शब्दसंग्रह कसा वाढवावा? l How to improve vocabulary in Marathi

WhatsApp Group Join Now

How to improve vocabulary in Marathi: 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन 27th February Marathi Language Day साजरा झाला. पुन्हा एकदा मराठी भाषेचे महत्व सांगितले गेले, गोडवे गायले गेले. परकीय भाषा सोडून मातृभाषेचा आग्रह धरला पाहिजे वगैरे वगैरे चर्चासत्र झाले. यामधील टिकात्मक भाग सोडला तर आपल्या मायबोली मराठीवर प्रत्येकाचे नितांत प्रेम आहे, हे दिसून आले.

भाषा हे संवादाचे माध्यम आहे. भाषेतील योग्य शब्द हे योग्य अर्थाने, योग्य जागी आणि योग्य वेळी वापरले तर सुसंवाद साधला जातो. नाहीतर व्यक्तीच्या मनातील विचार, भावना इतरांपर्यंत चुकीच्या पद्धतीने पोहोचतात. हा नियम सर्व भाषांना लागू होतो. तसा तो आपल्या मराठी भाषेलाही लागू होतो. मराठी भाषा शिकायची असेल, आत्मसात करायची असेल, जतन करायची असेल तर उत्तम शब्दसंग्रह Vocabulary हा हवाच!

मराठी शब्दसंग्रह कसा वाढवावा? How to improve vocabulary in Marathi

लहान बाळ आपल्या आईसोबत मूकसंवाद साधत असते. हळू हळू ते बोबडे बोल बोलू लागते. मग एकेक शब्द, एकेक वाक्य बोलू लागते. जसजशी त्याची शब्दसंपदा वाढते तसं ते अधिक मोकळेपणाने आणि अर्थपूर्ण बोलू लागते. त्याचप्रमाणे एखादी अन्य भाषिक व्यक्ति मराठी शिकत असेल तर तीसुद्धा सुरुवातीला चुकतमाकत, अडखळत मराठी बोलते. सवयीने आणि सरावाने ती व्यक्ति चांगलं मराठी बोलते.

थोडक्यात मराठी भाषा आत्मसात करायची असेल तर भाषेतील नवनवीन शब्द शिकले पाहिजेत Learning new words. शब्दसंग्रह वाढला पाहिजे.

शब्दसंग्रह वाढवण्यासाठी अनेक मार्ग आहेत.

1.      मराठी शब्दकोश – Marathi Dictionary

शब्दसंग्रह म्हणताच सर्वात आधी आठवतो तो शब्दकोश. मराठी शब्दकोश हे एक असे पुस्तक असते ज्यामध्ये मराठी भाषेतील सर्व शब्द त्यांच्या अर्थासहित नमूद केले असतात. काही शब्दकोशात अर्थासोबत त्या शब्दासाठी प्रतिशब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द दिलेले असतात. एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने कसा वापरला जातो त्याची उदाहरणे दिलेली असतात.

अन्य भाषिक व्यक्तीला मराठी शिकायची असेल तर त्याला भाषा-जोडीच्या शब्दकोशाचा Language Pair Dictionary खूप उपयोग होतो. उदाहरणार्थ – एक बंगाली भाषिक व्यक्तिला मराठी भाषा शिकायची असेल तर तो बंगाली-मराठी, मराठी-बंगाली शब्दकोशाचा उपयोग करू शकतो. ज्यामध्ये मराठी शब्दांचे बंगाली भाषांतर दिलेले असते. तसेच बंगाली शब्दाला मराठी भाषेत पर्यायी शब्द दिलेला असतो.  

2.      वाचन – Reading

भरपूर वाचन करणे हा शब्दसंग्रह वाढवण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. शब्दकोशामध्ये शब्द आणि अर्थांची यादी असते. यादी लक्षात ठेवणे तसे कठीण असते. वाचन करताना मात्र तेथे एक संदर्भ असतो. संदर्भामुळे शब्दाचा अर्थ अधिक चांगल्या पद्धतीने कळतो. तसेच एकच शब्द वेगवेगळया संदर्भात कसा वापरला जाऊ शकतो ते सुद्धा समजते.  

काय आणि कसे वाचावे –

·        लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी.

·        विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करावे.

·        सुरूवातीला सोपी सोपी पुस्तके वाचावी.

·        बालसाहित्य वाचावे.

·        मराठी भाषेतील वाक्प्रचार आणि म्हणींवर आधारित गोष्टींची पुस्तके वाचावी.

·        वर्तमानपत्रे, नियतकालिके यांचे वाचन करावे. यामध्ये सद्यस्थितीवर आधारित मजकूर असतो. त्यामुळे आजूबाजूला जे घडते आहे त्या संदर्भात नवीन शब्द आणि अर्थ लगेच समजू शकतो.

·        वाचताना सोबत शब्दकोश असेल तर लगेच नवीन शब्दाचा अर्थ शोधावा. नंतर ते वाक्य पुनः एकदा वाचावे.

3.      संवाद  Communication

मराठी शब्दसंग्रह वाढवायचा असेल तर आधी मराठी भाषा लक्षपूर्वक ऐकायला शिकावे. तसेच सुरुवातीला चूक झाली तरी चालेल पण जमेल तेवढं मराठीमध्ये बोलावे; कारण शब्दाचा उच्चार कसा असावा हे प्रत्यक्ष ऐकल्यानंतरच कळते; आणि आपण बोलताना शब्दाचा उच्चार बरोबर आहे की नाही हे कळते.    

कोणी आपल्यासोबत मराठीमध्ये संवाद साधत असेल किंवा टीव्हीवर मराठी भाषेतील कार्यक्रम सुरू असेल, तर ते ऐकत असताना शब्दरचना, वाक्यरचना याकडे लक्ष द्यावे. वेगवगळ्या संदर्भात शब्द कसा वापरला जातो, बोलताना शब्दोच्चारामध्ये बदल झाला तर अर्थ कसा बदलतो याचे प्रात्यक्षिक जेव्हा आपण मराठी भाषा ऐकतो आणि बोलतो तेव्हाच मिळते.

काय करावे (How to improve vocabulary in Marathi) 

·        छान छान गोष्टी ऐकाव्या, गाणी ऐकावी

·        टीव्हीवर मराठी कार्यक्रम पाहताना, रेडियो ऐकताना लक्षपूर्वक ऐकावे.  

·        सांस्कृतिक कार्यक्रमाला जावे. तेथे मराठी भाषा आणि संस्कृती दोन्हीची ओळख होते.

·        चांगले मराठी नाटक, सिनेमे बघावे.  

·        मराठी भाषिकांसोबत मराठी भाषेतच संवाद साधायचा प्रयत्न करावा.

·        बोलताना एक एक शब्द, छोटी छोटी वाक्यरचना करावी.

4.      नोंदी करणे – Taking notes

आपण एखादी नवी गोष्ट शिकतो तेव्हा त्याची नोंद करून ठेवतो; जेणेकरून नंतर त्याचा आपण योग्य उपयोग करू शकतो. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी नोंद करण्याच्या सवयीचा खूप उपयोग होतो.

·        बरेचदा नवीन शब्द ऐकला की लगेच अर्थ विचारायला संकोच वाटतो. त्यावेळी अशा नवीन शब्दांची नोंद करून ठेवावी.

·        शब्दकोशात तो शब्द शोधून त्याचा अर्थ समजून घ्यावा.

·        नेहमीच्या व्यवहारातील शब्द, छोटी छोटी वाक्ये यांची नोंद करावी. त्यांची उजळणी करावी.

·        वेगवेगळ्या संदर्भात तो शब्द कसा वापरला आहे त्याची नोंद करावी.

·        या नोंदीची वेळोवेळी उजळणी करून त्याचा हळू हळू उपयोग करावा.

5.      शब्दखेळ / शब्दकोडे – Word Games / Word Puzzles

खेळ खेळायला कोणाला आवडत नाही. लहान मुलाची शिक्षणाची सुरुवात ही बालवयातील खेळापासूनच सुरू होते. लहान मुलांमध्ये तसेच मोठ्या माणसांमध्ये शब्दसंग्रह वाढवण्यासाठी निरनिराळे खेळ खेळता येतात.

·        शब्दकोडे Word Puzzles –

शब्दकोडे हा सर्वांचा आवडता खेळ. दिलेल्या शब्दाला पर्यायी शब्द वापरुन कोडे पूर्ण करणे या स्वरूपाचा हा खेळ आहे. साहजिकच जेवढी शब्दसंपदा जास्त तेवढे कोडे लवकर सुटते. सततच्या सरावाने शब्दसंग्रह नक्कीच वाढतो.

·        फ्लॅश कार्ड Flash Cards 

लहान मुलांमध्ये शब्दसंग्रह वाढवण्यासाठी हा खेळ उपयुक्त आहे. विशेषत: शिशुवर्ग, बालवर्गात विद्यार्थ्यांसोबत हा खेळ नक्कीच खेळतात. कार्डवर लिहिलेले अक्षर किंवा शब्द वाचणे अशा सोप्या सोप्या क्रियेमधून मुलांचा शब्दसंग्रह वाढतो.  

·        चित्रवाचन Pictionary –

हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये मुलांना एक चित्र दाखवले जाते आणि मुलांना त्याचे वर्णन करायला सांगितले जाते. मुले वर्णन करतात तेव्हा साहजिकच त्यांचे शब्दभांडार वाढते. अर्थानुसार शब्द वापरणे, एकच शब्दाचे प्रतिशब्द वापरणे ही कौशल्ये विकसित होतात.

·        कुटुंब वाचन आणि समूह वाचन Family Reading / Group Reading –

हा एक उपक्रम हसत खेळत करता येतो. वाचनामुळे शब्दसंग्रह कसा वाढतो हे आपण या आधी पाहिले. मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढावी यासाठी आपण वाचन खेळ खेळू शकतो. पालकांनी मुलात मूल होऊन वाचन करावे, मुलांचे गटागटात वाचन घ्यावे. मुलांना अर्थ विचारावा. समजावून सांगावा. योग्य उत्तर देणाऱ्याचे कौतुक करावे, बक्षीस द्यावे. यामुळे वाचनाची प्रक्रिया कंटाळवाणी होत नाही, मजेशीर होते.  

·        अन्य खेळ –

बाजारात असे खूप सारे शैक्षणिक खेळ आहेत जसे की अक्षर खेळ Letter Games, शब्द खेळ Word Games, ठोकळ्याचे खेळ Block Games, स्क्रॅबल Scrable इत्यादि. लहान मुलांना भेटवस्तू देतेवेळी असे खेळ दिले तर मुलांना आनंद होतोच आणि त्यांचा बालवयात शब्दसंग्रह वाढण्यास मदत होते.

6.      तंत्रज्ञान 

माहिती आणि तंत्रज्ञानाने आपले जीवन व्यापून टाकले आहे. असा कोणताही विषय नाही ज्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात नाही. मग भाषाविकास हा मुद्दा कसा मागे राहील?

·        ऑनलाइन खेळ आणि ॲप्स Online games and Apps – इंटरनेटच्या दुनियेत असे कितीतरी ऑनलाइन खेळ आणि ॲप्लीकेशन्स उपलब्ध आहेत ज्याचा वापर करून शब्दसंग्रह वाढवता येतो. हे खेळ अतिशय रंजक पद्धतीने तयार केलेले असतात. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना हे खेळ खेळायला आवडतात. काहीवेळा खेळ खेळून झाला की लगेच छोटीशी चाचणी घेतली जाते आणि निकाल दिला जातो. त्यामुळे आपण कसे खेळलो, आपल्याला किती समजले आहे, अजून किती तयारी करावी लागेल याची कल्पना येते.

·        ई-बुक, यू ट्यूब, पॉडकास्ट E-books, You Tube, Podcast – वाचणे, पाहणे, ऐकणे यामधून शब्दसंग्रह कसा वाढतो ते आपण पाहिलेच आहे. आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आपल्याला ई-बुक, यू ट्यूब, पॉडकास्ट व इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच शब्दकोशाचा वापर करणाऱ्यांसाठी ऑनलाइन शब्दकोशाचा पर्याय उपलब्ध आहे.

गेल्या काही दशकांपासून  इंग्रजी शाळांची संख्या वाढत गेल्यामुळे तसेच व्यावहारिक भाषेत इंग्रजीचा प्रभाव वाढल्यामुळे मराठी भाषेची पीछेहाट होत आहे ही वस्तुस्थिती आहे. मराठी आपली मातृभाषा आहे. तीचे जतन, संवर्धन करणे हे आपल्याच हातात आहे. इतरांनी काय करावे यावर काथ्याकूट न करता आपण स्वत: वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर काय  करू शकतो ते महत्वाचे आहे. पुढच्या पिढीला आपल्या मातृभाषेचा मराठीचा वारसा द्यायचा असेल तर लहान वयातच त्यांना मराठी भाषेची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करायला हवे. त्यामध्ये मराठी शब्दसंग्रह वाढवणे हा एक महत्वाचा टप्पा आहे.

मराठी शब्दसंग्रह कसा वाढवावा How to improve vocabulary in Marathi याबद्दलचा हा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला या लेखाबद्दल काही सूचना करायच्या असतील तर तुमच्या सूचनांचे स्वागत आहे.

विविध विषयांवरील माहितीपूर्ण लेख तसेच कथा वाचण्यासाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला भेट देत रहा तसेच आमचा whatsapp ग्रुप जॉइन करा.

धन्यवाद!

8 thoughts on “शब्दसंग्रह कसा वाढवावा? l How to improve vocabulary in Marathi”

  1. खुप छान पद्धतीने सागितले आहे. खास करून आता इंग्रजी भाषेत मुले शिकत असताना हया टीप त्यांना आणि त्यांच्या पालकांना खुप उपयुक्त आहेत.

    1. Kavita Samant Nayak

      धन्यवाद श्रावणी,
      एक पालक म्हणून आपल्याला लेख उपयुक्त वाटला याचा खूप आनंद आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top