उन्हाळ्यातील उबदार व दमट हवामानामुळे आपल्या शरीराला खूप घाम येऊन घामाची दुर्गंधी येते. यासाठी आपल्याला आपल्या त्वचेची आणि आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. घाम येणे हे नैसर्गिक आहे. परंतु घामामुळे येणारी दुर्गंधी आपल्याला सहन करावी लागू नये म्हणून घामाची दुर्गंधी रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स तसेच घाम म्हणजे काय? घाम कसा येतो? घामाची दुर्गंधी का येते? घामाला दुर्गंधी येण्याची कारणे कोणती? याची सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
•घाम म्हणजे काय?
घाम आपल्याला थंड राहण्यास आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतो. घाम हा शरीराला थंड करण्याचा नैसर्गिक मार्ग आहे. घाम म्हणजे पाणी आणि शरीरातील इतर विषारी पदार्थ यांचे मिश्रण आहे जे घामाच्या ग्रंथीद्वारे शरीरातून बाहेर पडतात. यामुळे घामाद्वारे आपले शरीर स्वच्छ राहण्यास मदत होते.
•घाम कसा येतो?
घाम ग्रंथींद्वारे तयार होतो. या ग्रंथी शरीराच्या जवळजवळ प्रत्येक भागात आढळतात. घामाच्या ग्रंथीचे दोन प्रकार आहेत.
1) एक्रीन घाम ग्रंथी :- या घामग्रंथी तुमच्या संपूर्ण त्वचेवर आढळतात आणि तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी नलिकाद्वारे घाम बाहेर काढतात.
2) एपोक्राइन घाम ग्रंथी :-या घामग्रंथी शरीरावर ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात केस असतात त्या ठिकाणी आढळतात. या घामग्रंथी केसांच्या मुळातून घाम बाहेर टाकतात त्यामुळे तुमच्या शरीराला दुर्गंधी येण्याची शक्यता असते.
•घामाची दुर्गंधी का येते?
घामाला प्रत्यक्षात कशाचाही वास येत नाही. शरीरातून जसजसा घाम बाहेर पडतो तसतसे त्वचेच्या पृष्ठभागावरील बॅक्टेरिया घामाने वाढतात. आणि हे बॅक्टेरिया घामाच्या संपर्कात आल्यामुळे घामाचा वास येतो.
•घामाला दुर्गंधी येण्याची कारणे:-
1)कांदा,लसूण,ब्रोकोली अशा भाज्यांमध्ये सल्फर असते तसेच मसालेदार पदार्थ यामुळे घामाला उग्र असा वास येतो.
2)मधुमेह,किडनी समस्या,यकृतरोग, थायरॉईड इत्यादी आरोग्य विषयक तक्रारी तसेच औषधाचे सेवन यामुळे देखील घामाची दुर्गंधी येऊ शकते.
3)तणावामुळे हृदयाची गती वाढते त्यामुळे घामग्रंथींना शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी आणि शरीरातील द्रवपदार्थ संतुलित करण्यात मदत करण्यासाठी घाम निर्माण होण्यास सुरुवात होते. अशा परिस्थितीत येणारा घाम हा एपोक्राईन ग्रंथी मधून बाहेर पडतो. यामुळे घामाला वास येतो.
4)स्त्रियांना गर्भावस्थेत हार्मोन्स बदलल्याने शरीराचे तापमान वाढते आणि नेहमीपेक्षा जास्त घाम येतो ज्यामुळे शरीराला दुर्गंधी येते.
5) वाढलेले अतिरिक्त वजन आणि अनुवंशिकता हे देखील घामाच्या दुर्गंधीचे कारण असू शकते.
•नैसर्गिकरित्या घामाची दुर्गंधी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स:-
1)आपले शरीर स्वच्छ ठेवा
नियमित दिवसातून दोन वेळा आंघोळ करण्याचा प्रयत्न करा. तसेच व्यायाम /वर्कआउट केल्यानंतर आणि दिवसभर काम केल्यानंतर आंघोळ करायला विसरू नका. आंघोळीसाठी जंतुनाशक साबणाचा वापर करा.यामुळे घामाची दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध होईल. तसेच आंघोळीनंतर शरीर पूर्णपणे कोरडे करा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर शरीरावर दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाची वाढ होणार नाही.
2)सैल सुती कपडे घाला
उन्हाळ्यात हवेशीर म्हणजेच कॉटन किंवा लीनेन चे कपडे परिधान करणे योग्य ठरते. यामुळे शरीरात हवा खेळती राहून घाम साचणे कमी होते. पॉलिस्टर किंवा नायलॉन चे कपडे वापरल्यामुळे घामाचा त्रास वाढतो आणि वास येण्यास अधिक प्रोत्साहन मिळते. तसेच नेहमी धुतलेले स्वच्छ कपडे परिधान करा.
3)पुरेसे पाणी प्या.
दररोज ३-४ लिटर पाणी प्या.पाणी तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि शरीरातील दुर्गंधी निर्माण करणारे जीवाणू रोगजनकांना बाहेर काढण्यास मदत करते. तसेच पाणी हे सर्वोत्तम न्यूट्रलायझर देखील आहे जे आपल्या आतड्यांमध्ये बॅक्टेरिया तयार होण्यापासून प्रतिबंधित करते.
4) आहारात भाज्या व फळे यांचा समावेश करा
जेवणात काकडी, लालकोबी, पालक यासारख्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने घामाच्या पातळीचे नियमन करण्यास मदत करतात. तसेच कलिंगड, द्राक्षे, टरबूज, अननस, संत्री यासारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा समावेश केल्याने घामाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
5)त्वचेवर खोबरेल तेल लावा
नारळाचे तेल हे सर्वोत्तम आणि प्रभावी उपायांपैकी एक आहे. नारळाच्या तेलातील प्रतिजैविक गुणधर्म दुर्गंधी निर्माण करणाऱ्या जीवाणूंची वाढ रोखण्यास मदत करतात. यामुळे शरीराची दुर्गंधी थांबते.
6)लिंबाचा वापर करा
लिंबाच्या रसातील अम्लीय गुणधर्म त्वचेवरील हानीकारक जिवाणूंची वाढ कमी करण्यास मदत करतात. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा म्हणून लिंबू शरीरातील जीवाणू सह हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढून टाकतात. घाम येणे टाळण्यासाठी आणि शरीराची दुर्गंधी टाळण्यासाठी शरीराच्या ज्या भागावर जास्त घाम येतो अशा ठिकाणी तुम्ही लिंबाने स्क्रब करून दहा ते पंधरा मिनिटे ठेवून पाण्याने स्वच्छ धुऊन टाका.
7)गुणकारी कडूलिंब
कडुलिंबात अँटीबॅक्टेरियल गुण असतात त्यामुळे आपल्या त्वचेचा बॅक्टेरिया पासून बचाव होण्यास मदत होते. कडूलिंबाची पानं पाण्यात उकळून ते पाणी आंघोळीसाठी वापरा किंवा कडूलिंबाचे तेल मिसळून तुम्ही आंघोळ करू शकता यामुळे स्किन रॅशेज, घामाचा दुर्गंध आणि खाज कमी होण्यास मदत होते.
8)गुलाबाच्या पाकळ्या
आंघोळीच्या आधी पाण्यात काही वेळ गुलाबाच्या पाकळ्या घाला. आणि नंतर या पाण्याने स्नान करा. यामुळे त्वचा निरोगी राहून घामाचा वास येणार नाही.
9) एलोवेरा
अंडरआर्म्स मधून येणारी दुर्गंधी रोखण्यासाठी तुम्ही रात्री झोपताना अंडरआर्म्सवर एलोवेरा जेल लावून झोपू शकता आणि सकाळी उठून धुवून टाका.
10)शरीराच्या दुर्गंधीसाठी वैद्यकीय उपचार
तुम्ही या टिप्स वापरून पाहिल्या असल्यास आणि सुधारणा न दिसल्यास डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा. बुरशीजन्य संसर्गासारख्या इतर गोष्टीमुळे तुमच्या शरीराला दुर्गंधी येऊ शकते. तसेच कित्येकदा तुम्हाला उपचारांची गरज भासू शकते.
वरील माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा, माहितीपर लेख आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू . त्यासाठी आमच्या “लेखक मित्र” या वेबसाईटला नक्की भेट द्या. व आमचा व्हाट्सअप ग्रुप ही जॉईन करा.
धन्यवाद!
आकांक्षा निरळकर, मुंबई
Very useful information …Thanks