हरतालिका व्रत व पूजा विधि बद्दल माहिती
भारत देश हा सनातन संस्कृती असलेला देश आहे. जिथे मूर्ती पूजेला मानले जाते. अनेक पूजा विधींचा त्यात समावेश असतो. तसेच स्त्रियांद्वारे अनेक व्रत केले जातात. या व्रतांमागे आचार आणि विचार आहेत. ते का केले गेले पाहिजेत? तसेच कसे केले गेले पाहिजेत ?व त्याचे काय फायदे आहेत हे सारे आपल्या पौराणिक कथा तसेच ऋषींनी व मुनींनी लिहिलेल्या ग्रंथांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवले गेले आहे. आपल्या आजूबाजूचा भौगोलिक प्रदेश, आपले खाणे इत्यादी गोष्टींचा विचार या व्रतांमागे केला गेला आहे. या व्रतां द्वारे आपल्या संस्कृतीची ओळख पुढच्या पिढीला होत जाते. म्हणूनच मागच्या पिढीद्वारे पुढच्या पिढीला या व्रतांचा वारसा दिला जातो.
या व्रतांमध्ये महत्त्वाचे व्रत म्हणजे हरतालिका व्रत होय. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीयेला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत स्त्रियांद्वारे केले गेले जाते.
हरतालिका व्रत व पूजा विधी बद्दल माहिती information of hartalika vrat and its pooja rituals in marathi या लेखामध्ये आपण हरतालिका व्रताची संपूर्ण माहिती बघूया.
हरतालिका व्रताचे महत्त्व–हे व्रत हिंदू धर्मातील स्त्रिया आणि कुमारिका यांच्यासाठी सांगितलेले महत्त्वाचे व्रत आहे. पार्वतीने शंकराच्या प्राप्तीसाठी आपल्या सख्यांसह हे व्रत केले. म्हणूनच कुमारिकांनी आपल्याला उत्तम पती मिळावा म्हणून आपल्या पुराणात हे व्रत करावे असे सांगितले गेले आहे. हरितालिका या शब्दाचा अर्थ, हरता आणि लिका या दोन शब्दातून तयार झाला आहे. म्हणजेच पार्वतीला तिच्या सखीने व्रत करायला नेले म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात. .
हरतालिका व्रताची आख्यायिका–
शंकर आणि पर्वती एकदा कैलासावर बसले असताना पार्वतीने शंकरांना विचारले की “कुठल्या व्रताने मला आपण मिळाले? तसेच असे व्रत सांगा की सोपे असून त्याने खूप फळ मिळते”. शंकर म्हणाले “व्रतात श्रेष्ठ व्रत हरतालिका. तू हेच व्रत पूर्वजन्मी केल्यामुळे तुला मी प्राप्त झालो. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करतात. तू उपवर झाल्यापासूनच तुझ्या मनात मी होतो. मला प्राप्त करून घेण्यासाठी तू खूप व्रत केलेस.६४ वर्ष पिकली पाने खाऊन राहिलीस. ऊन वारा पाऊस हे सगळे सहन केले.अशी कन्या कोणास द्यावी असा विचार तुझे वडील हिमालय यांनी केला. तेवढ्यात नारद मुनी आले. हिमालयाला म्हणाले “हिमालया तुझी मुलगी उपवर झाली आहे ती तू विष्णुंना दे. तोच तिच्यासाठी योग्य नवरा आहे. मला विष्णूनींच इथे पाठवलं आहे. तुमच्या मुलीला मागणी घालण्यासाठी” हे ऐकून हिमालयाला खूप आनंद झाला. त्याने नारदांना वचन दिले. त्यानंतर नारद विष्णूं कडे होकाराचा निरोप घेऊन गेले. जेव्हा तुला हे कळले की तुझ्या वडिलांनी तुला विष्णूंना देण्याचे कबूल केले आहे, तेंव्हा तुला खूप राग आला तू म्हणाली की “महादेव सोडून मी कोणालाही माझा पती मानू शकत नाही”. ही गोष्ट तू तुझ्या सखीला सांगितलीस. सखीने त्यावर उपाय शोधला तुला घेऊन ती घोर अरण्यात गेली. एका नदीकाठी गुहा होती. त्या गुहेमध्ये तू शिवलिंग स्थापले .त्याची पूजा केली. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा. रात्री तू जागरण केलेस तुझ्या जागरणांनी माझे लिंग हलले. मी प्रसन्न झालो व तुझ्यासमोर आलो व तुला वर मागण्यास सांगितले तू म्हणालीस की “तुमच्या शिवाय कोणीही दुसरे माझे पती होणार नाही”. मी तुला वर दिला व तिथून गुप्त झालो.
दुसऱ्या दिवशी तू व्रत पूजेचे विसर्जन केले आणि पारणे केले. त्यानंतर तुझे वडील तिथे आले व तुला रागावण्याचे कारण विचारले. ते तू सांगितलेस मग त्यांनी तुला मला देण्याचे कबूल केले व घरी घेऊन आले. या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. त्यालाच हरतालिका व्रत असे म्हणतात.”
हरतालिका व्रताचा विधी—
ज्या ठिकाणी या व्रताची पूजा मांडायची आहे ते ठिकाण झाडून पुसून स्वच्छ करावे. एका पाटावर नवीन वस्त्र टाकावे. त्याच्या चारही बाजूंनी केळीचे खांब लावावे. केळीचे खांब हिंदू धर्मात नेहमीच शुभ मानले गेले आहेत. त्यापुढे सुंदर रांगोळी काढावी व वाळूचे शिवलिंग स्थापावे. त्यामध्ये पार्वती आणि सखी ची ही स्थापना करावी. सर्वप्रथम गणेशाची पूजा करावी व त्याला आवाहन करावे .शंकराची वाळूची पिंड काढल्यावर त्याला पंचामृताने अभिषेक करून हळद कुंकू अक्षता धूप दीप आणि नैवेद्य दाखवावा. म्हणजेच त्या शिवलिंगाची षोडशोपचारे पूजा करावी. आणि मनापासून चांगला नवरा मिळू दे अशी प्रार्थना कुमारिकांनी जरूर करावी. वेगवेगळ्या पानांच्या , रुई जाई जुई पारिजातक गुलाब तशी दुर्वा शमी आघाडा इत्यादी पानांच्या पत्री शंकराच्या पिंडीला वहाव्या. नैवेद्य करावा. या व्रताने सौभाग्यवती स्त्रियांचे सौभाग्य वाढते. स्त्रियांनी दिवसभर उपवास करावा रात्री जागरण करावे व हरतालिकेसमोर भजन कीर्तन करावे. या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो. पूजा झाल्यावर हरतालिकेची कहाणी वाचावी व सुवासिनींना वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताचं विसर्जन करावं.
काही स्त्रिया रात्री बारा वाजता बेलाच्या पानावर मध टाकून ते चाटतात तर कोणी खडीसाखर अथवा केळ खाऊन सुद्धा हा उपवास करतात.
या व्रतात आठ प्रहर उपवास केला जातो.
या व्रता पासून जे फळ मिळते त्याचे पुराणांमध्ये अवैधव्यकारा स्त्रीणा पुत्र पौत्र प्रवर्धिनी असे वर्णन केले आहे. म्हणजेच जीवनामध्ये सर्व प्रकारचे सुख स्त्रियांना मिळण्यासाठी हे व्रत केले पाहिजे असे सांगितले आहे.
हरतालिका व्रताचे फायदे–
हरतालिका व्रत कुमारी कन्यां द्वारा केले जाते. तिला सुयोग्य पती मिळावा म्हणून हे व्रत केले जाते. कारण पार्वतीने कुमारी अवस्थेत शिवाला पती म्हणून निवडले होते व हाच पती मिळावा म्हणून तिने हरतालिका हे व्रत केले होते. शिवलिंगाची त्या कन्येने मनापासून षोडशोपचारे पूजा केली की तिला सुयोग्य वर मिळतो असे मानले जाते.
लग्न झाल्यावर सुद्धा सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत करावे. त्यामुळे त्यांचे सौभाग्य वाढते तिला आयुष्य लाभते.
या दिवशी स्त्रियांनी संपूर्ण उपवास करावा असे पुराणात सांगितले आहे. उपवास केल्याने पचन संस्थेला सुद्धा आराम होतो.
आपल्या संस्कृतीत सांगितलेले व्रत, उपवास इत्यादी प्रथांचे पुढील पिढीला आचरण कसे करावे हे शिकवले जाते.
या व्रताच्या निमित्ताने अनेक स्त्रिया एकत्र येतात त्यामुळे त्यांच्यात वैचारिक देवाण-घेवाण सुद्धा होते.
हरतालिका व्रताच्या दिवशी पाळावयाचे नियम–
या दिवशी स्त्रियांनी संपूर्ण उपवास करावा.
काही ठिकाणी निर्जळी उपवास सुद्धा केला जातो.
या दिवशी दुपारी स्त्रियांनी झोपू नये.
या दिवशी खोटं बोलू नये
हरितालिका व्रताची कहाणी नक्की वाचावी
व्रताचे पारणे झाल्याशिवाय खाऊ नये.
पूजा करण्यासाठी फुल पत्री फळे यांचा उपयोग केला जातो पण त्याकरता निसर्गाची हानी करू नये.
हरतालिका व्रत कुठल्या राज्यात केले जाते–
हे व्रत महाराष्ट्र, दक्षिण भारत, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश झारखंड, राजस्थान या ठिकाणी केले जाते. प्रत्येक ठिकाणी या व्रताला वेगवेगळे नावं आहेत. उत्तर भारतात या सणाला तीज असे नाव आहे.
याच दिवशी हस्तगौरी हरकाली आणि कोटेश्वरी असे तीन प्रकारचे व्रतही केले जाते. यामध्ये माता पार्वतीचे पूजन केले जाते.
महाभारतामध्ये सुद्धा हस्तगौरी या व्रताचा उल्लेख आला आहे श्रीकृष्णाने धन धान्य आणि सुख-समृद्धीसाठी कुंतीला हे व्रत सांगितले होते. या व्रतात तेरा वर्ष शिवपार्वती आणि श्री गणेश यांचे ध्यान करण्यात येते आणि चौदाव्या वर्षी त्याचे उद्यापन करण्यात येते.
तर, हरतालिका व्रत व पूजा विधी बद्दल माहिती information of hartalika vrat and its pooja rituals in marathi हा लेख वाचण्यासाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला जरूर भेट द्या व लेख कसा वाटला हे प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा तसेच इतरही लेख वाचण्यासाठी आमच्या लेखक मित्र या व्हाट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन व्हा तसेच आपल्या मित्र आणि मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा धन्यवाद!
लेखिका –वैशाली देव( पुणे)
Chan 👌