घटस्थापना कशी करतात
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्रंबके गौरी नारायणि नमोस्तुते||
गणेश चतुर्थीच्या भव्य दिव्य सणानंतर सर्वांना ओढ लागते ती घटस्थापना आणि नवरात्रीय शारदोत्सवाची. महिषासुर दैत्याचा वध करून दुर्गामातेने संपूर्ण जीवसृष्टीचे संरक्षण केले. या विजयाचे प्रतिक म्हणून हा सण मोठ्या भक्ती भावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. आसुरी नकारात्मक प्रवृत्तीच्या अंधारातून देवींनी आपल्या शक्तीच्या आधारे सर्वांना सत्य आणि धर्माचा प्रकाश दाखवला. त्यांचं गायन- पूजन- मनन आणि चिंतन या काळामध्ये करण्याची प्रथा आहे. हा सण अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात साजरा केला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र नवमीपर्यंत हा उत्सव चालतो. मंदिरांमध्ये आणि घरांमध्ये घटांमध्ये देवींची स्थापना करून नंदादीप लावून या सणाची सुरुवात होते. नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा अर्चना केली जाते. घटस्थापनेची नेमकी पूजा विधी काय असते? हे आपणाला माहिती आहे का? चला तर मग आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेऊया घटस्थापने विषयीची संपूर्ण माहिती.
घटस्थापना
यावर्षी 2024 मध्ये गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोंबर दरम्यान हा उत्सव साजरा होत आहे. 3 ऑक्टोबर रोजी पवित्र घटाची अर्थात कलशाची स्थापना करावयाची आहे. यावर्षीच्या अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा उदय तिथीनुसार घटस्थापने करिता दोन शुभ मुहूर्त आहेत. तीन तारखेस सकाळी ६ वाजून १५ मि. पासून ते ७ वाजून २२ मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे. हा मुहूर्त आपल्याला १ तास ६ मिनिटाकरिता मिळणार आहे. दुसरा मुहूर्त ११ वाजून ४६ मिनिटांपासून ते १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत म्हणजेच ४७ मिनिटांकरिता हा मुहूर्त असणार आहे. यापैकी एका मुहूर्तावर आपल्या सोयीनुसार घटस्थापना करू शकता.
पूजा विधि
घटस्थापने करिता एक स्थान नियोजित करून त्या ठिकाणी स्वच्छता करून घ्यावी. सडा रांगोळी करून पूजेची विधिवत तयारी करावी.3 ऑक्टोबर रोजी सकाळी अंघोळ करून शुद्ध सुचिर्भूत होऊन नियोजित शुभ मुहूर्तावर कुलदैवत व कुलदेवींचे नामस्मरण करुन एक ताम्हण घ्यावे.त्यामध्ये शेतामधील माती आणून त्याचा एक थर तयार करावा त्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात गहू- मूग- हरभरा आणि ज्वारी चे दाने घेऊन त्या माती वरती छानसे एकसमान पसरावे. त्यामध्ये मध्यभागी एक छानसा कलश घेऊन त्यामध्ये शुद्ध स्वच्छ पाणी भरावे. त्यात तांदळाचे दाणे, एक नाणे, एक सुपारी आणि एक आंब्याचे पान घालावे. त्यावरती एक नारळ ठेवून कलशाच्या ओठांवर सभोवती विड्याची पानं घालून त्यावरती श्रीफळ अर्थात नारळ ठेवून पवित्र घटाची स्थापना करावी. हे देवींच्या अवताराचे प्रतीक म्हणून पूजले जाते. कलशा वरती झेंडूच्या फुलांच्या माळ घातली जाते. नारळास भस्म हळद-कुंकू वाहून नंदादीप लावावा. धूप- अगरबत्ती लावावी. एकदा ही पूजा मांडल्यानंतर नऊ दिवसापर्यंत ती हलविली जाऊ नये याची काळजी घ्यावी.तेथून पुढे नऊ दिवसापर्यंत देवीच्या नव अवतारांची पूजा करावी. त्यांना वेगवेगळे नैवेद्य अर्पित करण्याची परंपरा आहे.
धार्मिक आणि वैज्ञानिक संदर्भ:
आपल्या सर्व सणांमध्ये कुलाचार संस्कृती जपली गेलेली आहे. घटस्थापना करीत असताना त्यामध्ये धान्यांची बिज घालतात. त्याचे कारण की वर्षभर घरामध्ये ठेवलेली धान्याची बीज उगवण योग्य आहेत का? हे घटांमध्ये धान्य टाकून तपासले जाते. या नऊ दिवसांमध्ये जे धान्य निकोप सदृढ तजेलदार वाढते ते धान्य चांगले पिकते अशी मान्यता आहे. या नऊ दिवसांमध्ये त्या धान्याची उगवण झाल्यानंतर त्या घटाची सुंदरता तर वाढते.शिवाय घटस्थापनेनंतरच्या दसऱ्याच्या दिवशी यातील धान्याची अंकुरलेली पाने शर्टाच्या खिशामध्ये किंवा डोक्यावरील टोपी मध्ये मानाने मिरवली जातात.
अशाप्रकारे आपण घटस्थापनेचे महत्त्व जाणून घेऊन विधी व पूजा करावी आपणा सर्वांना दुर्गा मातेच्या आशीर्वादाने सर्व ऐश्वर्य प्राप्त व्हावे ही सदिच्छा. हा लेख आपणास कसा वाटला कमेंट द्वारे निश्चित कळवा.
लेखक – सदानंद पाटील
सुंदर माहिती. धन्यवाद
Very nice write up. Abhinandan
छान लेख लिहिला आहे. ✍️😊
पूजेची संपूर्ण महिती यातून मिळाली.