2. धनत्रयोदशीची पुजा आणि आरोग्यासंबंधी कथा
नमामि धन्वंतरीमादि देवं सुरासुरै वन्दित पादपद्मम् लोकेजरारुक् भयमृत्युनाशं धातारमिशं विविधौषधिणाम ।
अर्थ – सुर असूर ज्याच्या चरणाची पुजा करतात , ज्याच्या कृपेने मनुष्यातील वेदना , वार्धक्य , भीती , मृत्यु यांचा नाश होतो, अशा धन्वंतरी देवास माझा नमस्कार.
या जगात धनसंपत्ती पेक्षाही काय महत्वाचे असेल तर ते म्हणजे आरोग्य. आरोग्य नसेल तर धनसंपत्तीचा काहीही उपयोग नाही.
भारतीय संस्कृतीत आरोग्याला संपत्ती बरोबर मानले गेले आहे.म्हणूनच दिवाळीत लक्ष्मीपुजनाच्या आधी धनत्रयोदशीला महत्त्व दिले जाते. म्हणूनच धन्वंतरीच्या दिवशी देवीदेवतांचे वैद्य , आयुवेदाचार्य भगवान धन्वंतरी यांची पुजा करण्याची प्रथा आहे. धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीच्या रूपाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
चला तर मग धनत्रयोदशीचे महत्व , पुजा विधी , शुभ मुहुर्त यांबद्दल जाणून घेऊया .
धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी साजरी केली जाते.
असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी लक्ष्मी मातेसोबत पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
धनत्रयोदशी कथा
धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक दंतकथा आहे. हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.
शुभ मुहुर्त आणि पुजा विधी
धनत्रयोदशी 2024 पूजा मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 6:31 ते रात्री 8:13 पर्यंत करू शकतो .
पुजा सुर करण्याआधी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. भगवान धन्वंतरीची मूर्ती किंवा चित्र स्वच्छ ठिकाणी स्थापित करा आणि पूर्व दिशेला तोंड करून बसा. त्यानंतर या मंत्राने भगवान धन्वंतरीचे आवाहन करावे. यानंतर पूजास्थळी आसन देण्याच्या भावनेने तांदूळ अर्पण करा. आचमनसाठी पाणी सोडा आणि भगवान धन्वंतरीला वस्त्र अर्पण करा. भगवान धन्वंतरीच्या मूर्तीवर किंवा चित्रावर अबीर, गुलाल पुष्पा, रोळी आणि इतर सुगंधी वस्तू अर्पण करा. चांदीच्या भांड्यात खीर अर्पण करा. (चांदीची भांडी नसल्यास, इतर कोणत्याही भांड्यातही भोग देऊ शकता.) त्यानंतर आचमनसाठी पाणी सोडावे. मुखशुद्धीसाठी सुपारी, लवंग, सुपारी अर्पण करा. भगवान धन्वंतरीला शंखपुष्पी, तुळशी, ब्राह्मी इत्यादी पूजनीय औषधी अर्पण करा. यानंतर रोगाच्या नाशासाठी या मंत्राचा जप करावा. मंत्र – ‘ओम रम रुद्र रोग नाशय धन्वंतरे वसा ।’ त्यानंतर भगवान धन्वंतरीला श्रीफळ आणि दक्षिणा अर्पण करा. पूजेच्या शेवटी कर्पूर आरती करावी
धनप्राप्तीसाठी घरातील पूजास्थानी कुबेरासाठी दिवा दान करा आणि मृत्यूमुखी भगवान यमराजासाठी मुख्य दरवाजावर दिवा दान करा.
धनत्रयोदशी महत्व
धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार चांदी आणि इतर धातू कोणत्याही स्वरूपात खरेदी करणे खूप शुभ आहे. हिशोबाच्या नव्या वहयांची सुरुवात या दिवशी केली जाते.
आरोग्यप्राप्ती साठी भगवान धन्वंतरी यांची आराधना धनत्रयोदशी दिवशी केली जाते. धन्वंतरी हे देवतांचे वैद्य होते. त्यांना विष्णूचे अवतार आणि आयुवेदाचे दैवत मानले जाते.
लक्ष्मी माता आणि कुबेर यांचीही पुजा धनत्रयोदशी दिवशी केली जाते. यांच्या पुजेने सुख, धन , समृद्धी यांची प्राप्ती होते.
अकाली मृत्यू टाळण्यासाठी दक्षिण दिशेला किंवा घराच्या मुख्य दरवाजावर यमराजासाठी पिठाचा दिवा ठेवावा. त्यामुळे यमराज प्रसन्न होतात.
अशा प्रकारे उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी आणि घरात सुखसमृद्धी नांदावी यासाठी धनत्रयोदशी हा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात येतो.
शुभ धनत्रयोदशी
तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे सांगायला विसरू नका. भेटुया अशाच एका अनोख्या विषयासोबत.
लेखिका – गायत्री कमलाकर झोमटे .