FIR कशी आणि कुठे दाखल करावी?-
गुन्हेगारी कृत्य घडल्यानंतर त्याबद्दल पहिली माहिती पोलिसांना देणे म्हणजेच संबंधित गुन्ह्याबद्दल FIR दाखल करणे होय.FIR म्हणजे “First Information Report”.
FIR दाखल करणे म्हणजे संबंधित गुन्हेगार व्यक्ती बद्दल तक्रार दाखल करणे. एफ आय आर म्हणजे मौखिक किंवा लिखित स्वरूपात घडलेल्या गुन्ह्याबद्दल माहिती पोलिसांना सांगणे. ही माहिती पीडित व्यक्ती किंवा त्याचे नातलग पोलिसांना देऊ शकतात. गुन्हा घडल्यानंतर FIR कशी दाखल करावी याची माहिती आपण पाहणार आहोत.ही तक्रार दाखल करताना सामान्य व्यक्तीच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या आजच्या या सदरात पाहणार आहोत-

1)FIR कुठे दाखल करावी?
2) FIR कशी दाखल करावी?
3) FIR कधी दाखल करावी?
4) FIR कोण दाखल करू शकते?-
5) गुन्ह्याचे प्रकार-
1.दखलपात्र गुन्हा-
2.अदखलपात्र गुन्हा-
3.कोर्ट complaint करणे म्हणजे काय?-
6)FIR नंतरची पोलीस प्रोसेस कशी असते?-
7) जर पोलीस FIR दाखल करून घेत नसतील तर-
1) FIR कुठे दाखल करावी?-
एखादा गुन्हा घडल्यानंतर तुम्ही FIR ही नजीकच्या कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये दाखल करता येऊ शकता.FIR दाखल केल्यानंतर संबंधित तक्रारही त्या हद्दीतील पोलीस स्टेशन कडे वर्ग करण्यात येते आणि त्यानुसार संबंधित गुन्ह्याचा पोलीस तपास सुरू करण्यात येतो.FIR ही आपल्याला लिखित स्वरूपातही दाखल करता येऊ शकते, तसेच FIR ही ऑनलाईनही दाखल करता येऊ शकते.
2) FIR कशी दाखल करावी?-
संबंधित गुन्हा घडल्यानंतर त्याची तात्काळ तोंडी माहिती पोलिसांना देऊन आपण त्या गुन्ह्याविषयी तक्रार दाखल करू शकतो किंवा आपण लिखित स्वरूपातही एफ आय आर दाखल करू शकतो. FRI दाखल केल्यानंतर त्या बाबतची NC ही तक्रारदार व्यक्तीला देणे हे पोलिसांना बंधनकारक असते.तसेच तुम्ही online ही FIR दाखल करून त्याची NC घेऊ शकता.
3) FIR कधी दाखल करावी?-
एखादे गु*न्हेगारी कृत्य घडल्यानंतर तात्काळ त्यासंबंधीची सर्व माहिती पोलिसांना देऊन एफ.आय.आर दाखल करावी. महिला संबंधित तक्रारी या महिला तक्रारदारांना पोलीस स्थानकात फोन करून दाखल करता येऊ शकतात. किरकोळ गुन्हे हे पोलीस संकेतस्थळावरही तक्रार देऊन दाखल करू शकतो.
4) FIR कोण दाखल करू शकते?-
गुन्हातील पीडित व्यक्ती,गुन्हातील साक्षीदार किंवा पीडीत व्यक्तीचे नातेवाईक हे FIR दाखल करू शकतात. जर कोणी घाबरून FIR दाखल करत नसेल तर त्यावेळेस पोलिसांना स्वतः हून FIR दाखल करावी लागते. गुन्हा नोंद करून घ्यावा लागतो एफ.आय.आर दाखल करणे म्हणजे पोलिसांना तपासात सहकार्य करणे होय.
5)गुन्ह्यांचे प्रकार –
पोलीस स्टेशन मध्ये एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यांचे दोन प्रकारात वर्गीकरण करण्यात येते. एक म्हणजे दखलपात्र गुन्हे आणि दुसरे अदखलपात्र गुन्हे,
1) दखलपात्र गुन्हा-
दखलपात्र गुन्हा म्हणजे या गुन्ह्याची दखल ही पोलिसांना घ्यावीच लागते आणि संबंधित त्वरित ॲक्शन ही घ्यावी लागते.या गुन्ह्यामध्ये पोलीस संशयताला विदाऊट वॉरंट अटक करू शकतात.दखलपात्र गुन्हे म्हणजे खुन,बलात्कार इत्यादी ज्यात त्वरित पोलीस कारवाई करणे हे गरजेचे असते.
2) अदखलपात्र गुन्हे-
अदखलपात्र गुन्हे म्हणजे किरकोळ स्वरूपातील गुन्हे यात कोणतीही ॲक्शन ही पोलिसांना मॅजिस्ट्रीच्या परवानगीशिवाय घेता येत नाही.
3) कोर्ट complaint म्हणजे काय?-
एखाद्या गुन्ह्याविषयी एफ.आय.आर दाखल न करता कोर्ट मार्फत कंप्लेंट करणे म्हणजे डायरेक्ट कोर्ट मध्ये एखाद्या गुन्ह्याची नोंद करणे यामध्ये कोर्ट ऑर्डर नुसार पोलीस हे ॲक्शन घेत असतात.
6) FIR नंतरची पोलीस प्रोसेस कशी असते?-
एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हणजेच एफ.आय. आर ची नोंद झाल्यानंतर पोलीस हे सदर घटनेचा तपास सुरू करतात. पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी किंवा चौकशीसाठी पोलीस तात्काळ संशयताला दखलपात्र गुन्ह्यांमध्ये विदाऊट वॉरंट अटक करून सदर गुन्ह्याचा तपास चालू करू शकतात. प्रत्येक गुन्ह्याच्या तपासासाठी FIR हा महत्त्वाचा दस्तावेज आहे. गुन्ह्याचा तपास करताना पोलीस हे FIR मधील माहिती वाचूनच तपास करत असतात. त्यामुळे एफ.आय.आर दाखल करताना पीडित व्यक्तीने घटनेचा क्रम,घटनेचे स्थळ आणि घडलेली घटना याची खरी आणि सत्य माहितीच पोलिसांना सांगणे गरजेचे असते. एफ आय आर दाखल झाल्यानंतर पीडित व्यक्तीने ती वाचून त्याच्यावरती सही करावी आणि त्याची पोच म्हणजे NC ही पोलिसांकडुन घ्यावी. एफ.आय.आर दाखल झाल्यावर कुठल्याही व्यक्तीला संशयीत म्हणून अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट समोर हजर करणे हे पोलिसांना बंधनकारक असते.पीडित व्यक्ती हा जखमी किंवा गंभीर जखमी झाला असेल तर गुन्ह्यातील पीडित व्यक्तीचे नातलग हे एफ.आय.आर दाखल करू शकतात.
एफ.आय.आर च्या नोंदीनंतर पोलीस हे गुन्हा घडलेल्या जागी जाऊन संबंधित जागेचे निरीक्षण करून संबंधित पुरावे गोळा करतात.हे पुरावे पोलीस नंतर कोर्टासमोर हजर करतात. पीडीत व्यक्तीने सांगितलेली मौखिक माहिती ही कुठल्याही कायदेशीर प्रोसेस मध्ये अत्यंत महत्त्वाची असते, या माहितीची सत्यता तपासणी हे पोलिसांचे काम असते आणि या तपासानुसारच पोलीस हे खऱ्या गुन्ह्यागारापर्यंत पोहोचत असतात. पोलीस तपास चालू असताना संशयित व्यक्तीच्या कुठल्याही मूलभूत हक्कावर गदा येऊ न देणे यासाठी आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये विविध कायदे आणि नियम बनवण्यात आलेले आहेत. त्या नियमानुसार संशयित व्यक्तीला कायदेशीर मदत हवी असेल ती Legal Aid कडुन देणे.संबंधित व्यक्तीला अटक झाल्यानंतर त्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना देणे हे पोलिसांना बंधनकारक असते म्हणजे अटक झाल्यानंतर संशयित व्यक्ती हे जामीनासाठी कोर्टामध्ये अर्ज करू शकते. संशयित व्यक्तीला जर मेडिकल सुविधाची गरज असेल तर ती सुविधा सुद्धा पुरवली जाते. आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार न्याय हा नैसर्गिक न्याय झाला पाहिजे. कुठल्याही व्यक्तीवर अन्याय झाला नाही पाहिजे यासाठी संशयित व्यक्तीला गुन्हेगारासारखी ट्रीटमेंट न देता त्याच्या मूलभूत हक्कावरती कुठलीही गदा न आणता पोलिसांनी त्यांची कारवाई करणे हे गरजेचे असते. ही सगळी एफ.आय. आर नंतरची कायदेशीर प्रोसेस असते.
7) जर पोलीस FIR एफ आय आर दाखल करून घेत नसतील तर-
पीडित व्यक्ती किंवा तिचे नातेवाईक एफ. आय.आर दाखल करण्यासाठी नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर जर पोलीस कार्यक्षेत्राचे कारण सांगून एफ आय आर दाखल करून घेत नसतील.तर तात्काळ त्यांना आपण ही एफ आय आर दाखल करून घटनेच्या हद्दीतील पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करा म्हणून विनंती करू शकतो. त्यांच्या हद्दीत घडलेल्या कुठल्याही दखलपात्र गुन्ह्याची तक्रार दाखल करून घेणे हे पोलिसांना बंधनकारक असते.
जर पोलीस एफ.आय.आर दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असतील तर याची कंप्लेंट तुम्ही त्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे करू शकता किंवा कोर्ट कंप्लेंट करून त्या एफ.आय.आरची नोंदणी पोलीस स्टेशनमध्ये करा म्हणून न्यायालयात विनंती करू शकता.कोर्ट ऑर्डर नुसार पोलीस तात्काळ एफ.आय.आर नोंदवून घेतात. पीडित व्यक्ती ही ऑनलाइन किंवा ॲप द्वारे सुद्धा तक्रार दाखल करू शकते याची ऑनलाईन नोंद होऊन पीडित व्यक्तीला त्याची NC ही डाऊनलोड करता येते.एफ.आय.आर ची नोंद झाली की पोलिसांना ॲक्शन ही घ्यावीच लागते.
काही वेळेस परस्परातील वैरभाव किंवा द्वेषापोटी काही लोक परस्परविरुद्ध तक्रार दाखल करतात म्हणजेच खोटी एफ आय आर दाखल करतात.अशी खोटी एफ.आय.आर दाखल केल्यानंतर समोरच्या व्यक्तीचा विनाकारण वेळ आणि पैसा वाया जातो.तसेच संबंधित व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा ही मलीन होते होते.अशावेळेस एखादा निरापराध व्यक्ती विनाकारण खोट्या केस मध्ये अडकला जाऊ शकतो म्हणूनच एफ.आय.आर दाखल केल्यानंतर घडलेल्या घटनेचा पोलीस तपास हा निपक्षपातीपणे होणे गरजेचे असते.जर कोणी तुमच्या विरुद्ध खोटी एफ.आय.आर दाखल केली असेल तर तुम्ही न्यायालयीन मदत घेऊन दाखल केलेल्या एफ.आय.आर ला आव्हान देऊ शकता आणि तुमचा निर्दोषपणा सिद्ध करू शकता.
लेखिका-Adv.Vinita Zade Mohalkar
अतिशय उपयुक्त माहिती.