How to write a Movie Review in Marathi: “अरे काय ॲक्टिंग केलीय बघ हिरो ने, एकदम भारी. अख्खा पिक्चर उचलून धरलाय बघ एकट्याने. तसा सगळ्यांनीच अभिनय छान केलाय. पण मधे मधे जरा खूप नाटकी वाटतं रे आणि पटकथा अजून चांगली असती तर मजा आली असती बघ.” हे असं काही एखादा नवीन चित्रपट बघून आल्यावर तुम्ही ओळखीच्या लोकांना सांगता का? म्हणजे तो चित्रपट कसा आहे, आवडला की नाही आवडला? किंवा का नाही आवडला हे तुम्ही सांगता का? जर सांगत असाल तर याचा अर्थ तुम्ही उत्तम समीक्षण करू शकता. म्हणजेच तुम्ही “मुव्ही रिव्ह्यू” लिहू शकता की.! आता तुम्ही म्हणाल तो लिहून करायचं काय.? तर अहो, आजकाल बरेच जण असे रिव्ह्यू लिहून ब्लॉग लिहीतात किंवा युट्यूबवर व्हिडिओ बनवून पोस्ट करतात. हे तुम्ही स्वतः करू शकता किंवा एक कंटेट रायटर म्हणून कोणाला लिहून देऊ शकता. तरीही “मुव्ही रिव्ह्यू” लिखित स्वरूपात कसा लिहावा किंवा एखाद्या चित्रपटाचं समीक्षण साध्या सोप्या भाषेत कसं लिहावं हे जर कळत नसेल तर हा लेख वाचा कदाचित तुमचा गोंधळ थोडा कमी होऊ शकतो.

मुव्ही रिव्ह्यू लिहिण्यासाठी अशी विशिष्ट कोणती पद्धत नसते बरं! तुम्ही तुमच्या खुमासदार खास शैलीत लिहू शकता किंवा अगदी मुद्देसूद मांडणी करून सुद्धा लिहू शकता. फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी, मुद्दे नमूद केले गेले पाहिजेत. आता प्रत्येकाची आवड, निवड, निरिक्षण करण्याची पद्धत ही वेगळी असते त्यामुळे चित्रपटांच्या बाबतीत सुद्धा प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असू शकतं. तुम्हाला तो चित्रपट आवडला की नाही किंवा त्याची कारणं, तुमचं मत तुम्ही या रिव्ह्यू मध्ये लिहू शकता. एखाद्या चित्रपटाचा रिव्ह्यू, त्याबद्दल तुमचं मत म्हणजेच चित्रपट समीक्षण तुम्ही मुद्देसूद किंवा खुमासदार शैलीत जरी लिहायचं ठरवलं तरी काही ठराविक मुद्दे त्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. फक्त हा रिव्ह्यू, हे समीक्षण मोजक्या शब्दांत परंतु तेवढंच रंजकदार पद्धतीने लिहीता आलं पाहिजे.
समीक्षण म्हणजेच रिव्ह्यू लिहिताना आधी वरती चित्रपटाचं नाव, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, निर्माता, प्रदर्शित तारीख आणि दर्जा असा तक्ता लिहावा. नंतर खाली सुरुवातीला चित्रपटाच्या कथेची किंवा विषयाची ओळख करून द्यावी. आता ओळख म्हणजे सरळ कथा सुरू करू नये. ती कथा कोणत्या विषयावर आधारित आहे.? त्यातून कोणता संदेश दिला आहे का.? तर त्याबद्दल थोडं काही लिहून मग सुरूवात करावी.
उदाहरणार्थ, गेल्या महिन्यात “नवरदेव बीएससी ॲग्री” हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. बीएससी ॲग्री ही पदवी मिळवून त्यानंतर गावी येऊन शेती करणाऱ्या एका मुलाची गोष्ट यात आहे. “शेती आणि गाव” अशी निवड असल्यावर त्या मुलाचं लग्न ठरवताना किती अडचणी येतात हे या चित्रपटात दाखवलं आहे. आता या चित्रपटाचा रिव्ह्यू लिहिताना तुम्ही सुरूवातीला हेच लिहू शकता की,
आजकाल गावी राहून शेती व्यवसाय निवडणाऱ्या मुलांची लग्नं ठरवणं अवघड झालं आहे. ते कितीही पैसे कमवत असले तरी मुलींना शेतकरी नवरा नको असतो, बऱ्याचदा मुली तयार असतात परंतु आईवडिलांनाच शेतकरी जावई नको असतो. यावरच आधारित कटू पण सत्य परिस्थितीवर भाष्य करणारा राम खाटमोडे दिग्दर्शित “नवरदेव बीएससी ॲग्री” हा चित्रपट २७ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित झाला आहे. अशी सुरूवात करून पुढे त्या चित्रपटाबद्दल अधिक माहिती वाचकांना सांगावी जेणेकरून त्यांना ठरवता येईल की हा चित्रपट बघावा की बघू नये. आता ती कोणती माहीती ते बघुया.
१. कथानक काय आणि कसं आहे? (How to write a Movie Review in Marathi)
रिव्ह्यू लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्याला वाचकांना चित्रपटाचं कथानक अशा पद्धतीने सांगायचं आहे की त्यांनी पुढे काय होणार हे बघण्यासाठी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला पाहिजे. संपूर्ण कथानक सांगू नये. कथा काय आहे हे मोजक्या शब्दांत लिहावं, पात्रं कोण कोण आहेत, कथा कोणत्या पात्रांभोवती फिरतेय हे सगळं थोडक्यात सांगायचं. जर तो चित्रपट स*स्पे*न्स, थ्रि*ल*र जॉनरचा असेल तर अतिशय थोडक्यात सुरूवातीचं कथानक सांगून पुढे काय होणार, किंवा शेवटी असा ट्विस्ट आहे की तुम्ही विचार पण करू शकत नाही असं लिहून त्यांची उत्कंठा वाढवू तो ट्विस्ट काय हे जाणून घेण्यासाठी चित्रपट बघा असं लिहावं.
जर चित्रपटातून एखाद्या चांगल्या विषयावर काही संदेश दिला असेल, समाजप्रबोधन करणारा चित्रपट असेल तर थोडक्यात कोणत्या विषयावर आधारित कथानक आहे हे सांगावं. रिव्ह्यू फार मोठा होऊ नये यासाठी कथानक थोडक्यात सांगता आलं पाहिजे.
२. मुख्य कलाकार कोण आहेत? अभिनय कसा आहे?
समीक्षण लिहिताना चित्रपटातील सगळ्या कलाकारांची नावं सांगण्याची गरज नाही. मुख्य कलाकार कोण आहेत आणि महत्वाचे सहाय्यक कलाकार कोण आहेत हे सांगावं. मुख्य कलाकारांनी कोणकोणती पात्रं साकारली आहेत हे सांगावं. चित्रपटाची कथा मुख्यपणे कोणाभोवती फिरतेय , मध्यवर्ती भूमिका कोणी साकारली आहे हे लिहा. कोणाचा अभिनय कसा आहे, तुम्हाला तो कसा वाटला ते लिहा. कोणता कलाकार कुठे कमी पडला हे लिहा. एखाद्या जुन्या, अनुभवी कलाकारा बद्दल लिहिताना असं म्हणू शकता की यांच्या अभिनयाबद्दल मी काय सांगावं किंवा यांच्या अभिनयाबद्दल विशेष काही सांगण्याची गरज नाही.
उदाहरणार्थ, एखाद्या चित्रपटात अशोक सराफ आहेत तर अर्थातच प्रेक्षकांना, वाचकांना त्यांचा अभिनय माहीत आहेच त्यामुळे त्यांच्याबद्दल असणारा आदर तुम्ही व्यक्त केला पाहिजे. परंतु नवीन किंवा इतर सहाय्यक कलाकार त्यांचं चित्रपटातील योगदान किती आहे ते नक्की लिहा.
३. कथा-पटकथा कशी आहे? लेखक कोण आहेत?, संवादलेखन कोणी केलंय?
चित्रपटाची कथा कोणी लिहीली आहे, पटकथा आणि संवाद कोणी आणि कसे लिहीले आहेत हे सांगावं. कधी कधी चित्रपटाचा विषय खूप छान असतो, कथा चांगली असते परंतु पटकथा इतकी रटाळ आणि तुकड्या तुकड्यात बांधलेली असते की त्याचा परिणाम चित्रपटावर होतो. कधी चित्रपट संथ गतीने सरकत राहतो तर कधी काही गोष्टी अर्धवट सोडल्यासारख्या वाटतात याचं कारण ती पटकथा तेवढ्या चांगल्या प्रकारे लिहीलेली नसते. तर तुम्हाला ते कळायला हवं की विषय चांगला आहे पण पटकथा कुठेतरी फसलीय आणि ते तसं रिव्ह्यू लिहिताना वाचकांना सांगायला हवं.
दुसरं म्हणजे चित्रपटातील संवाद लेखन सुद्धा महत्वाचं असतं. प्रेक्षकांच्या काळजाला हात घालण्याचं काम हे संवाद म्हणजे तुमच्या भाषेत डायलॉग करतात. तर ते संवाद लेखन कसं आहे ते सांगावं.
४. दिग्दर्शन कसं आहे?
तुम्ही रिव्ह्यू च्या सुरूवातीला दिग्दर्शक कोण आहे हे सांगू शकता. परंतु दिग्दर्शन कसं आहे हे मात्र नंतर सांगाल. थोडं कथानक सांगून मग चित्रपट कसा दिग्दर्शित केला गेला आहे याकडे वळावं. कधी कधी कथा छान असते, कलाकार मंडळी अनुभवी असते परंतु दिग्दर्शन जर चांगलं नसेल तर अर्थातच चित्रपट चांगला आणि उत्कृष्ट दर्जाचा बनत नाही. एखादा चित्रपट, एखादी कलाकृती तेव्हाच चांगली बनते जेव्हा दिग्दर्शक चांगला असतो. दिग्दर्शक हा चित्रपटाचा कणा असतो असं म्हणायला हरकत नाही.
त्यामुळे दिग्दर्शन कसं आहे हे वाचकांना सांगणं महत्वाचं. ते चांगलं नसेल तर ते सुद्धा सांगावं. प्रत्येक दिग्दर्शकाची स्वतःची अशी वेगळी पद्धत , खासियत असते ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे. आणि रिव्ह्यू लिहिताना ते लक्षात ठेवून त्या दिग्दर्शकाच्या काही गोष्टी, गरज वाटल्यास आधीचे गाजलेले चित्रपट नमुद करावेत.
५. संगीत,पार्श्वसंगीत,गीतकार,गायक कोण आहेत?
सिनेमा म्हटलं की गाणी आली, पार्श्वसंगीत आलं. ते जर चांगलं नसेल तरीही चित्रपटावर त्याचा परिणाम होतो. काही चित्रपट तर असे असतात की कथा, दिग्दर्शन सगळं फसतं परंतु गाणी मात्र गाजतात. उदाहरणार्थ, सैराट सारख्या चित्रपटाचं समीक्षण लिहिताना त्यातील गाण्यांबद्दल जास्त लिहावं लागेल. एक परिच्छेद हा त्यातील गाणी, संगीत, पार्श्वसंगीत याबद्दल असेल.
तर तुम्हाला रिव्ह्यू लिहिताना हे सुद्धा बघावं लागणार की चित्रपटातील संगीत पार्श्वसंगीत कसं आहे. ते कोणी दिलंय. गाणी कोणी लिहीली आहेत कोणी गायली आहेत हे सांगितलं तर उत्तम. ती तुम्हाला कशी वाटली ते सांगा. बऱ्याचदा गरज नसताना उगीच भाराभर गाणी असतात तर अशा वेळी लिहू शकता की गाणी नसती तर चित्रपट अजुन आटोपशीर आणि परिणामकारक झाला असता.
६. सिनेमॅटोग्राफी कशी आहे.? लोकेशन्स आवडले तर ते सांगा.
चित्रपटाची कथा चांगली आहे. कलाकार उत्तम आहेत. संगीत छान आहे. सगळं काही छान आहे परंतु सिनेमॅटोग्राफी चांगली नसेल तर मोठ्या पडद्यावर सिनेमा बघताना तेवढी मजा येत नाही. कलाकारांचा अभिनय, प्रसंगानुरूप इमोशन्स नीट दिसले नाही तर तो सीन तेवढा रंजक वाटत नाही.
काही चित्रपटांच चित्रिकरण हे इतक्या सुंदर ठिकाणी केलेलं असतं की ते सौंदर्य तेवढ्याच सक्षमपणे कॅमेरा मध्ये टिपणं गरजेचं असतं. त्यामुळे जर तुम्हाला ती लोकेशन्स, सीन्स आवडले तर ते जरूर लिहा. उदाहरणार्थ, पंचक या चित्रपटाचं चित्रीकरण कोकणात केलं गेलं आहे आणि त्या चित्रपटात कोकणातील ते सौंदर्य बघताना खूप छान वाटतं. किंवा झिम्मा २ हा चित्रपट लंडनमध्ये चित्रित करण्यात आला होता तर तेथील अप्रतिम सौंदर्य त्या चित्रपटाच्या निमित्ताने बघायला मिळालं.
असं जर एखाद्या चित्रपटात तुम्हाला चित्रिकरण केलेली लोकेशन्स आवडली तर त्याबद्दल लिहा. एकंदर सिनेमॅटोग्राफी कशी वाटली ते लिहा.
७. निर्मिती कोणाची आहे?
चित्रपटाचा रिव्ह्यू लिहिताना अर्थातच चित्रपटाचा निर्माता/निर्माती कोण आहे हे लिहा. त्यांच्याबद्दलची काही विशेष, खास माहिती असेल तर ती सांगा.
उदाहरणार्थ, “गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला “पंचक” या चित्रपटाची निर्मिती माधुरी दीक्षित नेने आणि श्रीराम नेने यांची आहे. निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी माधुरी दीक्षित हिने एका मराठी सिनेमाची निवड केली हे विशेष.” असं लिहू शकता.
चित्रपटाचं समीक्षण लिहिण्यापूर्वी तो चित्रपट पाहिल्यानंतर लगेच ते लिहायला घ्या. जमलं तर किमान दोन वेळा तो चित्रपट पाहिला तर उत्तम. परंतु लगेच लिहायला घेतलं तर सगळे मुद्दे आपल्या लक्षात असतात. बारीकसारीक गोष्टी तुम्ही लिहू शकता. चित्रपटात विशेष आवडलेल्या गोष्टी, प्रसंग नमुद करा. काय आवडलं नाही ते सुद्धा लिहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी वाचकांना जरूर सांगा की त्यांनी तो चित्रपट बघावा की नाही. त्यासाठी पाचपैकी तुम्हाला योग्य वाटतील असे रेटिंग / स्टार देऊ शकता. म्हणजेच तुमच्या मतानुसार दर्जा ठरवू शकता जेणेकरून वाचकांना, प्रेक्षकांना तो चित्रपट बघावा की नाही हे ठरवणं सोपं जातं.
जर एखादा अगदीच सुमार चित्रपट असेल तर तसं स्पष्ट लिहा की हा चित्रपट बघून तुमचा वेळ आणि पैसा वाया घालवू नका. एक लक्षात घ्या, वाचकांना, प्रेक्षकांना आता प्रामाणिक रिव्ह्यू ची गरज असते. त्यामुळे तुमचं वैयक्तिक मत काही असलं तरी एखाद्या चित्रपटाकडे एक कलाकृती या दृष्टीने बघून नेहमी प्रामाणिक आणि तटस्थ राहून रिव्ह्यू लिहा. कारण बरेच चित्रपट हे राजकीय, सामाजिक विषयांवर आधारित असतात अशा वेळी तुमचं वैयक्तिक मत आणि आवड त्यात डोकावायला नको.
या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन रिव्ह्यू “Writing a Movie Review in Marathi” लिहू शकता आणि अर्थातच तुमची अशी एक खास शैली असेलच तर छान रंजकदार पद्धतीने तुमचा पहिला वहीला रिव्ह्यू लिहायला घ्या. फार लांबलचक आणि अवघड शब्दांत रिव्ह्यू लिहू नका.
हा लेख (How to write a Movie Review in Marathi), ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अजून अशा कोणत्या प्रकारचे लेख, माहिती वाचायला आवडेल तेही सांगा. असे अजून माहितीपूर्ण लेख वाचायचे असतील तर आमच्या “लेखकमित्र.कॉम” या वेबसाईटला नक्की भेट द्या. आणि आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा.!
धन्यवाद!
लेखिका -आकांक्षा कोलते.
This is informative! thanks