मा. इंदिरा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सर्वात जास्त काळ पंतप्रधानपद भूषविलेले पंतप्रधान अशी ज्यांची ओळख आहे. यांना भारताचे सर्वात शिक्षित पंतप्रधान म्हणूनही ओळखले जाते. १९९१ साली भारताला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता त्यावेळी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांची भारताचे अर्थमंत्री म्हणून निवड केली होती. या निवडी संदर्भात विरोध असूनही ज्यांनी भारताचे आर्थिक संकट टाळण्यात आणि भारताला नवीन,सकारात्मक अर्थव्यवस्थेची ओळख करून देणारे “ अर्थव्यवस्थेच्या वळणाचे जनक “ असे ज्यांचे संबोधन करता येईल अशा माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म :-
डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ साली पश्चिम पंजाब म्हणजेच आताच्या पाकिस्तान मध्ये असलेल्या गाह या गावात झाला. १९४७ मध्ये झालेल्या फाळणीत त्यांचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले. त्यांची आई अमृत कौर आणि वडील गुरमुख सिंग हे होत. त्यांच्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला. त्यांचे सुरूवातीचे शालेय शिक्षण उर्दू माध्यमात झाले त्यानंतर भारतात स्थलांतरित झाल्यानंतर अमृतसर येथे पुढील शालेय शिक्षण घेतले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९५७ साली त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्राचे ( Economics) पुढील शिक्षण घेतले. १९६० साली ऑक्सफोर्ड विद्यापीठात त्यांनी डिफिल केले. त्यांच्या डॉक्टरेट प्रबंधासाठी त्यांनी घेतलेला विषय होता “ भारताची निर्यात कामगिरी १९५१-१९६०, निर्यात संभावना आणि धोरण परिणाम “
त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिति ही बेताचीच होती. त्यांचे शिक्षण मात्र त्यांनी स्वकर्तुत्वावर घेतले आहे. जेव्हा त्यांचे शिक्षण सुरू होते त्याचवेळी फाळणी झाली पुढे दंगल,यातच त्यांच्या आजोबांचा मृत्यू या सर्व गोष्टींमुळे त्यांना बोर्डाची परीक्षा देता आली नाही. ती त्यांनी भारतात आल्या नंतर दिली. पुढील शिक्षण मात्र त्यांनी स्कॉलरशिप मिळवून घेतले.
कौटुंबिक माहिती:
डॉक्टर मनमोहन सिंग यांनी १९५८ साली गुरुशरण कौर यांच्याशी विवाह केला. त्यांना तीन मुली आहेत. पहिली मुलगी उपिंदर सिंग, या अशोका विद्यापीठात प्राध्यापिका आहेत. दुसरी मुलगी दमन सिंग या लेखिका आहेत. तिसरी मुलगी अमृत सिंग या अमेरिकेत सिव्हिल लिबर्टीज युनियन येथे वकील कर्मचारी म्हणून काम करतात. त्याच्या तिन्ही मुली या लाईम लाइट पासून खूप लांब आहेत.
राजकीय कारकीर्द:
ऑक्सफोर्ड मध्ये पीएचडी पूर्ण केल्यानंतर ते पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकनॉमिक्स मध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करीत होते.
१९७१ साली त्यांनी भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
१९७२ साली अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली.
१९७६ ते १९८० या सालात ते रिझर्व्ह बँकेचे संचालक म्हणून काम पाहत होते.
१९८० ते १९८२ नियोजन आयोगाचे सदस्य होते.
१९८२ ते १९८५ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते.
१९८५ ते १९८७ नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली.
१९९० ते १९९१ पंतप्रधांनांचे आर्थिक सल्लागार
डॉक्टर मनमोहन सिंग यांचा राजकारणात प्रवेश :-
डॉक्टर मनमोहन सिंग हे राजकारणापासून लांबच होते. पण १९९१ हे साल मात्र त्यांच्या राजकारणातील प्रवेशासाठी खुले झाले. चंद्रशेखर यांचे सरकार कोसळले होते त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणूक प्रचारात १९९१ साली राजीव गांधी यांची हत्या झाली. निवडणूकी नंतर मा. नरसिंह राव पंतप्रधान झाले.
त्यावेळी भारत मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत होता. इराक आणि कुवेत यांच्या युद्धाला सुरुवात झाली होती त्यामुळे तेलाचे दर गगनाला भिडले होते. एनआरआय मंडळींनी भारतातील गुतवणूक जवळ जवळ बंद केली होती. १९९० पासूनच भारतीय बँका मधले डॉलर्स काढून घ्यायला सुरुवात झाली होती. भारताने अल्प मुदतीची भरपूर कर्जे घेतली असल्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण आला होता. यासर्व पार्श्वभूमीवर नरसिंह राव पंतप्रधान झाले होते.
देश आर्थिक दिवाळखोरी पासून वाचला पाहिजे हे एकाच आव्हान पंतप्रधान नरसिंह राव यांच्यावर होते. देशासमोर असलेला आर्थिक पेच सोडविण्यासाठी विशेष अर्थतज्ञाची नेमणूक करणे गरजेचे होते. अर्थमंत्री पदासाठी राजकारणाबाहेरील व्यक्तीची निवड होणे गरजेचे आहे हे त्यांनी जाणले होते. त्यांच्यासमोर दोन नावे होती त्यातल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. पण त्यांना राजी करण्याचे कामाची जबाबदारी ही पी. सी. आलेक्झंडर यांच्यावर सोपविण्यात आली. पी. सी. आलेक्झंडर हे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या काळात पंतप्रधानांचे मुख्य सचिव होते. काही मिनिटांच्या चर्चेनंतर डॉक्टर सिंग यांनी ही जबाबदारी स्वीकारली.
डॉक्टर सिंग यांनी पदभार स्वीकारताच अर्थव्यवस्थेची कोणतीही बाजू लपवून न ठेवता सर्वांसमोर मांडली. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत “ आपल्याकडे कोणतीही जादूची छडी नसल्याचे संगितले.”
आधीच नाजुक स्थिति असलेल्या खासदारांनी नाराजी व्यक्त केली पण लगेचच पंतप्रधान नरसिंह राव, डॉक्टर सिंग आणि रिझर्व्ह बँकेने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. जागतिक चलंनांच्या मानाने भारतीय रुपयाची किमत ७ टक्क्यांनी कमी करण्यात आली. त्यानंतर ११ टक्क्यांनी कमी करण्यात आली.
आपण जी आयात करीत होतो त्या वस्तूंचे पेमेंट करण्यासाठी सरकारला परकीय चलनाची गरज होती. त्या आधीच्या चंद्र्शेखर सरकारने युनायटेड बँक ऑफ स्वित्झर्लंड मध्ये २० मेट्रिक टन सोन गहाण ठेवले होते. मा. नरसिंह राव यांच्या १९९१ या काळात सरकारने ४६.९१ टन सोन बँक ऑफ इंग्लंड मध्ये गहाण ठेवून २० कोटी डॉलर्स आणि त्यानंतर ४० कोटी डॉलर्स एवढी रक्कम भारताकडे जमा झाली. सुरक्षेच्या कारणामुळे या निर्णयाचा कुठलाही गवगवा न करता हा निर्णय अमलात आणला गेला. देशाला दिवाळखोरी पासून वाचवण्यासाठी सरकारने जे सोन गहाण ठेवले होते ते डिसेंबर १९९१ मध्ये परत आणले.
पण डॉक्टर सिंग यांच्या या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची दिशा मात्र निश्चित बदलली असे अर्थशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आजही भारताची अर्थ व्यवस्था अशाच नाजुक स्थितीत पोहोचली आहे. यातून बाहेर येण्यासाठी पुन्हा तोच फॉर्म्युला वापरण्याची गरज आहे.
१९९१ मध्ये डॉक्टर सिंग यांचा जो अर्थ संकल्प सादर करण्यात आला त्यामुळे देशाच्या आर्थिक सुधारणा आणि उदारीकरणांना खऱ्या अर्थाने वाट मिळाली. याच काळात भारतीय बाजारपेठेच्या विस्तारीकरणाला वाव मिळाला. २००७ मध्ये भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी दुसरी प्रमुख अर्थ व्यवस्था अशी ओळख निर्माण झाली.
अमेरिकेसारख्या आर्थिक दृष्ट्या बलाढ्य देशा बरोबर आपले संबंध आणखी दृढ झाले तसेच २००५ साली भारत-अमेरिका नागरी आण्विक कराराच्या वाटाघाटीही याच काळात सुरू झाल्या. त्यानंतर अणुकराराच्या घोषणेमुळे भारताचा अमेरिकेच्या आण्विक इंधन आणि तंत्रज्ञानातील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला.
डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्यावर होणार्या टीकेला न जुमानता देशाच्या हिताचा संकल्प साध्य करून दिला. ते नेहमीच विनम्र राहिले.
ते राज्यसभेचे सभासद होते. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते व्हीलचेअर वर बसून आपली नेहमीची उपस्थिती नोंदवित होते. एप्रिल २०२४ मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी राजकीय निवृत्ती घेतली. “विद्या विनयेन शोभते” याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग.
मैत्रिणींनो तुम्हाला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याविषयी माहिती कशी वाटली? तुम्हाला माहिती आहे का की भारताची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने सांभाळली पाहीजे? डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ज्या पद्धतीने बजेट सादर केले त्याविषयी तुम्हाला काय वाटते? तुम्हाला ही माहिती आवडली का? तर हा लेख वाचून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.
तेही कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.”
लेखिका : सपना कद्रेकर मुंबई