श्री गणेशाच्या मोहक स्वरूपाचा प्रतिकात्मक अर्थ

WhatsApp Group Join Now

श्री गणेश म्हणजे हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत. या दैवताला सर्वत्र अग्रपूजेचा मान मिळाला आहे. कोणत्याही कार्याला सुरुवात करताना सर्वप्रथम या विघ्नहर्त्याची पूजा करून कार्य सिद्धीस नेण्यासाठी त्याला साकडं घातलं जातं. 

अशा या गणेशाचे स्वरूप अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. हत्तीचे डोके, मोठे पोट अशी त्याची ठळक वैशिष्ट्ये. याच वैशिष्ट्यांमुळे श्री गणेशाला ‘गजानन’, ‘गजवदन’, ‘लंबोदर’, ‘शूर्पकर्ण’, ‘एकदंत’ अशा अनेक नावांनी ओळखले जाते. 

पण गणेशाचे स्वरूप असे का आहे? श्री गणेशाच्या मोहक स्वरूपाचा प्रतिकात्मक अर्थ  समजून घेण्याचा  मात्र क्वचितच विचार केला जातो. हाच अर्थ समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करू. त्यामुळे गणेशाप्रती असलेली आपली दृढ श्रद्धा आणि भक्ती अधिक डोळस होईल.

श्री गणेशाचे स्वरूप आणि त्याची विविध नावे:

श्री गणेशची प्रतिमा आपल्याला विविध स्वरुपात पहावयास मिळते. कदाचित ही एकमात्र देवता अशी असावी जिचे पूजन भक्त इतक्या विविध रुपात करतात. गणेश म्हणजे ‘गणांचा ईश’. शिव पार्वतीच्या सेवकांना ‘गण’ असे संबोधले जाते. या गणांचा ईश (स्वामी) म्हणून गणेश तसेच ‘गणांचा अधिपती’ म्हणून ‘गणपती’ या नावांनी त्याला संबोधले जाते. ‘विशेष नायक’ म्हणून त्याला ‘विनायक’ असेही संबोधतात. 

श्री गणेशाच्या देहवैशिष्ट्यांमुळे त्याला अनेक नावे प्राप्त झाली आहेत. 

त्याच्या हत्तीप्रमाणे असलेल्या मोठ्या डोक्यामुळे त्याला ‘गजानन’, ‘गजवदन’ असे संबोधतात.

त्याला असलेल्या सोंडेमुळे तो ‘वक्रतुंड’ म्हणून ओळखला जातो. 

‘तुंदीलतनू’ श्री गणेश आपल्या मोठ्या पोटामुळे ‘लंबोदर’ म्हणून ओळखला जातो.

त्याच्या हत्तीसारख्या मोठ्या, सुपासारख्या कानांमुळे त्याला ‘शूर्पकर्ण’ असे म्हटले जाते.

त्याच्या दोन सुळ्यांपैकी एक तुटलेला आहे. त्यामुळे त्याला ‘एकदंत’ असे नामाभिधान आहे. 

श्री गणेश ‘चतुर्हस्त’ म्हणजे ‘चार हात असलेला’ आहे. 

या चार हातांपैकी एक हात भक्तांना अभयवर देण्यासाठी उंचावलेला आहे. म्हणूनच तो ‘वरदहस्त’ आहे.

त्याच्या आणखी दोन हातात ‘पाश’ आणि ‘अंकुश’ आहेत. त्यामुळे त्याल ‘पाशांकुशधारी’ असे म्हटले जाते.

श्री गणेशाला मोदक अतिशय प्रिय आहे. त्याच्या चौथ्या हातात तो मोदक धारण करतो. म्हणूनच त्याला ‘मोदकहस्त’ असे नाव आहे. 

उंदीर, ज्याला संस्कृतमधे मूषक असे म्हणतात, हे त्याचे वाहन आहे. असा हा श्री गणेश ‘मूषकवाहन’ आहे. 

श्री गणेशाचे हे स्वरुप वेगळे असले तरी अतिशय मोहक आणि साजिरे आहे. मस्तकावरील हिरेजडित मुकूट, गळ्यातील रत्नखचित हार, हातातील सुवर्ण कंकणे, कमरेवरील सुंदर मेखला आणि पायातील रुणझुणते नुपूर या सर्वांमुळे तो भक्तांच्या मनाला आनंद देणारा आहे. 

श्री गणेशाच्या मोहक स्वरुपाचा प्रतिकात्मक अर्थ:

वरवर पाहता श्री गणेशाचे हे रूप आणि त्याची नावे यांचे साधे सरळ अर्थ प्रतीत होतात. पण या प्रत्येक नावामागे अतिशय खोल, गहन आशय दडलेला आहे. 

  • पुराणात भगवान शंकरांनी गणेशाचे मस्तक छाटल्यावर त्याला हत्तीचे मस्तक लावून परत जिवंत केले, अशी कथा आहे. गजाननाचे हत्तीप्रमाणे असलेले मोठे डोके म्हणजे बुद्धिमत्ता, व्यापक विचारशक्ती आणि निर्णयक्षमता यांचे प्रतिक आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी या सर्वांची आवश्यकता असते. हत्ती हा बुद्धिमत्ता आणि शक्ती यांचा द्योतक आहे. गणेशाच्या ठाई सुध्दा असाच शक्ती आणि बुद्धीचा अपूर्व संगम झाला आहे. म्हणून गणपतीला बुद्धीची देवता मानले जाते. 

हत्ती चालत असताना आपल्या वाटेतील सर्व अडथळे दूर करत चालतो. त्याचप्रमाणे जीवनातील सर्व अडचणींवर मात करत, त्यांना दूर सारत, जगण्याचा मूलमंत्र आपल्याला त्याच्या या स्वरूपामुळे मिळतो. हत्तीप्रमाणे असलेले लहान डोळे आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टी एकाग्रतेने निरखून, पारखून घेणे, प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहणे शिकवतात.

  • या शूर्पकर्णाचे मोठे कान दुसऱ्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकण्याचे कसब दर्शवतात. आधुनिक भाषेत बोलायचे तर हे ‘लिसनिंग स्कील’ प्रत्येक ‘लीडर’ कडे अत्यावश्यक आहे. मग या गणांच्या अधिपतीकडे ते नसेल तरच नवल! हा गजकर्ण भक्तांची प्रार्थना ऐकून त्यांच्या हाकेला धावून जातो व त्यांच्यावर संकटे दूर करतो. आपणही दुसऱ्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे आणि त्याचबरोबर नको असलेल्या गोष्टी सोडून देण्याचे कसब बाळगणे आवश्यक आहे. 
  • वक्रतुंड अशा या गणेशाची सोंड लवचिकता आणि सर्व परिस्थितींशी जुळवून घेण्याची क्षमता दर्शवते. ज्याप्रमाणे  सोंड एकाच वेळी मोठी, कठीण कामे आणि अतिशय सूक्ष्म कामे सहजतेने करू शकते, त्याचप्रमाणे मनुष्याने आपल्या जीवनात लवचिक असले पाहिजे आणि असेल त्या परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे असा संदेश ही सोंड देते. 

ॐ हे गणेशाचे ध्वनी-प्रतिक आहे. गणपतीची लवचिक सोंड ॐ चेही प्रतिनिधित्व करते.

  • गणराजाचे वाहन असलेला उंदीर हा मनाचे प्रतिक आहे. आपले मन अतिशय चंचल असते. ‘मन वढाय वढाय’ असे त्याचे यथार्थ वर्णन बहिणाबाईंनी केले आहे. उंदीर हे इच्छा, वासना यांचेही प्रतिक आहे. हा मूषकवाहन आपले मन आणि वासना  यांच्यावर आरूढ होऊन नियंत्रण ठेवण्याची शिकवण देतो. 

याचबरोबर, कोणालाही आणि कशालाही क्षुद्र न लेखण्याची शिकवण गणपती आपल्याला देतो. उंदरासारखा छोटा प्राणी अनेक मोठमोठ्या वस्तू कुरतडून त्यांचा नाश करण्याची क्षमता ठेवतो. म्हणूनच नेत्याने  आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येकाचे गुण हेरण्याची आणि त्याचा सुयोग्य वापर करुन घेण्याची आवश्यकता असते. अनेकदा, अगदी शुल्लक वाटणारी बाब किंवा व्यक्ती फार मोठी आणि महत्त्वाची ठरू शकते. 

  • लंबोदर असलेल्या गणेशाचे मोठे पोट हे जीवनातील सुख-दुःखे, यश-अपयश सारख्याच वृत्तीने पचवण्याची क्षमता दाखवते. आयुष्यातील कडू-गोड प्रसंग पचवून परत आनंदाने आणि नव्या उभारीने आयुष्य जगले पाहिजे हे त्यामुळे समजते. भक्तांचे अपराध पोटात घालण्याच्या त्याच्या क्षमतेचेही हे मोठे पोट निदर्शक आहे. माणसानेही असेच क्षमाशील असले पाहिजे असा संदेश आपल्याला गणेशाच्या या स्वरूपामुळे मिळतो. 

आध्यात्मिक दृष्ट्या हे विशाल पोट संपूर्ण विश्वाचे प्रतिनिधित्व करते, जे कुंडलिनी शक्तीने (साप) बांधून ठेवले आहे. 

  • एकदंत गणेशाचा एक दात तुटलेला आहे. याबाबत असे कथा सांगितली जाते की भगवान वेदव्यासांनी श्रीगणेशाला महाभारत लेखनासाठी आपले लेखनिक होण्याची विनंती केली. व्यासांच्या बोलण्याच्या वेगवान गतीने लेखन करताना त्याची लेखणी तुटली. लेखनात खंड पडू नये म्हणून त्याने  आपला एक दात तोडून लेखणी म्हणून वापरला आणि लिखाण चालू ठेवले. एखाद्या महत्कार्याला किती समर्पण भावाने साथ द्यावी, त्यासाठी किती त्याग करण्याची तयारी ठेवावी याचे हे मूर्तिमंत उदाहरणच नाही का? 

तसेच, त्याचा एक तुटलेला दात आपल्यामधे असलेल्या अपूर्णतेचा मनापासून स्वीकार करण्याची सर्वांना प्रेरणा देतो.

  • श्रीगणेशाच्या अंगावरील मोहक दागिने त्याची कलासक्ती दर्शवतात. तो चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा दाता मानला जातो. काव्य, नाटक,गायनासह चौसष्ट कलांमध्ये निपुण असलेला हा गणराज सर्वांना आनंद देणारा, सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. 
  • गणेशाच्या एका हातात पाश असतो. तो मोह आणि वासना यांच्या बंधनाचे तसेच आसक्तीचे प्रतिक आहे. मनुष्याने जीवनात मोह, वासना आणि आसक्ती यांच्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे असा याचा अर्थ होतो. 
  • त्याच्या दुसऱ्या हातातील अंकुश हा हत्तीला नियंत्रित करण्यासाठी वापरला जातो. मदमस्त झालेल्या हत्तीला ताळ्यावर आणण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे आपल्या चंचल मनावर नियंत्रण ठेवण्याचे, आपल्या मनातील षड् विकार ताब्यात ठेवण्याचे आणि वहावत जाणाऱ्या भावना व विचारांवर ताबा ठेवण्याचे प्रतिक म्हणून त्याकडे पाहता येईल. थोडक्यात मनुष्याला न्यायाच्या आणि सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी आणि पथभ्रष्ट होण्यापासून रोखण्यासाठी का अंकुश आवश्यक आहे.
  • वरदहस्त गणेशाचा तिसरा हात आशीर्वाद देण्यासाठी वर उचललेला असतो. तो भक्तांचे रक्षण करुन त्यांना आशीर्वाद देतो आणि त्यांच्यावरील कृपादृष्टी दाखवतो. 
  • गणेशाच्या चौथ्या हातात मोदक असतो. ‘मोद’ म्हणजे आनंद. हा मोदक संसारातील आनंदाचे आणि समृद्धीचे प्रतिक आहे. मनुष्याने जीवनात आत्मिक उन्नतीसोबत भौतिक संपत्ती आणि सुखांचाही आनंद घ्यावा असा या प्रतिकाचा अर्थ होतो. मोदकाप्रमाणे आपले जीवन वरून साधे दिसत असले तरी ते आनंदाने, गोडव्याने भरलेले असावे. 
  • श्री गणेशाच्या कंबरेला बांधलेला नाग हा कुंडलिनी शक्तीचे (शरीरातील सुप्त असलेली अध्यात्मिक ऊर्जा) प्रतिक आहे. अध्यात्मिक उन्नती साठी कुंडलिनी शक्ती जागृत व्हावी लागते. कंबरेला बांधलेला नाग हा आत्मशक्ती नियंत्रणाचे प्रतिक आहे. हा नाग म्हणजे आपल्या अंतर्गत शक्तीला योग्यरित्या नियंत्रित करण्याचे प्रतिक सुद्धा आहे. 

गणेशाच्या शरीरावरील विविध प्रतिके आपल्याला जीवनातील अनेक तत्वे सहजगत्या शिकवत असतात.  जीवनाचे धडे देत असतात. त्यांचा अर्थ समजून घेऊन ती तत्वे आचरण्यात आणण्याचा प्रयत्न करणे हेच गणेश-भक्तीत अभिप्रेत आहे. जोपर्यंत भक्त आपल्या आराध्याची वैशिष्ट्ये आत्मसात करीत नाही, तोपर्यंत तो त्याच्याशी एकरूप होऊ शकत नाही. म्हणूनच त्याच्या मूर्तीमागे दडलेला हा अध्यात्मिक आणि धार्मिक अर्थ समजून घेण्याचा अल्पसा प्रयत्न! सर्वसामान्य मनुष्याला दैनंदिन जीवनात दिशा दाखवणारा, मार्गदर्शन करून प्रेरणा देणारा हा अर्थ आहे. 

अध्यात्मिक दृष्ट्याही या प्रतिकांना वेगळा अर्थ आहे. परंतु त्याचा ऊहापोह या लेखात केला नाही. 

श्री गणेशाच्या मोहक स्वरुपाचा प्रतिकात्मक अर्थ तुम्हाला कसा वाटला? ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपही जॉईन करा.

      धन्यवाद !

हा मंगलमूर्ती गणराय आपल्या जीवनात सुख, शांती, समाधान घेऊन येवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना. 

3 thoughts on “श्री गणेशाच्या मोहक स्वरूपाचा प्रतिकात्मक अर्थ”

  1. Madhavi Venkatesh Gopalan

    छान मांडला आहे अर्थ. खूप छान. अध्यात्मिक अर्थ वाचायला आवडेल.

  2. SHRIGANESHACHYA Roopacha Khupach vyapak artha samjala…lekhatil ek ek line vachtanna devache sundar roop laksha lavun pahile gele….itaka detail aapn kontyach murticha vichar karat nahi…
    Khup chan lihile ahe🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top