गुढीपाडवा 2024 Gudhipadwa 2024
गुढीपाडवा, पाडवा हा संस्कृत शब्द याचा अर्थ “पहिला” असा होतो. गुढीपाडवा महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण. हिंदू धर्मशास्त्रनुसार गुढीपाडव्याला खूप महत्त्व आहे.नवचैतन्य उत्साह आणि आनंद महाराष्ट्रात घरोघरी येत्या 9 तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचे कारणही तसेच आहे.येत्या नऊ तारखेला असणारा गुढीपाडवा. यावर्षीही गुढीपाडवा हा तितक्याच आनंदात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.चला तर मग आपण आता गुढीपाडव्याचे महत्त्व,या दिवशी गुढीची पुजा कशी करावी सोबतच शुभमुहूर्त आणि पौराणिक इत्यादी विषयाची माहिती पाहुया,
गुढीपाडव्याचे महत्त्व-
गुढीपाडवा म्हणजे वसंत ऋतुचे आगमन,वसंत ऋतु हा वातावरणात एक अमुलाग्र बदल घडवून आणत असतो शेतकऱ्यांसाठी वसंत ऋतू चालू झाला ते ओळखण्याची खूण म्हणजे गुढीपाडव्याचा हा सण. गुढीपाडव्याचा सण हा साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक मानला जातो. तसेच या दिवशी घडलेल्या अनेक पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात.
हिंदू नविन वर्षाची सुरुवात- Beginning of new year
गुढीपाडवा म्हणजे बदलणारे हिंदू वर्ष गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंदू नवीन वर्षांची सुरुवात ही होत असते याच दिवशी घरोघरी नवीन पंचांग आणून त्याची विधिवत पूजा करून पंचांग पाहायला सुरुवात केली जाते. या पंचांगामध्ये शुभ वेळ,शुभ दिवस, शुभ नक्षत्र हे आपल्याला कळतात. कोणतेही शुभ कार्य करताना पंचांग पाहूनच त्या शुभ कार्याची सुरुवात केली जाते.
गुढीची पुजा कशी करावी?
गुढीची पूजा करण्याकरता लागणारे साहित्य,गुढी करिता एक तांब्याचा,पितळेचा किंवा चांदीचा तांब्या, कडुलिंबाच्या पानाची एक छोटीसी फांदी, एक रेशमी वस्त्र गुढीला नेसवण्याकरता, वेळूची काठी, फुले,गाठीचा हार, हळदी कुंकू अगरबत्ती इत्यादी साहित्य लागते.
प्रथम वेळूच्या काठीला वस्त्र नेसवून त्याच्यावरती तांब्या ठेवणे,त्यानंतर त्यावर कडुलिंबाचे पान,गाठीचा हार,फुलाचा हार इत्यादी सर्व गुढीला अपर्ण करावे यानंतर घरातील सगळ्यांनी मिळून गुढीची विधीवत पूजा करावी आणि दारात गुढी उभी करावी. दारात उभी केलेली गुढी ही संध्याकाळी पाचच्या आत उतरावी.गुढी उतरवताना तिला हळदीकुंकू अक्षता वाहून साखरेचा नैवेद्य दाखवून उतरावी.
यावर्षीचा शुभ मुहूर्त-
कोणतेही कार्य करताना हिंदू संस्कृतीमध्ये मुहूर्ताला अनन्यसाधारण असे महत्त्व आपल्याला पाहायला मिळते. यावर्षीचा गुढी पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:07 ते सकाळी 10:07 पर्यंत असणार आहे.
पौराणिक कथा- {Related Stories}
कथा 1
चौदा वर्ष वनवास सहन केलेले श्रीराम प्रभू रावणाचा वध करून जेव्हा अयोध्येत परत आले तो दिवस गुढीपाडव्याच्याच होता. त्यावेळी अयोध्येतील नागरिकांनी रामविजयाचा आनंद व्यक्त करताना घरोघरी गुढ्या उभ्या केल्या होत्या.याचा वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आपल्याला मिळतो.
कथा 2
पूर्वी पैठणमध्ये शालिवाहन नावाचा एक राजा राज्य करत होता.तो राजा खूप पराक्रम न्यायी आणि धोरणी होता या पराक्रमी राजावर शक नावाचा एक राजा नेहमी स्वारी करून येत असे एकदा या शक राजाच्या स्वारीला प्रत्युत्तर देण्यासाठी शालिवाहन राजाने मातीचे सैन्य तयार केले व त्याच्यात प्राण फुंकले व शक राजा वरती चालून गेला या युद्धामध्ये शक राजाचा पराभव झाला आणि शालिवाहन राजाचा विजय झाला. शालिवाहन राजाच्या विजयदिवस म्हणून नवीन वर्षाची सुरुवात शालिवाहन शक पासून सुरू झाली.
कथा 3
गुढीपाडव्याची आणखी एक सांगितली जाणारी कथा म्हणजे आदिपर्वामध्ये उपरिचर नामक राजाला इंद्राकडून एक काळकाची काठी मिळाली होती. यानंतर इंद्राला नमन म्हणून उपरिचर राजाने ती काठी जमिनीमध्ये रोवून त्याची विधिवत पूजा केली तो दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस होता.
ब्रह्मदेवाने पाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि याच दिवसापासून सत्ययुगाची सुरुवात झाली अशी देखील आख्यायिका सांगितली जाते. गुढीपाडवा या दिवशी विविध धार्मिक गोष्टींची आयोजन केले जाते जसे की शिवमंदिरात कावडीने पाणी आणून पूजा करणे.
सोने खरेदीला विशेष महत्त्व-
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला पाडवा या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते.या दिवशी केलेली सुवर्ण खरेदी ही फलदायी असते आणि ह्या दिवशी केलेली सुवर्ण खरेदी ही चिरकाल टिकणारी असते अशी देखील एक मान्यता आहे यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी सुवर्ण खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन खरेदी तसेच कपडे खरेदी करतानाही आपल्याला ग्राहक दिसून येतील शुभमुहूर्तावर केलेली खरेदी ही शुभ गोष्टीचे संकेत असते या धारणेतून अनेकजण या शुभमुहूर्ताची वाट पाहत असतात.
सध्या साजरा करण्यात येणारा गुढीपाडवा- Gudhipadwa Celebration
गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत सध्या एक नवे रूप धारण करताना आपल्याला दिसून येत आहे जसे की मोठ्या शहरांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त तरुणाई मोठ्या प्रमाणावर एकत्र येत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करते.गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सकाळी बऱ्याच ठिकाणी बाईक रॅलीचे आयोजन केले जाते,यामध्ये तरुणाई ही पारंपारिक वेशात एकत्र येताना दिसून येते.मुलींमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी नऊवार साडी किंवा पैठणी साडी घालण्याचा सध्या ट्रेंड दिसून येत आहे.तसेच तरुणांमध्ये कुर्ता पायजमा किंवा,कुर्ता आणि धोतर असा ट्रेंड सध्या दिसून येत आहे. पारंपारिक वेशात एकत्र आल्यानंतर ही तरुणाई संपूर्ण शहरात बाईकवर फिरताना दिसून येते.
हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ही चांगल्या गोष्टीने व्हावी यासाठी अनेक जण आपल्या घरात असणाऱ्या वडीलधाऱ्याच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद देखील घेतात.
गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला देण्यात आलेली संपूर्ण माहिती तसेच शुभ मुहूर्त पौराणिक कथा इत्यादी सर्व गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. तसेच अधिक नवनवीन माहितीसाठी आमच्या लेखक मित्र वेबसाईटला नक्की भेट देत रहा तुमच्या सूचना आणि कमेंट्सचे नेहमी स्वागत आहे
Adv.विनिता झाडे मोहळकर