चित्रपट: दो और दो प्यार
परीक्षण:
१४ जून २०२४ रोजी हॉट स्टार वर प्रदर्शित झालेला दो और दो प्यार या सिनेमामध्ये चार भिन्न व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमाच्या कथेची सुरेख गुंफण आहे. सिनेमाची सुरवात समुद्रात तरंगणाऱ्या कॉर्क च्या बुचाने होते. त्या कॉर्क सारखाच तरल आणि सहज अनुभव तुम्हाला हा सिनेमा पाहताना येणार आहे असे या सिनेमाच्या दिग्दर्शिका शीर्षा गुहा ठाकुरता याना सुचवायचे असावे.
सिनेमाचे कथानक प्रतीक गांधी (अनिरुद्ध), विद्या बालन (काव्या), सेंधील राममूर्ती (विक्रम राममूर्ती) आणि इलियना डी’क्रूझ (नोरा) या मुख्य पात्रांभोवती फिरत राहते. अनिरुद्ध बॅनर्जी आणि काव्या गणेशन यांनी १२ वर्षांपूर्वी पळून जून लग्न केलेलं आहे. परंतु १२ वर्षांनंतर दोघेही भावनिक, मानसिक, शारीरिक पातळीवर एकमेकांपासून खूप दूर गेले आहेत. आता त्यांच्या मध्ये केवळ कामापुरते संवाद होत असतात. योगायोगाने दिवसभर कॉर्कच्या फॅक्ट्ररी मध्ये पिचून गेलेल्या अनिरुद्धच्या आयुष्यात नोरा नावाची झुळूक आलेली आहे आणि आणि क्लीनिकमधले नेहेमीचेच दातदुखीचे चेहेरे पाहून कंटाळलेल्या काव्याच्या कोरड्या आयुष्यात विक्रमच्या रूपात हिरवळ निर्माण झाली आहे. दोघेही आपापल्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत पण एकमेकांना त्यांचा अजिबात पत्ता नाहीये.
नोराला फिल्मी दुनियेत अभिनेत्री म्ह्णून नाव कमवायचं आणि त्यासाठी ती अनिरुद्धचा शिडी सारखा वापर करतेय आणि इकडे विक्रम एक इंटरनॅशनल फोटोग्राफर आहे. विक्रमने जगभर प्रवास केलाय पण जगातील कोणत्याच शहराने त्याला आपलेसे केले नाही हे त्याचे दुःख आहे आणि शेवटी त्याने मुंबईला आपलंस केलय आणि काव्या बरोबर तो बस्तान बसवायचा विचार करतो आहे. नोरा आणि विक्रम अनिरूद्घ आणि काव्याला सतत एकमेकांपासून वेगळे होण्यास सांगत आहेत. काव्याची याबाबतीत वकिलांची देखील भेट झाली, पण अनिरुद्ध पासून घटस्फोट का पाहिजे या वकिलाच्या प्रश्नावर मात्र अनिरुद्ध विरोधात तिला काही सांगता येत नाही.
अनिरुद्ध आणि काव्या तिच्या आजोबांच्या अंतिम संस्कारासाठी उटीला जातात आणि तिथून त्यांच्या नात्याला पून्हा युटर्न मिळतो. उटीच्या काही दिवसांच्या वास्तव्यात दोघेही त्यांचे जुने दिवस नव्याने जगून घेतात आणि आपण आजही आईबाबा आणि नातेवाईक यांनी नाकारले आहोत ही सल मनात ठेवून परत येतात. परत आल्यावर मात्र सगळे चित्र बदलते. पूर्वी विक्रम आणि नोरासाठी एकमेकांशी खोटे बोलणारे अनि आणि काव्या एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी त्यांच्याशी खोटे बोलू लागतात आणि हाच या सिनेमाचा युएसपी आहे. पण, एके दिवशी अनिरुद्ध आणि काव्याला त्यांच्या प्रेमप्रकरणाचा सुगावा लागतो आणि जुळत आलेली मने पुन्हा दुरावतात. दोघेही राहते घर सोडून वेगळे होतात.
एक वर्षानंतर काव्या आणि अनिरुद्ध एका संध्याकाळी अनपेक्षितपणे जुन्या घरात पुन्हा भेटतात. दरम्यान च्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते. नोराला अनिरुद्धच्या शिडीची गरज उरलेली नसते तर काव्याने विक्रमला कायमचा निरोप दिलेला असतो. आकाशातील अर्धचंद्राच्या साक्षीने काव्या आणि अनिरुद्ध चे पुन्हा बॅनर्जी आणि गणेशन होतात आणि त्यांच्या पाठमोऱ्या फ्रेममधला लॉन्ग शॉट घेऊन गाण्याच्या पार्शवसंगीताच्या साथीने २ तास १७ मिनिटांचा सुखद अनुभव संपतो.
सिनेमा का पहावा?
विद्या बालन आणि प्रतीक गांधी यांचा संयत आणि दमदार अभिनय आणि इलियाना आणि सेंधील यांची त्यांना लाभलेली सुरेख ही सिनेमाची सशक्त बाजू आहे. सिनेमात एकूण ७ गाणी आहेत आणि सर्व अत्यंत श्रवणीय आहेत. सिनेमाच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत ही गाणी आपली साथ देत राहतात.
ख्वाबो मी सोचा है जो भी वोह बता दू हे गाणे विशेष श्रवणीय आहे.
मुंबईच्या पावसाचे विलोभनीय दर्शन करतानाच कलाकारांच्या देहबोलीतून व्यक्त होणारा अभिनय आणि छोट्या छोट्या निशब्द प्रसंगांतून खूप काही व्यक्त करणारे प्रसंग टिपण्यात सिनेमॅटोग्राफर कार्तिक विजय कमालीचे यशस्वी झाले आहेत, मग ते प्रेम आणि टूथपेस्ट यांच्यातील संबंध दर्शवणारा प्रसंग असो किंवा अनिरुद्ध झोपायला जाताना सगळे दिवे बंद करण्याचा प्रसंग असो, कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विचार दिग्दर्शिकेने जाणीवपूर्वक केला आहे.
एकमेकांना आडनावांनी हाक मारणारे, आपापले गुपित उघडे झाल्यावर संताप अनावर झाल्यावर एकमेकांशी बालिशपणे भांडणारे आणि शेवटी एका वळणावर वेगवेगळ्या दिशांनी जाणारे अनि आणि कावू हे आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. काव्याचे वडील व्यंकट यांनी देखील एका कर्मठ पण तितक्याच प्रेमळ पित्याची भूमिका यथार्थ साकारली आहे.
सिनेमातील कमकुवत बाजू:
अनिरुद्ध आणि काव्या विक्रम आणि नोराच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतानादेखील पुन्हा एकत्र येतात आणि वस्तुस्तिथी कळल्यावर पुन्हा वेगळे होतात आणि शेवटी पुन्हा एकत्र येतात हे फिल्मी वाटते. ख्वाबो मी सोचा है जो भी वोह बता दू, या गाण्याचा इतिहास काय आहे हे शेवटपर्यंत कळत नाही.
सासुरवाडीला अनिरुद्ध आणि काव्या दारू पिऊन घरी जातात आणि त्यांच्या आजोबांचे शव ज्या खोलीत असते त्याच खोलीत चुकून जातात यापेक्षा ते दोघे रात्री बाहेरच राहून सकाळी परत येतात असे दाखवणे जास्त सयुक्तिक वाटले असते. काव्याचा भाऊ कार्तिक याच्याबरोबर काव्याचा एकही संवाद नाही. सगळी गाणी सुश्राव्य असली तरी ती सलग कानावर पडत नाहीत. कथा, पटकथा उत्तम असली तरी संवाद तितकेसे प्रभाव पाडत नाहीत.
निष्कर्ष:
मूळ सिनेमा ‘द लव्हर्स’ या इंग्रजी चित्रपटावरून प्रेरित असलेला हा सिनेमा २ तास तुमचे निश्चितच मनोरंजन करतो. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते, म्हणून उत्तराला पर्याय शोधण्यापेक्षा प्रश्नाचे उत्तर शोधणे कधीही हितकारक असते हाच संदेश देण्याचा प्रयत्न दिग्दर्शिकेने त्यांच्या पहिल्याच सिनेमात केला आहे.
लेखक – डॉ. सुधीर रा. सावंत