भारतीय संस्कृतीत असलेल्या चातुर्मासाची माहिती व महती
चार्तुमास म्हणजे चार महिने. मास म्हणजे महिना. हिंदू धर्मातील परंपरेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी ते कार्तिक महिन्यातील शुक्ल एकादशी हे चार महिने चातुर्मासातील आहे. तर जैन धर्माच्या परंपरेमध्ये चातुर्मासाचा कालखंड आषाढ शुक्ल चतुर्दशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. या चार महिन्यांचे भारतीय सण आणि उत्सव परंपरेमध्ये विशेष महत्त्व आहे. धार्मिक दृष्ट्या सुद्धा याला महत्त्व आहे. पुरातन कालपासून भारतातील सगळ्याच प्रांतांमध्ये चातुर्मासाला मानले जाते.
तर, भारतीय संस्कृतीत असलेल्या चातुर्मासाची माहिती व महती information and importance of chaturmas in hindu religion या लेखांमध्ये आपण चातुर्मासा बद्दल माहिती बघूया.
चातुर्मासाचा कालावधी—साधारणतः आषाढ महिन्याचे वीस दिवस श्रावण भाद्रपद अश्विन या तीन महिन्यांचे सगळे दिवस, कार्तिक महिन्याचे अकरा दिवस असा एकूण चातुर्मासाचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये एकंदरीत भारतीय उपखंडात पावसाळा हा ऋतू सुरू असतो.
ज्या दिवशी चातुर्मास सुरू होतो, त्या दिवशी आषाढी एकादशी असते. या दिवशी देव पुढच्या चार महिन्यांकरता निद्रिस्त होतात. अशी आख्यायिका आहे. म्हणून त्याला देवशयनी एकादशी असे म्हणतात. तर चातुर्मास हा कार्तिक शुद्ध एकादशीला संपतो, त्यादिवशी देव उठतात असे म्हणतात. या एकादशीला देवउठनी एकादशी असे म्हणतात.
हिंदू कालगणनेनुसार श्रावण भाद्रपद अश्विन या महिन्यात जर अधिक मास आला तर चातुर्मास पाच महिन्यांचा होतो.
कृषी परंपरेनुसार जेष्ठामध्ये पेरणी होते, आषाढात देव शयनात जातात. अश्विन महिन्यात पिकांची तोडणी होते. कार्तिका मध्ये पिकांची मळणी होऊन देव जागे होतात असे म्हटले जाते.
हिंदू धर्मात चातुर्मासामध्ये विवाह मुहूर्त नसतात.
चातुर्मासातील व्रत उपासना—-या काळात अनेक प्रकारचे व्रत आणि उपासना केल्या जातात. या काळामध्ये ईश्वर निद्रा घेत असल्यामुळे असुरांचे राज्य येते. म्हणूनच त्यांची प्रबळता नष्ट करण्यासाठी पृथ्वीवर व्रत्त वैकल्य केले जावे असे पुराणांमध्ये सांगितले आहे. पूजा, व्रत वैकल्य करून पुण्य ग्रहण करावे असे संकेत आहेत.
वार्षिकांश्चतुरो मासान् वाहयेत् केनचिन्नरः ।
व्रतेन न चेदाप्नोति किल्मिषं वत्सरोद्भवम् ।।
म्हणजेच चातुर्मासामध्ये प्रत्येक माणसाने काही ना काहीतरी व्रत केले पाहिजे असे पुराणांमध्ये सुचित केले गेले आहे.
पण हिंदू धर्मात जे 16 संस्कार सांगितले गेले आहेत ,त्यापैकी विवाह, उपनयन, गोदान अशा प्रकारचे संस्कार केले जात नाहीत. असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. भागवत पुराणामध्ये विष्णूंच्या निद्रेला हरीशयन असे म्हटले जाते. संस्कृत मध्ये हरीला सूर्य चंद्र असा सुद्धा अर्थ प्राप्त झालेला आहे. म्हणजेच हरीशयन म्हणजे ढगांमुळे चंद्र आणि सूर्य न दिसणे असाही होतो. या काळामध्ये आकाशामध्ये ढग असल्यामुळे चंद्र आणि सूर्य बऱ्याच काळ दिसत नाहीत.

या काळामध्ये पाऊस पडत असल्यामुळे पूर्वीच्या काळी कोणीही प्रवास करत नसत. म्हणूनच एका जागी राहून व्रत वैकल्ये करण्याचा प्रघात पडला.
चातुर्मासात पाळावयाचे नियम—
१) या काळामध्ये पाऊस पडत असल्यामुळे पचन मंदावले असते. त्यामुळे शक्यतो कांदा लसूण खाऊ नये.
२) जमल्यास एकभुक्त राहावे म्हणजेच एक वेळेसच खावे.
३) केळाच्या पानावर भोजन करावे अथवा कुठल्याही पानावर भोजन करावे त्यामुळे पचन लवकर होण्यास मदत होते.
४) एक वाढी जेवण करणे म्हणजे एक वेळेसच सर्व वाढून घेऊन मग ते जेवण जेवणे.
चातुर्मासात साजरे होणारे सण–
१) देवशयनी एकादशी
२) गुरुपौर्णिमा
३) दीप अमावस्या
४)पोळा
५) जिवती पूजन
६) नागपंचमी
७)नारळी पौर्णिमा
८) हरितालिका
९) गणपती, गौरी पूजन
१०)नवरात्र
११)दिवाळी, तुलसी विवाह
१२)देव उठनी एकादशी अर्थात कार्तिक एकादशी
असे बरेच सण आणि उत्सव चातुर्मासात साजरे केले जातात.
या वर्षा ऋतूमध्ये अनेक प्रकारचे फुलं, फळ,पत्री निसर्गामध्ये उपलब्ध असतात. त्यांचा वापर परमेश्वराच्या चरणी अर्पण करण्यासाठी केला जातो.
या कालखंडामध्ये पितृ पंधरवडा सुद्धा साजरा केला जातो. यावेळी आपल्या पितरांना तर्पण करून मुक्तीसाठी प्रार्थना केली जाते.
चातुर्मासात श्रावण महिना हा विशेष मानला जातो. या महिन्यात पूजा, पाठ, भजन, कीर्तन, नामस्मरण याला महत्त्व आहे.
चातुर्मासात काय वर्ज्य करावे—
१)अन्नामध्ये–कांदा, लसूण, वांगी, कोहळा, बोरे, आवळे, मुळा, कलिंगड, विष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसूर, पावटा,
२) मंचकावर शयन
३) विवाह अथवा तत्सम कार्य
४) धर्मग्रंथानुसार ब्राह्मणाने एकाच जागी दोन मास तरी रहावे असे सांगितले आहे.
चातुर्मासात काय वर्ज्य नाही—
१) यज्ञाच्या वेळी जे अन्न चालते ते.
२) तांदूळ, मूग, जव, नारळ, दूध, दही, फणस, आंबा, केळी हे सारे पदार्थ सत्व गुण संपन्न असतात.
चातुर्मासामध्ये केली जाणारी व्रते–
१) या काळामध्ये तुळशीची पूजा केली जाते. चार महिने तुळशीजवळ रोज दिवा लावून हळदीकुंकू लावून तिला पुजले जाते.
२) श्रावणी सोमवारी उपास करून शंकराला शिवामूठ अर्पण करणे.
३) श्रावण शुक्रवारी जिवती पूजन करणे.
४) विष्णूंना नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्नग्रहण न करणे.
५) श्रावण महिन्यात केला जाणाऱ्या व्रताला शाक व्रत म्हणतात यात शेपू आणि मेथीची भाजी खात नाही.
६) भाद्रपद महिन्यात येणाऱ्या व्रताला दही व्रत असे म्हणतात या व्रतात दही खात नाही.
७) अश्विन महिन्यात येणाऱ्या व्रताला शिरा व्रत म्हणतात. या व्रतात दूध आणि दुधाचे पदार्थ खात नाहीत.
८) कार्तिक महिन्यात येणाऱ्या व्रतात द्विदला व्रत असे म्हणतात या व्रतालत उडद डाळ खात नाही.
९) चातुर्मासात एकूण आठ एकादशी येतात त्या एकादशीला अन्नग्रहण न करता संपूर्ण उपवास केला जातो.
१०) या काळात अनेक धार्मिक ग्रंथांचे पारायण केले जाते जसे ज्ञानेश्वरी, भागवत इत्यादी.
११) या काळात नवविवाहित वधू मंगळागौरीचे व्रत करते.
चातुर्मास साजरा करण्यामागची वैज्ञानिक कारणे–
१) या काळात पाऊस पडत असतो. यज्ञ ,हवन केल्यामुळे वातावरणात बदल होतो.
२) वातावरणात ओलावा असतो, त्यामुळे वातावरणात लहान लहान कृमी घटक असतात. यज्ञ केल्यामुळे त्यांचा नाश होतो.
३) या काळात मानवाची प्रतिकारशक्ती कमी झाली असते म्हणूनच एक वेळ जेवण केले जाते.
४) उपवास जप,तप, पूजा मौन, ब्रह्मचर्य यामुळे माणूस स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकतो.
५) आहारात ज्या पदार्थांमध्ये तमोगुण आहेत ,ते न खाल्ल्यामुळे मनुष्य सत्वगुणांकडे वळतो.
६) चातुर्मासामध्ये अनेक व्याख्यान भजन कीर्तन यांचे आयोजन केले जाते त्यामुळे मनुष्य आध्यात्मिक मार्गाकडे वळतो.
७) अनेक धर्मग्रंथ या काळात वाचले जातात. त्यामुळे ज्ञानात भर पडते तसेच अध्यात्मिक वृत्ती सुद्धा वाढते.
जैन धर्मात चातुर्मास साजरा करण्याची पद्धत–
जैन धर्मातील साधू आणि तपस्वी बायका या कालखंडाला वर्ष योग असे म्हणतात. या कालखंडात वातावरणात अतिशय लहान लहान किडे असतात म्हणून हे सगळेजण चार महिने समूहात राहतात. मौन व्रत धारण करतात व तपश्चर्या करतात. हे साधू एकत्रित येऊन अनेक घरांमध्ये जाऊन जैन धर्माबद्दल माहिती देतात व भाषण करतात. कर्मयोग आणि योग साधने बद्दल माहिती देतात. भाद्रपद महिन्यात त्यांचा पर्युषण नावाचा मोठा पर्व असतो. यावेळी सगळे जैन लोकं आपल्या आत असणाऱ्या षड्विकारांचे दमन करतात. जैन मंदिरात नियमित विधी होतात. जैन तीर्थंकर याबद्दल माहिती दिली जाते. उत्सवाचा शेवटचा दिवस अनंत चतुर्दशीच्या दिवशी असतो. या दिवशी जैन धर्मीय मिरवणूक काढतात. क्षमा वाणी दिगंबर जैन धर्मियांच्या द्वारे अनंत चतुर्दशीच्या एक दिवस नंतर पाळली जाते. तर श्वेतांबर धर्मीय त्याच्या एक दिवस नंतर पाळतात. जैन धर्मीय त्यांनी केलेल्या चुकांची क्षमा मागतात. दिवाळी साजरी केल्यानंतर कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवशी जैन धर्मीय नवीन वर्ष साजरे करतात. कार्तिकातला पाचवा दिवस ज्ञानपंचमी म्हणून साजरा करतात.
अशाप्रकारे हिंदू धर्मीयांमध्ये कार्तिक महिना आला की कार्तिक स्नान केले जाते तुळशी विवाह साजरा केला जातो आणि शेवटी कार्तिक शुद्ध एकादशीला देव उठणी एकादशी साजरी केली जाऊन चातुर्मासाचा काळ संपतो. विविध व्रत, उपवास, पूजा, धर्मग्रंथ वाचन, किर्तन भजन, पारायण इत्यादी अनेक परमेश्वराच्या सेवेचा लाभ घेऊन सगळ्यांनाच उत्साह आलेला असतो. मनुष्याची अध्यात्मिक वाटचाल चालू होते. हे सगळे संस्कार पिढ्यांनं पिढ्या आपला वारसा चालवत असतात. यातच हिंदू धर्माचे मोठेपण सामावले आहे.
भारतीय संस्कृतीत असलेल्या चातुर्मासाची माहिती व महती
information and importance of chaturmas in hindu religion हा लेख आपल्याला कसा वाटला हे आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला भेट देऊन नक्की वाचा व आपल्या प्रतिक्रिया द्या. तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा व आमच्या व्हाट्सअप चॅनलला पण जॉईन व्हा. धन्यवाद!
लेखिका– वैशाली देव( पुणे)
Very informative article.
Very informative article.
खूप छान माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.
खूप छान माहिती.
चातुर्मासाची छान आणि शास्त्रोक्त माहिती.