वृद्धापकाळी स्मरणशक्ती तल्लख कशी ठेवावी?

WhatsApp Group Join Now

वृद्धापकाळी स्मरणशक्ती तल्लख कशी ठेवावी? (How to prevent memory loss in old age?)

आपल्या आजूबाजूला आपण अनेकदा ‘आजकाल ना, माझ्या काही लक्षातच राहत नाही.’ अशी तक्रार करणाऱ्या किंवा एखादे नाव, ठिकाण आठवताना ‘अगदी जिभेच्या टोकावर आहे, पण आठवताच नाही.’ असे म्हणणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती पाहतो. साधारण साठीनंतर अश्या तक्रारी करायला सुरुवात होते. बहुतेकवेळा बोलणारा आणि ऐकणाराही याचे खापर ‘वय’, ‘वृद्धापकाळ’ यावर फोडून मोकळा होतो. मग, कुठेतरी एखाद्या स्मृतिभंश झालेल्या व्यक्तीबद्दल काहीतरी वाचण्यात, ऐकण्यात येते. किंवा एखाद्या जवळच्या नातेवाईकालाच स्मृतिभंश होतो. तेव्हा ‘आपल्याला स्मृतिभ्रंश तर होणार नाही ना?’ असा विचार मनात येऊन अजूनच चिंता दाटून येते. पण खरंच, वय आणि स्मरणशक्ती यांचा संबंध आहे का हो? वाढत्या वयाबरोबर स्मरणशक्ती कमी होते का? असेल, तर ती का होते? आणि यावर उपाय काय? असे अनेक प्रश्न वाढत्या वयाबरोबर मनात उमटू लागतात. याच प्रश्नांची उत्तरे या लेखात जाणून घेणार आहोत. 

स्मरणशक्ती कमी होण्याची कारणे:

सर्वप्रथम हे लक्षात घेणे आवश्यक आहे की जसजसे  आपण वयाने वाढतो, तसतसे आपल्या शरीरातील मेंदूसकट सर्व अवयवांमध्ये बदल घडत असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी ही एक अखंड आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. असे म्हणतात की ‘द चेंज इज द ओन्ली पर्मनंट थिंग इन अवर लाइफ.’ आपला मेंदू हा शरीरातील गुंतागुंतीच्या अवयवांपैकी एक आहे. आपल्या मेंदूत स्मृती, बुद्धीमत्ता आणि कल्पनाशक्ती अशी वेगवेगळी केंद्रे असतात. अगदी झोपेतही मेंदूचे कार्य अखंड चालू असते. आपण करीत असलेल्या प्रत्येक कामात मेंदूचा सहभाग असतोच. वाढत्या वयाबरोबर मेंदूचाही ऱ्हास होतो. मानवी मेंदूतील पेशी वयापरत्वे कमी होतात व त्यामुळे विस्मरण होते. विस्मरणाची ही प्रक्रिया नैसर्गिक असली तरी ती व्यक्तिसापेक्षही आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीत ती वेगवेगळी असते. आनुवंशिकता, जीवनशैली, आजूबाजूचे वातावरण अशा अनेक गोष्टींवर ती अवलंबून असते. 

वाढत्या वयासोबत येणारे विविध आजार तसेच अनेक कारणांनी जीवनात येणारे नैराश्य हे सुद्धा स्मरणशक्ती कमी होण्याचे एक कारण आहे. नैराश्यामुळे मनुष्य बाहेरच्या जगाशी संपर्क तोडून आपल्या कोषात जातो. नवी माहिती शिकण्यात त्याला रस वाटत नाही. 

औषधांचे दुष्परिणाम, मेंदूवर झालेले आघात, जीवनसत्वाची कमतरता, ताणतणाव, अतिश्रम, अपुरी विश्रांती अशी अनेक कारणे सुद्धा स्मरणशक्तीच्या ऱ्हासास कारणीभूत होऊ शकतात. 

स्मरणशक्तीसंबंधी जाणवणाऱ्या समस्या

सर्वसाधारणपणे वाढत्या वयासोबत स्मृतीसंबंधी खालील समस्या जाणवू लागतात:

  • पूर्वी लक्षात असले माहिती न आठवणे किंवा ती आठवण्यास वेळ लागणे.
  • नव्याने सांगितलेली माहिती लक्षात न रहाणे किंवा ती लक्षात ठेवण्यास अधिक वेळ लागणे.
  • अधूनमधून वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवणे.

ही सर्व सौम्य विस्मरणाची चिन्हे आहेत. खरे सांगायचे तर, कोणत्याही वयात वेळोवेळी विस्मरण होणे ही पूर्णपणे सर्वसामान्य गोष्ट आहे.

परंतु ज्याप्रमाणे शारीरिक क्षमता टिकवण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक असते, त्याच प्रमाणे मेंदूचा ऱ्हास कमी करण्यासाठी किंवा आलेले नैराश्य दूर करण्यासाठी मेंदूच्या व्यायामाची आवश्यकता असते. संशोधनातून असे लक्षात आले आहे की मेंदूचे काही व्यायाम केल्याने आपली स्मृती तल्लख राहण्यास मदत होते.आपली स्मरणशक्ती, एकाग्रता आणि लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता अश्या व्यायामांमुळे वाढू शकते हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. जर आपण आपले स्नायू वापरले नाहीत तर ते नष्ट होतात. मेंदूचेही तसेच आहे. तो जसा आणि जेवढा वापरू, तेवढा तो सक्षम राहतो.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी (विस्मरण टाळण्यासाठी) काय उपाय करावे? त्यासाठी काही औषध आहे का?

आपला मेंदू २४x७x३६५ असा सतत काम करत असतो. त्यामुळे तो स्वस्थ राखणे फार महत्वाचे आहे. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे त्याचीही काळजी घेतली पाहिजे. वयापरत्वे येणारे सौम्य विस्मरण टाळण्यासाठी अनेक साधे, सोपे उपाय करता येतात. त्यापैकी काही उपाय असे:

  • ध्यान करणे: आपल्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य नीट राखण्यासाठी ध्यानाचा उपयोग होतो. आपल्या मेंदूत अविरत चालणाऱ्या विचारांचा गलबलाट कमी करुन तो शांत करणे आणि एका ठिकाणी लक्ष केंद्रित करणे यांचा समावेश ध्यानात होतो. नियमितपणे ध्यान केल्यास मेंदूचा ऱ्हास कमी होऊन स्मरणाशक्ती मजबूत होण्यास मदत होते. नैराश्यातून बाहेर पडण्यासही ध्यानधारणेचा मोठा उपयोग होतो. 
  • शारीरिक व्यायाम करणे: चालणे, पोहणे, धावणे असे शारीरिक व्यायाम केल्याने शरीरातील स्नायू बळकट होण्यास मदत होते व परिणामस्वरूपी आपला मेंदूही सुदृढ राहण्यास मदत होते. 
  • सामाजिक दृष्ट्या क्रियाशील राहणे: मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, हितचिंतक यांच्या सहवासात राहणे, त्यांच्यासोबत गप्पागोष्टी, हास्यविनोद करणे, विविध विषयांवर चर्चा करणे यामुळेही मेंदूला विश्रांती मिळते. मेंदूला चालना मिळण्यासाठी समाजात मिसळणे, सामाजिक कार्यात सहभागी होणे आवश्यक असते. 
  • कोडी आणि शब्दाकोडी सोडवणे: वेगवेगळ्या प्रकारची कोडी, शब्दाकोडी तसेच सुडोकूसारखी संख्याकोडी सोडवणे हा केवळ वेळ घालवण्याचा एक उत्तम मार्गच नाही, तर त्यामुळे मेंदूतील विचार करण्याच्या प्रक्रियेला पण चालना मिळते. कोडी आणि शब्दाकोडी सोडवल्याने मेंदूची ग्रहणशक्ती आणि आकलनशक्ती सुधारते. 
  • नवीन कौशल्ये आत्मसात करणे: मेंदूची क्षमता टिकवण्याचा आणि वाढवण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. आपल्या आवडीनिवडी जोपासत प्रत्येकाने काही नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ते मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.  
  • संगीत: संगीत ऐकणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे या सर्वांचा मेंदूच्या आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. संगीतामुळे ताण, चिंता, वेदना, दुःख विसरले जाते. याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास हातभार लागतो.
  • वेगवेगळे छंद जोपासणे: आपल्या लहानपणी परिस्थितीमुळे, किंवा तरूणपणी कार्यबाहूल्यामुळे मागे पडलेले छंद जोपासण्याने मेंदू ताजातवाना होतो. त्यातील नकारात्मक विचार निघून जाण्यास मदत होते. गायन, वादन,नर्तन, लेखन, वाचन, बागकाम करणे, नवीन भाषा शिकणे असे छंद जोपासण्याने मेंदूचे आरोग्य टिकवण्यास मदत होते.
  • पुरेशी झोप घेणे: ‘झोप घेणे’ हा काही एखादा सक्रिय व्यायाम प्रकार नाही. पण मेंदूच्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे प्रौढांना ६ ते ८ तास झोप पुरेशी होते. झोपेत मेंदू त्यामानाने कमी कार्यरत असतो. त्यामुळे त्याला आवश्यक ती विश्रांती मिळते. परिणामी मेंदूची झालेली झीज भरून निघण्यास मदत होते. 
  • स्मरणशक्तीचा खेळ: हा खेळ व्यक्ती एकट्याने सुद्धा खेळू शकते. यामध्ये आजूबाजूच्या किंवा परिसरातील वस्तू आठवून लिहिणे, पूर्वी पाहिलेल्या चित्रपटांची/ नाटकांची नावे, वाचलेल्या पुस्तकांची नावे इत्यादी आठवून लिहिणे असे काहीही आठवून लिहीता येईल. यामुळे बौद्धिकदृष्ट्या सक्रिय राहण्यास मदत होते.
  • कुटुंबीयांसमवेत बैठे खेळ खेळणे: कॅरम, बुद्धिबळ, पत्ते असे खेळ खेळल्याने एकाग्रता, समन्वय व स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच असे खेळ खेळल्याने कौटुंबिक बंध दृढ होण्यास मदत होते. 
  • पौष्टिक आहार घेणे: बदलती जीवनशैली आणि वाढते ताणतणाव हे ही मेंदूच्या ऱ्हासाचे एक महत्त्वाचे कारण आहे. तृणधान्ये व कडधान्ये, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, फळे यांचा समावेश असलेले सकस, ताजे अन्न मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. 

हे सर्व उपाय म्हणजे वृद्धापकाळी स्मरणशक्ती तल्लख ठेवण्याचे (किंवा विस्मरण कमी करण्याचे) मंत्रच आहेत. आयुर्वेदात स्मरणशक्ती तल्लख ठेवण्यासाठी काही औषधेही सांगितली आहेत. परंतु ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच घेणे योग्य ठरेल.

हे सर्व झाले वृद्धांमधील सर्वसाधारण विस्मरणाबद्दल! पण स्मृतिभ्रंश किंवा इंग्रजीमध्ये ज्याला डिमेन्शिया [Dementia] असे म्हणतात हा मात्र सर्वसामान्य विस्मरणाचा प्रकार नाही. 

स्मृतिभ्रंश (डिमेन्शिया) म्हणजे काय? 

जेव्हा मेंदूतील मज्जातंतू काम करणे थांबवतात, मेंदूच्या इतर मज्जातंतूंशी त्यांचा संपर्क तुटतो आणि त्या मृत होतात तेव्हा माणसामध्ये स्मृतिभ्रंशाची लक्षणे दिसून येतात. स्मृतिभ्रंश हा एक असा आजार आहे ज्यात विस्मरणाबरोबर विचार करण्याची क्षमता कमी होते.  माणसाची निर्णयशक्ती कमी होते. त्याच्या वागण्यात समजुतदारपणाचा अभाव आढळतो. अनेकदा तर तऱ्हेवाईक म्हणता येईल असे तो वागू लागतो. चिडचिडेपणा, हट्टीपणा वाढतो. कुटुंबीयांना त्याच्याबरोबर विचारांची देवाणघेवाण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हा आजार जेव्हा गंभीर रूप धारण करतो तेव्हा अशा व्यक्तीला आपल्या दैनंदिन कामासाठीसुद्धा सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. स्मृतिभ्रंशाचे अनेक प्रकार आहेत. अल्झायमर्स हा सुद्धा स्मृतिभ्रंशाचाच एक प्रकार आहे. मेंदूच्या काही भागांमध्ये मज्जातंतूंमध्ये बदल झाल्याने स्मृतिभ्रंश होतो. या आजारावर जगभर संशोधन चालू आहे. पण निश्चित असे कारण आणि उपाय मात्र अजून सापडले नाहीत. 

अनेकदा स्मृतिभ्रंशाकडे ‘वयोमानाने येणारे विस्मरण’ असे मानून दुर्लक्ष होते. त्यामुळे आजार बळावतो आणि मग त्यावर इलाज करणे कठीण होते. या आजाराचे वेळेवर (सुरुवातीच्या टप्प्यात) निदान करून औषधोपचाराच्या सहाय्याने तो नियंत्रणात ठेवता येतो. त्यामुळे जर विस्मरणाने तुमच्या दैनंदिन कामात व्यत्यय येऊ लागला असेल तर ती धोक्याची घंटा समजून वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. 

६५ वर्षे वयापुढील जवळजवळ ४०% लोकांना स्मरणशक्ती कमी होण्याचा अनुभव येतो. (म्हणजे ६०% लोकांना तो येत नाही!) तसेच या ४०% लोकांमधे स्मरणशक्ती कमी होत असली तरीही त्यांना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता कमी असते. बऱ्याचदा आपली स्मृती कमी होणे इतके सौम्य असते की आपण आपले दैनंदिन जीवन विनव्यत्यय  पार पाडू शकतो. WHO च्या मते ६० वर्षे वयापुढील ५ ते ८% व्यक्तींना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता असते. 

तेव्हा, ज्येष्ठ नागरिकांनो, काळजी करू नका. पण काळजी घ्या. वर सांगितलेल्या उपायांच्या मंत्राने वृद्धापकाळी आपली स्मरणशक्ती तल्लख ठेवा!

तुम्हाला ‘वृद्धापकाळी आपली स्मरणशक्ती तल्लख कशी ठेवावी?’ याबद्दलची ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपही जॉईन करा.

      धन्यवाद !

2 thoughts on “वृद्धापकाळी स्मरणशक्ती तल्लख कशी ठेवावी?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top