फटाके उडवण्यामागची परंपरा आणि पर्यावरण पूरक दिवाळी साजरे करण्याचे उपाय.

WhatsApp Group Join Now

फटाके उडवण्यामागची परंपरा आणि पर्यावरण पूरक दिवाळी साजरे करण्याचे उपाय.

        दिवाळी अर्थात दीपावली हा खरंतर दिव्यांचा सण; अंधारावर प्रकाशाने मात करण्यासाठी केलेला दीपोत्सव !! दिवाळी म्हटलं की दिव्यांची रोषणाई, नविन वस्त्र-आभूषणांची खरेदी, भेटी-गाठी, मिठाया आणि फराळाचे पदार्थ आणि फटाके!! या साऱ्या गोष्टींशिवाय दिवाळीचा आनंद अपूर्ण आहे.

दिवाळीचे ऐतिहासीक, सांस्कतिक महत्व :-

   हिंदू धर्मामध्ये दिवाळी या सणाला धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. आपल्या आयुष्यातील नकारात्मकता व निराशेला घालवून देण्यासाठी दिवे, पणत्या लावून, फटाके वाजवून आसमंत प्रकाशमय केला जातो. सर्व समुदायांना बरोबर घेवून आनंद, उत्साह व्यक्त करण्याचे द्योतक म्हणजे दिवाळी. एकतेची भावना जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. 

    चौदा वर्षांचा वनवास संपवून, रावणाचा पराभव करून जेंव्हा श्रीरामचंद्र, लक्ष्मण, सीता अयोध्येत परतले त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी दिवे उजळून, आतिषबाजीने आयोध्यानगरी प्रकाशमान करण्यात आली होती. आपल्या प्रिय राजाच्या आगमनार्थ जल्लोष व्यक्त करण्यात आला.

     तसेच दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरोघरी देवी लक्ष्मीचेही आगमन होते. लक्ष्मीमातेच्या स्वागतासाठी दिव्यांचा लखलखाट व फटाक्यांची आतिषबाजी केली जाते.

फटाक्यांचा पूर्वेतिहास :-

          प्राचीन भारताला ‘अग्निचूर्णाची’ (सॉल्टपेट्रे) माहिती होती याचे पुरावे काही संस्कृत ग्रंथात सापडतात. ‘अग्नीचूर्ण’ म्हणजे  ‘विस्तवाला फोडणारी पावडर’. युद्धभूमीत शत्रूला विचलित करण्यासाठी  सॉल्टपेट्रे अर्थात अग्नीचूर्ण वापरले जायचे असे कौटिल्याच्या अर्थशास्त्रात म्हटले आहे.

    दिवाळीत दिवे लावून चराचर उजळून टाकण्याची परंपरा आहे असे शास्त्रवचन, पुरावे सापडतात. त्यानंतर म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात चंद्रनळे व तोटे यांचे काही उल्लेख आढळतात. परंतु फटाके उडवून दिवाळी साजरी करण्याची प्रथा केव्हापासून सुरू झाली याचे निश्चित पुरावे सापडत नाहीत. पेशव्यांच्या काळातही फटाके उडवून दिवाळी साजरी करण्याची प्रथा नव्हती. दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पोटात दारू भरून आतिषबाजी केली जात असे. बहुतेक वेळा लग्नकार्यांच्या वरातीतदेखील आतिषबाजी केली जात असे. 

फटाके का फोडले जातात; याची सुरुवात केव्हांपासून झाली :

    दिवाळीत फटाके उडवण्याची परंपरा केव्हापासून सुरू झाली हे नेमके सांगता येत नाही. परंतु अगदी अलीकडे म्हणजे सन १९४० च्या आसपास शिवकाशी येथे दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी केली जायची. तेथे वैशिष्ट्यपूर्ण फटाके उडवले जायचे. हळूहळू ही प्रथा सर्व भारतभर प्रसिद्ध झाली व लोकांनी तिथून फटाके आणून उडवायला सुरुवात केली. त्यामुळे शिवकाशी हे ठिकाण फटाक्यांसाठी प्रसिद्ध झाले व आजही आहे.

      अजून एक संदर्भ असा की साधारण याच सुमारास

चंद्रभागेच्या वाळवंटात फटाक्यांची ‘लुटुपुटीची मारामारी’ होत असे. ती पहायला खूप दुरून हौशी लोक मोठ्या उत्साहाने येत असत. त्यात काहीजण जखमीदेखील होत परंतु ही पद्धत चालूच राहिली. त्यानंतर १९४२ मध्ये ब्रिटिशांनी ही प्रथा बंद पाडली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती पुन्हा चालू केली गेली. परंतु त्यामध्ये पूर्वीइतका जोम राहिला नसल्याने ती हळूहळू लोप पावली. मात्र १६व्या १७व्या शतकातील काही चित्रे असेही दाखवतात की दिवाळीत फटाक्यांचा वापर केला जात असे.

  याबाबतीत अजून एक धारणा अशी आहे की दिवाळीपूर्वी नवरात्र येते. नवरात्राच्या आधी जो पितृपक्ष येतो. त्या पितृपक्षात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात. यावेळी त्यांना तृप्त करण्याचा आपण प्रयत्न करतो. पितरांना येण्याचा मार्ग माहिती असतो. याकरिता दिवाळीत फटाके वाजवून आकाशमार्ग उजळवून टाकला जातो. पितरांना पुन्हा त्यांच्यास्थानी जाण्यास मदत केली जाते. फटाके वाजवण्याच्या या प्रथेला ‘आकाशदीपम्’ असे म्हटले जाते. हातात ‘उल्का’ अर्थात ‘अग्नी’ धरून किंवा प्रज्वलित करून पितरांचा आकाशमार्ग उजळून टाकला जातो व त्यांना पुन्हा त्यांच्या स्थानी स्थापित केले जाते.

     काही इतिहासकारांच्या मते पूर्वी युद्धात ‘गन पावडर’ वापरली जायची. त्यापासून फटाके बनवून ते उडवण्याची परंपरा चालू झाली असावी. काही जाणकारांच्या मते फटाके उडवणे हा ‘चिनी’ संस्कृतीचा प्रभाव आपल्यावर पडलेला दिसतो.

पर्यावरणपूरक दिवाळी कशी साजरी करावी :-

       दिवसेंदिवस विविध कारणांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडू लागला आहे. हे आपण सर्वजण जाणतोच. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण हे युध्दासारख्या विनाशकारी हानीपेक्षा तात्पुरत्या स्वरुपाचे आहे. सर्वच समुदायानी आपले सण साजरे करताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी आपण काही गोष्टी करु शकतो त्या आज आपण पाहू :-

१. ‘एक गाव एक गणपती’ या आधुनिक संकल्पनेप्रमाणे ‘एक गाव एक आतिषबाजी’ म्हणजे एका गावातील किंवा उपनगरातील लोकांनी ठराविक  ठिकाणी एकत्र येऊन मोकळ्या मैदानावर अथवा गावाबाहेर मोठ्या पटांगणात फटाक्यांची आतिषबाजी करता येईल. 

२. फटाके उडवण्याची अथवा पाहण्याची विशेष आवड आहे अशा लोकांनी गाव, शहरात आपापल्या घरासमोर किंवा सोसायटीत फटाके न उडवता, मुलांना आतिषबाजी दाखवायला अशा एका विशिष्ट ठिकाणी घेऊन जाता येईल. 

३. दिवाळीच्या ऋतूत हवेचे वहन थोडे कमी प्रमाणात असते. अशाप्रकारे गाव, उपनगराबाहेर फटाके उडवल्यास  शहरामध्ये असणाऱ्या प्रदूषणात आणखी वाढ होणार नाही. पर्यायाने लहान मुले, अशक्त, आजारी व्यक्ती, वृद्धलोक, मुके प्राणी यांना जो नाहक त्रास सहन करावा लागतो तो करावा लागणार नाही. पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेऊन असे स्तुत्य उपक्रम काही ठिकाणी राबवायला सुरुवात केली आहे.

 ४. काही संशोधकांनी पर्यावरणपूरक फटाके निर्माण करता येतील का याबाबत संशोधन करून पर्यावरण पूरक फटाके तयारदेखील केले आहेत. याप्रकारच्या फटक्यांमुळे नेहमीच्या फटाक्यांपेक्षा ३०% कमी प्रदूषण होते. असे फटाके आपण वापरू शकतो.

५. आपल्याच देशात उत्पादन झालेले, तुलनेने कमी आवाज, कमी प्रदूषणकारी वायू उत्सर्जित करणारे असे ग्रीन (हिरवे) फटाके आपण वापरू शकतो. यातील काही फटाक्यांमध्ये हानिकारक रसायने अजिबात वापरली जात नाहीत.

६. सध्या भारतात तीन प्रकारचे ‘ग्रीन’ फटाके उपलब्ध आहेत. यांचा वापर केल्यास हा व्यवसाय करणाऱ्याना देखील प्रोत्साहन मिळेल.

४. रंगीत,चकचकीत कागद वापरून, विविधरंगी फुगे फोडून लहान मुलांना फटाक्यांचा आनंद देता येऊ शकेल. तसेच फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनादेखील टाळता येतील.

५. लहान मुलांना मंदिरांमध्ये, वृध्दाश्रम वगैरे  ठिकाणी पणत्या, दिवे लावण्यासाठी नेवून त्यांना यातून आनंद देता येईल.

६. मुलांना विज्ञानात रुची निर्माण करणे, ज्ञानरंजन, अनाथाश्रमात मिठाईवाटप असे पर्याय उपलब्ध करून देता येतील. दुर्गभर्मंती, किल्ले बनवणे, त्यांचे प्रदर्शनभेट असे उपक्रम केले तर फटाके वाजवण्याकडचा मुलांचा कल कमी होईल. त्यातून होणाऱ्या गंभीर दुखापतींपासून देखील मुलांचे संरक्षण होईल.

७. फटाके न उडवल्यास त्या पैशात एखादी सहल, जादूचे प्रयोग, मुलांच्या आवडीची वस्तू घेऊन देणे वगैरे गोष्टी करता येऊ शकतील. असे विवीध पर्याय योजता येतील.

 जगभरात सर्वत्र विवीध प्रसंगी मोठया प्रमाणात फटाके वाजवले जातात हे आपण जाणतोच. फटाक्यांमुळे नायट्रोजन डायॉक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायॉक्साईड असे हानिकारक वायू वातावरणात अतिप्रमाणात सोडले जातात. या विषारी वायुंमुळे  श्वसनमार्गाला अडथळा निर्माण होऊन दमा-अस्थमा अशा प्रकारचे विकार असणाऱ्या लोकांना श्वसनाला त्रास होतो. एलर्जीज, फुफुसांचे आरोग्य बिघडणे इत्यादी तक्रारींचे प्रमाण वाढते. फटाक्यातून उत्सर्जित होणारी काही घातक, विषारी रसायने लवकर किंवा पूर्णपणे विघटित होत नाहीत. ती रसायने वातावरणात तशीच राहिल्यामुळे मानवी आरोग्यावर अतिशय घातक परिणाम करतात.

       भारतातच केवळ दिवाळीत फटाके उडविले जातात असे नाही. तर सणसमारंभाच्या, लग्नकार्यांच्या व इतर प्रसंगी, खेळाचे सामने जिंकल्यानंतरदेखील जगभरात अनेक ठिकाणी फटाके उडवले जातात. हे सर्व एका मर्यादेत असले पाहिजे. कोणतीही गोष्ट इतरांना सांगण्याआधी स्वतःपासून याची सुरुवात केली तर ती जास्त परिणमकारक होते. पर्यावरणरक्षणातील आपला खारीचा वाटा आपण उचलण्याचा प्रयत्न करूया व इतरांनाही उद्युक्त करूया

     माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून गणला जातो. त्याने स्वतःबरोबरच इतर जीवसृष्टीचादेखील विचार केला पाहिजे. आपले जगणे पर्यावरणपूरक असावे. इतरांचे आरोग्य व जगणे बिघडवून केवळ आपणच आनंद मिळवणे हे कोणत्याही संवेदनशील मनुष्याला रुचण्यासारखे नाही. जगभरात याविषयी जनजागृति करणे आवश्यक आहे.

   आपल्या संस्कृती, परंपरा जपून सर्वांनी आपआपले सणवार निश्चितच साजरे केले पाहिजेत. ते करत असताना आपल्याला आनंद मिळवण्यासाठी इतरांचे जगणे असह्य होऊ नये याची जाणीव मात्र ठेवली पाहिजे.

      “अति सर्वत्र वर्जयेत” या एका संस्कृत वचनाप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा मानवाला विनाशाकडेच घेऊन जाणारा ठरू शकतो. सर्व मानवजातीने याचा विचार करून, आपल्या भावी पिढीसाठी एक पाऊल मागे येवून, चांगल्या गोष्टींची सुरूवात आपल्यापासून केली पाहिजे.

 दीपावलीच्या आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

ही दीपावली आपणा सर्वांना सौख्याची, आनंदाची जावो ही सदीच्छा!!

शुभं भवतु!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top