‘जून’ महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

WhatsApp Group Join Now

‘जून’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या सर्जनशील व मोकळ्या मनाच्या असल्याचे मानले जाते. चालू ‘जून’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.

दुलिपसिंहजी (१३-०६-१९०५) :- काठियावाडचे संस्थानिक आणि रणजितसिंहजी यांचे पुतणे असणारे ‘कुंवर दुलिपसिंहजी’ स्वत:ही महान फलंदाज होते. इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेले दुलिपसिंह इंग्लंडसाठीच १२ कसोटी खेळले ज्यात त्यांनी ५८ च्या सरासरीने ९९५ धावा केल्या. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची कारकिर्द थोडक्यात आटोपली. पुढे त्यांच्याच सन्मानार्थ भारतातील ‘दुलिप करंडक’ चालू करण्यात आला. १९४९ मध्ये ते भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले आणि ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये भारताचे उच्चायुक्त झाले. १९५३ मध्ये ‘सौराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली. ‘अखिल भारतीय क्रीडा परिषदे’चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.           

खंडू रांगणेकर (२७-०६-१९१७) :- देशांतर्गत स्पर्धा तब्बल २४ वर्षे आपल्या अष्टपैलू खेळाने गाजवणारे खंडेराव डावखुरे फलंदाज व उजव्या हाताचे मध्यमगती गोलंदाज होते. पण त्यांच्या वाटेला १९४७-४८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फक्त ३ कसोटी सामने आले. क्रिकेटप्रमाणेच इतर क्षेत्रांतही त्यांनी अष्टपैलुत्व दाखवलं. राष्ट्रीय स्तरावरचे बॅडमिंटनपटू असणाऱ्या खंडूनी दुहेरीत विजेतेपदे मिळवली. क्रिकेट व्यवस्थापनात त्यांनी बराच काळ काम केले. ‘इंडियन कस्टम्स’साठी काही वर्षे नोकरी केली, तसेच कापड दुकानाचा व्यवसायही काही काळ केला. ठाण्यातील समाजकारण व राजकारणात ते सहभागी झाले आणि ठाणे नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला.       

चंदू सरवटे (२२-०६-१९२०) :- मध्य प्रदेशमधील ‘सागर’ येथे जन्मलेले ‘सरवटे’ हे चांगले फलंदाज आणि फिरकी गोलंदाज होते. अष्टपैलू खेळाने त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेट गाजवले असले तरी खेळलेल्या ९ कसोटींमध्ये छाप पाडता आली नाही. मात्र १९४६ साली इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना ‘सरे’ विरुद्धच्या सामन्यात दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येवून शतक ठोकून १०व्या गड्यासाठी २४९ धावांची विक्रमी भागीदारी केली. कला व कायद्याची पदवी घेतलेले सरवटे व्यवसायाने फिंगरप्रिंट तज्ज्ञ होते.     

रमाकांत देसाई (२०-०६-१९३९) :- अवघ्या सव्वापाच फूट उंचीचे मध्यमगती गोलंदाज ‘रमाकांत’ आपल्या वेगाने आणि बाऊन्सर्सनी फलंदाजांना हादरवून सोडत. वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि पाकिस्तानविरुद्ध त्यांनी प्रभावी कामगिरी केली. पाकिस्तानचा महान फलंदाज हनिफ मोहम्मद याला तर त्यांनी इतके सतावले की त्याला रमाकांतचा बकरा म्हटले जाऊ लागले. पण कसोटीतील व प्रथमश्रेणी क्रिकेटमधील गोलंदाजीच्या अति-कार्यभारामुळे त्यांची कारकीर्द लवकर आटोपली. त्यांनी २८ कसोटीत ७४ बळी घेतले आणि तिसाव्या वर्षीच निवृत्ती घेतली.   

    

अजिंक्य रहाणे** (०६-०६-१९८८) :- सचिनच्या निवृत्तीनंतर भारतीय संघात मुंबई आणि मराठीची पताका फडकवत ठेवणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक. बहरात असणाऱ्या अजिंक्यची नेत्रसुखद फलंदाजी बघणे ही पर्वणी असते. मधल्या फळीतील या फलंदाजाने आतापर्यंत ८५ कसोटीत ५००० धावा केल्यात. शिवाय ९० वन-डे व २० टी-२० सामन्यांत चमक दाखवलीय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असणाऱ्या अजिंक्यने १०० कसोटी झेल पकडलेत. कल्पक कर्णधार असणाऱ्या अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारताने एकही कसोटी किंवा एकदिवसीय सामना गमावलेला नाही. २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱ्यात २-१ ने मिळवलेला कसोटी मालिका विजय हा त्याच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. शिवाय रणजी, दुलिप, मुश्ताक अली स्पर्धांचे विजेतेपद त्याच्याकडे आहे. आजच्या काळातील क्रिकेटमधील दुर्मिळ सद्गृहस्थांपैकी एक अजिंक्य आहे.                 

वॉली हॅमंड (इंग्लंड : १९-०६-१९०३) :- क्रिकेट इतिहासातील एक महान फलंदाज ‘हॅमंड’ यांनी १९२७-४७ हा काळ गाजवताना ८५ कसोटीत ५८ च्या सरासरीने सात हजारच्यावर धावा करताना २२ शतके ठोकली. १९३३ साली न्यूझीलंडविरुद्ध त्यांनी एकाच दिवसात २९५ धावा चोपून काढल्या. शिवाय ते स्लिपमधील  उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मध्यमगती गोलंदाज होते. कसोटीत ११० झेल घेतानाच त्यांनी ८३ बळीही मिळवले.     सर लेन हटन (इंग्लंड : २३-०६-१९१६) :- महान फलंदाज ‘हटन’ यांनी दोन दशकांवर ठसा उमटवला. त्यांनी ७९ कसोटीत १९ शतके करत ५६ च्या सरासरीने सात हजार धावा ठोकल्या. १९३८ साली त्यांनी केलेला सर्वाधिक ३६४ धावांचा विक्रम बराच काळ अबाधित राहिला. मात्र १९५१ साली ‘खेळात अडथळा आणणे’ या कारणासाठी बाद झालेले हटन पहिले फलंदाज ठरले.            

अॅलन डेव्हिडसन (ऑस्ट्रेलिया : ०८-०६-१९२९) :- उत्कृष्ट डावखुरा वेगवान गोलंदाज आणि उपयुक्त डावरा फलंदाज असणाऱ्या ‘डेव्हिडसन’नी संघासाठी १९५३-६३ या काळात जबरदस्त योगदान दिले. त्यांनी ४४ कसोटीत १८६ बळी मिळवले आणि १३२८ धावा केल्या. १९६० मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकाच कसोटीत शतक करून दहा बळी घेण्याचा त्यांनी पराक्रम केला.  

रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड : ०८-०६-१९३२) :- ऑफ स्पिनर आणि उपयुक्त फलंदाज असणाऱ्या ‘इलिंगवर्थ’ यांनी ६१ कसोटीत १२२ बळी घेतानाच २ शतकांसह १८३६ धावा केल्या. त्यांनी कर्णधार, प्रशासक, व्यवस्थापक आणि रणनीतीकार म्हणून इंग्लिश क्रिकेटमध्ये विशेष छाप सोडली.       

पीटर पोलॉक (दक्षिण आफ्रिका : ३०-०६-१९४१) :- अप्रतिम वेगवान गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाज असणाऱ्या ‘पोलॉक’ यांनी २८ कसोटीत ११६ बळी मिळवले आणि ६०७ धावा केल्या. १९७० साली आफ्रिकेवर बंदी आल्याने त्यांची कारकीर्द संपुष्टात आली. नंतर त्यांनी निवड समिती सदस्य, पत्रकार आणि प्रशासक म्हणून प्रभावी कामगिरी केली.

जावेद मियांदाद (पाकिस्तान : १२-०६-१९५७) :- पाकिस्तानचा दादा फलंदाज ‘मियांदाद’ याला प्रतिस्पर्धी खेळाडूंशी पंगा घेणे नेहमीच आवडत असे. १९८६ साली चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना व चषक जिंकणे आणि १९९२ च्या विश्वचषकात किरण मोरेला माकडउड्या मारून वाकुल्या दाखवणे यासाठी तो भारतियांच्या विशेष लक्षात रहातो. कसोटी पदार्पणात शतक, १०० व्या कसोटीत शतक, सामन्याच्या दोन्ही डावात शतके, सलग ९ वन-डे सामन्यांत अर्धशतके असे काही खास विक्रम त्याच्या नावावर आहेत. त्याने १२४ कसोटीत ५२ च्या सरासरीने ८८३२ धावा केल्या असून २३३ वन-डे सामन्यांत ७३८१ धावा केल्या आहेत. १९९२ चा विश्वचषक जिंकण्यात त्याचा प्रमुख वाटा होता.        

स्टीव्ह वॉ (ऑस्ट्रेलिया : ०२-०६-१९६५) :- जुळ्या ‘वॉ’ बंधुपैकी काही मिनिटांनी थोरला असणारा ‘स्टीव्ह’ हा अनाकर्षक व्यक्तिमत्वाचा व शैलीचा फलंदाज होता. पण त्याची कसर तो जिगरबाज, लढाऊ, चिवट खेळाने व वृत्तीने भरून काढे. १९८९ व १९९३ चा अॅशेस मालिका विजय, १९९५ चा वेस्ट इंडिज मधील मालिका विजय, १९८७ व १९९९ चा विश्वचषक विजय हे त्याच्या कारकिर्दीतील मैलाचे दगड ठरले. त्याने १९८५ ते २००४ या कालखंडात तब्बल १६८ कसोटींमध्ये १०,९२७ धावा केल्या तर ९२ बळी घेतले. शिवाय ३२५ वन-डेंमध्ये ७५६९ धावा करताना १९५ बळी घेतले. अतिशय धूर्त कप्तान असणारा स्टीव्ह ऑस्ट्रेलियाचा दूसरा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे, ज्याने १९९९-२००१ या काळात सलग १५ कसोटी जिंकल्या. सामाजिक जाणीव असणाऱ्या स्टीव्हने कलकत्त्यात कुष्ठरोग्यांच्या मुलींसाठी एक धर्मादाय संस्था स्थापन करण्यास मदत केली.            

मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया : ०२-०६-१९६५) :- जुळ्या ‘वॉ’ बंधुपैकी धाकटा मार्क हा देखण्या व्यक्तिमत्वाचा आकर्षक फलंदाज व उपयुक्त गोलंदाज तसेच अप्रतिम क्षेत्ररक्षक होता. कसोटी पदार्पणात शतक करत नंतर १२ वर्षे त्याने आपल्या सहजसुंदर, नजाकतभऱ्या फलंदाजीने शौकिनांना आनंदित केले. १२८ कसोटींमध्ये मार्कने ८०२९ धावांबरोबरच ५९ बळी आणि १८१ झेल घेतले. तर २४४ वन-डेत ८५०० धावांसह ८५ बळी व १०८ झेल टिपले.             

वसिम अक्रम (पाकिस्तान : ०३-०६-१९६६) :- इतिहासातील सर्वोत्तम डावखुरा वेगवान गोलंदाज असेच अक्रमबाबत म्हणता येईल. त्याचा वेग, स्विंग, टप्पा, कौशल्य यापुढे भलेभले फलंदाज नामोहरम होऊन जात. वन-डे क्रिकेट मध्ये तळाला आक्रमक फलंदाजी करणाऱ्या अक्रमने १९९६ साली कसोटीत २५७धावा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याने अनेकदा संघाचे नेतृत्व केले असले तरी सहकाऱ्यांशी मतभेद, क्रिकेट बोर्ड व निवड समितीशी वाद, सामनानिश्चिती प्रकरणातील आरोप, इत्यादी अनेक कारणांनी तो फार यशस्वी कप्तान होऊ शकला नाही. त्याने १०४ कसोटीत ४१४ तर ३५६ एकदिवसीय सामन्यांत ५०२ बळी घेतले. १९९२ चा विश्वचषक विजयात त्याचा सिंहाचा वाटा होता.            

सनथ जयसूर्या (श्रीलंका : ३०-०६-१९६९) :- डावखुऱ्या जयसूर्याने आपल्या अष्टपैलू खेळाने श्रीलंकेसाठी इतिहास घडवला. सलामीच्या आक्रमक फलंदाजीने त्याने वन-डे क्रिकेटचा चेहरामोहराच बदलला आणि तोच धडाका कसोटीतही कायम राखला. श्रीलंकेने १९९६ चा विश्वचषक जिंकणे आणि २००७ साली अंतिम फेरी गाठणे यात त्याचा प्रमुख हातभार होता. त्याने ११० कसोटीत ६९७३ धावा करत ९८ बळी घेतले. तर ४४५ वन-डे सामन्यांत १३,४३० धावा आणि ३२३ बळी अशी अफलातून कामगिरी केली. १९९७ साली भारताविरुद्ध त्याने ३४० धावांची खेळी केली. त्याशिवाय तो अतिशय जबरदस्त असा क्षेत्ररक्षकही होता.        

क्रिस केर्न्स (न्यूझीलंड : १३-०६-१९७०) :- १९८९ ते २००६ या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला केर्न्स त्या काळातील जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू होता. मध्यम-वेगवान गोलंदाज असणारा ‘क्रिस’ तडाखेबंद फलंदाज होता. मोठे मोठे षटकार मारण्यासाठी त्याची ख्याती होती. न्यूझीलंडने २००० साली ‘आयसीसी एकदिवसीय स्पर्धा’ जिंकली, त्यात त्याचा मोठा हातभार होता. त्याने ६२ कसोटीत २१८ बळी घेत ३३२० धावा केल्या. त्याशिवाय २१५ वन-डे मध्ये ४९५० धावा करताना २०१ बळी मिळवले.

अॅंड्र्यू सायमंडस् (ऑस्ट्रेलिया : ०९-०६-१९७५) :- इंग्लंडमध्ये जन्मलेला अफाट गुणवान अष्टपैलू सायमंडस् खेळला मात्र ऑस्ट्रेलियाकडून. वादळी फलंदाज असणारा सायमंडस् मध्यमगती व फिरकी गोलंदाजी टाके आणि चित्याच्या चपळाईने क्षेत्ररक्षण करी. १९९८ मध्ये वन-डे पदार्पण करणारा सायमंडस् स्थिरावला मात्र २००३ च्या विश्वचषकानंतर. बेधुंद जीवनशैली आणि फटकळ स्वभाव यामुळे त्याची कारकीर्द अनियमित आणि वादग्रस्त राहिली. तो २६ कसोटी, १९८ वन-डे आणि १४ टी-२० खेळला. २००८ मध्ये हरभजन सिंगबरोबर वर्णद्वेषाच्या मुद्दयावर त्याचा मोठा वाद झाला.                

डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका : २७-०६-१९८३) :- आफ्रिकेच्या महान वेगवान गोलंदाजांच्या परंपरेतील झळाळता तारा म्हणजे ‘स्टेन’. २००४-१९ या काळात फलंदाजांना आपल्या वेग व कौशल्याने भंडावून सोडताना त्याने ९३ कसोटीत ४३९ तर १२५ वन-डे मध्ये १९६ बळी घेतले.   

स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड : २४-०६-१९८६) :- २००७ च्या टी-२० विश्वचषकात युवराज सिंगकडून एकाच षटकात ६ षटकार खावे लागल्याने स्टुअर्टला बऱ्याच कुचेष्टेला सामोरे जावे लागले. पण नंतर त्यास मागे टाकत या वेगवान गोलंदाजाने भरपूर प्रगती करत मोठे यश मिळवले. त्याने १६७ कसोटीत ६०४, १२१ वन-डेत १७८ तर ५६ टी-२० मध्ये ६५ बळी मिळवले. २०१५ च्या अॅशेस कसोटीत त्याने ऑस्ट्रेलियाचे ८ गडी १५ धावांत बाद करून त्यांचा डाव फक्त ६० धावांत गुंडाळला. तर २०१० मध्ये पाकिस्तानविरुद्ध आपला संघ ७ बाद १०२ असा संकटात सापडला असताना १६९ धावा करून इंग्लंडला विजय मिळवून दिला.           

अॅंजेलो मॅथ्यूज** (श्रीलंका : ०२-०६-१९८७) :- मधल्या फळीतील फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज असणारा अॅंजेलो गेल्या दीड दशकात श्रीलंकेसाठी आधारस्तंभ राहिला आहे. श्रीलंकेच्या विजयी टी-२० विश्वचषक मोहिमेत त्याने चमकदार कामगिरी केली. २०१३ मध्ये कर्णधार असताना त्याने श्रीलंकेला इंग्लंडमध्ये प्रथमच मालिका विजय मिळवून दिला. आतापर्यंत त्याने १०९ कसोटीत ७६०८ धावा केल्या असून, २२६ वन-डेमध्ये ५९१६ धावा करतानाच १२६ बळी घेतले आहेत. शिवाय ८८ टी-२० मध्ये १३७० धावा व ४५ बळी असे योगदान आहे.   

स्टीव्ह स्मिथ** (ऑस्ट्रेलिया : ०२-०६-१९८९) :- लेग-स्पिनर म्हणून कारकिर्दीची सुरवात करणारा ‘स्टीव्ह’ सध्या जगातल्या सर्वोत्तम चार फलंदाजांमध्ये गणला जातो. त्याची फलंदाजीची शैली पुस्तकी पठडीतली नसली तरी अतिशय परिणामकारक आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि यशस्वी कर्णधार असणाऱ्या स्टीव्हच्या कारकिर्दीला २०१८ मध्ये ‘चेंडू कुरतडण्या’च्या प्रकारामुळे ग्रहण लागले आणि बंदीमुळे एक वर्ष वाया गेले. तरीही त्याच्या नावावर आतापर्यन्त १०९ कसोटीत ५७ च्या सरासरीने ३२ शतकांसह ९६८५ धावा आहेत. शिवाय १५८ वन-डे आणि ६७ टी-२० सामन्यांची पुंजी जमा आहे.          

बेन स्टोक्स** (इंग्लंड : ०४-०६-१९९१) :- न्यूझीलंडमध्ये जन्मलेला ‘स्टोक्स’ उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आणि डावरा फलंदाज असून, सध्याचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. २०१९ चा वन-डे विश्वचषक, २०१९ ची अॅशेस मालिका, २०२२ चा टी-२० विश्वचषक त्याने गाजवले असून इंग्लंडला जिंकून दिले आहेत. आतापर्यन्त तो १०२ कसोटी, ११४ वन-डे आणि ४३ टी-२० सामने खेळला आहे.        

à ईतर काही प्रमुख खेळाडू ::

[अ] परदेशी खेळाडू :-   

टॉम ग्रॅव्हेनी (इंग्लंड : १६-०६-१९२७) :- मधल्या फळीतील फलंदाज. ७९ कसोटी (४८८२ धावा).

जॉन रीड (न्यूझीलंड : ०३-०६-१९२८) :- फलंदाज व ऑफ स्पिनर. ५८ कसोटी (३४२८ धावा, ८५ बळी).  

ब्रायन स्टॅथम (इंग्लंड : १७-०६-१९३०) :- वेगवान गोलंदाज, ७० कसोटी (२५२ बळी). ५०-६० च्या दशकात ट्रूमनच्या साथीने फलंदाजांमध्ये दहशत निर्माण केली.  

जॉन एड्रिच (इंग्लंड : २१-०६-१९३७) :- डावखुरा सलामी फलंदाज. ७७ कसोटी (५१३८ धावा). १९६५ साली न्यूझीलंडविरुद्ध त्रिशतक ठोकले.   

ग्रॅहॅम मॅकेन्झी (ऑस्ट्रेलिया : २४-०६-१९४१) :- वेगवान गोलंदाज, ६० कसोटी (२४६ बळी).   

आसिफ ईक्बाल (पाकिस्तान : ०६-०६-१९४३) :- फलंदाज, मध्यमगती गोलंदाज, कर्णधार. ५८ कसोटी (३५७५ धावा, ५३ बळी).   

डेरेक अंडरवूड (इंग्लंड : ०८-०६-१९४५) :- डावखुरा फिरकी गोलंदाज, ८६ कसोटी (२९७ बळी), २६ वन-डे.   

जेरेमी कोनी (न्यूझीलंड : २१-०६-१९५२) :- फलंदाज, मध्यमगती गोलंदाज, कर्णधार. ५२ कसोटी (२६६८  धावा, २७ बळी), ८८ वन-डे (१८७४ धावा, ५४ बळी).

टेरी ऑल्डरमन (ऑस्ट्रेलिया : १२-०६-१९५६) :- मध्यमगती गोलंदाज, ४१ कसोटी (१७० बळी). १९८१ आणि १९८९ च्या दोन्ही अॅशेस मालिकांमधून ४० च्यावर बळी घेतले.   

अॅलन लॅम्ब (इंग्लंड : २०-०६-१९५४) :- मधल्या फळीतील फलंदाज. ७९ कसोटी (४६५६ धावा), १२२ वन-डे (४०१० धावा). १९८७ व ९२ च्या वन-डे विश्वचषकच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या संघाचा सदस्य.

माईक गॅटींग (इंग्लंड : ०६-०६-१९५७) :- मधल्या फळीतील फलंदाज व कर्णधार. ७९ कसोटी (४४०९  धावा), ९२ वन-डे (२०९५ धावा).       ८६ साली मार्शलच्या गोलंदाजीवर नाक तुटल्याने आणि ८७ साली वर्ल्ड कप अंतिम सामन्यात रिव्हर्स स्वीपच्या फटक्याने बाद झाल्याने, प्रकाशझोतात राहिला.      

मुश्ताक अहमद (पाकिस्तान : २८-०६-१९७०) :- लेग स्पिनर – ५२ कसोटी (१८५ बळी), १४४ वन-डे (१६१  बळी). १९९२ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा प्रमुख शिलेदार.

शेन बॉन्ड (न्यूझीलंड : ०७-०६-१९७५) :- वायुवेगाने स्विंग गोलंदाजी करणारा ‘बॉन्ड’. पण दुखापतींनी कारकीर्द थोडक्यात आटोपली. १८ कसोटीत ८७ बळी आणि ८२ वन-डेत १४७ बळी.    

केविन पीटरसन (इंग्लंड : २७-०६-१९८०) :- दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला आकर्षक, आक्रमक फलंदाज. १०४ कसोटी (८१८१ धावा), १३६ वन-डे (४४४० धावा), ३७ टी-२० (११७६ धावा). २००५ ची अॅशेस मालिका, २०१२ ची भारतातील कसोटी मालिका, २०१० चा टी-२० विश्वचषक यांतील विजयांचा प्रमुख शिल्पकार. पण वादग्रस्त स्वभाव, व्यवस्थापनाशी सतत मतभेद यांमुळे अकाली निवृत्ती.       

रामनरेश सारवान (वेस्ट इंडिज : २३-०६-१९८०) :- भारतीय वंशाचा मधल्या फळीतील फलंदाज. ८७ कसोटी (५८४२ धावा), १८१ वन-डे (५८०४ धावा). २००६ साली भारताविरुद्ध कसोटीत एका षटकात ६ चौकार ठोकले. 

शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया : १७-०६-१९८१) :- अष्टपैलू – मध्यमगती गोलंदाज व मधल्या फळीतील फलंदाज. ५९ कसोटी (३७३१ धावा, ७५ बळी), १९० वन-डे (५७५७ धावा, १६८ बळी), ५८ टी-२० (१४६२  धावा, ४८ बळी). २०१२ च्या टी-२० विश्वचषकाचा मालिकावीर.    

व्हर्नॉन फिलॅंडर (दक्षिण आफ्रिका : २४-०६-१९८५) :- मध्यमगती गोलंदाज. ६४ कसोटी (२२४ बळी), ३०  वन-डे. स्विंग गोलंदाजीचा बादशहा.       

डिन एल्गर (दक्षिण आफ्रिका : ११-०६-१९८७) :- डावरा सलामी फलंदाज व कप्तान, ८६ कसोटी (५३४७ धावा).

केमार रोच** (वेस्ट इंडिज : ३०-०६-१९८८) :- वेगवान गोलंदाज – ८१ कसोटी (२७० बळी), ९५ वन-डे (१२५ बळी).   

मोईन अली** (इंग्लंड : १८-०६-१९८७) :- पाकिस्तानी वंशाचा अष्टपैलू खेळाडू – ऑफस्पिनर व डावखुरा फलंदाज. ६८ कसोटी (३०९४ धावा, २०४ बळी), १३८ वन-डे (२३५५ धावा, १११ बळी), ८४ टी-२० (११५८ धावा, ४८ बळी).   

मार्नस लबुशेन** (ऑस्ट्रेलिया : २२-०६-१९९४) :- आफ्रिकेत जन्मलेला मधल्या फळीतील प्रतिभावंत फलंदाज. ५० कसोटी (४११४ धावा), ५२ वन-डे.  

सॅम करन** (इंग्लंड : ०३-०६-१९९८) :- अष्टपैलू – डावखुरा मध्यमगती गोलंदाज व मधल्या फळीतील फलंदाज. २४ कसोटी, ३२ वन-डे, ४६ टी-२०. २०२२च्या टी-२० विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघाचा सदस्य व मालिकावीर.   

कॅमेरॉन ग्रीन** (ऑस्ट्रेलिया : ०३-०६-१९९९) :- अष्टपैलू – वेगवान गोलंदाज व मधल्या फळीतील फलंदाज. २८ कसोटी, २६ वन-डे, ८ टी-२०.

[ब] भारतीय खेळाडू :-  

माणिंदर सिंग (१३-०६-१९६५) :- डावखुरा फिरकी गोलंदाज. १७ व्या वर्षी कसोटी पदार्पण, भावी बिशन बेदी म्हणून पहिले गेले पण अपेक्षापूर्ती करण्यात अपयश. ३५ कसोटी (८८ बळी), ५९ वन-डे (६६ बळी).

पारस म्हांब्रे (२०-०६-१९७२) :- मध्यमगती गोलंदाज. २ कसोटी, ३ वन-डे. गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून अनेक संघांना मार्गदर्शन.

दिनेश कार्तिक (०१-०६-१९८५) :- यष्टीरक्षक-फलंदाज. २६ कसोटी, ९४ वन-डे, ६० टी-२०. 

 ** खेळाडू म्हणून अजून कारकीर्द चालू )

फलंदाज नाबाद )

( ++ सारी आकडेवारी ३०-०५-२०२४ पर्यंतची )

मित्रहो, ‘जून’ मध्ये जन्मलेल्या या प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडले असेल. आपल्या काही प्रतिक्रिया, सूचना असतील तर जरूर कळवा तसेच हा लेख आपल्या क्रिकेटप्रेमी मित्रपरिवारासोबत सामायिक करायला विसरू नका. असेच नवनवीन माहितीपूर्ण, मनोरंजक लेख, बातम्या, कथा आम्ही आपल्यापर्यंत आणत असतो. त्यासाठी आमच्या ‘लेखकमित्र’ या संकेतस्थळाला भेट देत रहा आणि आमच्या ‘व्हॉटसअॅप’ व ‘टेलिग्राम ग्रुप’शी जोडले जा.

धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top