दसरा
“उत्सव आला विजयाचा दिवस सोने लुटण्याचा.. नवे जुने विसरुन सारे, फक्त आनंद वाटण्याचा.. विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म म्हणून ओळखला जातो.तर आपल्या हिंदू धर्मात अनेक सण,उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात.त्यापैकीच एक अत्यंत महत्वपूर्ण सण म्हणजेच दसरा .हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे, ज्याला विजयादशमी असेही म्हणतात. या सणाचे महत्त्व दृष्टावर सत्याचा विजय दर्शविण्यात आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी प्रभू श्री रामांनी रावणावर विजय मिळवल्याचा आनंद म्हणून, तर काही ठिकाणी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केल्याचे स्मरण म्हणून दसरा साजरा केला जातो.दसरा किंवा विजयादशमी हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. मौल्यवान वस्तू खरेदीसाठी विजयादशमीचा आजचा दिवस शुभ मानला जातो. कोणत्याही शुभकामाचा प्रारंभ आजच्या दिवशी केला जातो.विजयादशमी या सणाची उत्पत्ती काही कथांद्वारे सांगितली जाते.
यंदा आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी सुरू होत आहे आणि १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजून ०८ मिनिटांनी ती समाप्त होईल. त्यामुळे दसरा हा सण १२ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. तर दसरा किंवा विजयादशमी उत्सवामागील विविध आख्यायिका, इतिहास, सणामागील शास्त्र आणि महत्व काय आहे ते आजच्या या लेखातून जाणून घेऊयात.
विजयादशमी साजरी करण्यामागील कथा किंवा आख्यायिका तसेच या सणाचा इतिहास पुढीलप्रमाणे :
आख्यायिका :
१) पैठण शहरात कौत्स नावाचा मुलगा वरतंतु ऋषींकडे वेदाभ्यास शिकला. त्यानंतर त्याने गुरूदक्षिणेविषयी विचारले. तेव्हा वरतंतु ऋषींनी गुरुदक्षिणा नको, असे सांगितले. तरी कौत्साचे समाधान झाले नाही. त्याने गुरूदक्षिणेविषयी आग्रह धरला. तेव्हा वरतंतु ऋषींनी १४ कोटी सुवर्णमुद्रा देण्यास सांगितले. कौत्स १४ कोटी सुवर्णमुद्रा आणण्यासाठी रघुराजाकडे गेला. रघुराजाने तीन दिवसांची मुदत मागितली. रघुराजाने त्यासाठी इंद्रावर स्वारी करायचे ठरविले. इंद्राला ते समजले. इंद्राने रात्री कुबेराकडून गावाबाहेरील आपट्याच्या आणि शमीच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. रघुराजाने त्या सर्व सुवर्णमुद्रा कौत्सास दिल्या. त्या सर्व सुवर्णमुद्रा घेऊन कौत्स वरतंतु ऋषींकडे गेला. परंतु वरतंतुंनी त्यातील १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या. उरलेल्या त्यांनी स्वीकारल्या नाहीत. कौत्स त्या घेऊन रघुराजाकडे गेला. रघुराजाही त्या परत घेईना. शेवटी कौत्साने रघुराजाच्या सांगण्यावरून त्या उरलेल्या सर्व सुवर्णमुद्रा आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली ठेवल्या आणि लोकास त्या लुटून नेण्यास सांगितले. तो दिवस विजयादशमीचा होता. त्यामुळे या दिवशी आपट्याच्या व शमीच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा पडली.
२) महिषासूर राक्षस सर्व लोकांना त्रास देत होता. तेव्हा परमेश्वराने अष्टभुजा देवीच्या रुपात अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून दशमीपर्यंत महिषासूर राक्षसाशी तुंबळ युद्ध करून त्यास ठार मारून विजय मिळवला. त्यावेळी देवीने विजया नाव धारण केले होते. म्हणून अश्विन शुक्ल दशमीस ‘विजयादशमी’ हे नाव मिळाले.
३) पांडव अज्ञातवासात राहण्यासाठी म्हणून विराट राजाच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी आपली सर्व शस्त्रे जंगलात शमीच्या झाडावर ठेवली होती. शेवटी अज्ञातवास संपल्यावर पांडवांनी सर्व शस्त्रे शमीच्या झाडावरून काढून घेतली. शमीच्या झाडाची आणि शस्त्रांची पूजा केली. तो दिवस अश्विन शुक्ल दशमीचा होता.
४) प्रभू रामचंद्रांचा पणजा रघुराजा सर्व दिशांच्या राजांना जिंकण्यासाठी याच दिवशी निघाले होते.
५)श्री प्रभु रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला तो हाच दिवस होता.
दसरा’ साजरा करण्यामागील शास्त्र व इतिहास
१. तिथी : आश्विन शुद्ध दशमी
२. व्युत्पत्ती आणि अर्थ :
दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो.
दसरा सणाचे महत्त्व :
दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून अतिशय शुभ दीन मानला जातो. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आजच्या दिवशी केली जाते.
सण साजरा करण्याची पद्धत:
या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.
अ. सीमोल्लंघन
अपराण्हकाली (तिसर्या प्रहरी, दुपारी) गावाच्या सीमेबाहेर ईशान्य दिशेकडे सीमोल्लंघनासाठी जातात. जिथे शमीचा किंवा आपट्याचा वृक्ष असेल, तिथे थांबतात.
अर्थ : शमी पाप शमवते (नष्ट करते). शमीचे काटे तांबूस असतात. शमी श्रीरामाला प्रिय बोलणारी असून अर्जुनाच्या बाणांचे धारण करणारी आहे. हे शमी, श्रीरामाने तुझी पूजा केली आहे. मी यथाकाल विजययात्रेला निघणार आहे. ही यात्रा तू मला निर्विघ्न आणि सुखकारक कर.
आ. आपट्याचे पूजन
आपट्याची पूजा करायची असल्यास पुढील मंत्र म्हणतात –
अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।
इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ।।
अर्थ : हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. नंतर त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्णनाणे (विकल्पाने तांब्याचे नाणे) ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात.
इ १. आपट्याची पाने सोने म्हणून देणे
शमीची नाही; पण आपट्याची पाने सोने म्हणून देवाला वाहतात आणि इष्टमित्रांना देतात. सोने हे लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते, असा संकेत आहे.
ई. अपराजितापूजन
ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात.
हारेण तु विचित्रेण भास्वत्कनकमेखला ।
अपराजिता भद्ररता करोतु विजयं मम ।।
अर्थ : गळ्यामध्ये चित्रविचित्र हार घालणारी, जिच्या कटीत चकाकणारी सुवर्णमेखला आहे, अशी आणि (भक्तांचे) कल्याण करण्याच्या कामी तत्पर अशी अपराजितादेवी मला विजय देवो. काही ठिकाणी अपराजितेची पूजा सीमोल्लंघनाला निघण्याच्या पूर्वीही करतात.
उ. शस्त्रे आणि उपकरणे यांचे पूजन
या दिवशी राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे आणि उपकरणे साफसूफ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात. त्याचप्रमाणे शेतकरी आणि कारागीर हे आपापली आऊते आणि हत्यारे यांची पूजा करतात. (काही लोक ही शस्त्रपूजा नवमीच्या दिवशीही करतात.) लेखणी आणि पुस्तके ही विद्यार्थ्यांची शस्त्रेच होत; म्हणून विद्यार्थी त्यांचे पूजन करतात. या पूजनामागील उद्देश हा की, त्या त्या गोष्टींमध्ये ईश्वराचे रूप पाहणे, अर्थात ईश्वराशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करणे.
राजविधान
दसरा हा विजयाचा सण असल्यामुळे या दिवशी राजेलोकांना विशेष विधान सांगितले आहे.
लौकिक प्रथा
काही घराण्यांतले नवरात्र (देवी) नवमीच्या दिवशी, तर काहींचे दशमीच्या दिवशी विसर्जित होते.
कृषीविषयक लोकोत्सव
`दसरा’ हा प्रारंभी एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळयात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसर्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वहातात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथादेखील या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला.
श्रीराम व हनुमान तत्त्वे आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा दसरा
दसर्याच्या दिवशी ब्रह्मांडात श्रीरामतत्त्वाच्या तारक, तर हनुमानतत्त्वाच्या मारक लहरींचे एकत्रिकीकरण झालेले असते. दसरा या तिथीला जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो. या क्षात्रभावातूनच जिवावर क्षात्रवृत्तीचा संस्कार होत असतो. . दसऱ्याला श्रीराम व हनुमान यांचे स्मरण केल्याने जिवात दास्यभक्ती निर्माण होऊन श्रीरामाचे आशीर्वादरूपी तत्त्व मिळण्यास मदत होते. दसऱ्याच्या दिवशी ब्रह्मांडात लाल (शक्तीरूपी) व तांबूस (दास्यभावातून निर्माण झालेल्या आशीर्वादरूपी लहरी) रंगांच्या स्प्रिंगसारख्या लहरी कार्यरत अवस्थेत असतात. या लहरींमुळे जिवाची आत्मशक्ती जागृत होण्यास मदत होऊन जिवाच्या नेतृत्वगुणामध्ये वाढ होते.
तर अशाप्रकारे आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्वपूर्ण सण दसरा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.
आपणास व आपल्या परिवाराला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा…
तर आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या दसरा किंवा विजयादशमी सणाबद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली ते कॉमेंट करुन आम्हाला नक्की कळवा तसेच आणखी कोणत्या सण, उत्सवाबद्दल आपल्याला माहिती वाचायला आवडेल तेही नक्की कळवा.
धन्यवाद !
लेखिका -मोनिका भगवान भेरले , कल्याण
खूप छान मोनिका
खूपच छान माहिती आहे.