केस स्टडी म्हणजे एखाद्या गोष्टीचे किंवा व्यक्तीचे सखोल परीक्षण. याचे विविध प्रकार आणि शैली आहेत. सध्याच्या काळात केस स्टडी अनेक क्षेत्रात एक प्रभावी साधन म्हणून वापरले जाते. चला तर मग या बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या या लेखात.
या लेखात आपण पुढील गोष्टी सविस्तर जाणून घेऊ:
- केस स्टडी म्हणजे काय?
- केस स्टडी कुठल्या क्षेत्रात वापरली जाते?
- केस स्टडी चे विविध प्रकार कुठले?
- केस स्टडी कशी लिहावी?
केस स्टडी म्हणजे काय? (What is Case Study)
केस स्टडी म्हणजे एखादी व्यक्ती, समूह किंवा विशिष्ट परिस्थिती यांचा विशिष्ठ काळात वास्तविक जगतात केलेला सखोल अभ्यास. ही एक प्रस्थापित संशोधन प्रणाली आहे जी विविध विषयांमध्ये वापरली जाते. केस स्टडी मधील माहिती ही गुणात्मक आणि परिमाणात्मक अशा दोन्ही स्वरूपात असू शकते. प्रयोगशाळेत जेथे संशोधक नियंत्रित परिस्थितीत संशोधन करतात तिथेच केस स्टडी मध्ये नैसर्गिक वातावरणात अभ्यास केला जातो.
केस स्टडी कुठल्या क्षेत्रामध्ये वापरली जाते?
केस स्टडी ही प्रणाली अनेक क्षेत्रांमध्ये वापरली जाते जसे की, बिझनेस, वैद्यकशास्त्र, शैक्षणिक, आणि सामाजिक विज्ञान इत्यादी.
- बिझनेस: बिझनेस केस स्टडी मध्ये बिझनेस मधील समस्या प्रभावीपणे कशा सोडवल्या जातात याचे स्पष्टीकरण असते. बिझनेस केस स्टडी शिक्षण पद्धती म्हणून पहिल्यांदा हार्वर्ड बिझनेस स्कूल मध्ये १९२० साली वापरण्यात आली. तिथे पहिल्यांदा खऱ्या आयुष्यातील केसेस कॉलेजमध्ये वर्गात शिकवल्या गेल्या. आणि त्यावर चर्चा केली गेली.
- गुन्हा अन्वेषण: यामध्ये साधारणतः एखादी व्यक्ती किंवा समूह याविषयी सखोल अभ्यास केला जातो. गुन्हेगारांची पार्श्वभूमी, मानसिकता आणि त्यांचा हेतू याबद्दल परीक्षण करण्यासाठी या केस स्टडी चा उपयोग केला जातो.
- समाजशास्त्र: समाजशास्त्रात केस स्टडी प्रणाली ही पहिल्यांदा १९ व्या शतकात फ्रेडरिक ले प्ले या समाजशास्त्रज्ञाने विकसित केली. यामध्ये संशोधन करणाऱ्या व्यक्तीला एखाद्या समूहाबरोबर राहून त्यातील सदस्यांच्या सवयी, वृत्ती, परस्परांमधील संवाद ह्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. असा अभ्यास कधी कधी वर्षानुवर्षे चालू राहतो.
- वैद्यकशास्त्र: प्रत्येक डॉक्टर आजकाल रुग्णाची पार्श्वभूमी समजून घेऊन मगच उपचार सुरु करतात. याला सुद्धा एक केस स्टडी प्रणालीच मानले जाते.
केस स्टडी चे विविध प्रकार: (Different types of case study)
केस स्टडी चे अनेक प्रकार आहेत. माणसे आपल्या विषयानुरूप आणि आपल्या आवश्यकतेनुसार यापैकी एक किंवा जास्त प्रकार निवडू शकतात.
- सामूहिक केस स्टडी (Collective Case Study):
यामध्ये व्यक्तींचा समूह किंवा गट यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. संशोधक ठराविक परिस्थितीतील काही व्यक्तींचा अभ्यास करू शकतात किंवा पूर्ण समूहाचा अभ्यास करू शकतात. उदाहरणार्थ समाजशास्त्राचा अभ्यास करणारे हे निरीक्षण करू शकतात की मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे एखाद्या समूहावर काय परिणाम झाले आहेत.
- वर्णनात्मक केस स्टडी (Descriptive Case Study):
या केस स्टडी ची सुरुवात ही वर्णनात्मक सिद्धांतापासून होते. यांनतर विविध विषयांचे निरीक्षण सुरु होते आणि मग जमा केलेल्या माहितीची सुरुवातीच्या सिद्धांताबरोबर तुलना केली जाते.
- स्पष्टीकरणात्मक केस स्टडी (Explanatory Case Study):
ही केस स्टडी सहसा तपासणी करण्यासाठी वापरली जाते. एखादी गोष्ट का घडली किंवा त्यामागे नेमकी काय करणे होती हे जाणून घेण्यासाठी ही पद्धत वापरली जाते.
- शोध केस स्टडी (Exploratory Case Study):
ह्या पद्धतीचा उद्देश एखाद्या घटनेचा सखोल अभ्यास करणे हा आहे. नवीन दृष्टीकोन, सिद्धांत किंवा गृहितके मांडण्यासाठी विशिष्ट प्रकरणांचा तपशीलवार तपास करणे हे यात अपेक्षित आहे.
- इंस्ट्रुमेंटल केस स्टडी (Instrumental Case Study):
एखादी गोष्ट किंवा घटना याबद्दल अंतर्ज्ञान मिळवण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ: मुलांमध्ये लठ्ठपणा किती वाढला आहे ह्याचा अभ्यास करण्यासाठी संशोधक एखाद्या माध्यमिक शाळेतील मुले किती व्यायाम करतात याबद्दल सखोल तपास करू शकतो. यामध्ये ती मुले किंवा व्यायाम यावर जास्त लक्ष केंद्रित नसून लठ्ठपणा वर सगळे लक्ष केंद्रित आहे.
- आंतरिक केस स्टडी (Intrinsic Case Study):
अशा केसेस ज्यामध्ये संशोधकाला वैयक्तिक स्वारस्य असते त्यांना इंट्रिनसिक केस स्टडी असे म्हटले जाते. जीन पायगेट या संशोधकाची स्वतःच्या मुलांबद्दलची निरीक्षणे मानसशास्त्रीय सिद्धांताच्या विकासासाठी कशी मोलाची ठरू शकतात हे आंतरिक केस स्टडीचे उत्तम उदाहरण आहे.
यापैकी आंतरिक, इंस्ट्रुमेंटल आणि सामूहिक केस स्टडी हे प्रकार जास्त वापरले जातात.
केस स्टडी कशी लिहावी: (How to write Case Study?)
- केस स्टडी चा विषय: सर्वात प्रथम आपण कशाबद्दल केस स्टडी लिहिणार आहोत तो विषय ठरवावा. तो वैयक्तिक आहे का सामूहिक, एखाद्या गोष्टीबद्दल आहे का परिस्थितीबद्दल, हे सर्व काळजीपूर्वक आणि तपशीलवार ठरवावे. आपल्या केस ची व्याप्ती काय आहे, त्यासाठी कुठले पुरावे लागणार आहेत आणि या केस स्टडी मधून नक्की काय अपेक्षित आहे या सर्व गोष्टींची यादी केली पाहिजे.
- सखोल अभ्यास: एकदा विषय निश्चित झाला की मग या विषयावर आधी काय संशोधन झाले आहे किंवा काय माहिती प्रकाशित झाली आहे याची तपासणी करावी. ऑनलाईन किंवा लायब्ररी मध्ये जाऊन त्याविषयीचा सखोल अभ्यास करावा. यातील महत्वाची परीक्षणे आपण आपल्या केस स्टडी मध्ये समाविष्ट करू शकतो.
- मुलाखतीची तयारी: विषय ठरल्या नंतर संशोधकाला त्यासंबंधित व्यक्तींची मुलाखत घेण्याची परवानगी दिली जाते. मुलाखती मध्ये सहभागी व्यक्तींना संशोधनाची माहिती दिली जाते आणि त्यासाठी त्यांची संमती घेतली जाते. बऱ्याच वेळा सहभागी व्यक्तींची माहिती हि गोपनीय ठेवण्यात येते. आणि तसा करार करणे गरजेचे असते.
- प्रश्नांची यादी तयार करणे: आपण मुलाखतीत कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारणार आहोत त्याची तयारी आधीच करून ठेवली पाहिजे. मुलाखत वैयक्तिक किंवा टेलिफोन द्वारे सुद्धा घेतली जाऊ शकते. कधी कधी ई-मेल हा सुद्धा पर्याय असतो. प्रश्न असे विचारावे जेणेकरून आपल्याला मुलाखत देणाऱ्यांची मते स्पष्टपणे जाणून घेता येतील. तसेच जी माहिती आधीच्या लेखांमध्ये उपलब्ध नसेल त्याबद्दल जास्त प्रश्न विचारावे.
- संशोधनाच्या पद्धती: संशोधक दोन प्रकारच्या पद्धती वापरू शकतो. एक म्हणजे गुणात्मक ज्यात मुलाखत आणि थेट निरीक्षण असे पर्याय वापरू शकतो. आणि दुसरी म्हणजे परिमाणात्मक ज्यात सर्वेक्षण, प्रश्नावली असे पर्याय उपलब्ध असतात. आपण कुठली पद्धत वापरणार आहोत हे आधीच ठरवले गेले पाहिजे जेणेकरून पुरावे मिळवणे सोपे जाईल.
- माहिती संकलन आणि विश्लेषण: आपण जमा केलेली सर्व माहिती एका ठिकाणी संकलित करावी जेणेकरून केस स्टडी लिहिणे सोपे होईल. माहिती एकत्र केल्यानंतर त्याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. आपण सर्वच संकलित माहिती वापरू शकत नाही. त्यामुळे कुठली माहिती जास्त उपयोगी आहे हे ठरवणे आवश्यक असते.
- संदर्भ आणि संलग्नक जोडा: आपण जेव्हा माहिती जमा करतो तेव्हा ते विश्वसनीय स्रोत आहे ना ह्याची खात्री करून घ्यावी. आणि मग हे स्रोत आपल्या केस स्टडी मध्ये नमूद करणे गरजेचे आहे.
- तपासून घ्या: आपली केस स्टडी पूर्ण लिहून झाल्यावर ती परत एकदा नीट वाचून घ्यावी. त्यात काही लिखाणाच्या, व्याकरणाच्या चुका नाहीत ना ते तपासून घ्यावे. माहिती क्रमवार लिहिली गेली आहे ना हे सुद्धा तपासणे गरजेचे आहे.
केस स्टडी ह्या आपल्याला एखाद्या गोष्टीची किंवा परिस्थीची सखोल आणि समूळ माहिती मिळवण्यात मदत करतात. वास्तविक जगातील उदाहरणे असल्यामुळे ह्या सिध्दांतांपेक्षा जास्त वास्तविक आणि जवळच्या वाटतात. ज्या गोष्टी अन्यथा लोकांना अनुभवता येणार नाहीत अशी गोष्टी त्यांना केस स्टडीच्या माध्यमातून अनुभवता येतात आणि त्यापासून शिकता सुद्धा येते.
आपल्याला ही केस स्टडी बद्दलची माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशा अजून कुठल्या नवीन विषयांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हेही आम्हाला कंमेंट मध्ये जरूर कळवा. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका: नेहा करंदीकर – हुनारी, मालवण