कथा लिहिताना नेमकं कोणतं तंत्र वापरावं?
कथा कशी लिहावी ?: बऱ्याचदा आपल्याला छान कविता सुचते.! चारोळ्या सुचतात.! लेखही छान लिहायला जमतात. परंतु कथा लिहिताना मात्र गोंधळायला होतं. कथेची सुरुवात केली तर शेवट कसा करावा कळत नाही, आणि शेवट माहीत असेल तर सुरूवात कशी करावी ते सुचत नाही. अशी तक्रार किंवा अशी खंत बऱ्याच नव लेखकांकडून ऐकायला मिळते. तुमच्या बाबतीत पण असं होतं का.? की कथा लिहिण्याची इच्छा आहे पण असाच गोंधळ उडतोय. तर हा लेख नक्की वाचा. या लेखात काही छोट्या छोट्या गोष्टी आम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामुळे तुमचा हा गोंधळ थोडा कमी होऊ शकेल.
बऱ्याचदा आपण आजुबाजुला खूप प्रसंग, घटना बघतो. वेगवेगळ्या तऱ्हेचे किस्से ऐकतो. या सगळ्याचा वापर तुमच्या कथेत करू शकता. लेखकाने नेहमी आजुबाजुला चौकस नजर फिरवली पाहीजे. निरिक्षण केलं पाहिजे. जे इतरांना दिसत नाही ते टिपता आलं पाहिजे. आणि अर्थातच या सगळ्याचा वापर कथा लिहिताना करता आला पाहिजे. अशा निरिक्षणांमधून तुम्हाला तुमच्या कथेची पात्र मिळतात, एखादी गोष्ट सापडते. आणि अर्थातच या सगळ्यासोबत कल्पनाशक्तीचा सुद्धा वापर करता आला पाहिजे. बऱ्याचदा मनातल्या मनात एखादी गोष्ट सुचते, पात्रं सुचतात परंतु कथा लिहायला सुरुवात केली की मात्र गाडी अडकते.

तर कथा लिहिताना काही गोष्टी, काही तंत्र ही आवर्जून पाळावी लागतात. आता त्या कोणत्या गोष्टी आहेत हे आपण एक एक करून बघू.
कथा लिहिताना महत्वाचे घटक:-
१. कथानक :-
एक लक्षात घ्या, कथा लिहिताना कथानक हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला डोक्यात हे ठरवायला हवं की आपण काय गोष्ट सांगणार आहोत किंवा कथेत काय घडतंय असं सांगणार आहोत. ते एकदा ठरलं की पुढची मांडणी करणं सोपं जातं. कथानक जेवढं रंगतदार असेल, कथेतील पात्रं जेवढी खरी वाटतील तेवढे वाचक त्या कथेमध्ये गुंतून राहतील.
तुम्हाला आधी हे ठरवायचं आहे की कथेचा आशय काय आहे. तुमची कथा विनोदी आहे, की भयकथा आहे की सामाजिक कथा आहे त्यानुसार तसं कथानक, त्या प्रकारचे संवाद अपेक्षित असतात. (कथा कशी लिहावी)
कथानक अशाप्रकारे मांडता आलं पाहिजे की ती कथा शेवटपर्यंत वाचण्यासाठी वाचणाऱ्याची उत्कंठा राहीली पाहिजे ,किंबहुना ती वाढली पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही पात्रांमधील संवाद लिहून कथेची सुरुवात करू शकता. मग पुढे आठवणी आठवण्याचा निमित्ताने भुतकाळात घडलेले प्रसंग मांडू शकता. एखादं मुख्य पात्र घेऊन त्याभोवती कथानक गुंफू शकता. वाचकांना तुमच्या कथेतील विश्वात रमता आलं पाहिजे.
२. पात्रं
एकदा का गोष्ट काय आहे हे ठरल्यावर पात्रं ठरवा. जर तुम्ही पहिल्यांदा कथा लिहायला घेताय तर प्रयत्न करा की कथा छोटी असेल आणि कथेतील पात्रं कमी असतील. जेवढी पात्रांची संख्या जास्त असेल आणि जर तुम्हाला ती नीट मांडता आली नाही तर वाचकांचा गोंधळ उडतो आणि ते कथा अर्धवट वाचून सोडून देतात. त्यामुळे मोजकी पण महत्वपूर्ण पात्रं असावीत. आणि महत्वाचं म्हणजे संपूर्ण कथानक त्या पात्रांभोवती फिरणार असावं. पात्राच्या भावना समजतील इतक्या ओघवत्या शैलीत ते कथानक मांडता आलं पाहिजे. एकदा का ते पात्रं वाचकांना जिवंत वाटलं, ओळखीचं वाटलं की वाचक कथेमध्ये गुंतून जातो.
यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पात्रांची नावे. तुमचं कथानक कुठे आणि कोणत्या काळात घडतंय त्यानुसार पात्रांची नावे ठेवा.
३. भाषाशैली
आता तुमची कथा कुठे घडतेय त्यानुसार कथेची किंवा त्यातील पात्रांची भाषा असावी. म्हणजे जर कथेमधील गोष्ट एखाद्या खेडेगावात घडतेय आणि जर तुम्ही पात्रांचे संवाद लिहित असाल तर अर्थातच पात्रांची भाषा ही ग्रामीण बाज असलेली एखादी बोलीभाषा असावी.
किंवा जर तुमची कथा शहरात घडतेय तर तशी शहरी भाषा वापरू शकता. तुमची पात्रांची पार्श्वभूमी बघून म्हणजेच त्यांचं वय, त्यांचा स्वभाव ती कुठे राहतात, कुठे आणि काय काम करतात त्यानुसार त्यांची भाषा ठरवावी. उदाहरणार्थ, तुमच्या कथेतील पात्र तरूण असेल, एखाद्या बॅंकेत किंवा एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत आहे असं दाखवलं असेल तर त्याप्रमाणे तो सुशिक्षित आसल्यासारखे त्याची भाषा किंवा संवाद असावेत.
कथा लिहिताना आपला शब्दसंग्रह सुद्धा चांगला असणं गरजेचं आहे. खूप अलंकारिक भाषा वापरायला हवी असं काही नाही परंतु शब्दसंपदा चांगली असेल, तर कथा रसदार पणे लिहिता येते.
४. कथेची मांडणी (कथा कशी लिहावी)
कथेची मांडणी म्हणजेच तुमच्या कथेची सुरुवात कशी करणार, मध्यभागी काय लिहीणार आहात आणि शेवट कसा करणार आहात हे सुद्धा सुरूवातीला ठरवून घेतलं की त्याप्रमाणे कथा लिहिणं सोपं जातं. सुरूवातीला तुम्ही वातावरण निर्मिती करण्यासाठी एखाद्या जागेचं, व्यक्तीचं किंवा प्रसंगाचं वर्णन करू शकता. किंवा मग सरळ दोन व्यक्तींमधील संवाद किंवा एखाद्या पात्राचं स्वगत याने सुद्धा सुरूवात करू शकता.
कथेच्या मध्यभागी गोष्ट कशाबद्दल आहे हे वाचकांना कळायला हवं. पुढे काय घडणार याचे वाचक अंदाज लावतील, विचार करतील असा कथेचा गाभा असायला हवा. सगळ्यात महत्त्वाचं जर कथेमधील एखादं पात्र भुतकाळ सांगत असेल तर तो भुतकाळ आणि कथेतील वर्तमानकाळ याची सांगड घालता आली पाहिजे. नाहीतर वाचकांना कधी काय घडतंय याचा अंदाज लागत नाही.
आणि अर्थातच कथेचा शेवट हा महत्त्वाचा घटक आहे. कथेच्या शेवटी एखादा ट्विस्ट असेल तर वाचकांना ते वाचायला आवडतं. कथेचा शेवट नेहमी गोड करावा असं काही नाही. कधी कधी कथेचा शेवट हा मनाला चुटपुट लावणारा असला की पुढे कित्येक दिवस ती कथा डोक्यात राहते. त्यामुळे कथेचा आशय असेल त्यानुसार शेवट करावा.
५. निवेदक
तर आता निवेदक किंवा निवेदन म्हणजे काय.? तर कथा सांगणारा, तुमच्या कथेत काय घडतंय हे वाचकांना सांगणारा हा निवेदक असतो. आता निवेदक हा प्रथमपुरूषी आहे की तृतीयपुरूषी आहे हे कथा लिहिताना लेखकाने ठरवायला हवं.
प्रथमपुरूषी निवेदक म्हणजे लेखक स्वतः ते कथानक आपल्याला सांगत असतो किंवा एखादं पात्र स्वतःची कथा सांगत आहे असं वाचताना वाटतं, तो प्रथमपुरूषी निवेदक. आणि त्याउलट तृतीय पुरूषी निवेदक हा संपूर्ण कथेमध्ये सगळ्या ठिकाणी असतो. तुमची कथा कुठे घडतेय, कशी घडतेय, तेव्हा दिवस आहे की रात्र आहे, थंडी आहे की पाऊस आहे.? हे सगळं वर्णन आपल्याला तृतीयपुरूषी निवेदक सांगत असतो. इतकंच काय तर एखाद्या पात्राच्या मनाची घालमेल, त्याच्या अंतर्मनातील भावना सुद्धा हा तृतीयपुरूषी निवेदक सांगत असतो.
पात्रांचे संवाद लिहिले तरी कथेची पार्श्वभूमी सांगणारा, वातावरण निर्मिती करणारा निवेदन करणारा निवेदक कोण आहे म्हणजेच कथा कोण सांगत आहे हे लेखकाने आधीच ठरवून घ्यावं.
६. वातावरण निर्मिती
कथेमध्ये वातावरण निर्मिती हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वर म्हटल्याप्रमाणे कथा कुठे आणि कशी घडतेय याचसोबत कोणत्या परिस्थितीत, वातावरणात घडतेय याचं वर्णन जेवढं रसाळ भाषेत तुम्ही कराल तेवढी ती कथा वाचकांना खरी वाटते.
उदाहरणार्थ, कथा जर एखाद्या गावात घडतेय तर गावात कुठे घडतेय म्हणजे शेतात, शाळेत, एखाद्या एस. टी स्टॅण्डवर किंवा दवाखान्यात त्या जागेचं वर्णन म्हणजेच स्थळ कोणतं हे सांगणं, तिथल्या माणसांचं वर्णन म्हणजेच स्वभाव, पेहराव, भाषा कशी आहे हे सांगणं, कथा कधी घडतेय म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ हे सांगणं म्हणजे वातावरण निर्मिती. अशाप्रकारे कथेतील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची माहिती देणं, तो काळ, तो प्रसंग जिवंत करणं म्हणजे वातावरण निर्मिती. ही तुम्हाला छान जमली की कथा वाचताना ती जागा, पात्रं सगळं खरं वाटतं.
जमल्यास कथेचं स्वरूप असेल त्याप्रमाणे आणि प्रसंगानुरूप मधे मधे गाण्यांच्या ओळी, किंवा शायरी, चारोळ्या लिहाव्या. यामुळे कथेचा प्लॉट म्हणजेच कथानक रंगतदार होतं.
७. शिर्षक
हा सगळ्यात शेवटचा छोटासा घटक आहे पण महत्वपूर्ण आहे. कधी कधी तुमच्या कथेच्या शीर्षकावरून सुद्धा वाचक ठरवत असतात की ही कथा वाचायला हवी. शिर्षक फार फार तर दोन शब्दांत लिहा. परंतु सलग तीन चार शब्द लिहून एखाद्या वाक्या सारखं शिर्षक नसावं. कथेतील मुख्य पात्राचं नाव सुद्धा तुम्ही कथेचं शिर्षक म्हणून लिहू शकता.
या सगळ्या गोष्टींचा विचार करून मनात आधी कथानक रचून त्यानुसार पात्रं निवडून तुमची कथा लिहायला घ्या. आणि अर्थातच भरपूर वाचन करा जेणेकरून तुमची शब्दसंपदा वाढेल, जेवढी शब्दसंपदा जास्त तेवढी कथा रसाळपणे लिहीता येते. आणि हो, तुमची कथा लिहून झाली की आम्हाला नक्की कळवा.
कथा कशी लिहावी हा लेख तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाप्रकारची अजून माहिती हवी असेल, असे अजून माहितीपूर्ण लेख वाचायचे असतील तर आमच्या “लेखकमित्र.कॉम” या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा.!
धन्यवाद!
लेखिका -आकांक्षा कोलते.
छान माहितीपूर्ण लेख
धन्यवाद सर, फारच उपयुक्त माहितीपूर्ण
नवीन लिहिणाऱ्यांना तसंच जे आधीपासून लिहितात, त्यांच्यासाठीही खूप उपयुक्त माहिती.. धन्यवाद.
कथा लेखनाविषयी छान आणि सविस्तर माहिती दिली आहे.
खूप छान माहिती मिळाली
उपयुक्त माहिती.
खूपच माहिती पूर्ण आहे.
मस्त सांगितले कथा लेखन मंडणीबद्दल !