दीप अमावास्या म्हणजे काय? त्याचे महत्त्व, कहाणी, कशी पूजा करावी? यांची संपूर्ण माहिती.

WhatsApp Group Join Now

दीप अमावस्या म्हणजे ‘आषाढी अमावस्या’ होय. या अमावस्येला दिवा अमावस्या असे म्हटले जाते. या दिवशी दिव्यांची आरास करून पूजन केले जाते. तसेच आगामी श्रावण माहिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. पवित्र श्रावण महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही दीप अमावस्या येते. तसेच श्रावण महिना पाळणाऱ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी पंचांगानुसार, गटारी अमावस्या म्हणजेच दिप अमावस्या तिथी रविवार, ३ ऑगस्टपासून दुपारी प्रारंभ ३ वाजून ५० मिनिटांनी सुरू होईल. जी ४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजून ४२ मिनिटापर्यंत राहील. त्यामुळे घरातील दिव्यांची पूजा केली जाते.

श्रावण महिन्याला हिंदू महिन्यातील पवित्र महिना मानला जातो, तसेच या दरम्यान महिनाभर तरी मांसाहार खात नसल्यामुळे श्रावण महिन्या सुरू होण्याच्या आदल्या दिवशी मांसाहार आणि विविध चमचमीत पदार्थ बनवून गटारी साजरी करत असतात. या मागचं कारण म्हणजे या दिवसानंतर पवित्र श्रावण मास सुरू होतो. तसेच या महिन्यात बहुतेक लोक कांदा, लसूण, मांसाहारी व अभक्ष्य भक्षण बंद करतात. कारण श्रावण महिन्यात बरेच लोक श्रावणी उपवास करून , पूजा,पाठ करायला सुरुवात करतात. तसेच श्रावणा महिन्या पासून जोरदार पाऊस पडत असतो त्यामुळे, हवा कुंद होत असल्यामुळे पचनशक्तीही कमकुवत झालेली असते. त्यामुळे जड अन्न पचत नाही. असे ही म्हंटले आहे की, हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो त्यामुळे मासे खाणे योग्य नसते. कदाचित यामुळेच श्रावणात उपवास करण्याची पद्धत सुरू झाली असावी.

तर चला आपण दिप अमावस्याचे महत्त्व जाणून घेऊया-

दीप अमावस्याचे महत्त्व-

1) व्रताचे महत्त्व-
आपल्याकडे प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे महत्व सांगण्यात आलेले आहे. दिप अमावस्याच्या दिवशी बरेच जण या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात. पार्वती, शिवशंकर, कार्तिकेय यांची पूजा केली जाते. या दरम्यात अन्नदान, तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला १०८ प्रदक्षिणा घालणे शुभ मानले जाते. अशी धार्मिक कार्ये श्रद्धेने केल्यास त्याचे फळ नक्की मिळते.

2) पितरांना तर्पण करणे- या दिवशी पितरांना तर्पण दिले जाते. तसेच पितरांना पुरणाचा नैवेद्य दाखवल्यास पितर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्या व्रत करतात, तसेच पूजा आणि दान धर्म करतात. त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापांतून मुक्त केले जाते. दीप अमावस्याच्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे आणि उपवास ठेवल्याने शुभ मानले जाते. तसेच मृत पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते असे मानले जाते.

3) झाडे लावण्याचे महत्त्व- या दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावल्याने ग्रह दोष शांत होतात, असंही सांगितलं जातं. जसे की, या दिवशी पिंपळ, केळी, लिंबू किंवा तुळशीचं रोपटे लावले जातात.

4) गंगा स्नानाचे महत्त्व-  दीपअमावस्याच्या दिवशी माशांना पीठाच्या गोळ्या बनवून खायला दिल्या जातात. या दिवशी गंगास्नानाचे तसेच देणगी देण्यालाही फार महत्व समजले जाते.

5) दीप अमावस्याला लहान मुलांना ओवाळण्याचे महत्व-
भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला, वातींना, ज्योतीला फार मोठया प्रमाणात महत्व आहे. भारतीय संस्कृतीत सांगितलेला योग सुद्धा प्राण शक्तीशी निगडीत आहे. आणि या प्राणालाही ‘प्राणज्योत’ म्हटले जाते. असे म्हटले जाते की, हिंदू संस्कृती ही पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्यामुळे दिव्याला विशेष महत्व दिले जाते. त्यामुळेच दिवा हा माणसाच्या जीवनाशी संबंधित महत्वाचा घटक झाला आहे. त्यामुळे मुलांनाही वंशाचे दिवे म्हटले जाते. जे वंश उजळून काढतील असे मानले जाते. या प्रतीकाचा पूजनाला ‘दीपपूजन’ असे म्हटले जाते.
तसेच जिवती ही दुसरी पूज्य देवता मनाली जाते. जिवतीची पूजा प्रतिमेच्या रूपात केली जाते. या प्रतिमेच पूजन संपूर्ण श्रावण महिनात मातृशक्तीकडून केल्या जातात आणि आपल्या मुलांसाठी मंगलतेची प्रार्थना केली जाते.
तसेच आजचे मुले हे भाविष्यातले जबाबदार नागरिक असल्यामुळे, त्यांच्यावर चांगले संस्कार घडविण्यात यावे यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला संस्कार विधी आहे. याचा कृष्ण कथेशी संबंध आहे.

6) दिव्यांच्या माध्यमातून मिळणारी प्रेरणा-
आषाढा महिन्या नंतर श्रावण महिना हा हिंदू धर्मीयांनसाठी अत्यंत पवित्र समजल्या जाणार्‍या महिन्याची सुरूवात होय. यातून दीपअमावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणादायी गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना आणि मजबूती मिळते.
त्याच प्रमाणे आषाढ महिन्यातील अमावस्येला दिव्याची आवस किंवा दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते. दीप पूजनाला आपल्याकडे विशेष महत्त्व असल्याने कोणत्याही कार्यक्रमापूर्वी किंवा शुभ दिवशी आपण आवर्जून दिप प्रज्वलन करत असतो.

दीप अमावस्या कहाणी – 

कहाणी

ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. एका आटपाट नगरात एक राजा राहत होता. त्याला एक सून होती. त्या सुनेने एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला व आपल्यावरचा प्रमाद टाळण्यासाठी उंदरावर आळ आणला. इकडे उंदरांनी विचार केला. आपली काही चूक नसताना आपल्यावर उगाच आळ आला आहे. तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला आणि या उद्देशाने त्यांनीं रात्रीं पाहुण्याच्या अंथरुणात हिची चोळी नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाल्यामुळे सासू-दिरांनी निंदा केली आणि तिला घरांतून घालवून दिली.

हिचा रोजचा हा नियम असे, रोज दिवे घासणे, तेलवात करणे, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अंवसेचे दिवशीं त्यांना चांगला नैवेद्य दाखवणे. त्याप्रमाणं ही घरांतून निघाल्यावर तें बंद पडलं.त्यानंतर अवसेच्या दिवशीं राजा शिकारीहून येत असताना, एका झाडाखालीं मुक्कामासाठी उतरला. तिथं त्याच्या दृष्टिस एक चमत्कार नजरेस आला. तो म्हणणे आपले सर्व गांवातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसून, एकमेकांपाशी गोष्टी करीत होत्या. कोणाचें घरीं काय जेवावयास केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली होती. सर्व दिव्यांनी आपाआपल्या घरीं घडलेली हकीकत सांगितली.

त्यां मागून राजाच्या घरचा दिवा सांगूं लागला की बाबांनो, काय सांगू ? यंदा माझ्यासारखा दुर्दैवी कोणीं नाहीं. मी दरवर्षी सर्व दिव्यांमध्ये मुख्य असायचो, माझा थाटमाट चांगला व्हायचा, तर यंदा असे कठीण दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारणा केली की, असं होण्याचं कारण काय ? मग त्या दिव्याने सांगायला सुरुवात केली की, बाबांनो, काय सांगूं ? मी ह्या गांवच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती, तिनं एके दिवशीं घरांतला पदार्थ स्वतः खाऊन, आपल्यावरचा प्रमाद टाळण्यासाठी उंदरांवर आळ आणला. इकडे उंदरानें विचार केला, की हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हां आपण तिचा चांगलाच सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. रात्रीं पाहुण्याच्या अंथरुणांत तिची चोळी नेऊन टाकली.

दुसरे दिवशी तिची फजिती झाल्यामुळे, सासू-दिरांनीं निंदा केली आणि तिला घरांतून घालवून दिली. त्यामुळे मला हे दिवस पदरी आले. ती दर वर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो ! असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. हा घडलेला प्रकार राजानं श्रवण केल्यावर, यात आपल्या सुनेचा अपराध नाहीं अशी त्याची खात्री झाली. राजा घरी आल्यावर कोणी प्रत्यक्ष पाहिलें आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा ( झाकलेली पालखी) पाठवून घरीं आणून, तिची झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरांत मुखत्यारी दिली आणि ती सुखानं रामराज्य करूं लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ! ही सांठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

पण दीप अमावस्याला कशी केली जाते ते पाहुया-

दिव्याची पूजा कशी करावी ? हे पाहूया

1) त्या दिवशी सकाळी सर्वप्रथम घरातील सर्व दिवे, समया, निरंजने काढावेत. गरम पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून, घासून पुसून स्वच्छ करावेत. देवासमोर एक पाट मांडून त्या भोवती छान रांगोळी आणि फुलांची छान सजावट करावी.

2) पाटावरती सर्व दिवे, निरंजनी मांडावे. त्यात दिव्यांमध्ये वाती, तेल टाकून दिवे प्रज्वलित करून, दिव्याची छान पूजा करावी.

3) दिव्यांना हळद-कुंकू, गुलाल, अक्षता वाहून पूजा करावी. तसेच दिव्यांना फुलं वस्त्रमाळ हे व्हावं आणि आघाडा, दूर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी. नंतर हे सर्व दिवे हे पेटवून, त्यांना हात जोडून नमस्कार करावा.

4) काही ठिकाणी बरेचजण ओल्या मातीचे दिवे करुन त्यांचीही पूजा करत असतात. तसेच कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवता आणि त्यांचा नैवेद्यही दाखवतात. सायंकाळ झाली की, सर्व दिव्यांची आरती करावी. त्या नंतर पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी.

दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम ।

गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥

अर्थात

‘‘हे दीप, तू सूर्यरूप तसेच अग्निरूप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कराव व माझ्या सर्व इच्छा पूर्ण करावे.’’.

5) अनेक ठिकाणी सायंकाळ झाली की, शुभंकरोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळतात. लहान मुलांना वंशाचा दिवा मानलं जातं असल्यामुळे, त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्वाचं स्थान आहे.

6) सायंकाळ झाल्यानंतर दिव्यांची कहाणी वाचून, दिव्यांची आरती करावी. मग प्रार्थना करावी कि, घरातील सर्व प्रकारची इडापिडा टळू दे, अज्ञान, रोगराई दूर होउदे, अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरुदे अशी प्रार्थना करून, दीप प्रज्वलित करावे आणि त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती आहे.

तसेच दीप पूजा केल्यावर काय फायदे आहेत ते पुढे पाहूया-


1) दिव्याची पूजा केल्यावर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान नांदते. शिवाय महालक्ष्मी प्रसन्न होते. आपल्यावर महालक्ष्मीची आखंड कृपा दृष्टी राहते.

2) तसेच घरातील प्रत्येक सदस्याला परम सुख, शांती, निरोगी, दिर्घायुष्य लाभते.

3) पितरांचे आशीर्वाद मिळून, त्याच्या आत्म्यांना शांती मिळते. घरातील पितृदोष नाहीसे होऊन, सगळ्यांची प्रगती होते.

4) आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार दूर होऊन, ज्ञानरूपी प्रकाश आपला आयुष्यात यावा म्हणून, यासाठी या दिव्यांची पूजा आपण करायला पाहिजे.

अश्या या येणाऱ्या ४ ऑगस्ट रोजी सगळ्यांना दीप अमावस्याच्या हार्दीक शुभेच्छा!

तर मित्र , मैत्रीनो कसा वाटला माझा लेख मला नक्की कळवा. धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top