टेलिग्राम ग्रुप’शी जोडले जा.

धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top