भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेचे महत्त्व

WhatsApp Group Join Now

भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेचे महत्त्व

भारतीय संस्कृती सनातन आहे. अनेक सणवार, उत्सव भारतामध्ये साजरे केले जातात. प्रत्येक सण आणि उत्सवाचं स्वतःच असं एक महत्त्व आहे. हे सण माणसा माणसांना जोडतात. आणि आपल्या संस्कृतीचं महत्त्व टिकवून ठेवतात. तसेच या सणांचं निसर्गाशी काहीतरी नातं आहे. म्हणूनच ही संस्कृती आजपर्यंत जिवंत आहे आणि प्रत्येक पिढी त्याचं रक्षण करते आहे.

या उत्सवांमध्ये अतिशय महत्त्वाचा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमेचा असतो.अध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गुरुचे पूजन केले जाते.

 गुरु हा मार्गदर्शक असतो आणि पौर्णिमा हा प्रकाशाचा दिवस म्हणूनच गुरूकडून मिळणाऱ्या ज्ञानाच्या प्रकाशाचा आपल्या जीवनात उपयोग करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे या दिवसाचे महत्त्व आहे.गुरु शिवाय आपल्याला ज्ञान मिळत नाही. गुरु साठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. म्हणूनच गुरु करता हा श्लोक म्हटला जातो. 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।

गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।

गुरु पौर्णिमा कधी साजरी केली जाते?

आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. याच दिवशी महर्षी वेद व्यासांचा जन्म झाला आहे. महर्षी वेद व्यासांनी अनेक धर्मग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी वेदाचे चार भाग केले आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. वेदव्यासांनी महाभारताची पण रचना केली आहे व आपल्या संस्कृतीला नीतीशास्त्र, औषध शास्त्र, आहारशास्त्र, युद्धशास्त्र अशा अनेक शास्त्रांचे ज्ञान दिले. म्हणून ते थोर गुरु आहेत.भारतीय संस्कृतीचे ते शिल्पकार आहेत. म्हणूनच त्यांच्या जन्माच्या दिवशी गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. गुरु म्हणजे अज्ञान आणि अंधकार दूर करणारा जीवनातील प्रकाश असतो.

याच दिवशी गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन दिले असे मानले जाते.

या दिवशी शाळा, कॉलेज व विविध आश्रम, मंदिर या ठिकाणी गुरुचे पूजन केले जाते.

गुरु पौर्णिमेचे महत्त्व—

गुरु हे एक तत्त्व असतं. गुरु म्हणजे व्यक्ती पूजा नाही. 

भारताच्या वैदिक परंपरांमध्ये व्यक्तिपूजे ऐवजी तत्त्व पूजेला थोर मानले गेले आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेला गुरु या तत्त्वाला नमन केले जाते. मी कोण किंवा मी कुठून आलो असे प्रश्न साधारणतः सगळ्यांनाच पडत असतात. आध्यात्मिक गुरु आपल्याला हे प्रश्न सोडवण्याकरता मदत करतात.

१)हिंदू धर्मामध्ये गुरू पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे. पूर्वीच्या काळी वेद शिकण्यासाठी गुरूंच्या आश्रमामध्ये विद्यार्थी जात असत. त्यांचे शिक्षण पूर्ण झाले की गुरुप्रती आदर दाखवण्यासाठी तसेच गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. प्राचीन काळापासून गुरूंचे खूप महत्त्व आहे. गुरु शिवाय ज्ञान नाही आणि मुक्ती नाही. असे आपल्या धर्मामध्ये मानले जाते. म्हणूनच त्यांच्या प्रति कृतज्ञता दाखवण्याचा हा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. हिंदू धर्म, बुद्ध धर्म आणि जैन धर्मीयांमध्ये हा सण साजरा केला जातो. योगिक परंपरेमध्ये शिवाला आदी गुरु म्हंटले आहे. त्यांनी सप्तर्षींना ज्ञान दिले होते.

२) आत्मज्ञान झाल्यानंतर गौतम बुद्धांनी पाच भिक्खूंना याच दिवशी ज्ञान दिले होते. यांना पंचवर्गीय भिक्षू म्हणून ओळखले जाते. जिथे जिथे बुद्ध धर्म मानला जातो त्या त्या देशात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. भारत, श्रीलंका, कंबोडिया, थायलंड, लावोस या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. 

३) जैन धर्मात सुद्धा गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. जैन धर्मातील गुरु या दिवशी आपल्या शिष्याला ज्ञान देतात व शिष्य त्यांची पूजा करतात व आशीर्वाद घेतात.

गुरु शिष्यांचे उदाहरण–

प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये उत्तम गुरु आणि त्यांचे उत्तम शिष्य अशा अनेक जोड्या आहेत. 

१) कृष्ण- अर्जुन—महाभारतामध्ये अर्जुन जेव्हा लढण्यासाठी मागेपुढे पाहत होता. तेव्हा कृष्णाने गीता सांगून त्याचे गुरू पद स्वीकारले आणि त्याला जीवन विषयक मार्गदर्शन केले. अर्जुन सुद्धा कोटीचा शिष्य होता.

२) एकलव्य- द्रोणाचार्य–महाभारतामध्ये द्रोणाचार्यांकडून एकलव्याला युद्ध कला शिकायची असते पण ते त्याला तो राजपुत्र नसल्यामुळे नाही म्हणतात. पण तो  त्यांचा पुतळा समोर ठेवून युद्ध कले मध्ये पारंगत होतो. असे शिष्य आणि असे गुरु आपल्याला क्वचितच बघायला मिळतात.

३) रामदास स्वामी -शिवाजी महाराज—हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याकरता शिवाजी महाराजांनी रामदास स्वामी  यांचा अनुग्रह घेतला होता आणि रामदास स्वामी त्यांना आवश्यक त्या गोष्टींचे ज्ञान देत होते. 

यश संपादन करण्यासाठी शिष्याला अखंड साधना करावी लागते. त्यासाठी गुरूला संपूर्ण शरण जावे लागते. गुरु सुद्धा स्वतःच्या हाती काहीही न राखता शिष्याला संपूर्ण ज्ञान प्रदान करतो.

४) रामकृष्ण परमहंस– स्वामी विवेकानंद–स्वामी विवेकानंदांसारखा बाणेदार, धर्माला अनुसरून वागणारा शिष्य तयार करण्यात  रामकृष्ण परमहंस यांचा सिंहाचा वाटा आहे.

५) रमाकांत आचरेकर –सचिन तेंडुलकर—हे उदाहरण आपल्याच काळातले आहे. सचिन तेंडुलकर सारखा धुरंदर क्रिकेट वीर तयार होण्यामागे रमाकांत आचरेकर सरांचे शर्थीचे प्रयत्न आहेत.

गुरु पौर्णिमा कशी साजरी केली जाते—

१) त्या दिवशी सर्वप्रथम सकाळी घर स्वच्छ केले जाते. स्वच्छता आटोपल्यावर स्वच्छ स्नान करावे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी स्नान करावे. घरातील देव्हाऱ्यातील देवाची व्यवस्थित पंचोपचारे पूजा करावी.

२) घरातील पूर्व पश्चिम दिशेकडे एक लहान व्यासपीठ तयार करावे. त्यावर हळदीकुंकवाने बारा रेषा ओढाव्या. रेषा या दक्षिणोत्तर अथवा पूर्व पश्चिम असल्या पाहिजे.

३) त्यावर एक मंत्र लिहावा.तो आहे “गुरुपरंपरा प्रित्यर्थम व्यासपूजा करिष्ये”.

४) त्यानंतर दश दिशांना अक्षता टाकाव्यात.

५) त्यानंतर  विश्वाचे निर्मितीकार ब्रम्हा, व्यास, शुकदेव आणि गोविंदाचार्य यांची मंत्राने पूजा करावी.

६) त्यानंतर आपल्याला ज्या गुरूंनी मंत्र दीक्षा दिली आहे त्यांच्या प्रतिमेचे आणि  पादुकांचे पूजन करावे. ओम गुरुभ्यो नमः या मंत्राचे पठण करावे मनोभावे नमस्कार करून त्यांना गुरुदक्षिणा द्यावी. या दिवशी गुरुदक्षिणेचे खूप महत्त्व असते.

७) शाळा, महाविद्यालय किंवा इतर ठिकाणी जिथे आपण गुरुचे स्थान म्हणतो अशा प्रत्येक ठिकाणी त्या दिवशी गुरूंचे पूजन  करायचे असते किंवा केले जाते. फक्त त्याचे स्वरूप वेगवेगळे असते.

८) या दिवशी आई-वडील किंवा मोठे भाऊ बहीण यांचेही पूजन केले जाते कारण आपण जीवनामध्ये त्यांच्याकडूनच खूप काही शिकत असतो. आपल्या संस्कृतीत मातृदेवो भवः, पितृदेवो भवः असे म्हटले जाते.

९)  वस्त्रं, फुलं, फळ आणि गुरुदक्षिणा देऊन त्यांचे पूजन केले जाते.

१०) या दिवशी गुरूंचा आशीर्वाद मिळणे गरजेचे असते. त्या आशीर्वादानेच आपण आपल्या जीवनामध्ये यश संपादित करायचे असते.

११) अशा तऱ्हेने आपण  आपल्या जीवनामध्ये ज्यांना गुरु म्हणून स्थान दिले आहे त्यांचे पूजन मनापासून करावे. व त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. 

मोठ्यांना नमन करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे असे आपले संस्कृती नेहमी सुचित करते. कारण आपण नेहमीच त्यांच्याकडून काहीतरी शिकत असतो. अशाच गुरुजनांना नमन करून जीवनाची वाटचाल योग्य दिशेने करावी.

गुरु पौर्णिमेचे महत्त्व importance of guru purnima in marathi हा लेख वाचण्यासाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला जरूर भेट द्या व लेखाला जरूर प्रतिक्रिया द्या. आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा आणि आमचे व्हाट्सअप चॅनेल पण जॉईन करा धन्यवाद!

5 thoughts on “भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेचे महत्त्व”

  1. Chandralekha Dhairyasheel Jagdale

    गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🌹.

  2. किशोर गोलतकर, मुंबई

    फारच छान. गुरुबद्दल सर्व समावेशक माहीती वरील लेखात सादर केली आहे..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top