दिवाळी फराळ विशेष रेसिपी
दिवाळी फराळाचे महत्त्व आणि पारंपरिक रेसिपी.
“आरोग्यदायी दिवाळी फराळ”
लाडू,करंजी,शंकरपाळी,खाऊ कडबोळी,
गड्यांनो आली दिपवाळी,आली दिपवाळी!
दिवाळी म्हणताच लहानपणीची ही कविता हमखास आठवते.भारतीय सणांचा राजा अशी ओळख असलेल्या या दिवाळीच्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक बाबी आहेत,जसे घराची स्वच्छता,अंगणात काढलेली सुबक रांगोळी,सुगंधी उटणे,अभ्यंगस्नान,आकाशकंदील,पणत्या-दिव्यांची रोषणाई, फटाके आणि यासोबतच सर्वांना हवाहवासा असतो तो खमंग,खुसखुशीत ‘दिवाळीचा फराळ!’
असं म्हणतात की ‘चार इंचाची जीभ आपल्या पाच फूट देहाला नेहमीच अडचणीत आणते’.
आरोग्यदृष्ट्या यात तथ्य असले तरी दिवाळीचा सण मात्र याला अपवाद आहे.भारतीय खाद्यसंस्कृतीचा ठेवा असलेला हा ‘दिवाळी फराळ’ प्रत्येक कुटुंबाचा आनंद द्विगुणित करतो.
पूर्वी फक्त दिवाळी सणाला म्हणून केले जाणारे हे फराळाचे पदार्थ आजकाल बारमाही मिळतात.या इन्स्टंट फराळाच्या काळातही खास घरी केल्या जाणाऱ्या दिवाळी फराळाची मजा काही औरच!
ऋतुमानानुसार आरोग्याची उत्तम काळजी घेता यावी यासाठी आपल्या पूर्वजांनी एकेका सणाची रचना केलेली आहे.आश्विन महिन्यात येणारा दिवाळी सण धनधान्याच्या संपन्नतेचा काळ आहे.या आधीच्या चार महिन्याच्या पर्जन्यकाळात शेतकरी काबाडकष्ट करून शेतीत राबलेला असतो.त्या कष्टाचा आनंद घेत त्याची दिवाळी साजरी करण्यास तो आतुरलेला असतो.तसेच याआधी संपन्न झालेल्या शारदीय नवरात्रातील उपवासांनी झालेली शरीर शुद्धी आणि पुढे येणारा थंडीचा काळ यामुळे दिवाळीचा फराळ विशेष महत्त्वाचा आहे.
दिवाळी येते तो हेमंत ऋतू म्हणजेच हिवाळ्याची चाहूल. शरीरास आवश्यक असणाऱ्या बलवृद्धीच्या या पोषक,आल्हादायक काळात जठराग्नी प्रदीप्त झालेला असल्याने साहजिकच भूक वाढते.
अशातच स्निग्धयुक्त दिवाळीचा फराळ सेवन करणे हा आपल्या आहार परंपरेचा मानबिंदूच म्हणावा लागेल.शुध्द तूप, दूध, साखर,गूळ,मैदा,गव्हाचे पीठ, प्रोटीनयुक्त धान्यांची भाजणी, इ पदार्थांचा वापर यात केलेला असतो.गोड खुशखुशीत शंकरपाळी (शंखपाला), खमंग चकली,कुरकुरीत चिवडा,
शुभशकुनाशी नातं जोडलेली करंजी (शष्कुली),
असो किंवा शुद्ध तुपातली रवा,बेसन,बुंदीचे लाडू,अनारसे,असोत हे सारे एकाहून एक सरस पदार्थ जिभेची लालसा तृप्त करणारे असतातच शिवाय गृहिणीच्या सुगरणपणाचा ‘ कस ‘ लावणारे ही असतात.
आपल्या या दिवाळी फराळ परंपरेचाही एक इतिहास आहे.उपनिषद काळापासून वेगवेगळ्या रूपात ह्या फराळाच्या नोंदी केलेल्या आढळतात.
प्रसिद्ध वेदाभ्यासक ऋग्वेदी म्हणतात… ‘गृहसंस्कारातल्या ‘पार्वण,आश्वयुजी व आग्रयण’ या पाकयज्ञांचे एकीकरण आणि रूपांतर होऊन दीपावली सण अस्तित्वात आला असावा.या पाकयज्ञांमध्ये शेतातील नवीन धान्याची खीर, नवीन भातांचे पोहे,काही गोड पदार्थ अशी पोषक मिष्टान्ने बनवल्याचे उल्लेख आहेत.११ व्या शतकातील “क्षेमकुतूहल, भोजनकुतूहल” या ग्रंथात दिवाळीच्या फराळाचा उल्लेख केला आहे.
वर्षानुवर्षे झाले तरी ह्या पदार्थांचे महत्व तसूभरही कमी नाही हे भारतीय संस्कृतीचे विशेष!दिवाळी नंतर येणाऱ्या शीतकाळात शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन आरोग्याला हितकारक सांगितले आहे. या फराळामध्ये वापरले जाणारे स्निग्धयुक्त पदार्थ आयुर्वेद दृष्ट्या मधुर रसाचे, वातनाशक,शुक्रवर्धक,बुद्धिवर्धक,धातुवर्धक असतात.
आता आपल्या सध्याच्या बदलत्या आणि बैठ्या जीवनशैलीचा परिणाम दिवाळी फराळावरही झाला आहे.शारीरिक कष्ट कमी झाले आहेत.मधुमेह,
हृदयरोग,स्थूलत्त्व यामुळे सर्वांनी अंगिकारली हेल्दी लाईफ स्टाइल आणि फिटनेस विषयीची जागरूकता यामुळे पारंपरिक ‘फराळ पदार्थ’ ही संकल्पना बदलली आहे.या फराळाच्या पदार्थाची जागा आता कमी तेलातुपातील डाएट पदार्थांनी घेतली आहे.
*दिवाळीचा आनंद घेताना शरीर निरोगी राहायचे असेल तर काही हेल्दी टिप्स*
१.
दिवाळी फराळ शक्यतो घरी तयार केलेलाच असावा.लाडू बनवताना प्रोटीन मूल्य जास्त असलेल्या डाळीपासून तो तयार करता येऊ शकतो. कारण बेसनामध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्सला कमजोर करण्यास मदत करतात.अशा लाडूमधे खांडसरी साखर, शुध्द तूप, गूळ,किंवा खजूर, यांचा वापर असावा.असे लोहयुक्त लाडू शरीराचे हिमोग्लोबिन वाढवण्यास उपयुक्त ठरतील.
२
शंकरपाळी तळण्याऐवजी शक्य असल्यास मायक्रोवेव्हमध्ये बेक करू शकतो.
३. चकली,कडबोळी हा एक उच्च-कार्बोहायड्रेट असलेला प्रकार आहे. त्याऐवजी उच्च फायबर पिठापासून बनवलेली नाचणी किंवा बाजरीसारख्या संपूर्ण धान्याच्या पिठापासून बनवलेली चकली आपण तयार करू शकतो.
४.रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास हे उपयुक्त आहे.खमंग चिवडा करताना भाजलेले डाळे,शेंगदाणे,बदाम,काजू कमी तेलात तळून घेता येऊ शकते.
५.दिवाळी फराळ करायचा तर रोजच्या जेवणाकडे ही लक्ष हवेच.म्हणून कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ कमी करून फायबरयुक्त भाज्या,फळे,इतर पौष्टिक पदार्थांचाही आहारात समावेश असावा.
६.वजन आणि रक्तातील साखर नियंत्रित करायची तर दररोजचा व्यायामही आवश्यकच आहे.
७.दिवाळीत तेलापासून बनविलेले पदार्थ आणि थंडी यामुळे शरीरात कमी प्रमाणात पाणी जाते पण त्यामुळे अपचन, बद्धकोष्ठ होण्याची शक्यता असते. त्यामुळे भरपूर पाणी प्या.
चला तर अशा ‘आरोग्यदायी दिवाळी फराळाचा’ आस्वाद घेत,गड्यांनो आपला दिवाळीचा आनंद द्विगुणित करूया.तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा.
लेखन – विशाखा कुलकर्णी .चिंचवड, पुणे.