‘ऑक्टोबर’ महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू
‘ऑक्टोबर’मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘शांत, प्रसन्न, प्रामाणिक व कणखर मनोवृत्तीच्या’ मानल्या जातात. चालू ‘ऑक्टोबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.
सी.के. नायडू (३१-१०-१८९५) – नागपूरच्या सुखवस्तू तेलगू वकील कुटुंबात जन्मलेले ‘सी.के.’ मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज आणि ऑफ ब्रेक फिरकी गोलंदाज होते. भारत १९३२ साली पहिला कसोटी खेळल्याने त्यांच्या नावे फक्त ७ कसोटी लागल्या. ते भारताचे पहिले कसोटी कर्णधार होते. ‘सी.के.’ आक्रमक फलंदाजीसाठी आणि उत्तुंग षटकारांसाठी लोकप्रिय होते. त्यांच्या खेळावर खूश होऊन इंदूरच्या होळकरांनी त्यांना आपल्याकडे बोलावून घेतले आणि तिथे आपल्या सैन्यात आधी कॅप्टन आणि नंतर कर्नल बनवले. तब्बल ४६ वर्षे ते प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले. भारतीय क्रिकेटचे ते पहिले सुपरस्टार होते आणि ‘पद्मभूषण’ मिळवणारे पहिले क्रिकेटपटू होते.
विजय मर्चंट (१२-१०-१९११) – मुंबईच्या श्रीमंत उद्योजक गुजराती ‘ठाकरसी’ घराण्यातून आलेले ‘विजय’ महान सलामी फलंदाज होते. दुसरे महायुद्ध आणि आजारपणे यांमुळे त्यांच्या काही मालिका हुकल्या आणि केवळ १० कसोटी खेळू शकले. त्यात त्यांनी ३ शतकांसह ४८ च्या सरासरीने ८५९ धावा केल्या. प्रथमश्रेणी क्रिकेट मात्र ते भरपूर खेळले आणि त्यातील ७२ ची सरासरी ब्रॅडमन यांच्यानंतर जगात सर्वोत्तम आहे. निवृत्तीनंतर क्रिकेट व्यवस्थापक, समालोचक आणि निवडकर्ता म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली. आपल्या घराण्याच्या कापड उद्योग त्यांनी सांभाळला आणि ‘हिंदुस्थान मिल्स’चे ते अध्यक्ष होते. मुंबईचे शेरीफ म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आणि अनेक वर्षे अपंगांच्या पुनर्वसनाच्या आणि समाजसेवेच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले.
नवज्योत सिंग सिद्धू (२०-१०-१९६३) – १९८३ साली वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केलेला पंजाबी सलामीवीर ‘सिद्धू’ अति-बचावात्मक खेळामुळे ‘स्ट्रोकलेस वंडर’ म्हणून हिणवला गेला. त्याच सिद्धूने १९८७ च्या वर्ल्ड कपमध्ये षटकारांची आतषबाजी करत दणकेबाज पुनरागमन केले आणि ‘सिक्सर किंग’ म्हणून कौतुक मिळवले. पुढे धडाकेबाज खेळ कायम राखत त्याने कारकिर्दीत ५१ कसोटी आणि १३६ वन-डे खेळताना अनुक्रमे ३२०२ आणि ४४१३ धावा केल्या. खेळतानाच्या दिवसांत अतिशय शांत व अबोल असणारा सिद्धू निवृत्तीनंतर आमूलाग्र बदलला आणि प्रचंड बडबड करीत व उपमा, वाक्प्रचार, म्हणी यांचा मनमुराद वापर करत हिंदी व इंग्रजी भाषेतला लोकप्रिय समालोचक बनला. राजकारणातही हातपाय मारून काही वर्षे तो भाजप व कॉँग्रेसतर्फे खासदार राहिला.
अनिल कुंबळे (१७-१०-१९७०) – कर्नाटकचा हुशार चश्मिस अभियंता ‘कुंबळे’ भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. १३२ कसोटीत ६१९ तर २७१ वन-डेमध्ये ३३७ बळी त्याच्या पोतडीत आहेत. लेग स्पिनर अनिलचे चेंडू वळत नाहीत म्हणून त्याच्यावर बरीच टीका होत असे. पण त्याच्याकडे लक्ष न देता परिश्रम, अचूकता, वेगबदल, उसळी यांच्या जोरावर भरपूर बळी मिळवत त्याने भारताला अनेक विजय मिळवून दिले. २००२ साली जबडा फ्रॅक्चर झाला असतानाही भरपूर गोलंदाजी टाकून लाराचा बळी मिळवत त्याने आपल्या जिद्दीचे दर्शन घडवले. १९९९ साली पाकिस्तानविरुद्ध दिल्लीमध्ये एका डावात १० बळी घेत विश्वविक्रमाला गवसणी घातली. फलंदाज म्हणून १ शतक आणि ५ अर्धशतके त्याच्या नावावर आहेत आणि भारताचा कप्तान असताना त्याने निवृत्ती स्वीकारली. एक अतिशय सभ्य, सज्जन, बुद्धिमान व्यक्ति आणि खेळाडू म्हणून अनिलची ओळख आहे.
झहीर खान (०७-१०-१९७८) – महाराष्ट्रातील ‘अहिल्यानगर’ जिल्ह्यातील श्रीरामपूर गावचा झहीर आधी बडोदा आणि मग संधी मिळताच मुंबईसाठी स्थानिक क्रिकेट खेळला. डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर आधी वेगासाठी ओळखला जायचा पण कालांतराने विविध कौशल्ये, युक्ती शिकून तो अधिक घातक गोलंदाज बनला. तीन वन-डे विश्वचषक खेळलेला झहीर २०११ सालच्या विजेत्या संघाचा भाग होता. त्याने ९२ कसोटीत ३११, २०० वन-डेमध्ये २८२ आणि १७ टी-२० मध्ये १७ बळी मिळवले.
विरेन्द्र सेहवाग (२०-१०-१९७८) – सचिन तेंडुलकरला आदर्श मानणारा ‘सेहवाग’ त्याच्याप्रमाणेच आत्यंतिक गुणवान खेळाडू होता. दिल्लीचा मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज सेहवाग नंतर सलामीला येऊन गोलंदाजांची धुलाई करू लागला. अतिशय बिनधास्त स्वभावाचा ‘विरू’ विरोधी गोलंदाजांच्या लौकिकाचे दडपण न घेता फटकेबाजी करे. अक्षरश: गाणी म्हणत आणि शीळ घालत तो भल्या भल्या गोलंदाजांना बदडून काढत असे. २००७ च्या टी-२० आणि २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा तो प्रमुख शिलेदार होता. पहिल्याच कसोटीत शतक करणाऱ्या विरुने १०४ कसोटीत ८५८६, २५१ वन-डेत ८२७३ तर १९ टी-२० मध्ये ३९४ धावा ठोकून काढल्या. शिवाय ऑफ स्पिन गोलंदाजीने अनुक्रमे ४० व ९६ बळी घेतले.
गौतम गंभीर (१४-१०-१९८१) – दिल्लीकर सलामीचा डावखुरा फलंदाज गंभीर २००३ ते २०१३ या काळात भारतीय संघाचा प्रमुख शिलेदार होता. नावाप्रमाणेच गंभीर व रागीट स्वभावाचा गौतम अनेकदा प्रतिस्पर्ध्यांशी मैदानावर पंगा घेत असे. २००७ च्या टी-२० आणि २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा प्रमुख घटक होता. त्याने ५८ कसोटीत ४१५४, १४७ वन-डे मध्ये ५२३८ आणि ३७ टी-२० मध्ये ९३२ धावा केल्या. नुकताच तो भारतीय संघाचा प्रशिक्षक झाला आहे. २०१४-१९ या काळात तो भाजपचा दिल्लीतून खासदार झाला होता.
ऋषभ पंत** (०४-१०-१९९७) – मूळचा उत्तराखंडचा ‘ऋषभ’ चांगल्या संधीसाठी दिल्लीत स्थायिक होऊन खेळू लागला. यष्टीरक्षक व डावखुरा आक्रमक फलंदाज ‘ऋषभ’ने थोड्याच काळात भारतीय संघात स्थान मिळवले. प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या लौकिकाचे दडपण न घेता बिनधास्त खेळण्याची अनोखी शैली त्याच्याकडे आहे. आपल्या फटकेबाज शैलीसह परदेशातदेखील यशस्वी होत त्याने भारताला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिले आहेत. ३० डिसेंबर २०२२ ला सुसाट वेगाने जाणाऱ्या गाडीला झालेल्या जीवघेण्या अपघातातून तो सुदैवाने आश्चर्यकारकरित्या बचावला. गंभीर जखमा आणि फ्रॅक्चर्समधून दृढ मनोबलाने तो सव्वा वर्षात बरा झाला आणि भारतीय संघात पुनरागमन करून २०२४ च्या टी-२० विश्वचषकविजेत्या संघाचा प्रमुख हिस्सा राहिला. जिंदादील स्वभावाचा ऋषभ मैदानावरील व संघातील वातावरण नेहमी आनंदी व हलकेफुलके ठेवतो. आतापर्यंत ३५ कसोटी, ३१ वन-डे व ७६ टी-२० खेळलेल्या ऋषभकडे भारतीय संघाचा भावी कप्तान व सुपरस्टार म्हणून बघितले जाते.
विल्फ्रेड ऱ्होडस् (इंग्लंड : २९-१०-१८७७) – यॉर्कशायरचा अष्टपैलू ‘विल्फ्रेड’ सर्वार्थाने ऐतिहासिक क्रिकेटपटू म्हटला पाहिजे. डावखुरा फिरकी गोलंदाज व उत्तम फलंदाज असणाऱ्या विल्फ्रेडनी ५८ कसोटीत १२७ बळी घेतले, २३२५ धावा केल्या आणि ६० झेल घेतले. ५२ व्या वर्षी कसोटी खेळलेले विल्फ्रेड आतापर्यंतचे सर्वात वयस्कर खेळाडू आहेत आणि त्यांची कारकीर्द तब्बल ३१ वर्षं चालली. प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये विल्फ्रेडनी १११० सामने खेळताना ३९,९६९ धावा केल्या, ४२०४ बळी घेतले आणि ७६५ झेल टिपले.
रिची बेनॉ (ऑस्ट्रेलिया : ०६-१०-१९३०) – ‘बेनॉ’ हे उत्कृष्ट लेग स्पिन गोलंदाज, उपयुक्त फलंदाज आणि कल्पक कर्णधार होते. त्यांनी ६३ कसोटीत २४८ बळी मिळवले आणि ३ शतकांसह २२०१ धावा केल्या. १९५९ साली भारताविरुद्ध एका डावात एकही धाव न देता ३ बळी घेतले. नंतर समालोचनात आपला असा खास ठसा उमटवला.
टोनी ग्रेग (इंग्लंड : ०६-१०-१९४६) – दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला साडे-सहा फूटी अष्टपैलू ‘टोनी’ त्याकाळी आफ्रिकेवर बंदी असल्याने इंग्लंडकडून खेळला. तो मधल्या फळीतील फलंदाज, ऑफ ब्रेक गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता. त्याने ५८ कसोटीत ३५९९ धावा केल्या, १४१ बळी घेतले आणि ८७ झेल टिपले. काही सामन्यात नेतृत्व केलेल्या टोनीने २२ वन-डे देखील खेळल्या. पुढे समालोचक म्हणून देखील तो लोकप्रिय झाला.
कर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज : ३०-१०-१९६२) – शांत व मजेशीर स्वभावाचा वॉल्श घातक वेगवान गोलंदाज होता. कपाळावरच्या आठ्यांमुळे त्याच्या चेहऱ्यावर कायम प्रश्नचिन्ह आहे असे वाटे. बरीच वर्षे त्याने संघाचे नेतृत्व केले. १३२ कसोटींमध्ये त्याने ५१९ बळी घेतले ज्यात सामन्यात १० बळी तीन वेळा तर डावात ५ बळी बावीस वेळा होते. शिवाय २०५ वन-डेमध्ये २२७ बळी घेतले.
जॅक कॅलीस (दक्षिण आफ्रिका : १६-१०-१९७५) – बलदंड शरीराचा ‘कॅलीस’ आधुनिक काळातला महान अष्टपैलू खेळाडू होता. मधल्या फळीतील आश्वासक फलंदाज, वेगवान गोलंदाज आणि उत्तम क्षेत्ररक्षक असणारा कॅलीस जगातल्या कुठल्याही संघात निव्वळ फलंदाज वा गोलंदाज म्हणून बसला असता. त्याने १६६ कसोटीत ४५ शतकांसह ५५ च्या सरासरीने १३,२८९ धावा केल्या, २९२ बळी घेतले आणि २०० झेल टिपले. तर ३२८ वन-डेमध्ये ४४ च्या सरासरीने ११,५७९ धावा करतानाच २७३ बळी घेतले आणि १३१ झेल टिपले. शिवाय २५ टी-२० मध्येही आपली अष्टपैलू चमक दाखवली.
कुमारा संगकारा (श्रीलंका : २७-१०-१९७७) – आकर्षक, शैलिदार डावखुरा फलंदाज ‘संगकारा’ एक विश्वासार्ह यष्टीरक्षक व क्षेत्ररक्षक होता. त्याने १३४ कसोटीत ३८ शतकांसह ५७ च्या सरासरीने १२,४०० धावा काढल्या आणि २०२ झेल / यष्टीचीत टिपले. शिवाय तब्बल ४०४ वन-डेमध्ये १४,२३४ धावा करतानाच ५०१ झेल / यष्टीचीत टिपले. याशिवाय ५६ टी-२० सामनेदेखील खेळला. एकूण ८२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीलंकेचे त्याने नेतृत्व केले. २००६ साली आफ्रिकेविरुद्ध त्याने जयवर्धनेच्या साथीने ६२४ धावांची विश्वविक्रमी भागीदारी केली ज्यात त्याचा २८७ धावांचा वाटा होता. तर २०१४ साली बांगलादेशविरुद्ध त्रिशतक ठोकण्याचा पराक्रम केला. उच्चशिक्षित संगकारा एक विचारी, बुद्धिमान व्यक्ती, खेळाडू म्हणून ओळखला जातो.
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया : २७-१०-१९८६) – बुटका, भांडखोर स्वभावाचा ‘वॉर्नर’ डावखुरा सलामी फलंदाज होता. नुकतीच त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अनेकदा कसोटीमध्ये-सुद्धा तो वन-डे स्टाइलने खेळत असे.त्याने ११२ कसोटीत २६ शतकांसह ८७८६ धावा केल्या. तर १६१ वन-डेमध्ये २२ शतकांसह ६९३२ धावा केल्या. त्याशिवाय ११० टी-२० मध्ये ३२७७ धावा ठोकल्या. २०१८ साली आफ्रिकेत चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात त्याच्यावर एक वर्षाची बंदी आली.
ग्लेन मॅक्सवेल** (ऑस्ट्रेलिया : १४-१०-१९८८) – आक्रमक फलंदाज, फिरकी गोलंदाज आणि अप्रतिम क्षेत्ररक्षक अश्या अष्टपैलू गुणवान मॅक्सवेलच्या अतिआक्रमक फलंदाजीला क्षणभंगुरतेचा व सातत्याच्या अभावाचा शाप आहे. आपल्या वादळी फलंदाजीने त्याने संघाला मर्यादित षटकांच्या सामन्यांत अनेक विजय मिळवून दिले आहेत. असाच २०२३ च्या वन-डे विश्वचषकात त्याने अफगाणिस्तानविरुद्ध अद्भुत द्विशतक करून संघाला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. आतापर्यंत तो १४२ वन-डे, ११३ टी-२० आणि ७ कसोटी खेळला आहे. भारतीय वंशाची विनी रमण ही त्याची पत्नी आहे.
à ईतर काही प्रमुख खेळाडू ::
[अ] परदेशी खेळाडू —
बिल पान्सफोर्ड (ऑस्ट्रेलिया : १९-१०-१९००) –सलामीवीर. २९ कसोटी, २१२२ धावा. पदार्पणाच्या पहिल्या दोन कसोटीत शतके करणारा पहिला क्रिकेटपटू. ब्रॅडमन यांच्याबरोबर ४५१ धावांची विक्रमी भागीदारी.
रे लिंडवॉल (ऑस्ट्रेलिया : ०३-१०-१९२१) – महान वेगवान गोलंदाज. ६१ कसोटीत २२८ बळी. शिवाय २ शतके आणि ५ अर्धशतके नावावर.
नील हार्वे (ऑस्ट्रेलिया : ०८-१०-१९२८) – मधल्या फळीतील महान आकर्षक डावखुरा फलंदाज. ७९ कसोटीत ६१४९ धावा.
बेसिल डी’ओलीव्हिरा (इंग्लंड : ०४-१०-१९३१) – मधल्या फळीतील फलंदाज व मध्यमगती गोलंदाज. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला मिश्र-पोर्तुगीज वंशीय बेसिल तेथील वर्णद्वेशी धोरणामुळे संधी मिळत नसल्याने इंग्लंडकडून खेळू लागला. पण त्याची १९६८ च्या आफ्रिकेचा दौरा करणाऱ्या इंग्लिश संघात निवड झाली आणि त्यावर बरीच राजकीय उलथापालथ होऊन अखेर तो दौरा रद्द झाला. पुढे आफ्रिकेवर २१ वर्षे खेळण्यावर बंदी आली. बेसिलने ४४ कसोटीत २४८४ धावा करताना ४७ बळी घेतले.
बॉब काउपर (ऑस्ट्रेलिया : ०५-१०-१९४०) – डावखुरा फलंदाज आणि ऑफ-ब्रेक गोलंदाज. २७ कसोटीत २०६१ धावा आणि ३६ बळी. इंग्लंडविरुद्ध त्रिशतक नोंदवले. पण बँकिंग आणि शेयर मार्केटमधील करियरसाठी फक्त २८ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
जेफ्री बॉयकॉट (इंग्लंड : २१-१०-१९४०) – सलामी फलंदाज, समालोचक. चिवट, रटाळ खेळासाठी कुप्रसिद्ध. १०८ कसोटी – ८११४ धावा, ३६ वन-डे – १०८२ धावा.
जॉन स्नो (इंग्लंड : १३-१०-१९४१) – वेगवान गोलंदाज. ४९ कसोटी – २०२ बळी.
लान्स केर्न्स (न्यूझीलंड : १०-१०-१९४९) – मध्यमगती गोलंदाज, आक्रमक फलंदाज. ४३ कसोटी (१३० बळी, ९२८ धावा), ७८ वन-डे (८९ बळी, ९८७ धावा).
रॉय डायस (श्रीलंका : १८-१०-१९५२) – शैलिदार फलंदाज. २० कसोटी – १२८५ धावा, ५८ वन-डे – १५७३ धावा.
दीपक पटेल (न्यूझीलंड : २५-१०-१९५८) – ऑफ स्पिनर, उपयुक्त फलंदाज. केनियात जन्मलेला भारतीय वंशाचा खेळाडू. ३७ कसोटी (७५ बळी, १२०० धावा), ७५ वन-डे (४५ बळी, ६२३ धावा). १९९२ च्या वर्ल्ड कपमध्ये प्रभावी कामगिरी.
मार्क टेलर (ऑस्ट्रेलिया : २७-१०-१९६४) – डावरा सलामी फलंदाज, कर्णधार. १०४ कसोटी (७५२५ धावा, १५७ झेल), ११३ वन-डे (३५१४ धावा). पाकिस्तानविरुद्ध ३३४* धावांची खेळी.
अरविंदा डी’सिल्वा (श्रीलंका : १७-१०-१९६५) – प्रेक्षणीय आक्रमक फलंदाज, फिरकी गोलंदाज. ९३ कसोटी (६३६१ धावा), ३०८ वन-डे (९२८४ धावा, १०६ बळी). १९९६ च्या विश्वचषक विजयात मोलाचा वाटा.
केन रुदरफोर्ड (न्यूझीलंड : २६-१०-१९६५) – फलंदाज, कर्णधार. ५६ कसोटी – २४६५ धावा, १२१ वन-डे –३१४३ धावा.
अॅलन डोनाल्ड (दक्षिण आफ्रिका : २०-१०-१९६६) – वेगवान गोलंदाज. ९० च्या दशकात वादळी वेगवान गोलंदाजीने फलंदाजांचे जगणे कठीण केले व ‘White Lightening’ म्हणून प्रसिद्धीस आला. ७२ कसोटीत ३३० तर १६४ वन-डेमध्ये २७२ बळी घेतले.
इयान बिशप (वेस्ट इंडिज : २४-१०-१९६७) – वेगवान गोलंदाज. ४३ कसोटी – १६१ बळी, ८४ वन-डे ११८ बळी. खास वेस्ट इंडियन परंपरेतला शेवटचा भीतीदायक गोलंदाज. दुखापतींमुळे कारकिर्दीला ब्रेक.
रशीद लतीफ (पाकिस्तान : १४-१०-१९६८) – यष्टीरक्षक. ३७ कसोटी (१३० झेल + यष्टीचीत, १३८१ धावा), १६६ वन-डे (२२० झेल + यष्टीचीत, १७०९ धावा).
डॅमियन मार्टिन (ऑस्ट्रेलिया : २१-१०-१९७१) – फलंदाज. ६७ कसोटी – ४४०६ धावा, २०८ वन-डे – ५३४६ धावा. १९९९ व २००३ च्या वन-डे विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य.
रॉनी इराणी (इंग्लंड : २६-१०-१९७१) – मध्यमगती गोलंदाज, फलंदाज. भारतीय-पारशी वडील आणि ब्रिटिश आई यांचा मुलगा. ३ कसोटी व ३१ वन-डे खेळला.
मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया : २९-१०-१९७१) – सलामीचा डावखुरा फलंदाज. भीमकाय देहाचा हेडन चेंडू आणि गोलंदाजीच्या अक्षरश: चिंधड्या उडवत असे. २००३ साली झिंबाब्वेविरुद्ध ३८० धावांची उत्तुंग खेळी केली. २००३ आणि २००७ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा प्रमुख शिलेदार. १०३ कसोटीत ३० शतकांसह ५१ च्या सरासरीने ८६२५ धावा, तर १६१ वन-डेमध्ये ६१३३ धावा.
रसेल अरनॉल्ड (श्रीलंका : २५-१०-१९७३) – डावखुरा फलंदाज. ४४ कसोटी – १८२१ धावा, १८० वन-डे – ३९५० धावा.
मायकल वॉन (इंग्लंड : २९-१०-१९७४) – फलंदाज, कर्णधार. ८२ कसोटी – ५७१९ धावा, ८६ वन-डे – १९८२ धावा.
दिलशान तिलकरत्ने (श्रीलंका : १४-१०-१९७६) – आक्रमक फलंदाज, ऑफ स्पिनर, कप्तान. ८७ कसोटी (५४९२ धावा), ३३० वन-डे (१०,२९० धावा, १०६ बळी), ८० टी-२० (१८८९ धावा).
ब्रॅड हॅडीन (ऑस्ट्रेलिया : २३-१०-१९७७) – यष्टीरक्षक. ६६ कसोटी (२७० झेल + यष्टीचीत, ३२६६ धावा), १२६ वन-डे (१८१ झेल + यष्टीचीत, ३१२२ धावा), ३४ टी-२० (२३ झेल + यष्टीचीत).
स्टीव हार्मिसन (इंग्लंड : २३-१०-१९७८) – वेगवान गोलंदाज. ६३ कसोटी – २२६ बळी, ५८ वन-डे – ७६ बळी.
अॅडम व्होग्स (ऑस्ट्रेलिया : ०४-१०-१९७९) – फलंदाज. २० कसोटीत ६२ च्या सरासरीने १४८५ धावा, ३१ वन-डेत ४६ च्या सरासरीने ८७० धावा. ३५ व्या वर्षी कसोटी पदार्पणात शतक करताना, तसे करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.
मोहम्मद हफिज (पाकिस्तान : १७-१०-१९८०) – फलंदाज, ऑफ स्पिनर.५५ कसोटी (३६५२ धावा, ५३ बळी), २१८ वन-डे (६६१४ धावा, १३९ बळी), ११९ टी-२० (२५१४ धावा, ६१ बळी).
मशरफी मूर्तझा (बांगलादेश : ०५-१०-१९८३) – मध्यमगती गोलंदाज, कर्णधार. ३६ कसोटी – ७८ बळी, २२० वन-डे – २७० बळी, ५४ टी-२० – ४२ बळी.
ड्वेन ब्राव्हो (वेस्ट इंडिज : ०७-१०-१९८३) – मध्यमगती गोलंदाज, आक्रमक फलंदाज. ४० कसोटी (२२०० धावा, ८६ बळी), १६४ वन-डे (२९६८ धावा, १९९ बळी), ९१ टी-२० (१२५५ धावा, ७८ बळी). दोन टी-२० विश्वचषक विजेत्या संघांचा भाग. चॅम्पियन-कॅलिप्सो नृत्यासाठी प्रसिद्ध.
मॉर्ने मॉर्केल (दक्षिण आफ्रिका : ०६-१०-१९८४) – वेगवान गोलंदाज. ८६ कसोटी – ३०९ बळी, ११७ वन-डे – १८८ बळी, ४४ टी-२० – ४७ बळी.
रवी रामपॉल (वेस्ट इंडिज : १५-१०-१९८४) – (भारतीय वंशाचा) वेगवान गोलंदाज. १८ कसोटी – ४९ बळी, ९२ वन-डे – ११७ बळी, २७ टी-२० – ३१ बळी.
दिनेश रामदिन (वेस्ट इंडिज : १३-१०-१९८५) – (भारतीय वंशाचा) यष्टीरक्षक. ७४ कसोटी (२१७ झेल + यष्टीचीत, २८९८ धावा), १३९ वन-डे (१८८ झेल + यष्टीचीत, २२०० धावा), ७१ टी-२० (६३ झेल + यष्टीचीत).
एजाज पटेल** (न्यूझीलंड : २१-१०-१९८८) – (भारतीय वंशाचा) डावरा फिरकी गोलंदाज. १८ कसोटी – ७० बळी, ७ टी-२०. मुंबईत जन्मलेल्या एजाजने २०२१ मध्ये भारताविरुद्ध मुंबईतच डावात सर्व १० बळी घेण्याची किमया केली.
मिशेल मार्श** (ऑस्ट्रेलिया : २०-१०-१९९१) – आक्रमक फलंदाज, मध्यमगती गोलंदाज. ४२ कसोटी (२०१० धावा, ४८ बळी), ९३ वन-डे (२७९४ धावा, ५७ बळी), ६५ टी-२० (१६२९ धावा, १७ बळी). दोन वन-डे आणि एका टी-२० विश्वचषक विजेत्या संघांचा सदस्य.
ईश (इंदरबीर सिंग) सोधी** (न्यूझीलंड : ३१-१०-१९९२) – (भारतीय वंशाचा) लेग स्पिनर. २० कसोटी, ५१ वन-डे, ११७ टी-२०.
एडन मार्करम** (दक्षिण आफ्रिका : ०४-१०-१९९४) – फलंदाज, टी-२० कप्तान. ३९ कसोटी, ७१ वन-डे, ५३ टी-२०.
लिटन दास** (बांगलादेश : १३-१०-१९९४) – यष्टीरक्षक, फलंदाज. संघातील मोजक्या ‘हिंदू’ खेळाडूंपैकी एक. ४५ कसोटी, ९१ वन-डे, ८९ टी-२०.
बाबर आझम** (पाकिस्तान : १५-१०-१९९४) – पाकिस्तानचा गेल्या दशकातला सर्वोत्कृष्ट फलंदाज, कर्णधार. ५४ कसोटी – ३९६२ धावा, ११७ वन-डे – ५७२९ धावा, १२३ टी-२० – ४१४५ धावा. वन-डेमध्ये सर्वात जलद ५,००० धावांचा विक्रम.
मेहिदी हसन मिराज** (बांगलादेश : २५-१०-१९९७) – ऑफ स्पिनर, उपयुक्त फलंदाज. ४७ कसोटी (१८३ बळी, १६८९ धावा), ९७ वन-डे (१०६ बळी, १३३१ धावा), २५ टी-२०.
[ब] भारतीय खेळाडू —
पद्मनाभ गोविंद (नाना) जोशी (२७-१०-१९२६) – बडोद्यात जन्मलेले यष्टीरक्षक ‘नाना’ १२ कसोटी खेळले ज्यात त्यांनी यष्टीमागे २७ बळी टिपले.
दत्ताजी गायकवाड (२७-१०-१९२८) – बडोद्याच्या ‘दत्ताजीं’नी एक फलंदाज म्हणून ११ कसोटी खेळल्या, त्यातील ४ सामन्यांत नेतृत्व केले. यावर्षी फेब्रुवारीमध्ये ९६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
अशोक मंकड (१२-१०-१९४६) – ‘विनू मंकड’चे सुपुत्र ‘अशोक’ मुख्यत: सलामी फलंदाज असले तरी भारतासाठी अनेक क्रमांकावर खेळले. मुंबईकर अशोकनी २२ कसोटीत ९९१ धावा केल्या.
रामनाथ पारकर (३१-१०-१९४६) – मुंबईकर सलामीवीर ‘रामनाथ’ आक्रमक फलंदाज आणि अप्रतिम क्षेत्ररक्षक होते. मात्र ते दोनच कसोटी खेळले.
समीर दिघे (०८-१०-१९६८) – मुंबईकर यष्टीरक्षक ‘समीर’ ६ कसोटी आणि २३ वन-डे खेळला. ज्यात त्याने यष्टीमागे अनुक्रमे १४ व २४ बळी टिपले.
नरेंद्र हिरवाणी (१८-१०-१९६८) – १९८८ साली कसोटी पदार्पणात वेस्ट इंडिजविरुद्ध १६ बळी घेऊन विश्वविक्रमासह खळबळ माजवणारा ‘हिरवाणी’ पुढे तो करिश्मा कायम राखू शकला नाही. मध्य प्रदेशच्या चश्मिस लेग स्पिनर हिरवाणीने १७ कसोटीत ६६ तर १८ वन-डेमध्ये २३ बळी घेतले.
संजय बांगर (११-१०-१९७२) – ‘बीड’चा अष्टपैलू ‘बांगर’ रेल्वेसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळला. चिवट फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज बांगरने १२ कसोटी आणि १५ वन-डे खेळताना दोन्हीत मिळून ६५० धावा केल्या आणि १४ बळी मिळवले. आता तो प्रशिक्षक म्हणून ठसा उमटवत आहे.
वृद्धिमान साहा (२४-१०-१९८४) – बंगाली यष्टीरक्षक ‘साहा’ने ४० कसोटी खेळल्या, ज्यात यष्टीमागे १०४ बळी टिपताना १३५३ धावाही केल्या. शिवाय तो ९ वन-डे सामने खेळला.
इरफान पठाण (२७-१०-१९८४) – बडोद्याचा डावखुरा वेगवान गोलंदाज आणि सक्षम फलंदाज ‘इरफान’ २००४ साली भारतीय संघात आला तेव्हा त्याने मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या. पण पहिले चार वर्षे चांगली कामगिरी केल्यानंतर त्याचा स्विंग हरवला आणि हळूहळू तो भारतीय संघातून बाहेर फेकला गेला. तोपर्यंत त्याने २९ कसोटीत १०० बळी घेत ११०५ धावा केल्या. शिवाय १२० वन-डेमध्ये १७३ बळी घेताना १५४४ धावा केल्या. २४ टी-२० खेळणारा इरफान २००७ च्या टी-२० विश्वचषकविजेत्या संघाचा भाग होता. २००६ साली पाकिस्तानविरुद्ध कराची कसोटीत पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेण्याची किमया केली.
उमेश यादव** (२५-१०-१९८७) – नागपूरचा वेगवान गोलंदाज ‘उमेश’ने विशेषत: मायदेशात भारताला काही विजय मिळवून दिलेत. त्याने आत्तापर्यंत ५७ कसोटी, ७५ वन-डे आणि ९ टी-२० सामन्यांमध्ये अनुक्रमे १७०, १०६ आणि १२ बळी मिळवले आहेत.
शार्दुल ठाकूर** (१६-१०-१९९१) – ‘पालघर एक्सप्रेस’ नावाने ओळखला जाणारा ‘शार्दुल’ मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. मध्यमगती गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाज असणारा शार्दुल आतापर्यंत ११ कसोटी, ४७ वन-डे आणि २५ टी-२० खेळला आहे.
हार्दिक पंड्या** (११-१०-१९९३) – बडोद्याचा अष्टपैलू ‘हार्दिक’ आक्रमक फलंदाज आणि तेज-मध्यमगती गोलंदाज आहे. ११ कसोटी खेळलेला हार्दिक मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग असतो. आतापर्यंत तो ८६ वन-डे आणि १०२ टी-२० खेळला आहे.
( ** खेळाडू म्हणून अजून कारकीर्द चालू )
( * फलंदाज नाबाद )
( ++ सारी आकडेवारी ३०-०९-२०२४ पर्यंतची )
मित्रहो, ‘ऑक्टोबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या या प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडले असेल. आपल्या काही प्रतिक्रिया, सूचना असतील तर जरूर कळवा तसेच हा लेख आपल्या क्रिकेटप्रेमी मित्रपरिवाराला अग्रेषित करायला विसरू नका. असेच नवनवीन माहितीपूर्ण, मनोरंजक लेख, कथा, बातम्या आम्ही आपल्यापर्यंत आणत असतो. त्यासाठी आमच्या ‘लेखकमित्र’ या संकेतस्थळाला भेट देत रहा आणि आमच्या ‘व्हॉटसअॅप’ व ‘टेलिग्राम’ ग्रुपशी जोडले जा.
धन्यवाद !
– गुरुप्रसाद दि पणदूरकर (मुंबई)