‘फायटर’ – एरियल ॲक्शन थ्रिलर
नुकताच २५ जानेवारीला भारतातील पहिला एरियल ॲक्शन थ्रिलर, बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण अभिनित ‘फायटर’ हा चित्रपट रिलिज झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या जोडून आलेल्या सुट्ट्यांच्या कालावधीत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती वायकॉम18 स्टुडिओ आणि मार्फलिक्स पिक्चर्स यांनी संयुक्तपणे केली आहे. बँग बँग, वॉर आणि पठाण फेम सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर, कारण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय यांच्या मुख्य भूमिका आहेत. नियोजित एरियल ॲक्शन फ्रँचायझी मधील हा पहिला चित्रपट आहे.
१० जानेवारी २०२१ मध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. नोव्हेंबर २०२२ मध्ये चित्रीकरणाची सुरुवात आसाम, हैदराबाद, जम्मू आणि काश्मीर आणि मुंबईमधील विविध ठिकाणी झाली आणि ऑक्टोबरच्या उत्तरार्धात ती पूर्ण झाली. वास्तविक जीवनातील भारतीय हवाई दलाच्या कॅडेट्सनी या चित्रपटासाठी काम केले. चित्रपटात २०१९ चा पुलवामा हल्ला, २०१९ बालाकोट हवाई हल्ला आणि २०१९ भारत-पाकिस्तान सीमा चकमकींचा संदर्भ आहे. विशाल-शेखर या जोडीने बनवलेल्या चित्रपटाच्या अल्बममध्ये पाच गाणी आहेत.

बघूया कसा आहे चित्रपट.
कथा:
श्रीनगर बेस कॅम्पवर शत्रूचा संभाव्य ह*ल्ला लक्षात घेऊन भारतीय वायुसेना कॅप्टन रॉकीसह एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे. शमशेर पठानिया, उर्फ पॅटी (हृतिक रोशन), मिन्नी राठोर उर्फ मिन्नी (दीपिका पदुकोण), सरताज गिल (करण सिंग ग्रोव्हर) या टीमचा भाग आहेत. राकेश जय सिंग, उर्फ रॉकी (अनिल कपूर), त्यांचा कमांडिंग ऑफिसर आहे. ताज – कारण सिंग ग्रोव्हर आणि बास – अक्षय ओबेरॉय एकदा पकडले जातात आणि पॅटीला त्याची शिक्षा मिळते. चित्रपटाचा शेवट एका धाडसी बचाव मोहिमेभोवती फिरतो. शेवटी कोण जिंकते हे चित्रपटामध्ये पाहण्यासारखे आहे.
प्लस पॉइंट्स:
सिद्धार्थ आनंदच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच, फायटरच्या कथानकात वेगळे असे काही नाही, परंतु दिग्दर्शक पुन्हा एकदा त्याच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणे आपल्याला बहुतेक भागांमध्ये गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतो. सुरुवातीच्या चाळीस मिनिटांचा किंवा त्यापेक्षा जास्त काळ पात्रांच्या परिचयासाठी वापरला आहे, आणि नंतर खरी कथा सुरु होते. जोरदार एरियल अॅक्शन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात.
लढाऊ विमानांची साहसदृश्ये खूपच रोमांचकारी झाली आहेत. त्याबद्दल ‘फायटर’ टीमचे अभिनंदन. ही युद्ध दृश्ये कथानकात महत्वाचे योगदान देतात. पाहणाऱ्यांना एक वेगळाच अनुभव मिळतो. हॉलिवूडच्या तोडीस तोड हि दृश्ये झाली आहेत. टीमने हवाई दृश्यांचे बारकाईने चित्रीकरण केलेले आहे. फायटरची दुसरी जमेची बाजू म्हणजे त्याची काही भावपूर्ण दृश्ये, विशेषत: दुसऱ्या हाफ ( भाग) मध्ये येणारी. सामान्यतः ॲक्शन फ्लिक्समध्ये पुरेशी भावनिक खोली नसते, परंतु ‘फायटर’ला या पैलूमध्ये गुण मिळून जातो. आशुतोष राणाची छोटीशी भूमिका प्रभाव पाडून जाते.
या स्टायलिश ॲक्शन चित्रपटात हृतिक रोशन छाप पाडून जातो. हृतिकचा जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स नेहमीच पाहण्यासारखा असतो. त्याचा चाणाक्षपणा, संवाद वितरण, संयत अभिनय आणि व्यक्तिमत्व या चित्रपटाला खूप मदत करते. दीपिका पादुकोणसोबतही त्याची चांगली केमिस्ट्री जमून आली आहे. या जोडीचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एका फ्रेश जोडीचे दर्शन रुपेरी पडद्यावर मिळते. दीपिकाने तिची भूमिका चोख बजावली आहे. अनिल कपूर, अक्षय ओबेरॉय आणि करण सिंग ग्रोव्हर आपापल्या भूमिकेत छान आहेत. एका लहान भूमिकेत संजीदा शेख भाव खाऊन जाते. रिषभ साहनीचा खलनायक साहसदृश्यात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो.
मायनस पॉईंट्सः
फायटरची गाणी आणि पार्श्वसंगीत काही विशेष प्रभाव पाडत नाहीत. वंदेमातरम ट्रॅक वगळता, पार्श्वसंगीत फारसे जमले नाही. पार्श्वसंगीत जर चांगले असते तर प्रभाव काही अंशांनी वाढू शकला असता. काही संवाद आपल्याला ‘उरी’ची आठवण करून देतात. चित्रपटाची कथा साचेबद्ध असल्याने इतर देशभक्तीपर चित्रपटांशी तुलना करणे अपरिहार्य ठरते. हा चित्रपट ग्रामीण प्रेक्षकांपेक्षा शहरी प्रेक्षकांना अधिक आकर्षित करू शकतो त्यामुळे बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनला काही प्रमाणात अटकाव होऊ शकतो. मध्यांत रापूर्वी एरियल ॲक्शन सीक्वेन्स खूप चांगली झाली आहेत. पण मध्यांतर खूप अचानकपाने समोर येतो.
तांत्रिक बाबी:
आधी नमूद केल्याप्रमाणे संगीत आणि पार्श्वसंगीत समाधानकारक नाहीत. इतर तांत्रिक बाबींबाबत ‘फायटर’ पूर्ण गुण मिळवतो. सच्चिथ पाउलोसचे कॅमेरा वर्क उत्तम आहे. लढाऊ विमानांची मारामारी दरम्यान कॅमेऱ्याच्या हालचाली उत्साहवर्धक आहेत. व्हीएफएक्सची कामे चांगली झाली आहेत आणि तो चित्रपटाचा सर्वात मोठा यूएसपी ठरतो. एडिटिंग चांगले झाले आहे. सिद्धार्थ आनंदने एक नेहमीची कथा घेऊनदेखील बऱ्यापैकी आकर्षक चित्रपट बनवला आहे. त्यांची चित्रपटनिर्मितीची शैली उत्तम आहे. सिद्धार्थने ज्याप्रकारे हवाई युद्धाच्या दृश्यांची बांधणी केली आहे ती उत्कृष्ट झाली आहे. यासाठी ॲक्शन कोरिओग्राफर विशेष कौतुकास पात्र आहे. विशेषत: हवाई दलाच्या लष्करी विमानांमधील जवळचा लढा,चे त्यांचे संभाषण प्रेक्षकांना बांधून ठेवतात.
निष्कर्ष:
एकंदरीत, ‘फायटर’ हा एक एरियल अॅक्शन चित्रपट आहे जो चकचकीत अॅक्शन ब्लॉक्सने आणि हृतिक रोशनच्या अभिनयाने परिपूर्ण झाला आहे. कथेत काहीही नावीन्य नाही, परंतु सिद्धार्थ आनंद चित्रपटात आकर्षक दृशांची अशी काही पेरणी करतो की प्रेक्षकांना तो कंटाळवाणा होत नाही. दीपिका पादुकोण, अनिल कपूर आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या भूमिका उत्तम आहेत. पण जर एखाद्याला ठोस कथेची अपेक्षा असेल, तर तिथे थोडीशी निराशा होऊ शकते जर तुम्हाला हे ठीक असेल, तर एकंदरीत ‘फायटर’ चित्रपट त्याच्या तांत्रिक बाबींसाठी पाहू शकता. एकूणच काय सादरीकरण उत्तम असेल तर साधारण चित्रपटदेखील भाव खाऊन जातो.
‘फायटर’ मूळतः ३० सप्टेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार होता परंतु चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब झाला. चित्रपटाला सध्या संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा. धन्यवाद !
लेखिकाः श्रुती गपाटे, पुणे
छानच चित्रपट परीक्षण