दिवाळीच्या सणातील कथा: रामायणातील आणि महाभारतातील दिवाळी
दिवाळी निमित्ताने रामायण आणि महाभारत या हिंदू धर्मातील प्रमुख ऐतिहासिक कथांमध्ये असणारा दिवाळी या सणाचा संदर्भ उलगडण्यासाठी हा लेखदिप! हिंदू धर्मात साजरा केला जाणारा प्रत्येक सण हा कुठल्या न कुठल्या पौराणिक कथेशी निगडित असतो. दिवाळीच्या देखील अनेक कथा प्रचलित आहेत. या लेखात आपण रामायण आणि महाभारतातील दिवाळी विषयी थोड्क्यात जाणून घेणार आहोत.
रास दिव्यांची शोभे
रंग सजले दारी
उत्साह मावेना उरी
राम परतला घरी ..!
चौदा वर्षांचा अखंड वनवास भोगून, कुटुंबीयांचा विरह सोसून भगवान श्रीराम अयोध्येला परत आले तेव्हा संपूर्ण अयोध्या नगरी सुशोभित होऊन श्रीरामांच्या स्वागतास सज्ज झाली होती. रामायण कथासागरातील दिवाळीची कथा आनंदाचा जल्लोष आणि नाविन्याची सुरुवात दाखवते.
या कथेची पार्श्वभूमी श्रावणबाळाच्या कथेशी निगडित आहे. ही कथा दशरथाच्या तरुणपणी सुरू होते. दशरथ राजा एका हत्तीच्या दिशेने बाण मारतो. त्याचा बाण दिशा चुकतो. श्रावणबाळावर वार होतो. श्रावण जागीच ठार होतो. मातृपितृ भक्त श्रावणाच्या आई वडिलांना पुत्र विरहामध्ये क्रोध शोक अनावर होतो. दशरथाला पुत्रवियोगाचा श्राप मिळतो. आणि रामायण या ऐतिहासिक कथेचा प्रारंभ होतो. मरण हे निश्चित असते. त्या मरणाचे निमित्त म्हणजे नियती. श्रावणबाळाच्या अंध आईवडिलांनी पुत्र विरहात कायमचेच डोळे मिटून घेतले. स्वतःच्या दुर्भग्याला सामोरे जाता जाता दशरथाचे दुर्भाग्य त्याला सांगून गेले.
कैकयी ही कौशल्यानंदन रामाची सावत्र आई होती. कैकयीने राजा दशरथ कडे रामाला वनवासाला पाठवण्याचे वचन मागितले. असे म्हटले जाते की कैकयीला तिचा पुत्र भरत राजा बनवा अशी अपेक्षा होती. त्यामुळे तिने रामाला वनवासाला पाठवण्याचे वचन मागितले. आजही कैकयी या शब्दाचा तिरस्कारपूर्ण अर्थ घेतला जातो. कैकयी म्हणजे दुष्ट स्वभावाची स्त्री असा अर्थ मराठी व्याकरणात रूढ आहे. अखेर कैकयीचा प्रयत्न यशस्वी झला. प्रभु श्रीराम थोरांचा आशीर्वाद घेऊन पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण सोबत तब्बल चौदा वर्षांसाठी अयोध्येचा त्याग करून वनवासासाठी निघाले. संपूर्ण अयोध्या नगरी दुःखात बुडाली होती. काळोखात लुप्त झाली होती. हा काळोख मिटायला चौदा वर्षे उलटावी लागली. या चौदा वर्षांमध्ये एके दिवशी माता सीतेला सोनेरी मृगाचा मोह झाला आणि रामायणाचा प्रख्यात प्रसंग म्हणजेच सीतेचे अपहरण घडून आला.
लक्ष्मणाने शुर्पनखेचा केलेला अपमान; त्याचा प्रतिशोध म्हणजे सीतेचे हरण. मग लंकापती विरुद्ध सियापती हे न्यायाचे युद्ध म्हणजे रामायण. या वनवासात श्रीरामांना भक्त हनुमान भेटला. या वनवासामागे रावणाच्या अहंकाराचा अंत लिहिला होता. सितामातेशी संवाद करणारे भक्त हनुमान आपल्या शेपटीने लंका जाळतात आणि प्रभू श्रीराम दशाननाचा अहंकार गाळतात. रावणाचा भाऊ बिभीषण नसता तर त्याचा अहंकार तोडणारा तो एक बाण त्याच्या नाभीपर्यंत पोहोचण्यासाठी किती काळ उलटावा लागला असता हे प्रभू रामालाच ठाऊक! अशा प्रकारे रामायण म्हणजे एकमेकांमध्ये अर्थपूर्ण रित्या गुरफटलेल्या प्रसंगांची एकत्रित कथा. रावणाचा मृत्यू हा नवरात्रीचा शेवटचा दिवस. प्रत्येकाच्या मनात वाईट विचारांचा जो रावण दडलेला असतो, त्याचे दहन करावे आणि रामाचा म्हणजेच सुज्ञान विचारांचा अवलंब करावा अशी या दिवसाची महती आहे.
दिवाळी म्हणजे रावणाचा अंत करून प्रभु श्रीरामचंद्र सीता माता आणि लक्ष्मणासोबत चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून , विजयपताका झळकावून पुन्हा अयोध्या नगरीत आले तो दिवस. या दिवशी संपूर्ण अयोध्या नगरी लक्ख प्रकाशात सजली होती. फुलांच्या माळा , रांगोळ्या सर्वकाही विजयानंदाचे प्रतीक होत. आणि न्यायाचा प्रकाश घेऊन संपूर्ण अयोध्येत तेवणाऱ्या दिव्यांच्या वाती काळोखावर प्रकाशाच्या वर्चस्वाचे प्रतीक होत्या. ज्या दिवशी ही दिव्यांची रास अयोध्या नगरीत सजली तो दिवस दिवाळी म्हणून साजरा केला जातो. रामाचे अयोध्येत पुनरागमन झाले आणि दिवाळीचा सण थाटात साजरा झाला.
महाभारत कथा –
महाभारताच्या कथेतही दिवाळीचा संदर्भ सापडतो. बारा वर्षांचा वनवास संपवून पांडव माघारी परतले तेव्हा जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले होते. महाभारताच्या प्रमुख कथेत शकूनीचे कपट, द्रौपदी वस्त्रहरण, समस्त सभेला पांचालीचा श्राप, पांडवांचा वनवास असे कित्येक प्रसंग आहेत. कार्तिक शुद्ध एकादशीला पांडव वनवास संपवून घरी आले, तेव्हा दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करण्यात आली.
तेव्हापासून दरवर्षी हा दिवस दिवाळी म्हणून साजरा करतात अशी आख्यायिका आहे. त्यानंतर न्यायासाठी प्रसिद्ध महाभारत घडले.
रामायणाचे युद्ध वनवासाच्या कालावधीत घडले तर महाभारताचे युद्ध वनवास संपवून परत आल्यावर. रामायणातील दिवाळी युद्धानंतर साजरी झाली तर महाभारतातील दिवाळी युद्धापूर्वी साजरी झाली. ही दिवाळी न्यायाचा प्रकाश घेऊन आली.
रामायण आणि महाभारत ही हिंदू धर्मातील दोन महाकाव्ये दिवाळी या हिंदू धर्मातील महत्वाच्या सणाचा संदर्भ सांगतात. अश्या प्रकारे सण आणि पौराणिक कथांचे हे द्विरंगी ऋणानुबंध..!
लेख कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवावे.
धन्यवाद !
– लेखिका : श्रावणी सुळ