मराठी भयकथा – फणशीचे जंगल l Horror Story for readers

WhatsApp Group Join Now

          फणशीचे जंगल… चकवाआआआ…शुऊऊऊऊ…. 

       पुजारी बाबा घाबरून रडणाऱ्या त्या पाचही जणांना कधी पासून समजावत होते. पण प्रचंड घाबरलेले आणि भितीने रडणारे ते सगळे काहीही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. आपल्या सोबत घडलेल्या अविश्वसनीय घटनांचे ते स्वतः साक्षीदार होते. 

       “अरे बाळांनो…. शांत व्हा. असे घाबरून जाऊ नका. तुमच्या सोबत नक्की काय घडले आहे ते मला माहीत तर नाही पण हो… मला थोडाफार अंदाज आला आहे. कारण तुम्ही ज्या दिशेने इथे आला त्यानुसार मला कळून चुकले की तुमच्या सोबत काय घडले असावे “. पुजारी बाबा त्या दिशेला पाहत गूढपणे म्हणाले. 

       ” पुजारी बाबा… आम्हाला अजूनही भिती वाटत आहे… हे… हे.. सगळं काय आहे? “अनघाने अडखळत विचारले. 

       ” हो बाबा… अक्षरशः जिवावर बेतले आमच्या. घरातून मोठ्या उत्साहात बाहेर पडलो होतो पण आता वाटते घरी परत पोहोचू की नाही? ” मंदारही घाबरून बोलत होता. 

       “नक्की काय घडले आहे तुमच्या सोबत? मला सांगितले तर मी तुमची काही तरी मदत करु शकेन. ” पुजारी बाबा सर्वांना दिलासा देत म्हणाले. पुजारी बाबांचे आश्वासक शब्द मानून नीरजने सांगायला सुरुवात केली. 

      मंदार, अनघा, अवनी, नीरज आणि हर्ष सगळे एकाच कंपनीत काम करणारे.एकाच वेळी जाॅब साठी सिलेक्शन झालेले आणि एकत्रच कामावर रुजू झालेले हे पाचही जण गेल्या दोन वर्षात एकमेकांचे चांगले मित्र झाले होते. त्यात सर्वांना वेगवेगळी ठिकाणे फिरण्याची हौस होती म्हणूनच तीन चार महिन्यातून एखादी ट्रीप आयोजित केली जायची. 

       “नीरज… मी काय म्हणतोय .. यावेळी जरा साहसी ट्रीप आयोजित करायची का? ” हर्ष उत्साहाने म्हणाला. पण नीरजने नकारार्थी मान हलवली आणि हर्षने कपाळावर हात मारला. 

        “हमम्…. अनघा नाही म्हणणार हे तुला आधीच माहिती आहे म्हणून तिच्या आधी तूच नाही म्हणतोय….. मग आपण एक काम करु.. अनघाला ट्रीपला न्यायचेच नाही… कशी वाटली कल्पना? ” हर्षने जोरजोरात हसत नीरजला आपली कल्पना सांगितली आणि आता कपाळावर हात मारायची वेळ नीरजची होती. 

       “हर्ष…..अनघाला ट्रीप अगदी सुखरूप पार पडावी अशी इच्छा नेहमीच असते. काहीही विपरीत घटना घडू नये म्हणून ट्रीपला जाताना ती किती तरी वेळा देवाचे नाव घेते आणि हो… सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहस हा शब्द तिच्या शब्दसंग्रहात नाही… एक नंबरची भित्री मुलगी आहे आणि म्हणूनच ती या ट्रीपला नाही म्हणणार.. बघ तुला आधीच सांगतोय “.

     ” म्हणूनच म्हणतोय या ट्रिपला तू, मी आणि मंदार असे तिघेच जाऊ ” . हर्ष म्हणाला खरा पण इकडे नीरजचे डोळे मोठे झाले कारण हर्षच्या पाठीमागे अनघा आणि अवनी हाताची घडी घालून , नाकपुड्या फुगवून हर्ष आणि नीरजकडे रागात पाहत होत्या. 

     ” अच्छा ! म्हणजे हे असं आहे तर हमम्…. मी भित्री काय? आम्हाला ट्रीपला नेणार नाही काय? ” अनघा चिडून बोलत होती आणि हर्ष आणि नीरज काय उत्तर द्यावे या संभ्रमात पडले होते इतक्यात तिथे मंदार आला आणि दोघींचीही समजूत काढू लागला . 

      “अरे अरे अरे !असं कसं बरं ? तुम्ही मुली तर खूप धाडसी आहात. मी पाहीले ना अवनीने त्या दिवशी तिची पर्स चोरुन पळणाऱ्या चोराचा कसा पाठलाग केला होता. खूप खूप धाडसी मुली आहात तुम्ही “. मंदार समजावत म्हणाला आणि अवनी व अनघाचा राग शांत झाला. 

        ” ठीक आहे तर… आपण पाचही जण ट्रीपला जातोय. फणशीच्या जंगलात! जिथे जायला भले भले घाबरतात तिथे जायचं आपण “. हर्ष म्हणाला आणे सगळे आ वासून त्याच्याकडे पाहून लागले. 

       ” ए ,वेड लागलय का तुला हर्ष ? तू फणशीचे जंगल निवडले…. अरे त्या जंगलाबद्ल वेगवेगळे तर्क वितर्क आहेत. तिथे जाणे मला योग्य नाही वाटत ” . अनघा काहीशी घाबरत म्हणाली आणि हर्ष मोठमोठ्याने हसू लागला. 

       “धाडसी म्हणे! हे बघा यांचे धाडस !” हर्षच्या हसण्यावर मात्र अनघा आणि अवनी रागारागाने तयार झाल्या आणि शेवटी ट्रीप ठरली…. फणशीचे जंगल! 

      गप्पा टप्पा, गमती जमती करत प्रवास सुरू झाला. सगळे आनंदात होते. प्रवास सुखकर चालला होता. अर्धा रस्ता संपेपर्यंत तर सगळे मोठ्या उत्साहात होते पण आता पोटात कावळे ओरडायला लागले आणि अनघाने मॅप काढून हाॅटेल शोधायला सुरुवात केली. मॅप पाहताना तिला काही तरी गडबड जाणवली पण तिने दुर्लक्ष केले. गाडी एका हाॅटेल समोर थांबली. फारशी गर्दी दिसत नव्हती. सगळ्यांनी जेवण करून घेतले आणि पुढच्या प्रवासासाठी निघाले. हाॅटेल मधून बाहेर पडताना समोरच हाॅटेल मालक एका खुर्चीवर निवांत बसला होता. नीरजचे लक्ष जाताच त्याची पावले आपसूकच तिकडे वळली. 

        “काका… “. नीरजने हाक देताच हाॅटेल मालक त्याच्याकडे पाहू लागला. 

      ” बोला दादा.. काय म्हणताय ? ” . हाॅटेल मालक पायावर पाय टाकत खुर्चीला रेलून बसत म्हणाला. 

      “काका.. ते फणशीचे जंगल इथून किती अंतरावर आहे ? इथून पुढे जायचे कसे ते सांगाल का ? ” नीरजने विचारले आणि हाॅटेल मालक गूढ हसला. नीरजला थोडे विचित्र वाटले. 

       “हां… सांगतो की… हितनं आसंच फुडं जावा आन् डावीकडं वळा… तिथनं वाईच फुडं गेलासा की लागलं फणशीचं जंगाल.. “. हाॅटेल मालक नीरजचा चेहरा न्याहाळत म्हणाला. 

       आता प्रवास सुरू झाला होता पण जेवण केल्यामुळे सगळे थोडे सुस्तावले होते. गाडी चालवणारा नीरज त्या हाॅटेल मालकाने सांगितल्या प्रमाणे चालला होता. राहून राहून त्याला हाॅटेल मालकाचा चेहरा आठवत होता. पण त्याला खटकलेली ही गोष्ट त्याने कोणालाही सांगितली नाही. 

      साधारण पाचचा सुमार होता . अजूनही जंगल लागले नव्हते. अचानक नीरजने गाडी थांबवली. सगळे चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले. 

      “काय रे काय झाले? गाडी का अचानक थांबवली?” मंदारने विचारताच नीरजने पेट्रोल संपल्याचे सांगितले आणि सगळ्यांचा एकच गोंधळ सुरू झाला. असे कसे पेट्रोल संपले ? तू पाहिले नव्हते का? अशी प्रश्नांची सरबत्ती नीरजवर सुरू होती पण नीरज स्वत:च्याच विचारात हरवला होता. पेट्रोल कसे संपू शकते. मी तर सकाळीच येताना पेट्रोल भरले आहे मग…..? 

      अनघा मॅप काढून पेट्रोल पंप शोधू लागली. अनघाला मॅपवर पेट्रोल पंप दिसला पण थोडा दूर होता. आता सगळ्यांनी गाडी ढकलत न्यायचे ठरवले. मजल दरमजल करत शेवटी सगळे पेट्रोल पंपावर पोहोचले. तोपर्यंत साधारण सायंकाळचे सात वाजत आले होते. पेट्रोल पंपांवर भयानक शांतता पसरली होती. चिटपाखरुही नव्हते. 

     नीरज आणि हर्ष गाडीतून उतरले आणि आवाज देऊ लागले जेणेकरून कोणीतरी तिथे येईल. त्याच्या आवाजाने एक व्यक्ती हळूहळू त्यांच्या दिशेने येताना दिसू लागली पण नीरज आणि हर्ष दोघेही समोरुन येणाऱ्या व्यक्तीला पाहून चपापले. समोरील व्यक्तीने डोक्यावरून पूर्ण अंगावरती चादर गुंडाळली होती . त्या व्यक्तीचा चेहरा दिसून येत नव्हता. काहीही न बोलता ती व्यक्ती गाडी जवळ आली आणि चुपचाप पेट्रोल भरु लागली. पेट्रोल भरल्यावर नीरजने पैसे देण्यासाठी हात पुढे केला आणि त्याला दरदरून घाम फुटला. समोरील व्यक्ती त्याच्याकडे रोखून पाहत होती पण डोळ्यांच्या जागी केवळ दोन खोबण्या होत्या. नाक गायब होते आणि चेहरा विद्रुप! 

      नीरज हळूहळू मागे सरकू लागला आणि पाठीमागे फोन मध्ये व्यस्त असणाऱ्या हर्षला धडकला. हर्षने दचकून पुढे पाहिले आणि त्याच्या हातातून मोबाईल गळून पडला. नीरज अतिशय घाबरला होता आणि आत्तापर्यंत गाडीतील सर्वांनीच समोरील दृश्य पाहीले होते. अनघा तर रडायला लागली होती. पण हर्षने प्रसंगावधान राखत पटकन मोबाईल उचलला आणि नीरजला हाताला धरून ओढून गाडीत बसवले. आता गाडी हर्ष चालवत होता. सुसाट वेगाने तो सर्वांसहीत तिथून बाहेर पडला. 

       सगळे घाबरुन शांत बसले होते. इतक्यात अवनी जोरात ओरडली….मॅप परत पाहताच तिच्या जे लक्षात आले त्याने ती खूपच घाबरली कारण आता मॅप वर त्या ठिकाणी कोणताही पेट्रोल पंप दिसत नव्हता.कोणालाच समजेना आपण पाहिले ते सत्य होते की भास. नीरजला तर सतत ते खोबणी विरहित डोळे दिसत होते. मंदार आणि अवनी ते दृश्य विसरण्याचा प्रयत्न करत होते. इतक्यात हर्षला गाडीतून समोर एक मुलगी दिसली. तिचा चेहरा सर्वसाधारण होता पण ती रस्त्याच्या मधोमध उभी होती. हर्षने करकचून ब्रेक मारला आणि सगळे अवाक झाले. 

       “हर्ष गाडी का थांबवली? .. चल पटकन.. इथून बाहेर निघायचे आहे आपल्याला “. मंदार जोरात ओरडत म्हणाला. 

       ” अरे.. ती मुलगी अचानक गाडी समोर आली ना ? मी तिला पाहूनच ब्रेक मारला ” . हर्षने सांगताच सगळे चिडले. तिथे कोणतीही मुलगी नाही . आम्हाला कोणीही दिसले नाही हे ऐकताच हर्ष घाबरला. त्याने गाडी सुरू केली आणि ते पुढे जाऊ लागले पण हर्षला बाजूच्या आरशात ती मुलगी पाठीमागे दिसली . त्यासरशी हर्षने गाडीचा वेग वाढवला. त्याने सगळ्यांना हा प्रकार सांगितला पण यावेळी सर्वांना हा हर्षचा भास असेल असे वाटले. घाबरल्यामुळे आपल्याला भास झाला असे हर्षला पण वाटू लागले . 

      रात्रीचे अकरा वाजत आले होते आणि सगळे तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. गाडीने बरेच अंतर कापले होते पण बाहेर पडायची वाट काही सापडत नव्हती. इतक्यात गाडीतून समोर पाहून आता तर अवनीनेही रडायला सुरुवात केली. 

       समोर तिच मुलगी गाडी समोर रस्त्याच्या मधोमध उभी होती. हर्ष ओरडला हिच ती मुलगी आहे तसा नीरज सावध झाला आणि हर्षला गाडी चालवत रहा असे सांगू लागला. हर्षने देखील नीरजचे ऐकत सुसाट वेगाने गाडी चालवली. आता कोणीही मागे वळून पाहीले नाही. सगळे देवाचा धावा करत होते आणि गाडी सुसाट पळत होती. 

       पहाटे पाचच्या सुमारास गाडी कशी बशी एका मंदीरा समोर आली आणि मंदीर पाहताच सगळ्यांच्या जिवात जीव आला. सगळ्यांनी मंदीरात धाव घेतली आणि इथे येऊन सर्वांनाच रडू फुटले. 

      पुजारी बाबा शांतपणे बसून ऐकत होते. त्या पाचही जणांना आलेला अकल्पनिय अनुभव ऐकून पुजारी बाबांनी दीर्घ उसासा टाकला . एकदा समोरच्या गणपतीच्या मूर्तीकडे पाहून मनोभावे हात जोडले. 

       “मुलांनो… खूप मोठ्या संकटातून वाचला आहात तुम्ही सगळे. कारण फणशीच्या जंगलात जाणारा कधीच परत येत नाही पण तुम्ही सगळे गणेशाच्या कृपेने सुखरूप त्या जंगलातून बाहेर पडला “. पुजारी बाबा गंभीर होऊन बोलत होते. 

      ” पण बाबा.. आम्ही तर जंगलात पोहोचलोच नाही… म्हणजे आम्हाला कुठेही जंगल लागलेच नाही.. मग….? ” . अवनी चकित होत म्हणाली आणि पुजारी बाबांनी स्मितहास्य केले. 

       “तुम्ही ज्या ठिकाणी हाॅटेल समजून जेवायला थांबलात…. तिथूनच सुरुवात झाली होती या सगळ्याची.. तुम्ही त्यावेळी जंगलाच्या मध्यभागी होता. तिथे हाॅटेल मालक म्हणून तुम्हाला भेटलेली व्यक्तीच पेट्रोल पंपावर भेटली होती. तुम्ही जंगलात पोहोचला पण तुम्हाला समजले देखील नाही.. म्हणजेच चकवा लागला तुम्हाला….. चकवा… “.पुजारी बाबांच्या खुलाशाने सगळ्यांच्या पायाभोवतीची जमिन सरकली. 

       ” फार पूर्वी फणसांच्या झाडांनी व्यापलेला प्रदेश होता . अतिशय सुंदर,निसर्गरम्य वातावरण होते पण काही दुष्ट जमीनदारांच्या मुळे तिथे वृक्षतोड करण्याचा निर्णय घेण्यात आला . तेव्हा जंगलाच्या जवळ असणारे एकमेव गाव होते फणशी. तिथल्या लोकांनी विरोध दर्शवला आणि त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी जमीनदारांनी गाव पेटवून दिले पण त्यानंतर मात्र चित्र विचित्र घटना घडू लागल्या आणि फणशीच्या जंगलात जाणे लोकांनी सोडून दिले. आजही ते लोक तिथे कोणाला येऊ देत नाहीत. अजूनही ते झाडांचे रक्षण करत उभे आहेत “. पुजारी बाबा बोलत होते आणि सगळे शांतपणे ऐकत होते. 

       ” बाबा…. आम्हाला घरी जायचे आहे. तुम्ही आम्हाला रस्ता सांगा जेणेकरून आम्ही सुखरूप घरी पोहोचू . परत कधीही इकडे फिरकणार नाही “. अनघा रडत रडत पुजारी बाबांना विनंती करत होती. 

        पुजारी बाबा जागचे उठले. सर्वांना देवाला नमस्कार करायला सांगितला आणि पुजारी बाबांनी त्यांना घरी परतण्याची योग्य दिशा दाखवली. सरते शेवटी पाचही जण घरी सुखरूप पोहोचले होते पण पुढील काही दिवस मात्र कोणीही आपल्या सोबत घडलेली घटना विसरु शकले नाही. पुन्हा अशी अतिधाडसाची ट्रीप त्या पाचही जणांनी कधीही आयोजित केली नाही. 

टीप : सदर कथा कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. 

       कथा कशी वाटली तुमचे बहुमूल्य अभिप्राय देऊन जरुर कळवा .तुमच्या मित्रपरिवारासोबत कथा शेअर करा आणि अशा नवनवीन कथांसाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाइटला भेट द्या. आमचे what’s up चॅनेल जाॅइन करा. धन्यवाद. 

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

2 thoughts on “मराठी भयकथा – फणशीचे जंगल l Horror Story for readers”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top